आपल्याला काही शिकायचं आहे का?

विवेक मराठी    14-Apr-2020
Total Views |
 

शहर असो वा गावसगळीकडे हवा एकदम स्वच्छ झाली आहेत्याचं एकमेव कारण म्हणजे वाहनंउद्योग यातून होणारं ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण लक्षणीयरीत्या कमी झालंयमाणसाने अगदी गटार करून टाकलेल्या नद्या स्वच्छ होत आहेतअगदी गावपातळीवरील लहान लहान नद्याच नव्हेतर अगदी उल्हास नदी ते गंगा नदी सगळीकडे पाणी स्वच्छ होतंयअगदी गंगेचं पाणी थोड्याशा प्रक्रियेनंतर पिण्यायोग्य होऊ शकतंयावर कोणाचा विश्वास बसला असतामाणूस गप्प बसल्यावर अगदी शहरातही किती पक्षी दिसायला लागलेरोज पहाटे त्यांचा किलबिलाट होऊन जाग येणं किती आनंददायक असतंहे शहरातल्या नवीन पिढीलाही सहज कळायला लागलंय.



impact  lockdown  environ

माझं एकूण काम आणि कार्यक्षेत्र लक्षात घेता, माझा दिवस त्या दिवशीच्या आखलेल्या कामाप्रमाणे सुरू होतो. सध्या माझी रोजची सकाळ पहाटेच सुरू होते. दयाळ, नाचण, बुलबुल, शिंपी आणि चिमण्या यांच्या किलबिलाटामुळे अगदी सहज जाग येते. आमच्याकडे औदुंबर वृक्ष असल्याने आमच्याकडे पक्षी भरपूर असतात. पण गेली काही वर्षं सध्या येत असलेला अनुभव येणं बंद झालं होतं. गेली काही वर्षं सकाळ म्हणजे वेगवेगळ्या रसायनांचा आणि प्रदूषण करणाऱ्या वायूंचा तीव्र वास असाच अनुभव झाला होता. हे वेगवेगळे वास कोणत्या रसायनांचे आहेत, हे ओळखायला माझा रसायनशास्त्राचा अभ्यास नक्की उपयोगी पडायचा. पण सध्याचा - म्हणजे २२ मार्चनंतरच्या काळातील अनुभव म्हणजे अगदी माझ्या लहानपणीची आजोळची आठवण यावी तसा आहे. पारिजातक, अनंत वगैरे फुलांचा वास, पक्ष्यांचा किलबिलाट, स्वच्छ हवा इत्यादी लहानपणी घेतलेले अनुभव परत मिळण्याचा काळ आहे सध्या. टाळेबंदी झाल्यावर बदललेल्या या सर्व गोष्टींनी जग बदललं आहे.

सध्या घराबाहेर पडून मर्दुमकी दाखवणं, आपल्याच सुरक्षेसाठी असलेल्या कायद्याला वाकुल्या दाखवणं वगैरे बऱ्यापैकी लोकप्रिय गोष्टींवर विश्वास नसल्याने आवश्यक कारणाशिवाय बाहेर जाणं होत नाही. घरी बसून फार काही विशेष काम नसतं. त्यामुळे हे निरीक्षण करायला आणि त्यावर विचार करायला भरपूर वेळ मिळतो. त्यातच सोशल मीडिया नामक अद्भुतरम्य जगातील एकूण वातावरण बघितलं तरी काय करू नये याचं उत्तम मार्गदर्शन होतं. पण त्यात जीव फारसा रमत नाही. मग आपोआप त्यातील प्रश्न आणि अनुभव, आजूबाजूच्या घटनांचं निरीक्षण इत्यादी गोष्टींवर विचार सुरू होतो आणि मग काही प्रश्नांची उत्तरं शोधताना नवीन प्रश्न समोर येतात.

पृथ्वीवरील सगळ्या प्राण्यांमध्ये माणूस विशेष आहे. जरी उत्क्रांती होत असली, तरीही माणूस हा एक प्राणीच आहे आणि मनुष्यप्राण्याला कितीही प्रेमाने, रागाने, शिस्तीने शिकवलं तरीही त्याचा स्वार्थ काही कमी होत नाही. अशा वेळी शिक्षण देऊन शहाणं करायचा प्रयत्न बहुसंख्यांना दीड किंवा अतिशहाणे करूनच पूर्ण होतो. पण याच असीमित स्वार्थामुळे एक गोष्ट नक्की बदल घडवू शकते आणि ती म्हणजे 'भीती' किंवा 'दहशत. 'याचे अनेक पुरावे आहेत. पण सध्याचा ताजा ताजा पुरावा म्हणजे कोरोना साथ!

impact  lockdown  environ
impact  lockdown  environ

जगभरचे बहुसंख्य लोक स्वत:च्या जिवाच्या भीतीने आगाऊपणा सोडून गप्प घरी बसलेत. हे केवळ ज्ञान देऊन शक्य होईल असं मला तरी एकूण अनुभवांवरून वाटत नाही. आणि जिवाच्या भीतीने सगळं बंद करून फक्त माणूस हा एकच प्राणी घरी बसल्यावर वातावरण किती बदलतंय!

शहर असो वा गाव, सगळीकडे हवा एकदम स्वच्छ झाली आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे वाहनं, उद्योग यातून होणारं ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण लक्षणीयरीत्या कमी झालंय. माणसाने अगदी गटार करून टाकलेल्या नद्या स्वच्छ होत आहेत, अगदी गावपातळीवरील लहान लहान नद्याच नव्हे, तर अगदी उल्हास नदी ते गंगा नदी सगळीकडे पाणी स्वच्छ होतंय. अगदी गंगेचं पाणी थोड्याशा प्रक्रियेनंतर पिण्यायोग्य होऊ शकतं, यावर कोणाचा विश्वास बसला असता? माणूस गप्प बसल्यावर अगदी शहरातही किती पक्षी दिसायला लागले, रोज पहाटे त्यांचा किलबिलाट होऊन जाग येणं किती आनंददायक असतं, हे शहरातल्या नवीन पिढीलाही सहज कळायला लागलंय.


मानवी वस्ती जशी वाढत गेली, तसतसं त्या त्या भागातील जंगल कमी होत गेलं, अनेक ठिकाणी जवळपास संपलं. त्यामुळे आणि इतर ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण यामुळे त्या भागातील पक्षी, प्राणी आणि वनस्पती सृष्टी धोक्यात आली. फक्त एक महिना (खरं तर त्यापेक्षाही कमी काळ) माणूस नावाचा प्राणी जिवाच्या भयाने रोजची कामं, उद्योग, नोकरी, व्यवसाय इत्यादी गोष्टी कमी किंवा पूर्ण बंद करून घरी बसला, तर गेल्या साठ-सत्तर वर्षांमध्ये निसर्गात केलेली ढवळाढवळ निसर्गाने अलगद बाजूला करून ठेवली आहे असं दिसतंय. माणसाने जिथे जिथे अतिक्रमण केलंय, तिथले मूळ रहिवासी परत दिसायला लागलेत. मग कुठे साप वगैरे घरात येत आहेत, तर कुठे जंगली श्वापदं.


impact  lockdown  environ

अर्थात, माणूस हे करतोय ते केवळ 'जिवाची भीती' या एका गोष्टीमुळे. त्यामुळे बेशिस्त माणसाला केवळ ज्ञान नाही, तर भीतीच संकटापासून लांब ठेवू शकते, ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. आणि अर्थातच, या संकटातून बाहेर पडलेली माणसं परत त्याच चुका करणार याबद्दल किमान मला तरी काहीही शंका नाही. फक्त त्या चुकांचा वेग मर्यादेत असेल, तर संकट जास्त काळ लांब राहू शकेल.

स्वत:ला जास्त शहाणा मानणाऱ्या माणसाने गेली कित्येक वर्षं 'Save nature', 'Save Tiger', नदी वाचवा, जंगल वाचवा इत्यादी चळवळी केल्या. त्यात मर्यादित यशही मिळवलं. खूप संस्थांचा संसारही त्यावर पार पडला. पण मुळात हा 'याला वाचवा, त्याला वाचवा' हा अहंकारी विचार माणसाच्या मनात आला, याचीच गंमत वाटते. माणूस काय निसर्ग वाचवणार? माणूस हा काही उत्पादक नाही निसर्गात, तो केवळ एक ग्राहक आहे आणि अडेलतट्टू ग्राहक आहे. जे काही प्रयत्न केले जात आहेत, ते निसर्गावर प्रेम म्हणून नाही, तर माणसाला स्वत:चा जीव वाचवायचा आहे म्हणून आहेत. वातावरणातील समतोल ढासळायला माणूस हाच प्राणी जबाबदार आहे आणि तो गप्प बसला तर निसर्गाचं जास्त चांगलं चालतं, हासुद्धा या टाळेबंदीचा धडा आहे.

निसर्गामध्ये सोपे सोपे नियम असतात. Survival of the fittest हा एक नियम आहे. यामध्ये
. जी जगायला लायक आहे,
. जी स्पर्धेत टिकू शकते,
. जी बळकट आहे,
. जी निसर्गातील बदलांना सकारात्मक प्रतिसाद देऊ शकते,
. स्वत:मध्ये आवश्यक ते बदल घडवू शकते
अशी प्रजाती आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी होते. बाकीच्या वरील कालांतराने गुणवत्तेप्रमाणे नष्ट होतात. निसर्ग आणि संस्कृती हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. संस्कृती प्रगत होताना वर सांगितलेले सर्वात महत्त्वाचे गुण कमी असलेल्या माणसांनाही सांभाळून घेतलं जातं. सर्वांना समान समजलं जातं. निसर्गात जे 'recessive' गुण असतात, ते स्वाभाविकपणे हळूहळू गायब होतात आणि 'dominant' गुण (अपवाद सोडून) पुढे जातात. त्यामुळे फक्त स्पर्धेला लायक प्रजाती तग धरून राहतात.

संस्कृतीमध्ये नेमकं हेच होऊ दिलं जात नाही. किंबहुना, बलवान आणि कमकुवत या दोघांनाही समान संधी देण्याचा प्रयत्न संस्कृतीत होत असतो, असं म्हणायला हरकत नाही. सर्वांना सांभाळण्याच्या प्रयत्नांत सदोष कमकुवत नैसर्गिक गुण असणारे जीवही वाचवले जातात, जे पुढे अनेक प्रश्न गुंतागुंतीचे करतात.


impact  lockdown  environ

त्यातच, वेगवेगळ्या संशोधनातून मिळालेल्या अनेक उपायांमुळे माणसांचं आयुष्य वाढवण्यासाठी यशस्वी प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे एकीकडे माणसांचं सरासरी आयुष्य वाढलंय, पण औषधांचा मारा केल्यामुळे नैसर्गिक प्रतिकारक्षमता कमी कमी व्हायला लागली आहे. बदललेली जीवनशैली आणि खाद्यसंस्कृती आणि अन्नाचा खालावलेला दर्जा त्यात भर घालत आहेत.

या आणि अशा अनेक गोष्टींच्या एकत्रीकरणामुळे आणि निसर्गात केलेल्या हस्तक्षेपामुळे आणि तंत्रज्ञान आणि आधुनिक औषध आणि वैद्यकीय प्रगतीमुळे माणूस स्वत:बद्दलही बेफिकीर झाला आहे. आजारातून ताबडतोब बरं होण्यासाठी उपचार करायची घाई आणि त्यातही शरीराला प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी वेळ न देता, बाहेरून औषध उपाययोजना करून माणसाने स्वत:च्या नैसर्गिक प्रतिकारक्षमतेची वाट लावून घेतली आहे.

यातून जागं होण्यासाठी, आपण नक्की कुठे आलो आहोत आणि आपल्याला कुठे जायचंय हे ठरवण्यासाठी या मिळालेल्या कोरोना संधीचा फायदा घेऊन विचार आणि कृती करायची आवश्यकता आहे. यातून मूळ प्रतिकारक्षमता कोणत्या कारणांमुळे कमी होते आहे, काय केलं तर ती क्षमता परत मिळवता आणि वाढवता येईल, जीवनशैलीत काही मूलभूत बदल करणं शक्य आहे का, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला वेळ घेतला आणि योग्य दिशेने प्रवास सुरू केला, तर कदाचित पुढच्या विषाणू संसर्गाच्या वेळी आपण इतके हतबल नसू.

प्रश्न हा आहे की आपण यातून खरंच काही शिकणार का? आता कुतूहल आहे ते माझं मत चुकीचं ठरणार की बरोबर ठरणार याचं!