दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरळेगाव या गावची एकेकाळी हातभट्टी दारू गाळणारेे गाव म्हणून ओळख होती. सध्या या गावाने सकारात्मक बदल घडवत नवी क्रांती घडवून आणली आहे. आता तर ‘व्हिलेज ऑफ प्लंबर’ अशीच गावची ओळख बनली आहे. येथे 300 प्लंबर आणि 150 प्लंबर कंत्राटदार आहेत. विशेष म्हणजे हे प्लंबर इतके निष्णात आहेत की ते दर आठवड्याला लाखोंची कमाई करतात.
गावखेड्यातले मंदावलेले अर्थकारण, नापिकी आदी कारणांमुळे तेधील लोकांसमोर रोजगारांचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. रोजगाराच्या आशेने लोक मोठ्या शहरांकडे स्थलांतर करताहेत. दुसरीकडे नोकरी नाही म्हणून गावखेड्यात खितपत पडलेल्या तरुणांची संख्याही मोठी आहे. गावखेड्यात असे नकारात्मक चित्र दिसत असले, तरी आता काही गावे सकारात्मक बदल घडवून आणत आहेत. रोजगाराच्या संधी शोधताहेत. आत्मनिर्भर बनत आहेत. भारताच्या उत्कर्षासाठी असे बदल आवश्यकही आहेत. अशाच पद्धतीने रोजगारातून प्रगती साधणार्या गावाची ही गोष्ट आहे.
सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....
सोलापूर शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर वरळेगाव हे बाराशे लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. 25-30 वर्षांपूर्वी या गावात दारूच्या भट्ट्या होत्या. इथूनच आसपासच्या गावांना दारूचा पुरवठा होत होता. गावात आरोग्य, शिक्षण, आर्थिक स्थैर्य यांचा अभाव असल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते. सावकारी कर्जामुळे अनेकांना घर आणि शेत विकावे लागले. आसपासचे लोक या गावात मुलगी द्यायला नकार द्यायचे. गावाची अशीच परिस्थिती राहिली तर वरळेगाव हे कधीच पुढे जाणार नाही, असे आजूबाजूच्या गावचे लोक म्हणायचे. लोकनिंदेला लाजून अनेक जण रोजगाराच्या शोधात पुणे-मुंबई शहर जवळ करायचे. आज या गावाची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. या गावात एकेकाळी फक्त दारूच्या भट्ट्या होत्या, त्या दारूच्या भट्ट्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आज प्लंबिंग क्षेत्रामुळे गावाने प्रगती घडवून आणली आहे.
गावातील नागरिक बिभीषण देवकर सांगतात, ‘‘आमच्या गावाविषयी सांगाव्यात अशा अनेक गोष्टी, प्रसंग आहेत. ते प्रसंग आठवताना मन अस्वस्थ होते. तीस वर्षांपूर्वी दारूमुळे गावाची पूर्णपणे वाताहत झाली होती. लोकांचे जगणे मुश्कील बनले होते. नैराश्यामुळे अनेक तरुण व्यसनाधीन झाले होते. गावात कसलाच रोजगार नव्हता. गावाचा विकास थांबला होता. अशातच गावातील अभिमान सुतार व अनिल देवकर हे युवक कोणतेही कौशल्य नसताना सोलापुरात प्लंबरचे काम करू लागले. या दोघांच्या प्रेरणेने गावातील बहुतांश तरुण प्लंबर म्हणून काम करू लागले. आज गावात 300 प्लंबर आणि 150 प्लंबर कंत्राटदार आहेत.’’
हे कसे साध्य झाले? याविषयी सांगताना देवकर म्हणाले, ‘‘आज वरळेगावची ‘व्हिलेज ऑफ प्लंबर’ म्हणून जी ओळख आहे, ती अनिल देवकर यांच्यामुळे आहे. तीस वर्षांपूर्वी ते गावात शेळ्या राखत. पुढे ते सोलापुरात प्लंबिंगचे काम शिकले. या कामात कौशल्य मिळवून त्यांनी गावातील अनेक तरुणांना या क्षेत्रात उतरवले. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली 80 प्लंबर कंत्राटदार तयार झाले आहेत. अनिल देवकर यांना या कामातून आर्थिक स्थैर्य तर मिळालेच, शिवाय सामाजिक आणि राजकीय स्थैर्य लाभले आहे. कष्टाच्या कमाईतून त्यांनी गावात 70 एकर शेती विकत घेतली आहे. त्यांचा एक मुलगा इंजीनिअर, तर मुलगी डॉक्टर आहे. हे सगळे प्लंबरच्या कामामुळे साध्य होऊ शकले आहे. ही गोष्ट वैयक्तिक असली, तरी यातून अनेकांना प्रेरणा मिळाली.’’
कुशल प्लंबर
आज सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात प्लंबरसाठी प्रसिद्ध असलेले गाव कुठेच आढळणार नाही. ते यश छोट्याशा वरळेगावने मिळवले आहे. कामातील नैपुण्य गुणामुळे सोलापुरातील मोठी हॉटेल्स, मॉल्स, गृहनिर्माण संस्था, हॉस्पिटल अशा सर्व ठिकाणी काम करणारे प्लंबर वरळेगावचे आढळून येतात. आज बिल्डिंग वा प्लंबिंग क्षेत्रात काम करणार्या कोणत्याही कंपनीला सोलापुरात एखादी बैठक घ्यायची असेल, तर ती वरळेगावच्या प्लंबर कंत्राटदार व प्लंबर यांच्या उपस्थितीशिवाय पूर्ण होत नाही, हे विशेषच म्हणावे लागेल.
अनिल देवकर, बाबासाहेब मळगे, सुधाकर पाटील, अरविंद सुतार, बिभीषण देवकर, पांडुरंग तरंगे, राजू हक्के, भीमा पांडुरंग माने, तुकाराम मळगे, संतोष नवले, अरुण पारवे, सखाराम वाघ, विश्वनाथ वाघ, अगंद वाघ, अंबादास भगत, दत्ता कांबळे, बिरूदेव लेंगरे, सुनील देवकर, अरुण हक्के, महेश पाटील यांचा नामवंत व कुशल प्लंबर कंत्राटदार म्हणून लौकिक आहे.
भीमा पांडुरंग माने सांगतात, ‘‘मी एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. शिक्षणासाठी बोर्डिंगमध्ये राहावे लागले. परिस्थितीमुळे दहावीनंतर शिक्षण घेता आले नाही. गावात प्लंबर काम करणे हाच एकमेव रोजगाराचा मार्ग होता. 1999पासून मी प्लंबिंग कामाला सुरुवात केली. सुरुवातीला प्लंबिंगमध्येच बिगारी म्हणून काम करू लागलो. सोलापूरला कामाला जाण्यासाठी जवळ पैसे नसायचे, त्यामुळे वरळेगाव ते सोलापूर असा सायकलीवरून दररोज प्रवास करायचो.
प्लंबिंग काम म्हणजे बिल्डिंगमध्ये पाण्याची बचत कशी करायची आणि पाणी कसे वापरायचे, याचे तंत्रज्ञान आहे. हळूहळू प्लंबिंगमधील बारकावे शिकू लागलो. कुशल प्लंबर बनून मी 2003 साली प्लंबर कंत्राटदार झालो. आज गावात माझ्यासारखे अनेक तरुण कंत्राटदार झाले आहेत व यातून ते स्थिरस्थावर झाले आहेत. सोलापूर, मोहोळ, बार्शी, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लातूर व कर्नाटकपर्यंत आमच्या गावातील प्लंबर दिसतील.
जेव्हा गावातील विविध कंत्राटदारांना एका ठिकाणीवरून कोटेशन येतात, तेव्हा ते काम मिळवण्यासाठी त्या ठिकाणी सर्व जण एकत्र येतात, त्यांच्यात कोणताही वाद होत नाही. यासाठी ते कोणतेही स्पर्धा करत नाहीत, पैशासाठी कोणतेही नाते तोडत नाहीत, इतका समंजसपणा या कामात आम्ही मिळवला आहे’’ असेही माने यांनी सांगितले. सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश असल्यामुळे आमच्या गावातील प्लंबर व्यावसायिकांना अनेक कामे मिळतील, असेही ते म्हणाले.
आर्थिक स्थिरता
कधीकाळी निराशेच्या गर्तेत असलेल्या या गावाला प्लबिंग व्यवसायामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. गावात टुमदार घरे पाहायला मिळतात, थाटामाटात लग्न व कौटुंबिक सोहळे पार पडली जातात. अनेकांकडे चारचाकी गाड्या आहेत. प्रत्येक घरात दुचाकी गाडी आहे.
सुधाकर पाटील सांगतात, ‘‘30 वर्षांपूर्वी आमचे गाव दुसर्या गावावर अवलंबून होते. आज हेच गाव रोजगाराच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनले आहे. आज प्रत्येक घरात तीन ते चार प्लंबर आढळतात. सकाळी आठनंतर तुम्हाला कोणताही तरुण बिनकामाचा आढळणार नाही. गावातला प्रत्येक व्यक्ती या कामाशी जोडली गेली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हाती पैसा खेळत असतो. या कामातून प्रत्येक आठवड्याला लाखो रुपये गावात येतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात आर्थिक स्थैर्य निर्माण झाले आहे.
गावात पूर्वी जुनी, मातीची, कुडाची घरे होती. त्याजागी आता पक्की घरे पाहायला मिळतात. सोलापूर शहरात अनेकांची स्वतःची जागा आणि घरे आहेत.
विशेष म्हणजे 70 टक्के लोक दर वर्षी आयटी रिटर्न भरतात. जेमतेम बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात आयटी रिटर्न भरला जातो, आमच्यासाठी ही एक मोठी गोष्ट आहेच, मुख्य म्हणजे राष्ट्राच्या प्रगतीसाठी ती लाभदायक आहे.
आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने गावात महिलांच्या दहा, तर पुरुषांच्या आठ भिशी चालतात. आजपर्यंत भिशीत कोणताही आर्थिक गैरव्यवहार आढळलेला नाही. प्लंबर वर्गाच्या मदतीने गावात जय हनुमान सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. या सोसायटीच्या माध्यमातून अनेक आर्थिक विषय मार्गी लागताहेत. गावातील 95 टक्के महिला दुसर्यांच्या शेतात कामाला जात नाहीत
आज गावातील काही व्यक्तींनी शेती क्षेत्रात प्रगती साधली आहे. अनिल देवकर, दत्ता कवडे हे पंचक्रोशीत प्रगतिशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. गावातीलच तरुणांना सोलापूर शहरात एक मेडिकल स्टोअर्स, दोन प्लंबिंग मटेरियल दुकान सुरू केले आहे.
शैक्षणिक प्रगती
गेल्या अनेक दशकांपासून वरळेगावची शैक्षणिक प्रगती खुंटली होती. त्याला सामाजिक व आर्थिक कारणे कारणीभूत होती.
या संदर्भात बोलताना गावातील रहिवासी व शिक्षक अजित खरात म्हणाले, ‘‘मी जेव्हा लहान होतो, तेव्हा गावातील एकही विद्यार्थी दहावीच्या पुढे जात नव्हता. अनेकांची इच्छा असूनही पुढे शिकता येत नसे. आज प्लंबर व्यवसायामुळे गावाला आर्थिक झळाळी मिळाली आहे. त्यामुळे गावात अनेक बदल होताहेत, त्यातील एक महत्त्वाचा बदल शिक्षणात दिसून येतो. प्रत्येक जण शिक्षणाकडे नव्या आशेने पाहत आहे. आपण शिकलो नाही पण आपला पाल्य पुढे शिकला पाहिजे, त्याने उच्च शिक्षण घेतले पाहिजे, या हेतूने अनेक पालक आपल्या मुलांला चांगल्या शाळेत शिकवत आहेत. आज गावातील तरुण शिकून विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यातील दहा इंजीनिअर, एक डॉक्टर, तीन शिक्षक, दोन वकील, दोन पोलीस आणि एक ग्रमसेवक बनले आहेत. यापुढे गावातील अनेक तरुण-तरुणी विविध क्षेत्रांत कार्यरत राहून गावाचे नाव आणखी उंचावतील, अशी अपेक्षा आहे.’’
सामाजिक बांधिलकी
गावाने आर्थिक प्रगती साधली असली, तरी सामाजिक बांधिलकीचा विसर पडू दिलेला नाही. त्यासाठी गावात सद्भावना सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
याबाबत बिभीषण देवकर म्हणाले, ‘‘लॉकडाउनच्या काळात आमच्या गावाशेजारी असलेल्या उळे गावात ऊसतोड कामगारांची टोळी उतरली होती. या कामगारांचे हाल होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली, तेव्हा या कामगारांना आमच्या संस्थेकडून योग्य ती मदत देण्यात आली. विशेष म्हणजे पहिल्या लॉकडाउनपासून ते आजपर्यंत संस्थेशी जोडलेल्या एकाही व्यक्तींचा आम्ही वाढदिवस साजरा केला नाही. वाढदिवसासाठी होणारा खर्च आम्ही सामाजिक कार्यासाठी वापरत असतो. ग्रमदैवत हनुमान जयंतीच्या निमित्ताने गावातील आणि गावाबाहेर राहणारे सर्व जण आम्ही एकत्रित येत असतो आणि एकोपा जपतो’’असेही ते म्हणाले.
कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते, कमी दर्जाचे नसते. त्यामुळे कोणत्याही छोट्या गोष्टीने सकारात्मक बदल घडवून आणता येऊ शकतो, हे छोट्याशा वरळेगावने दाखवून दिले आहे. आत्मनिर्भर गावाची ही कहाणी प्रत्येक गावाने अनुकरण करावी अशी आहे.
संपर्क -
बिभीषण देवकर-9423856705
सुधाकर पाटील- 9850974262
भीमा माने - 9822116292