सेक्युलॅरिझमची अफू

विवेक मराठी    24-Feb-2020
Total Views |

सेक्युलॅरिझमची अफू गेली कित्येक वर्षे दिल्यामुळे अगदी शिकलेले लोकही सहज, अलगद या सापळयात अडकतात आणि सेक्युलॅरिझमच्या नावाखाली इतर धर्मीयांच्या हिंदू धर्मातील ढवळाढवळीचे समर्थन करतात. वर्षानुवर्षे चुकीचा इतिहास शिकवून आणि बॉलीवूडच्या चित्रपटांच्या माध्यमांतून ही सेक्युलॅरिझमची अफू दिली गेली आहे.

Lingayat mutt in Karnatak

सध्याच्या विविध सामाजिक परिस्थितींवर
, घटनांवर विचार करताना हे प्रकर्षाने जाणवते की आपल्याच लोकांच्या विविध संकल्पना स्पष्टच नाहीयेत. त्याला असलेली कारणे वेगवेगळी आहेत. जर एखाद्या व्यक्तीचे वाचनच नसेल तर अज्ञान असणारच. पण सेक्युलॅरिझमची अफू गेली कित्येक वर्षे दिल्यामुळे अगदी शिकलेले लोकही सहज, अलगद या सापळयात अडकतात आणि सेक्युलॅरिझमच्या नावाखाली इतर धर्मीयांच्या हिंदू धर्मातील ढवळाढवळीचे समर्थन करतात. वर्षानुवर्षे चुकीचा इतिहास शिकवून आणि बॉलीवूडच्या चित्रपटांच्या माध्यमांतून ही सेक्युलॅरिझमची अफू दिली गेली आहे. त्यामुळे एकतर आपल्या लोकांना हिंदू धर्मातील फक्त चुकाच दिसतात आणि इतर धर्मांतील फक्त जे दाखवले गेलेय तेवढेच दिसते. यात कुठेही योग्य प्रश्न विचारावेत अशी इच्छादेखील होत नाही.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 
 मूलभूत शिक्षण पध्दतीचा खेळखंडोबा

आपल्याला सगळयांनाच माहीत आहे की इंग्राजांनी गुरुकुलांना शासनाकडून (राजांकडून) मिळत असलेल्या देणग्या बंद करून आपली मूळ परंपरागत गुरुकुलांची शिक्षण पध्दती बंद पाडली. गुरुकुले चालविण्यास पैसेच नसल्याने देशभरात चालू असलेली पारंपरिक शिक्षण पध्दती हळूहळू बंदच पडली. त्याची जागा इंग्राजांच्या शिक्षण पध्दतीने घेतली. संस्कृत भाषादेखील हळूहळू शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाद झाली आणि त्यामुळे आपल्या पारंपरिक ग्रांथांमधून असलेले ज्ञानही तसेच ग्रांथांतच राहिले किंवा नष्ट केले गेले. आज अशी स्थिती आहे की देशातील बहुसंख्य जनतेला संस्कृत येत नाही. 70% जनतेला आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरा यांबध्दल लाज तरी वाटते किंवा ते सगळे थोतांड आहे असेच वाटते. आपल्या परंपरांवर, सणावारांवर, मंदिरांवर, मंदिरांच्या खजिन्यांवर होणारे हल्ले ताकदीनिशी परतवून लावणे तर दूरच, त्याविषयी फारसे सोयरसुतकही वाटत नाही. म्हणजे त्यातील भविष्यात होणारे गंभीर परिणाम दिसत नाहीत.

tirupati_1  H x

हिंदू मंदिरांतील ढवळाढवळ

 

उदाहरणार्थ, गेल्या काही वर्षांत बातम्या आल्या आहेत की आंध्र प्रदेश सरकारने तिरुपती देवस्थानच्या टीटीडी या व्यवस्थापन समितीमध्ये आपले लोक, तसेच इतर धर्मीय लोक घुसवून तेथील संपत्तीचा दुरुपयोग चालू केलेला आहे. 2018मध्ये बातमी पाहिली होती की टीटीडीच्या लोकांनी मंदिरातील मुदपाकखान्यातील जमीन खोदून त्यात लपविलेला खजिना हस्तगत केला आणि मंदिराच्या पुजाऱ्यांनी तक्रार केली, तर बालंट त्याच्यावरच टाकून त्यांना अटक केली. आधीचे चंद्राबाबू नायडू सरकारही हिंदूविरोधी होते आणि वाय.एस.आर. तर स्वत: बाटलेले ख्रिस्ती होते. सध्याच्या राजशेखर रेड्डीच्या सरकारचेही तेच धोरण आहे. टीटीडीमध्ये 45 अहिंदू लोक काम करत आहेत. तिरुपती मंदिराच्या तिकिटांवर मागच्या बाजूला जेरुसलेम यात्रेची आणि हज यात्रेची जाहिरात यामुळेच छापली गेलेली आढळली. तिरुपती मंदिरात मुसलमान कर्मचारिवर्गाने नमाज करण्यापर्यंत यांची मजल जातेय. तिरुपती देवस्थान हे सर्वात श्रीमंत हिंदू देवस्थान आहे. त्यातील 2300 कोटी रुपये आंध्र सरकारच्या तिजोरीत हलवले आहेत. लाखो लोक तिरुपतीला दर महिन्याला जातील, पण या विषयावर अवाक्षर काढणार नाहीत.

 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

सिध्दिविनायक मंदिरातील 600 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत हलवले गेलेत. याचा विनियोग नक्की कशासाठी होईल याची खात्रीच देता येत नाही. तामिळनाडू सरकारने मशिदींच्या आणि चर्चेसच्या दुरुस्तीसाठी आपल्या वार्षिक बजेटमध्ये अधिकचे फंड्स काढलेले आहेत. (https://m.timesofindia.com/city/chennai/tamil-nadu-budget-more-funds-to-repair-mosques-and-churches/amparticleshow/74144601.cms?fbclid=IwAR1T36zFKzWl9zP04iIHo0VšRhDvvMkPBOWctFrqLhdgsbkJRFX-kQwekU) केरळ सरकारने आधीच त्रावणकोर महाराजांच्या घराण्याकडून पद्मनाभ मंदिराच्या खजिन्याचा ताबा मागितलेला आहे. केरळमध्ये कम्युनिस्टांचे सरकार आहे आणि तिथे ख्रिस्ती आणि मुसलमान लोक किती ताकदवान आहेत याची आपल्याला कल्पना आहेच. हिंदू भाविक मात्र आपल्या श्रध्देपोटी या देवस्थानांमध्ये देणग्या देत आहेत. बरे, या देणग्या देणे बंद करा असे आवाहन केले, तर आपल्याच मंदिरांचा निधी बंद होऊन मंदिरे बंद पडतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कितीही म्हटले, तरी निम्म्यापेक्षा जास्त जनतेला जीवनात येणाऱ्या समस्यांपासून शांती मिळण्यासाठी, मानसिक बळ मिळविण्यासाठी धर्माची आवश्यकता असते. जिथे पोकळी निर्माण होईल, तिथे ती दुसऱ्या पर्यायांनी भरली जाऊ शकते, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मग मुसलमानांना आणि ख्रिस्त्यांना अडाणी अज्ञानी हिंदूंचे धर्मांतर करण्याची आयतीच संधी मिळेल.

हिंदू पंथांमध्ये ढवळाढवळ

सेक्युलॅरिझमच्या अफूचे आणखी एक उदाहरण म्हणजे उत्तर कर्नाटकातील गडग येथे लिंगायत समाजाचा एक मठ आहे. त्या मठाचा अधिपती म्हणून येत्या 26 फेब्रुवारीला एका 33 वर्षीय मुसलमान माणसाची नेमणूक केली जातेय. (https://theprint.in/india/how-a-once-alcoholic-auto-driver-father-of-4-became-first-muslim-pontiff-of-lingayat-mutt/368780/) हा माणूस तिसरीत शाळा सोडलेला आहे. काही महिन्यापूर्वीपर्यंत हा रिक्षा चालवीत असे आणि दारू पिऊन रस्त्यावर पडलेला असे. तीन महिन्यांपूर्वी याने त्या मठात लिंगायत समाजाची दीक्षा घेतली, पण याने मुसलमान धर्म सोडलेला नाही. त्यांचे असे म्हणणे आहे की तो रोज पहाटे दोन वाजता उठतो आणि ध्यान करतो. मग चार वाजता मुहम्मदाची शिकवण असलेले हादिफ वाचतो. याने लोकांसाठी, समाजासाठी काम करण्याची प्रेरणा बसवेश्वरांच्या शिकवणीतून घेतली, असो तो म्हणतोय. लिंगायत बनून तो समाजासाठी काम करणार आहे.

 

आता यात अनेक प्रश्न उपस्थित होतात - 1. पण नक्की बसवेश्वरांची शिकवण काय किंवा त्याचा उपयोग करून त्याने काय विशेष काम केलेय, हे सांगितलेले नाही. ह्या माणसाने तीन महिन्यांत असे काय विशेष काम केलेय, जेणेकरून त्याला त्या मठाचा अधिपती बनवले जातेय? 2. हा माणूस मुहम्मदाच्या हादिफमधील आणि बसवेश्वरांच्या शिकवणीतील साम्य शोधणार आहे. म्हणजे अजून शोधलेले नाहीये. हा दुसरी शिकलेला माणूस नक्की कुठपर्यंत मजल मारेल? मुळात महम्मदाने मूर्ती तोडा, मूर्तिपूजा करू नका आणि अल्लाह हा एकच देव आहे, त्यालाच माना, जे त्याला मानणार नाहीत त्यांना जबरदस्तीने अल्लाहला मानण्यास भाग पाडा किंवा त्यांना मारून टाका असे सांगितले आहे. लिंगायत समाज म्हणजे शिवभक्त, शिवलिंगाची पूजा करणारे कट्टर लोक. मग या दोन्ही विरुध्द विचारप्रवाहांचा मेळ हा माणूस कसा घालणार? 3. ज्या वेळी बसवेश्वरांनी लिंगायत पंथ स्थापन केला आणि जात-धर्म यांच्या पलीकडे विचार करण्याची शिकवण दिली (12व्या शतकात), त्या वेळी दक्षिणेतच काय, पण मध्य भारतातही मुसलमान धर्माचा शिरकाव झालेला नव्हता. जर त्या वेळी मुसलमान धर्म तिकडे अस्तित्वात असता, तर मला खात्री आहे की बसवेश्वरांनी मुसलमान धर्माच्या लोकांना वगळा असेच सांगितले असते. 4. गडग येथील मठ हा 3 वर्षांपूर्वीच स्थापन केलाय. त्या मठाच्या जमिनीसाठी या मुसलमान माणसाच्या वडिलांनीच जमीन दिलेली होती. तेथील जमिनीवरील मठाचे बांधकाम हाच पाहत होता. वडिलांनी जमीन दिलीय म्हणून याला मठाधिपती केले जातेय का? 5. गडग येथील मठ बसवेश्वरांची शिकवण पसरविण्याचे म्हणजे नक्की काय काम करतोय, हे सांगितलेलेच नाही. 6. गेली काही वर्षे लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून वेगळे पाडण्याचे जे प्रयत्न चालू आहेत, हा त्यातीलच भाग नसेल कशावरून? 7. हे सगळे इंग्लिश माध्यमांत वाचायला मिळालेय, पण स्थानिक वर्तमानपत्रांत हे असे प्रश्न उपस्थित केले गेलेत का? 8. मुळात लिंगायत समाजातील अध्वर्यूंना मुसलमान धर्माच्या खऱ्या शिकवणीची जाण तरी आहे का? 9. हिंदूंनी अशा प्रकारच्या धार्मिक ढवळाढवळीविरुध्द अत्यंत हुशारीने आवाज उठविला पाहिजे. आपण शांतपणे हे स्वीकारायला नाही पाहिजे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

लोकांमध्ये असलेल्या चुकीच्या संकल्पना

मी जेव्हा गडगमधली बातमी इतरांबरोबर शेअर केली आणि प्रश्न उपस्थित केले, तर मलाच उलट ही किती पॉझिटिव्ह बातमी आहे, यानेच लोकांची घरवापसी होईल वगैरे या बातमीच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया आल्या. 'आम्हाला गणेशभक्त मुसलमान माहीत आहेत.' एकतर व्यक्ती गणेशभक्त तरी असेल, नाहीतर मुसलमान तरी असेल. दोन्ही असणे अशक्य. असे जर कोणी क्लेम करत असेल, तर ती व्यक्ती स्वत:ला तसेच इतरांनाही (हिंदूंना तसेच मुसलमानांनाही) फसवीत आहे. कम्युनिस्ट मुसलमान अशीदेखील संज्ञा कोणीतरी सांगितली. हेसुध्दा तसेच. एकतर व्यक्ती कम्युनिस्ट तरी असेल नाहीतर मुसलमान तरी. दोन्ही एकाच वेळी असणे अशक्य आहे. आता हे समजण्यासाठी किंवा ही स्पष्टता येण्यासाठी आपल्याला ङ्ढइस्लाम धर्माची शिकवण, त्यांचा धार्मिक इतिहास संपूर्णपणे माहीत असला पाहिजे. कम्युनिस्ट विचारसरणीचा इतिहास, प्रत्यक्ष कम्युनिस्ट विचारसरणी, त्याचे प्रकार, त्यांच्यातील फरक हे स्पष्टपणे माहीत असले पाहिजेत. तरच आपण असल्या भंपक संकल्पना पसरण्यापासून रोखू शकू.

उदाहरणार्थ, कम्युनिस्ट विचारसरणी म्हणजेच साम्यवाद ही अर्थशास्त्रातील थिअरी आहे, जी संपत्तीची समान वाटणी, भांडवलशाहीच्या विरोधी आणि कोणत्याही प्रकारची सामाजिक उतरंड न मानणारी अशी आहे. याचा उगम जरी जर्मनीमध्ये कार्ल मार्क्स या तत्त्वज्ञाने लिहिलेल्या थिअरीमधून झालेला असला, तरी ती त्या वेळच्या युरोपीय औद्योगिक क्रांतीस धरून होती. त्यात प्रॅक्टिकल - म्हणजेच कृतिशीलता फार नव्हतीच. म्हणूनच रशियन लेनिन आणि चिनी माओ यांनी आपल्या शेतीप्रधान देशातील परिस्थितीप्रमाणे ती थिअरी बदलून घेऊन त्यात रक्तरंजित क्रांती आणली. पण ही थिअरी किंवा विचारसरणी प्रॅक्टिकल नाही. भांडवलशाही नसेल तर व्यवसाय निर्माण होणार नाहीत आणि संपत्तीदेखील निर्माण होणार नाही. त्यामुळेच ना जर्मनीमध्ये ती टिकली, ना रशियात आणि चीनमध्येदेखील ती स्वीकारली नाही. जगामध्ये आजमितीला या सर्व विचारसरणींचा सुवर्णमध्य साधला जातोय. चीनमध्ये जरी चिनी कम्युनिस्ट पार्टीचे सरकार असले, तरी ते साम्यवादापासून, समाजवादापासून हजार योजने दूर आहे आणि नावापुरतीच कम्युनिस्ट पार्टी आहे. ज्या देशांत ही विचारसरणी उगम पावली, वाढविली गेली, ते देश सोडून ही विचारसरणी भारतासारख्या अतिसहिष्णू देशात विविध गट अजूनही बाळगून आहेत. भारतात समाजवादी लोक आहेत, पण ते बरेच तत्त्वनिष्ठ आणि देशभक्त होते. याउलट या सर्व कम्युनिस्ट म्हणजेच साम्यवादी विचारसरणीच्या लोकांची बांधिलकी चीनशी, नाहीतर रशियाशी दिसून येते. आता यात नवीन कोन दिसतोय, तो म्हणजे पाकिस्तानधार्जिणेपणा.


Lingayat mutt in Karnatak

चुकीच्या संयुक्त संज्ञा वापरून केली जाणारी धूळफेक

तुम्ही जर उमर खालीद, शबाना आझमी, जावेद अख्तर यांची विचारसरणी पाहिली, तर ते स्वत:ला 'कम्युनिस्ट मुसलमान' म्हणवून घेतात. पण हे लोक मुसलमान धर्मातील अन्याय, शरीया कायदा याविरुध्द काहीही बोलत नाहीत. मुसलमान धर्मात पुरुष आणि महिला यांच्यामध्ये जी उतरंड आहे, त्याविरुध्द काहीही बोलत नाहीत. कम्युनिस्ट लोक एथीइस्ट असतात - म्हणजे अल्लाह, जीझस किंवा ज्युइश देव यांच्यावर त्यांचा विश्वास नसतो. हिंदू धर्मात निरीश्वरवाद ही संकल्पना सामावलेलीच आहे. त्यामुळे एखादा कम्युनिस्ट टेक्निकली हिंदू असू शकतो. आता जे हिंदू धर्मात जन्मलेले भारतीय कम्युनिस्ट आहेत, ते स्वत:ला हिंदू म्हणत नाहीत तो भाग वेगळा. पण मुसलमान मात्र स्वत:ला कम्युनिस्ट मुसलमान, कम्युनिस्ट ख्रिश्चन म्हणवून घेतात. हे लोक हिंदूंच्या विरोधात एकत्र येऊन देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना पाठिंबा देतात. मतपेटयांचे राजकारण करताहेत.

 

जे.एन.यू., जामिया, एम.एम.यू., शाहीन बाग, गेटवे ऑफ इंडिया इत्यादी ठिकाणी डफली घेऊन आझादी मागणारे हे खरे तर 'अनार्चिझम' - म्हणजेच अराजकवादी आहेत. पण हे लोक कधी काश्मीरच्या आझादीवर जातात आणि कधी जगातील सगळयात मोठया लोकशाहीने लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या सरकारपासून आझादी मागतात, हेच समजत नाही. कधी हे लोक संविधानाचे दाखले देत असतात, पण संविधानाचे मंदिर, लोकशाहीचे मंदिर म्हणजे भारतातील संसद, त्यावर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूच्या फाशीला ज्युडीशिअल किलिंग म्हणतात - त्याला शहीद/हुतात्मा म्हणतात. त्याची तुलना भगतसिंगांशी करतात. यातील हे सगळे तरुण पाहिले, तर हे सगळे गर्दुले आहेत. त्यांना कोणतीच सिस्टिम नको आहे. हे लोक स्वत:च इतके गोंधळलेले आहेत आणि हे लोक समाजात फिरून विद्यार्थ्यांना, मुसलमान समाजातील लोकांमध्ये स्वत:चा गोंधळ पसरवत आहेत. पुण्यातील गरवारे महाविद्यालयाच्या बाहेर जी मुले सी.ए.ए.विरोधासाठी अमित शहांच्या विरुध्द अत्यंत अपशब्द वापरलेले फलक घेऊन उभी होती, त्यांना या सगळयाची जाण आहे का? विविध विद्यापीठांतील तथाकथित शिकलेले लोक जेव्हा या अशा वैचारिक गोंधळामुळे या अराजकवाद्यांना पाठिंबा देतात, तेव्हा त्यांना या गोष्टींची स्पष्टता असते का? या प्रश्नांची उत्तरे नाही अशीच आहेत.


धूळफेकीचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम

शर्जिल, अमूल्या यांसारखे आणखी शंभर विद्यार्थी तरी देशभरात लोकांमध्ये गोंधळ पसरविण्याचे काम करत फिरत असतील. यांची यंत्रणा किती पध्दतशीरपणे काम करते, हे अमूल्याने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अत्यंत अभिमानाने सांगितलेय. आपण वेळीच सावध झाले पाहिजे. ''केंब्रीजहून आल्यावर एक वर्षभर मी आझम कॉलेजमध्ये व्याख्याती म्हणून काम करत होते. त्या वेळी कम्युनॅलिझम या विषयावर व्याख्यान देण्यास निरज जैन म्हणून आय.आय.टी. मुंबईचे माजी विद्यार्थी व्याख्यान देण्यास आले होते. व्याख्यानाला सुरुवात करण्याआधी त्यांनी अहमदाबादमधील दंगलींचा व्हिडिओ दाखविला. मी समोरच बसले असल्याने ताबडतोब हरकत घेतली. माझा पवित्रा बघून मग इतरही बोलण्यास सरसावले आणि त्यांनी तिथून गाशा गुंडाळला. पण त्यांच्याबरोबर आलेल्या मुसलमान मुलींनी जाता जाता 'रविवारी आझम कॅम्पसमधील मोठया हॉलमध्ये हेच व्याख्यान होईल, तेव्हा तिथे जरूर या' असे आमंत्रण दिले.'' पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यातील जे.एन.यू. होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईतील टी.आय.एस.एस.देखील पक्की या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी भरलेली आहे. यांचा खादीचा पेहराव, डफली घेऊन प्रस्थापित सिस्टिमविरुध्द आवाज उठविणे हे तरुण पिढीच्या दृष्टीकोनातून खूपच आकर्षक असते. या आकर्षकतेपोटीच अनेक विद्यार्थी अशा लोकांचे बोलणे ऐकायला जातात. खरा इतिहास तर फारसा कधी शिकलेलाच नसतो आणि या याटप्प्याला ते वाचण्याची धीरता कुणामध्ये नसते. यामुळे असे लोक जे सांगतील तेच खरे मानून विद्यार्थी अशा लोकांच्या जाळयात अगदी सहजतेने ओढले जात आहेत. आपला पाल्य महाविद्यालयात नक्की कोणत्या विचाराच्या गोळया घेतोय याचा पालकांना पत्ता नसतो. कला आणि वाणिज्य शाखांच्या विद्यार्थ्यांमध्ये हे सर्वाधिक दिसून येते. विज्ञान शाखेतील आणि अभियांत्रिकीला, वैद्यकीय शाखेला जाणारे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या स्वरूपामुळे कमी ओढले जातात.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/