आयुर्विमा घेताना आपल्यासमोर असलेल्या पर्यायांपैकी आपल्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे, हा संभ्रम असतो. विम्याचे प्रकार कोणते आणि प्रत्येकाचे काय काय फायदे असतात, हे लक्षात घेतले तर हा संभ्रम काही प्रमाणात दूर होईल.
आयुर्विम्याचे मुख्यत: चार प्रकार असतात.
1) मुदती विमा किंवा टर्म इन्शुरन्स
2) एन्डोमेंट इन्शुरन्स
3) होल लाइफ इन्शुरन्स आणि
4) पेन्शन विमा
विमा योजनेचे नाव कुठलेही असले, तरी पेन्शनच्या योजना सोडल्या तर प्रत्येक योजनेत टर्म इन्शुरन्सचा प्रकार असतोच असतो. या विमा प्रकारांची वैशिष्ट्ये कोणती आणि यात फरक काय, हे जाणून घेऊ या.
1) मुदती विमा : निवडलेल्या मुदतीत विमेदाराचा मृत्यू झाल्यास विमा हप्त्यापोटी भरलेल्या रकमेचा विचार न करता एकरकमी मोठी रक्कम नामित व्यक्तीस (नॉमिनीला) देणारा हा विमा प्रकार. खर्या अर्थाने आयुर्विमा हा हाच. याचे वैशिष्ट्य हे की मुदत संपेपर्यंत विमेदार जिवंत राहल्यास मुदतीशेवटी त्याला कुठलाही परतावा मिळत नाही. अर्थात यामुळेच या विमा प्रकारात विमा हप्ता अगदी अत्यल्प असतो. 25 वर्षे वयाच्या व्यक्तीस 10 लाखांचा विमा 35 वर्षे मुदतीसाठी मिळतो. केवळ वार्षिक हजार-पंधराशेमध्ये विमेदाराच्या वयाच्या 60पूर्वी त्याचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला 10 लाख रुपये मिळतात. हा केवळ जोखमीचा किंवा मुदती विमा असल्याने यात मुदतीशेवटी कुठलीच रक्कम मिळत नाही. हे पचनी पडणे जरा अवघड जाते. वरील उदाहरणात 35 वर्षांत विमेदाराने 35 हजार ते 50 हजार एवढी रक्कम विमा कंपनीकडे भरलेली असते. तेव्हा त्याची इच्छा असते की, मुदत संपल्यावर व्याज नाही, पण किमान आपण भरलेली मूळ रक्कम तरी आपल्याला विमा कंपनीने द्यायला हवी, अशी मानसिकता असलेल्या संभाव्य ग्रहकांसाठी विमा कंपनी त्यांच्याकडून थोडी जास्त रक्कम घेऊन अशी आकर्षक विमा योजना बेतते. पण खरे तर कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त विमा रकमेचा विमा जी योजना देत असेल ती सर्वात उत्तम.
पण खरेच काहीच मिळत नाही का? आपण 60-65 वर्षे वयापर्यंत जगलो, आपली सर्व कर्तव्ये त्या दरम्यान पार पाडली, अपमृत्यू न झाल्याने कौटुंबिक जबाबदारीतून मुक्तता मिळाली. याचे जे समाधान मिळते, त्याचे मूल्य काढता येत नाही.
वरील उदाहरणात सांगितल्याप्रमाणे वार्षिक 1,000 भरून 10 लाखांचा विमा असताना पहिल्याच वर्षी जर दुर्दैवाने विमाधारकाचा मृत्यू झाला, तर कुटुंबास 1,00,000% व्याज मिळेल; पण जास्त व्याज मिळावे म्हणून विमा घेतल्यावर लवकर मृत्यू यावा अशी अपेक्षा कोणीच करणार नाही. थोडक्यात काय, तर विमा घेताना व्याजाचा हिशोब बाजूला ठेवावा हे इष्ट.
2) एन्डोमेंट इन्शुरन्स : या विमा प्रकारात विमा मुदतीत मृत्यू झाल्यास विमा रक्कम मिळण्याची सोय तर असतेच, त्याचबरोबर मुदत संपल्यावर विमेदार हयात असेल तर त्याला विमारक्कम मिळण्याचीही तरतूद असते. या विमा प्रकारात मुदतीशेवटीही रक्कम देण्याची तरतूद करायची असल्याकारणाने विमा हप्ता टर्म इन्शुरन्सपेक्षा अधिक असतो. या प्रकारचे विमे अत्यंत लोकप्रिय आहेत. यात लाभासहित आणि लाभाविना असे पुन्हा दोन प्रकार असतात. लाभाविना एन्डोमेंट योजनेत मुदतीनंतर मिळणारी रक्कम आधीच ठरलेली असते. ती कमी-जास्त होत नाही. पण लाभासहित (विथ प्रॉफिट) एन्डोमेंट योजनेत बोनससहित रक्कम मिळत असल्याने हा विमाप्रकार जनसामान्यांमध्ये जास्त लोकप्रिय आहे.
साधारणपणे 25 वर्षे वयाच्या व्यक्तीचा 25 वर्षे मुदतीचा एक लाख रकमेचा वार्षिक हप्ता 4,000 रुपये येतो. मुदतीनंतर बोनससहित दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम सामान्यत: मिळते.
यातलाच एक प्रकार म्हणजे मनी बॅक प्लॅन, ज्यात दर 5/10/15/20 वर्षांनी विमेदाराला ठरावीक रक्कम मिळते. अशा योजनाही अत्यंत लोकप्रिय आहेत.
3) होल लाइफ प्लॅन : वयाच्या 80 वर्षापर्यंत विमा हप्ता भरत जायचा आणि जमा झालेली रक्कम (विमा रक्कम) केवळ मृत्युपश्चात किंवा 80 वर्षे वय झाल्यावर मिळेल अशा प्रकारचा विमा म्हणजे होल लाइफ इन्शुरन्स. पूर्वी इस्टेट ड्युटीचे कर प्रावधान होते. तेव्हा इस्टेट ड्युटी सरकारकडे जमा केल्याशिवाय मृत व्यक्तीची मालमत्ता कायदेशीर वारसाच्या नावे होत नसे. अशा वेळी मृत्यूनंतर वारसांना मिळणार्या विमा रकमेचा उपयोग इस्टेट ड्युटी भरण्यासाठी होत असे. यातही बोनससहित विमा आणि लाभविरहित विमा असे दोन प्रकार आहेत.
4) पेन्शन विमा : भारतात तसेच अनेक देशांत आयुर्मान वाढत आहे. निवृत्तीनंतर चरितार्थाची तरतूद करायचा एक मार्ग आहे पेन्शन विमा. आपल्या उत्पन्नातून काही रक्कम आपल्या सेवानिवृत्तीनंतरच्या काळासाठी सातत्याने बाजूला ठेवून या योजनेत आपण आपले पेन्शन निर्माण करू शकतो. तसेच निवृत्तीच्या वेळी मिळालेली एकरकमी रक्कम पेन्शन योजनेत गुंतविल्यास विमा कंपनी आयुष्यभर ठरावीक पेन्शन देते.
विम्याचे हे सर्व प्रकार आयुर्विमा महामंडळाने (एलआयसीने) उपलब्ध करून दिले आहेत. त्यांच्या प्रमुख आणि लोकप्रिय योजनांची माहिती पुढील लेखात.
(लेखक इर्डाचे (IRDAचे) माजी सदस्य आहेत.)