Enter your Email Address to subscribe to our newsletters
1866मध्ये अलेक्झांड्रोपॉल, अमेरिका येथे जन्माला आलेल्या जॉर्ज गुर्जीएफच्या साधनापध्दतीची आज खूप चर्चा होते. त्याच्या जुन्या झेन गुरूंसारख्या वाटणाऱ्या वर्तनावर चांगले-वाईट लिहिले, बोलले जाते. त्याच्या मार्गदर्शनाने पुलकित झालेले साधकदेखील आपण नेमके काय केले तेच शोधत असतात. काय आहे हा चौथा मार्ग? आणि मग आधीचे तीन मार्ग कोणते आहेत?
ओशोंच्या साहित्यात नेहमी गुर्जीएफचे नाव येते. त्याच्या जीवनातील लहानमोठे प्रसंग ओघाने सांगितले जातात. हा काहीसा वेगळा वागणारा गुरू, जो पठडीतील गुरूंप्रमाणे ज्ञान देत नाही, हे त्यातून आपल्याला कळते.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
गुर्जीएफबद्दल माहिती मिळवू लागलो की लक्षात येते, हा गुरू काहीतरी विस्मयकारक, चमत्कारिक वागत असे. त्याच्याकडे जाणाऱ्या शभरांपैकी दहा जणही टिकत नसत. अक्षरशः पळून येत. त्यातील त्याला काही जण सिध्द पुरुष समजतात, तर काही जण त्याला विक्षिप्त, ढोंगी, अहंकारी म्हणतात. अनेकांनी अनेक प्रकारे या गुरूविषयी लिहून ठेवले आहे. चांगले, वाईट, अनाकलनीय सर्व प्रकारचे. एक मात्र खरे की आजच्या आध्यात्मिक परिवेशात त्याला तुम्ही नावे ठेवू शकता, टाळू शकत नाही.
त्याच्याकडे शिकायला जाणारे लोक गणितज्ञ, लेखक, कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार अशा भिन्न भिन्न श्रेणीचे असत. त्याच्या कॅम्पमध्ये जे टिकत, त्यांचे आंतरिक उन्नयन, परिवर्तन झालेले त्यांचे त्यांना कळत असे, पण आपण कोणत्या पध्दतीने हे असे घडलो हे त्यांनाही नीटसे सांगता येत नसे.
आपण काही उदाहरणे बघू.
संगीतकार हार्टमन आणि त्यांची पत्नी गुर्जीएफबरोबर संगीत शिकतात. त्यांनी आतापर्यंत जे शिकलेले असते ते आणि गुर्जीएफ सोबत काम करत असताना शिकत आहोत ते, यातला भेद शोधू पाहतात. त्यांना वरवर काहीच फरक कळत नाही, तरीही आत लागलेले दीप जाणवतात, ज्याविषयी बोलता येत नाही असा प्रकाशमय संगीताचा नाद आत घुमतो आणि मग ते 'अवर लाइफ विथ गुर्जीएफ' लिहितात.
अमेरिकन लेखिका कट्रीन ह्य्रूम चार वर्षे खडी फोडणे व रस्ता तयार करणे एवढेच काम करते. लेखन, वाचन हा तिचा श्वास! पण त्याला तेथे वेळच दिला जात नाही. मध्यरात्री उठवून खडी फोडण्यासाठी पाठवले जाते. काल तिने नीट तयार केलेला रस्ता उखडून ठेवलेला दिसतो आणि तोच परत ठीकठाक करण्याचे सांगितले जाते. ती म्हणते, ''मी चिडले, वैतागले, पण टिकून राहिले. आज मी ती नाही जी तिथे गेली होती. मी अनंत विस्ताराच्या आतल्या रस्त्यावर आज चालत आहे.''
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
रेने जुबेर हा दिग्दर्शक गुर्जीएफकडे जातो. आपल्या ख्रिस्ती मान्यता आणि गुर्जीएफचे वागणे यांची बौध्दिक संगती लावू पाहतो. सत्याचे जे चिंतन मी धर्मातून करतो, ते आणि गुरूंचे वर्तन यात सुसंगती आहे का, हे तो शोधू पाहतो. ती संगती लागत नाही, पण तरीही हा गुरू तेच वागत आहेत, हे त्याला कुठेतरी आत कळत जाते आणि मग तो छोटे पुस्तक लिहितो, 'हू आर यू मिस्टर गुर्जीएफ?'
रशियन गणितज्ञ ओस्पेंक्सी, गणिताच्या अमूर्त जगातील बुध्दिमान पुरुष. तो गुर्जीएफकडे जातो. त्याला भेटीसाठी खूप ताटकळत राहावे लागते. कधी भेट मिळते, पण त्यात फक्त परवा अमुक ठिकाणी ये इतके सांगून वाटेला लावले जाते.
अखेरीस एक दिवस त्याला जवळ बसवून कागद दिला जातो आणि त्यावर, तुला जे काही नीट माहीत आहे ते लिही, म्हणजे काय माहीत नाही त्यावर आपण काम करू शकतो, असे सांगितले जाते. ओस्पेंक्सी चार तास बसतो, त्याला त्यावर काय लिहावे कळत नाही. ज्याची गणितात ख्याती परसलेली आहे, जो विद्वान म्हणून मान्यताप्राप्त आहे असा माणूस हमसून हमसून रडू लागतो. कागद कोरा राहतो. या ओस्पेंक्सीमुळेच गुर्जीएफची द फोर्थ वे ही प्रणाली आपल्यापर्यंत पोहोचली.
(आपल्याकडे चांगदेव-मुक्ताबाईची कथासुध्दा काहीशी अशीच आहे!!)
काय असेल या गुरूची साधनेची नेमकी पध्दती? ''आज खड्डे खण'' असे सांगून हा गुरू कुटीत निजून जातो. शिष्य खड्डे खणतो. दुसऱ्या दिवशी गुरू म्हणतो, ''आता ते माती घालून परत बुजवून टाक!'' शिष्य अवाक होतो. पण जो यात टिकतो तो, सांगता येणार नाही असे काही कमावून जातो.
बरे, कोणासाठी कोणती कसोटी, पध्दत काहीच अंदाज नाही. ज्याला सामान्य भाषेत सिस्टिम म्हणतात तसे काहीच नाही. पण म्हणून गुरू स्वतः अस्ताव्यस्त व्यक्तित्वाचा विसकळीत नाही, तर तो अत्यंत समायोजित, परिपूर्ण असा आहे. ज्याच्या सहवासात मनाचा लय होतो, बुध्दीची, सत्ता-संपत्तीची जाणीवच शून्य होते. बाहेरच्या आणि आंतर्जगातल्या एका बिंदूवर आपण स्थिर होतो!!
जवळपास सर्वच शिष्यांनी या गुरूविषयी असेच काहीसे गूढ लिहून ठेवले आहे. 1866मध्ये अलेक्झांड्रोपॉल, अमेरिका येथे जन्माला आलेल्या जॉर्ज गुर्जीएफच्या साधनापध्दतीची आज खूप चर्चा होते. त्याच्या जुन्या झेन गुरूंसारख्या वाटणाऱ्या वर्तनावर चांगले-वाईट लिहिले, बोलले जाते. त्याच्या मार्गदर्शनाने पुलकित झालेले साधकदेखील आपण नेमके काय केले तेच शोधत असतात.
रमा गर्गे
9922902552