मोपला जिहादला आर्थिक कारणे असती, तर मग हिंदूंची बाटवाबाटवी करण्याचे, त्यांची मंदिरे भ्रष्ट करण्याचे काय कारण होते? जिहादला मजहबी रंग नव्हता असे म्हणणे आहे ना? मग मंदिरे पडत असताना मशिदी कशा शाबूत राहिल्या? बरे, स्वतः खून पाडणार्यांनी आपल्या कृत्यांमागील आपल्या इस्लामी प्रेरणांना कधी सेक्युलर मुलामा दिला नाही. वैचारिक दहशतवादात सर्वप्रथम पायदळी तुडविले जाते ते सत्याला! मोपल्यांनी केलेला नंगानाच बंड किंवा विद्रोह होता असे म्हणणे सत्याचा अपलाप आहे. तो शुद्ध इस्लामी जिहाद होता, हे सांगायला संकोच कसला?
खिलाफत चळवळ ही हिंदू-मुस्लिमांनी गुण्यागोविंदाने चालविलेली अहिंसक चळवळ होती, अशी लोणकढी थाप वारंवार मारली जाते. पण वस्तुस्थिती काय होती? सन 1919-1922 ह्या काळात खिलाफत चळवळ शिगेला असताना देशात ठिकठिकाणी मुस्लिमांनी दंग्यांचे सत्र चालविले. वानगी म्हणून ह्या काळात झालेल्या मुस्लीम दंग्यांची त्रोटक यादी पुढीलप्रमाणे (गांधी अँड अॅनार्की, सर सी. शंकरन नायर, टागोर अँड कं., मद्रास, 1922) - नेल्लोर (22 सप्टेंबर 1919), मुथुपेट, तंजावर (मे 1920), मद्रास (मे 1920), सुक्कुर, सिंध (29 मे 1920), काचागढी, वायव्य सीमा प्रांत (8 जुलै, 1920), कसुर, पंजाब (25 ऑगस्ट, 1920), पिलिभीत, संयुक्त प्रांत (23 सप्टेंबर 1920), कुलाबा जिल्हा (9 जानेवारी 1921), नैहाती, बंगाल (4,5 फेब्रुवारी 1921), कराची (1 ऑगस्ट 1921), मद्रास (5 ऑक्टोबर 1921), कलकत्ता (24 ऑक्टोबर 1921), हावडा (4 नोव्हेंबर 1921), कूर्ग (17 नोव्हेंबर 1921), कण्णूर (4 डिसेंबर 1921), जमुनामुख, आसाम (15 फेब्रुवारी 1922), सिल्हेट (16 फेब्रुवारी 1922). पण मुस्लिमांनी क्रौर्याची परिसीमा गाठली ती उत्तर केरळच्या मलबार भागात! मजहब किंवा संप्रदाय असल्याचे भासवून धुमाकूळ घालणार्या साम्राज्यवादी विचारांच्या सच्च्या अनुयायांनीच सर्वाधिक नरसंहार केल्याचे मानवी इतिहास सांगतो. सन 1921-1922 ह्या काळात झालेला मोपल्यांचा जिहाद त्याच निर्दयी इतिहासाचा एक काळाकुट्ट अध्याय होय. त्यावर रंगसफेदी करणारी कथानके रचण्याचे उद्योग वर्षानुवर्षे अव्याहतपणे सुरू आहेत. कथाकाराने कोणते वैचारिक झापड लावले आहे, त्यावर कथानक ठरते. काँग्रेसी कळपातील लोकांना हा ब्रिटिश अधिकारी आणि त्यांच्या हिंदू समर्थकांविरुद्ध करण्यात आलेला राष्ट्रवादी उठाव वाटतो. डाव्या कंपूला तो हिंदू जमीनदारांविरुद्ध गरीब बिचार्या मुस्लीम शेतकर्यांनी केलेला वर्गसंघर्ष वाटतो.
केरळचे पहिले साम्यवादी मुख्यमंत्री आणि (अर्थातच) विद्वान समजल्या जाणार्या ई.एम.एस. नंबुद्रिपादांचे विश्लेषण पुढीलप्रमाणे - ‘जन्मी (जमिनीवर एकाधिकार असलेला)च्या अत्याचाराविरुद्ध सर्वप्रथम निषेधाचा आवाज उठविण्याचा मान येरनाड व वल्लुवनाड तालुक्यांतील निरक्षर आणि मागास मोपल्याला जातो’ (अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ पेजन्ट मूव्हमेंट इन केरला, ई.एम.एस. नंबुद्रिपाद, पीपल्स पब्लिशिंग हाउस, मुंबई, 1943, पृ. 1). अत्याचारग्रस्तांना दोष देऊन अत्याचार करणार्यांची तळी उचलणारी ही वैचारिक दादागिरी आपल्या किती अंगवळणी पडावी? केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अधीन असलेला स्वातंत्र्यसैनिक व पुनर्वसन विभाग मोपल्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून निवृत्तिवेतन देतो!
कोणत्याही पूर्वग्रहापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी भाष्य न करता केलेली ऐतिहासिक घटनांची कोरी नोंद महत्त्वाची असते. ‘मद्रास मेल’ आणि ‘वेस्ट कोस्ट स्पेक्टेटर’ यासारख्या वृत्तपत्रांतील तत्कालीन बातम्यांचे इतिवृत्त लिहिण्याचे काम कालिकत (कोळीकोळ)चे निवृत्त उपजिल्हाधिकारी दिवाणबहादुर सी.गोपालन नायर ह्यांनी केले (द मोपला रिबेल्लियन, नॉर्मन प्रिंटिंग ब्यूरो, 1923). ह्या व अशाच संदर्भांच्या आधारे प्रस्तुत लेख लिहिलेला आहे.
मलबार आणि मोपले
उत्तर केरळच्या मलबार किनारपट्टीवर राहणार्या मल्याळीभाषक मुस्लिमांना ‘मोपला’ (मापिल्ला, महापिल्लई शब्दाचा अपभ्रंश) म्हटले जाते. तामिळमध्ये किंवा मल्याळममध्ये ‘पिल्लई’ म्हणजे पुत्र, महापिल्लई म्हणजे महापुत्र किंवा जावई अशी ह्या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते, पण ती खरी नसावी. वस्तुतः ‘मापिल्ला’ हा शब्द हिंद्वेतारांसाठी वापरला जातो. ज्यू, ख्रिस्ती आणि मुस्लीम ह्यांना अनुक्रमे यहुदी मापिल्ला, नसरानी मापिल्ला आणि जोनगा मापिल्ला म्हटले जाते. हे मुस्लीम मोपले मुळात आले कुठून, ह्याविषयी अनेक आख्यायिका आहेत.
हिंसा आणि फसवणूक करणार्या विचारसरणी स्वतःचा प्रसार करण्यासाठी नेहमीच शांतीचा आणि प्रेमाचा मुखवटा चढवितात. इस्लामचे आणि ख्रिश्चनिटीचे आगमन हिंदुस्थानात सर्वप्रथम केरळमध्ये अगदी शांतिपूर्वक झाले, असा सुरम्य इतिहास सांगितला जातो. मक्केतील मशिदीनंतर जगातील सर्वांत प्राचीन मशीद कुठे आहे, ओळखा पाहू? तर ती आहे केरळच्या मलबार भागातील त्रिशूर जिल्ह्यात कोडंगलूर (अपभ्रंश क्रांगनोर) गावी, बरे का! ती कधी आणि कोणी बांधविली? चेरामन पेरुमल नावाच्या स्थानिक राजाने चंद्र दुभंगल्याचा चमत्कार पाहिला, त्याने प्रभावित होऊन तो मक्केला गेला, तिथे प्रेषित मुहम्मदांना भेटून त्याने इस्लामचा स्वीकार केला आणि त्यानेच 629 साली चेरामन जुम्मा मशीद बांधविली! वा रे इतिहास! वारंवार खोटे सांगितले की काही लोकांना तरी ते खरे वाटू लागते.
सन 825च्या सुमारास मलिक-इब्न-दिनारच्या नेतृत्वाखाली पंधरा अरबांचे टोळके कोडंगलूरला आले, असे सांगण्यात येते. स्थानिक राज्यकर्त्यांच्या अनुज्ञेने त्यांनी मलबार आणि लगतच्या दक्षिण कन्नडा भागांत दहा मशिदी बांधल्या आणि बाटवाबाटवीचा कार्यक्रम सुरू केला. अरबांच्या नौकांवर काम करण्यासाठी मच्छीमार कुटुंबातील किमान एका पुरुषाने मुस्लीम व्हावे, असे कालिकतच्या झामोरिन (सामुद्री शब्दाचा अपभ्रंश) राजाने आदेश काढल्याचे मुस्लीम इतिहासकार सांगतात. ऑगस्ट 1789मध्ये टिपू सुलतानच्या स्वारीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर बलात्काराने बाटवाबाटवी करण्यात आली (नायर, उपरोक्त, पृ. 3, 4).
उत्तर मलबारमधील मोपले हिंदूंच्या उच्च समजल्या जाणार्या सधन जातींतील बाटगे होते. ह्याउलट दक्षिण मलबारमधील मोपले हे तिय्या (इळवा), चेरुमन आणि मुक्कुवन नावाच्या निम्न समजल्या जाणार्या जातींतून आले होते (द मापिल्ला रिबेल्लियन, 1921: पेजन्ट रिवोल्ट इन मलबार, रॉबर्ट एल. हार्डग्रेव्ह ज्युनियर, मॉडर्न एशियन स्टडीज, खंड 11, क्र. 1, 1977, पृ. 59). सन 1921पर्यंत मलबारमधील सर्वाधिक गतीने वाढणारा समुदाय असा मोपल्यांचा लौकिक होता. त्या वेळची त्यांची लोकसंख्या दहा लाख - म्हणजे मलबारच्या एकूण लोकसंख्येच्या 32% होती. त्यातही दक्षिण मलबारमध्ये त्यांची विशेष संख्या होती. मोपला जिहादचा केंद्रबिंदू असलेल्या येरनाड तालुक्यात त्यांची लोकसंख्या 60% होती (हार्डग्रेव्ह, उपरोक्त, पृ. 58). तत्कालीन मलबार जिल्ह्यात दहा तालुके होते. जिहादच्या वेळी दक्षिण मलबारच्या येरनाड, वल्लुवनाड, पोन्नानी, कालिकत आणि उत्तर मलबारच्या कुरुंब्रनाड आणि वायनाड तालुक्यांत ‘सैनिकी कायदा’ लागू करण्यात आला. ह्यांतील पहिल्या चार तालुक्यांत प्रत्यक्ष हिंसाचार झाला. ह्या चार तालुक्यांचा विस्तार आणि त्यांतील विविध मतानुयायांची संख्या पुढीलप्रमाणे (नायर, उपरोक्त, पृ.1, 2) -
मोपला उद्रेकांचा इतिहास
सन 1766मध्ये कालिकतच्या झामोरिनची कागदपत्रे एका विशाल आगीत भस्मसात झाली. त्यामुळे झैन अल-दीन अल-मआबारी ह्याने 1580च्या दशकात लिहिलेल्या ‘तुहफात अल-मुजाहिदीन फी बआद अहवाल अल-पुर्तुकालिय्यीन’ (पोर्तुगीजांच्या काही कृत्यांसंबंधी पवित्र योद्ध्यांना भेटवस्तू) नावाच्या पुस्तकातूनच सोळाव्या शतकातील मलबारचा अरबी इतिहास वाचावयास मिळतो. मोपल्यांना पोर्तुगीजांविरुद्ध जिहाद करण्याची प्रेरणा देण्यासाठीच हे पुस्तक लिहिण्यात आले होते. अनेक शतकांपासून मोपल्यांत अखिल-इस्लामवादी भावना रुजलेली होती. सोळाव्या शतकात त्यांनी इंडोनेशियातील अॅचेनी मुस्लिमांची साथ देत पोर्तुगीजांविरुद्ध जिहाद केला होता. सन 1742पासूनचा मोपल्यांच्या उद्रेकांचा इतिहास उपलब्ध आहे. मार्च 1764मध्ये ताळसेरी (तेल्लीचेरी)जवळ असलेल्या धर्मादम किल्ल्यातील पोर्तुगीज चर्चवर दोन मुस्लिमांनी हल्ला केला (द इस्लामिक फ्रॉन्टियर इन साउथवेस्ट इंडिया: द शहीद अॅज अ कल्चरल आयडियल अमंग द मापिल्लाज ऑफ मलबार, स्टीफन एफ.डेल, मॉडर्न एशियन स्टडीज, खंड 11, क्र. 1, 1977, पृ. 42-43, 48, 52).
स्टीफन डेल ह्यांनी मोपल्यांच्या पूर्व उद्रेकांचे विश्लेषण केले आहे (द माप्पिल्ला आउटब्रेक्स: आयडियॉलॉजी अँड सोशल कन्फ्लिक्ट इन नाइनटीन्थ सेंच्युरी केरला, द जर्नल ऑफ एशियन स्टडीज, खंड 35, क्र. 1, नोव्हें. 1975, पृ. 85-97). सन 1836 आणि 1921-1922 च्या हिंसाचाराच्या दरम्यान मलबारात सुमारे 33 मोपला उद्रेक झाले. ह्यांपैकी अर्धेअधिक उद्रेक पहिल्या सोळा वर्षांत घडले. बहुतेक सर्व उद्रेक ग्रामीण भागांत झाले. त्यातही एक सोडून अन्य सर्व उद्रेक कालिकत आणि पोन्नानी ह्यांमधील 35 मैलांच्या क्षेत्रात घडले. तीन उद्रेक वगळता अन्य सर्व उद्रेक हिंदूंविरुद्ध होते. हे उद्रेक किरकोळ स्वरूपाचे असून काही दिवसांतच शमले. त्यांत बळी पडलेल्यांची संख्या कमी होती. तीसपेक्षा अधिक मोपल्यांनी भाग घेतला असे तीन उद्रेक होते. मोजके अपवाद वगळता सर्व उद्रेकांमध्ये इस्लामसाठी शहीद होण्याच्या लालसेपोटी मोपला हल्लेखोरांनी आत्मबलिदान केले होते. ह्या सर्व उद्रेकांत सहभागी झालेल्या 350 मोपल्यांपैकी 322 जणांचा मृत्यू होऊन केवळ 28 जणांना पकडण्यात यश मिळाले. आत्मघातकी हल्ल्याच्या कैक आठवडे अगोदरपासून हल्लेखोर विशिष्ट विधी करावयाचे.
एकूण 33 घटनांपैकी नऊ घटनांच्या बाबतीत ग्रामीण वर्गसंघर्ष हे मूळ कारण होते. अन्य तीन घटनांच्या बाबतीत शेतीविषयक गार्हाणी काही अंशी कारणीभूत होती. परंतु विस्तृत तपशील असलेल्या तेरा घटनांचा कुठल्याही शेतीविषयक विवादाशी उघड संबंध नव्हता. ह्यांपैकी चार घटना व्यक्तिगत वैमनस्यातून घडल्या होत्या. दोन हल्ले ब्रिटिश कलेक्टरांवर करण्यात आले होते. त्यांपैकी एका कलेक्टरने एका मुस्लीम मजहबी नेत्याला सीमापार केले होते, तर दुसर्याने बळाने मुस्लीम करण्यात आलेल्या एका हिंदू मुलास वाचविले होते. इस्लामचा त्याग केला म्हणून तीन घटनांमध्ये मूळ हिंदू असलेल्या व्यक्तीला आणि तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्यात आले होते. उर्वरित आठ घटनांमध्ये हल्लेखोरांचा हेतू ओळखणे अशक्य होते. जिहादचा पुरस्कार करणारे सय्यिद फजल (सुमारे 1820-1901)सारखे मजहबी नेते ह्या उद्रेकांमागील सर्वाधिक महत्त्वाचे कारण होते. हे नेते दोन प्रकारचे होते - महत्त्वाच्या मशिदींमध्ये काजी आणि इमामचे काम करणारे अरबवंशीय ’थंगल’ आणि कुराणाचा अर्थ सांगणारे अल्पशिक्षित ’मुसलियार’.
पूर्वी झालेल्या मोपला उद्रेकांमागे आर्थिक कारणे असल्याचे दिसत नाही. शेतमजुरांचे निष्कासन हे शेतीविषयक प्रमुख गार्हाणे असे. सन 1862-1880 ह्या काळातील निष्कासनांच्या दोन-तृतीयांश प्रकरणांत विविध हिंदू कृषकजाती पीडित होत्या. परंतु त्यांनी कधी ह्या काळात विशेष हिंसा केल्याची नोंद नाही. शिवाय निष्कासनांची प्रकरणे आणि मोपल्यांचे उद्रेक ह्यांचा अर्थाअर्थी कोणताही संबंध जोडता येत नाही. उलट 1862 ते 1880 ह्या काळात निष्कासनांची संख्या 1,891पासून 8,335 इतकी वाढूनही मोपल्यांचे तीनच उद्रेक झाले. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा! जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मोपले होते. पण एक अपवाद वगळता सर्व उद्रेक दक्षिणेकडील तालुक्यांतील एका छोट्याशा क्षेत्रापुरतेच सीमित होते.
पूर्वीचे उद्रेक आणि 1921-22मधील जिहाद यामध्ये वेगळे काय होते? आधीपासून असलेल्या मजहबी कट्टरपणात आणि सामाजिक संघर्षात खिलाफत चळवळीने सिद्धान्त आणि संघटना अशा दोन महत्त्वाच्या घटकांची भर घातली, हाच तो महत्त्वाचा फरक!
मोपला जिहादाची बीजे
दि. 28 एप्रिल 1920ला येरनाड तालुक्यातील मंजेरी येथे झालेल्या मलबार जिल्हा कॉन्फरन्सने प्रस्ताव संमत करून मलबारात खिलाफत चळवळीचे रणशिंग फुंकले. ह्या परिषदेला 1000 प्रतिनिधी आले होते. ’सरकारने तुर्की प्रश्न सोडवावा, अन्यथा मद्रास येथे मौलाना शौकत अलींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खिलाफत कॉन्फरन्सने ठरविल्याप्रमाणे जनतेने सरकारविरुद्ध उत्तरोत्तर असहकाराचे धोरण स्वीकारावे’ असे आवाहन परिषदेत करण्यात आले. दि. 18 ऑगस्ट 1920ला गांधी आणि शौकत अलींनी कालिकतच्या त्यांच्या भेटीत खिलाफत आणि असहकारावर भाषणे दिली. त्यामुळे मलबारमध्ये सर्वत्र खिलाफत कमिटींची स्थापना झाली. जिहाद सुरू होण्याच्या काही महिने अगोदर मोपल्यांच्या मुख्य केंद्रांवर अतिविशाल सभा घेण्यात आल्या. दि. 15 फेब्रुवारी 1921ला याकूब हसन नावाचा मद्रासचा खिलाफतवादी नेता सभा घेण्याच्या उद्देशाने कालिकतला आला. सरकारने त्याला मनाईचा आदेश बजावताच प्रक्षोभ निर्माण झाला (सी. गोपालन नायर, उपरोक्त, पृ. 8-16). प्रचाराचा धुरळा उडविण्यासाठी खिलाफतचे प्रचारक सर्वदूर हिंडू लागले. अफगाण येणार अशी आवई सर्वत्र उठली. आपले राज्य येणार ह्या अपेक्षेने खिलाफतवादी नेत्यांनी गरीब मोपल्यांच्या नावे जमीन निश्चित केली असून तिचा प्रत्यक्ष ताबा देण्यासाठी ते चळवळीची वाट पाहत असल्याच्या बातम्या पिकवण्यात आल्या. मौलाना मुहम्मद अलींनी मद्रासला दिलेल्या भाषणाच्या छापील वितरणावर सरकारने बंदी घातली (हार्डग्रेव्ह, उपरोक्त, पृ. 71).
जिहादसाठी पोषक घटक
मोपल्यांच्या प्रत्येक केंद्रात मोपला अध्यक्ष, मोपला सचिव आणि मोपला सदस्य असलेले ’खिलाफत असोसिएशन’ होते. अशा समित्यांचा नेमका आकडा सांगणे अवघड असले, तरी येरनाड आणि पोन्नानी तालुक्यांत सुमारे 100 खिलाफत समित्या असल्याचा अंदाज आहे (सी. गोपालन नायर, उपरोक्त, पृ. 16, 18). प्रत्येक गावाला स्वतःचे खिलाफत असोसिएशन होते. दूरवरच्या ठिकाणांहून पुरुषमंडळींना केव्हाही अल्पावधीत विवक्षित स्थळी एकत्र आणता येईल, अशी संपर्काची सक्षम यंत्रणा गावागावांमध्ये होती. सामुदायिक नमाजाचे केंद्र ह्या नात्याने मशिदीच्या भोवती मुस्लीम वस्ती एकवटलेली होती. ह्याच्या विरुद्ध हिंदूंची वस्ती विखुरलेली होती (हार्डग्रेव्ह, पृ. 72). जिल्हा पोलीस निरीक्षक आर.एच. हिचकॉकचे पुढील निरीक्षण महत्त्वाचे आहे - ‘खिलाफत चळवळीच्या जाळ्याहून कैक पटीने महत्त्वाची होती मोपल्यांची संपर्काची पारंपरिक यंत्रणा. हिंदू आणि मोपल्यांमध्ये हा मुख्य फरक होता. जे काही थोडे बाजार आहेत ते मोपल्यांचे आहेत आणि बहुतेक मोपले आठवड्यातून निदान एकदा तरी शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी आणि अनेकदा अन्य वेळी मशिदींत एकत्र येतात. त्यामुळे त्यांचे स्वतःचे सामूहिक मत बनवून ते एकत्र येऊ शकतात. पण हे सगळे धर्माच्या आवरणाखाली होत असल्यामुळे हिंदू किंवा युरोपीय लोकांना त्याची जाणीवदेखील होणे अवघड जाते. क्वचित होणार्या उत्सवांचा अपवाद वगळता हिंदूंना एकत्र येण्याची अशी कोणतीही संधी नाही (अ हिस्ट्री ऑफ द मलबार रिबेल्लियन, आर.एच. हिचकॉक, गव्हर्मेंट प्रेस, मद्रास, 1921, पृ. 3).
शिंगाच्या आकाराची मूठ असलेल्या दोन फूट लांबीच्या टोकदार एकधारी वा दुधारी तलवारी, दीड फूट लांबीचे शिकारी सुरे, पारंपरिक मोपला सुर्या, छेद असलेले तीन फूट लांबीचे भाले, लाठ्या, कुर्हाडी अशी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे मोपल्यांनी जमविली होती (द मापिल्ला रिबेल्लियन 1921-1922, जी.आर.एफ. टोटेनहॅम, गव्हर्मेंट प्रेस, मद्रास, 1922, पृ. 36). मलबार प्रदेशाचे स्वरूप बंदिस्त आणि डोंगराळ असल्यामुळे जिहादींना पकडणे दुरापास्त होते. जिहादी वेगवेगळ्या गटांत पसार होऊन गनिमी युद्ध करावयाचे... आणि बरीच मोठी सैनिकी अडचण निर्माण करावयाचे (टोटेनहॅम, उपरोक्त, पृ. 38). स्थानिक पोलिसांत बरेच मोपले होते, ह्या परिस्थितीचा सामना करण्यात ते पूर्णपणे अक्षम ठरले. पोलीस ठाण्यांवर हल्ले झाले, तरीही जवळजवळ कोणताही प्रतिकार करण्यात आला नाही आणि बंडखोरांनी सर्व शस्त्रे लंपास केली (सी.गोपालन नायर, उपरोक्त, पृ.71; टोटेनहॅम, उपरोक्त, पृ. 7).
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हिंदू-मुस्लीम एकीच्या पोकळ घोषणांच्या मोहजालात हिंदू पुरते फसले होते. टोटेनहॅम लिहितो - ‘महात्म्याच्या अहिंसेच्या हिंदू म्यानात इस्लामच्या हिंसक तलवारीचा खडखडाट ऐकू येत होता. मापिल्ला घरी गेला आणि नांगरापासून तलवार आणि करवतीपासून अनेक कट्यारी बनविण्याचा तो विचार करू लागला. अहिंसा हा कृतीची वेळ आली की भिरकावून देण्यासाठीचा बुरखा होता... मापिल्ला मानसिकतेबाबत अनभिज्ञ असलेले तरुण हिंदू वक्ते आपले अभियान चालविण्यात गुंग होते’ (टोटेनहॅम, उपरोक्त, पृ.3).
जिहादी हैदोस
प्रथम कोरी आकडेवारी बघू! दि. 20 ऑगस्ट 1921ला जिहाद सुरू झाला. दि. 26 ऑगस्ट 1921ला ’मार्शल लॉ’ लागू करण्यात आला नि तो दि. 25 फेब्रुवारी 1922ला मागे घेण्यात आला. दि. 30 जून 1922ला अबू बकर मुसलियार ह्या मोपला नेत्याच्या अटकेने जिहादचा शेवट झाला. सप्टेंबर ते डिसेंबर 1921 ह्या काळात जिहादी हैदोसाने कळस गाठला. केंद्रीय विधिमंडळात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना गृहसचिव सर विल्यम व्हिन्सेंट म्हणाला, “बळाने बाटविलेल्यांची संख्या बहुधा हजारांमध्ये असावी असा मद्रास सरकारचा अहवाल आहे, पण त्याचा निश्चित अंदाज बांधणे अर्थातच कधीही शक्य होणार नाही.” (पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया, बी.आर. आंबेडकर, ठाकर अँड कंपनी लि. 1945, पृ. 148).
एकूण 20,800 हिंदूंची हत्या करण्यात आली आणि 4000हून अधिक हिंदूंना तलवारीच्या धाकाने बाटविण्यात आले. लाखो हिंदू बेघर झाले, ब्रिटिशांच्या गोळीबारात सुमारे 2,339 मोपले ठार, तर 1,652 मोपले जखमी झाले. ब्रिटिशांनी 39,338 मोपल्यांवर खटला चालविला आणि त्यांतील 24,167 जणांना शिक्षा झाली (महाराष्ट्र हिंदुसभेच्या कार्याचा इतिहास, शं.रा. दाते, पुणे, 1975, पृ. 21, 22). नष्ट किंवा भ्रष्ट करण्यात आलेल्या मंदिरांची संख्या एक हजारांहून अधिक होती (सी. गोपालन नायर, उपरोक्त, पृ. 88). जिहादच्या सुरवातीला कालिकत आणि मल्लपुरम येथील 210 जणांचे राखीव सशस्त्र दल होते. जिहाद चालू असताना जिल्ह्यात ‘मलबार विशेष पोलीस’चे गठन होऊन शेवटी त्याची संख्या 600 झाली (सी. गोपालन नायर, उपरोक्त, पृ. 39). सैन्य आणि मलबार विशेष पोलीस दल मिळून 43 कर्मचारी मेले आणि 126 जखमी झाले. जिल्हा आणि राखीव पोलीस दलांचे आणखी 24 ठार आणि 29 जखमी झाले (टोटेनहॅम, उपरोक्त, पृ. 48, 53, 414, 425).
जिहादमध्ये नेहमीच होणार्या क्रौर्याचा पुढील कित्ता मोपला जिहादात गिरविण्यात आला (झामोरिन महाराजांच्या अध्यक्षतेखाली कालिकतला पार पडलेल्या परिषदेच्या वृत्तान्तावरून, सर सी. शंकरन नायर, उपरोक्त, पृ. 138) -
1. महिलांचा पाशवी विनयभंग
2. जिवंतपणे कातडी सोलवटून काढणे
3. पुरुष, महिला आणि मुलांची घाऊक हत्या
4. संपूर्ण कुटुंबांना जिवंत जाळणे
5. हजारो लोकांना बळाने बाटविणे आणि तसे करण्यास नकार देणार्यांना ठार मारणे
6. अर्धमेल्या लोकांना विहिरींत फेकून देणे, जेणेकरून वेदनांपासून मृत्यू सुटका करेपर्यंत पीडित लोक निसटून जाण्यासाठी तासन्तास तडफडत
7. प्रभावित क्षेत्रातील बरीच हिंदू आणि ख्रिस्ती घरे जाळणे आणि जवळजवळ सर्व घरे लुटणे ज्यात मोपला महिला आणि मुलांचाही सहभाग, महिलांच्या अंगावरील कपडेदेखील ओरबाडून घेणे, थोडक्यात सर्व मुस्लिमेतर जनतेला भिकेला लावणे
8. प्रभावित क्षेत्रातील अनेक मंदिरे नष्ट आणि भ्रष्ट करून, मंदिरांच्या आवारात गोहत्या करून नि पवित्र मूर्तींवर गायींची आतडी ठेवून नि कवट्या भिंतीवर व छतांवर ठेवून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा दुष्टपणे अपमान.
अली मुसलियार, वारियनकुन्नथ कुंजाहमद हाजी आणि कोया थंगल यासारख्या अनेक मुस्लीम नेत्यांनी स्वतःला खिलाफत राजा किंवा राज्यपाल म्हणवून हिंदूंचा नरसंहार घडवून आणला. पैकी कुंजाहमदला ‘महानायक’ ठरवून त्याच्यावर सध्या केरळमध्ये अनेक चित्रपट बनत आहेत. कोया थंगलने आजूबाजूच्या गावांतून 4000 अनुयायी गोळा करून एका टेकडीवर आपला ‘दरबार’ भरविला. चाळीसहून अधिक हिंदूंना त्यांचे हात पाठीला बांधून थंगलकडे नेण्यात आले. सैन्याला मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांतील 38 जणांना मृत्युदंड देण्यात आला. थंगलच्या हस्तकांनी सर्वांना विहिरीजवळ नेले. एकेकाचे मुंडके छाटून धड विहिरीत ढकलण्यात आले. या सर्व प्रकाराची पाहणी करण्यासाठी थंगल विहिरीजवळ असलेल्या दगडावर बसला होता. (सी. गोपालन नायर, उपरोक्त, पृ. 76-80). ठार मारण्याची ही अभिनव पद्धत थंगलने शोधून काढली होती असे समजण्याचे कारण नाही. त्याच्यापुढे प्रत्यक्ष प्रेषित मुहम्मदांचे उज्ज्वल उदाहरण होते. सन 627मध्ये झालेल्या खंदकाच्या लढाईत प्रेषितांच्या नेतृत्वाखालील इस्लामी सैन्याने बनू कुरैझा ह्या ज्यू टोळीचे असेच शिरकाण केले होते!
सेक्युलर लबाडी
मोपल्यांनी केलेल्या बलात्कारांना आणि हत्यांना सेक्युलर कारणे देऊन त्यांचे समर्थन करण्याची लबाडी होत असल्यामुळे तिची झाडाझडती घेतली पाहिजे. मोपला उद्रेकांची चौकशी करण्यासाठी मलबारात ‘विशेष निरीक्षक’ म्हणून नेमण्यात आलेल्या टी.एल. स्ट्रेंज ह्याने 1852 साली लिहिलेल्या अहवालात पुढील नोंद केली - ‘भाडेकरूला व्यक्तिगत अडचणी आल्याची उदाहरणे होत असली, तरी हिंदू जमीनदारांची त्यांच्या मोपला किंवा हिंदू भाडेकरूंशी एकूण वर्तणूक सौम्य, न्याय्य आणि सहिष्णू असल्याची ...माझी खात्री पटली आहे... उद्रेक सामान्यपणे घडले, त्या दक्षिण मलबारच्या तालुक्यांतील मोपला भाडेकरूंचा, कामचुकारपणा करण्याकडे आणि खोट्या दावेवजा तक्रारी करण्याकडे असतो... उद्रेक वारंवार घडलेल्या ठिकाणी मोपल्यांना हिंदू इतके घाबरतात की त्यांच्याविरुद्ध आपले अधिकार प्रस्थापित करण्यास ते बहुधा धजत नाहीत. धोका इतका असतो की भाडे न देणार्या अनेक मोपला भाडेकरूंना हाकलून देता येत नाही’ (सी. गोपालन नायर, उपरोक्त, पृ. 6).
‘उच्च जातींविरुद्ध पीडित जातींनी केलेला विद्रोह’ अशीही मोपला जिहादाची भलामण केली जाते, पण तेही निराधार आहे. प्रत्यक्ष जिहाद सुरू होण्यापूर्वी खालच्या समजल्या जाणार्या तिय्या जातीच्या लोकांवर मोपल्यांनी हल्ले केल्याची अनेक उदाहरणे आहेत. ही मंडळी ताडीची दुकाने चालवायची. मद्यविक्री करणार्या दुकानांपुढे धरणे देणे हा असहकार आंदोलनातील भाग मजहबी कारणांमुळे मुस्लिमांच्या आस्थेचा होता (हार्डग्रेव्ह, उपरोक्त, पृ. 70, 71).
मोपला जिहादला आर्थिक कारणे असती, तर मग हिंदूंची बाटवाबाटवी करण्याचे, त्यांची मंदिरे भ्रष्ट करण्याचे काय कारण होते? जिहादला मजहबी रंग नव्हता असे म्हणणे आहे ना? मग मंदिरे पडत असताना मशिदी कशा शाबूत राहिल्या? बरे, स्वतः खून पाडणार्यांनी आपल्या कृत्यांमागील आपल्या इस्लामी प्रेरणांना कधी सेक्युलर मुलामा दिला नाही.
मोपला जिहादाविषयी भिन्न मते असलेल्या गांधी आणि डॉ. आंबेडकरांनीदेखील त्यांच्या त्यांच्या पद्धतीने का होईना, मोपल्यांच्या वर्तणुकीला सेक्युलर नव्हे, तर इस्लामी कारणे दिली. ‘शूर, देवभीरू मोपले, जे त्यांच्या दृष्टीने असलेल्या मजहबसाठी आणि त्यांच्या दृष्टीने मजहबी असलेल्या पद्धतीने लढत होते’ अशा शब्दांत गांधींनी मोपल्यांची संभावना केली. डॉ. आंबेडकरांच्या मते ’ब्रिटिश सरकारला उलथवून इस्लामचे राज्य स्थापन करण्याचा (मोपल्यांचा) उद्देश होता’ (डॉ. आंबेडकर, उपरोक्त, पृ. 148,153).
वैचारिक दहशतवादात सर्वप्रथम पायदळी तुडविले जाते ते सत्याला! मोपल्यांनी केलेला नंगानाच बंड किंवा विद्रोह होता असे म्हणणे सत्याचा अपलाप आहे. तो शुद्ध इस्लामी जिहाद होता, हे सांगायला संकोच कसला?
क्रमश: