धनाजीरावांची ‘देशी बियाणे बँक’

विवेक मराठी    17-Dec-2020
Total Views |

उस्मानाबाद जिल्ह्यातील आरळी बुद्रुक येथील शेतकरी, ग्रामविकास समितीचे कार्यकर्ते धनाजी धोतरकर यांनी गेल्या सोळा वर्षांपासून विविध दुर्मीळ वैशिष्ट्यपूर्ण अशा 125हून अधिक देशी पीक वाणांचे जतन केले आहे. त्यासह सेंद्रिय शेतीला चालना देत ते देशी बियाणांचा प्रचार आणि प्रसार करत आहेत.


krushi_2  H x W 

 

शेतीचे उत्पादन अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यामध्ये बियाणे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटीया ओवीत संत तुकाराम महाराजांनी बियाणांचे महत्त्व सांगितले आहे. पेरणीच्या वेळी अंकुरक्षम अधिक जोमदार असलेल्या बियाणांची उपलब्धता हे अपेक्षित उत्पन्न मिळविण्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. आधुनिक शेती पद्धतीत कृषी पर्यावरणीय दृष्टीकोनातून शुद्ध देशी बियाणांचा वापर करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे आजच्या काळात शेतीतील पारंपरिक ज्ञान किती महत्त्वाचे आहे आणि त्याचे दस्तऐवजीकरण करणे किती गरजेचे आहे, या संदर्भात पर्यावरण लेखक हर्षद तुळपुळे यांचा सा. विवेकच्या 30 नोव्हेंबर 2020 ते 6 डिसेंबर 2020च्या अंकातीलपारंपरिक ज्ञानसंकलन व्हावी राष्ट्रव्यापी चळवळया शीर्षकाखाली लेख प्रसिद्ध झाला होता. प्रस्तुत लेखहीपारंपरिक ज्ञानसंकलनया विषयाला पुढे घेऊन जाणारा आहे.

देशी बियाणांचा संग्रह

तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक गावातील धनाजी धोतरकर हे 2004 सालापासून देशी बियाणांवर काम करत आहेत. या कामात त्यांना समाधान मिळते आहे. पारंपरिक बियाणे शेतीसाठी उपयुक्त असून त्याच्या लागवडीतून शेतीचे अनेक प्रश्न निकाली लागतील, असा त्यांचा विश्वास आहे.

देशी वाणांविषयी काम करताना आलेल्या अनुभवाविषयी सांगताना धनाजीराव म्हणाले, “बियाणे हा शेतीचा आत्मा आहे. भारतीय शेतीचा अभ्यास केला, तर आपला देश, शेतकरी बियाणांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता. इथला शेतकरी देशी बियाणांची लागवड करत होता. हल्ली पारंपरिक बियाणांची जागा हायब्रीडने (रासायनिक बियाणांनी) घेतली आहे. त्यामुळे पारंपरिक बियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी बियाणांच्या बाबतीत शेतकरी परावलंबी झाला आहे.

आपल्या पूर्वजांना बी-बियाणे बनवण्याचे ज्ञान असायचे. त्यामुळे घरीच बियाणे बनवली जायची. त्यामुळे शेतकर्यांना दोन प्रकारचे फायदे व्हायचे - एक म्हणजे बियाणांवरचा खर्च वाचायचा आणि दुसरे म्हणजे देशी अस्सल बियाणांमुळे त्यांची फसवणूक व्हायची नाही. माझा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. आमची दहा एकर शेती आहे. माझे वडील शेतात पेरणीच्या वेळी पारंपरिक बियाणे वापरायचे. मिश्र शेतीतून विविध बियाणांचे जतन संवर्धन करायचे.

मला लहानपणापासून शेतीचे वेड होते. गाय, बैल, वासरू, शेळी यांना चारण्यासाठी रानात घेऊन जात असे. रानात विविध प्रकारची कडधान्ये पालेभाज्या दिसायच्या. अशा कडधान्यांची पालेभाज्यांची बियाणे आमच्या शेतात असावी, म्हणून मी धडपडत असे. गाईगुरांचे खत असल्याने हे बियाणे शेतात एकदा पेरले की चांगले उत्पन्न निघायचे. करड, तीळ, अंबाडीच्या उत्पादनातून तेल निघायचे, शिवाय या तेलाची पेंड निघायची, हाच गाईगुरांचा पौष्टिक आहार असायचा.

सध्या शेतकरी नगदी पिकांकडे वळला आहे. त्यामुळे स्थानिक बियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आपली पारंपरिक शेती जगावी यासाठी मी गेल्या 16 वर्षांपासून धडपडत आहे. पुण्यातीलअफार्मबायफसंस्थेमुळे मला देशी बियाणे संकलन करण्याची अधिक आवड निर्माण झाली. माझी नाळ शेतीशी जुळलेली असल्याने या कामात मी झोकून देऊन काम केले. आज माझ्याकडे 125हून अधिक बियाणांचे संकलन आहे.


krushi_1  H x W

हुलगे, करड, अंबाडी, तीळ, जवस, मूग, मटकी, कारळ, नाचणी, राळ, साव, भगर, मूग, गहू, बाजरी, पिवळी साळी, हरभरा अशा सर्व प्रकारच्या कडधान्यांच्या पालेभाज्यांच्या बिया इतरत्र कुठे मिळत नाहीत, त्या आमच्याकडे आहेत.”

धनाजीरावांनी ही सर्व पारंपरिक बियाणे मोठ्या कष्टाने संकलित केली आहेत. त्यांनी आपल्या कार्यालयात हा सर्व ठेवा जतन करून ठेवला आहे. हे कार्यालय म्हणजे धनाजींचे संशोधन केंद्रच आहे. अनेक शेतकरी कार्यालयात येऊन धनाजीरावांचा सल्ला घेऊन आपल्या शेतीसाठी देशी बियाणे घेऊन जातात.

 

देशी बियाणांची वैशिष्ट्ये

1. देशी बियाणांत उच्च दर्जाची पोषणमूल्ये असतात. खाण्यास चवदार.

2. हवामान बदलात तग धरण्याची क्षमता.

3. बदलत्या हवामानाच्या काळात वैशिष्ट्यपूर्ण पीक जातींच्या स्थानिक ज्ञानाचे संकलन, तसेच शुद्ध बियाणांची निर्मिती
करून त्यांचा प्रचार प्रसार करण्याची नितांत आवश्यकता आहे.
 

 


krushi_1  H x W
 
पाच हजार लोकांपर्यंत प्रचार, प्रसार

 

पारंपरिक बियाणे शेतकर्यांच्या उपयोगाची आहेत. त्या दृष्टीने विचार करता ही बियाणे केवळ चार भिंतीत बंदिस्त ठेवता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी धनाजीरावांची प्रयत्नशील आहेत.

धनाजीराव सांगतात, “ग्रामविकास सेवा मंडळ लोकप्रबोधन संस्थेच्या माध्यमातून पारंपरिक बियाणांचा प्रचार प्रसार करत आहे. आतापर्यंत मी पाच हजार शेतकर्यांपर्यंत पोहोचलो आहे. राज्यातील परराज्यातील कृषी प्रदर्शनांतून, कृषी कार्यशाळेतून देशी बियाणांचा प्रसार केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी के.एम. नागरगोजे दीपा मुधोळ-मुंडे यांनी देशी बियाणे दालनास भेट देऊन प्रशंसा केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास 80 टक्के गावांत देशी बियाणे सेंद्रिय शेतीसाठी प्रबोधन केले आहे. देशी बियाणे, दुष्काळ, पाणी शेती क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन मला 2014 सालीकृषिमित्रपुरस्काराने गौरवण्यात आले.

प्रचार-प्रसाराच्या कामात टाटा सामाजिक संस्था अभिव्यक्ती संस्था नाशिक यांचे सहकार्य लाभले. सह्याद्री वाहिनीवरीलआमची माती, आमची माणसंया टाटांच्या कार्यक्रमात, तर अभिव्यक्ती संस्थेमुळे केरळ येथे झालेल्या जागतिक ऑरगॅनिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये, तर हिमाचल प्रदेशातील बीर येथे झालेल्या कृषी कार्यक्रमात सहभाग नोंदवता आला.

शेतकर्यांच्या सहभाग पद्धतीतून पारंपरिक बियाणांचे पुनरुज्जीवन करणे, पुनरावृत्ती करणे ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. त्यासाठी स्थानिक शेतकर्यांच्या संपर्कात राहण्याचे, देशी बियाणांची देवाणघेवाण करण्याचे काम करत आहे.”

सेंद्रिय शेतीची कास

धनाजीराव आपल्या शेतात पारंपरिक बियाणांचा वापर करतात. त्यासाठी त्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. धनाजीराव सांगतात, “राष्ट्राच्या हिताचा विचार करून मी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. आज माझ्याकडे 10 गावरान गाई, 10 खोंड, 4 बैल आहेत. माझ्या सर्व शेतात दशपर्णी, पंचामृत, गोमूत्र, जीवामृत गांडूळ खताचा वापर करतो. त्यामुळे माझ्या शेतातील मातीचा पोत टिकून राहिला आहे. पारंपरिक बियाणांचा सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्याने माझ्या शेतीचे उत्पादन तीन पट वाढले आहे. विशेष म्हणजे आरोग्यावरचा खर्चही कमी झाला आहे. एकूणच मिश्र जीववैविध्य शेती पद्धत पुनरुज्जीवित करण्याकडे माझा कल आहे.”

रासायनिक शेतीमुळे होणारी मातीची हानी टाळण्यासाठी, तसेच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रीय शेती हा उत्तम पर्याय आहे. दुष्काळी परिस्थिती, पाण्याची अनुपब्धता पाहता पारंपरिक सेंद्रीय शेती फायदेशीर ठरणारी आहे, असेही त्यांनी सांगितले.

 


पुढील दिशा

 

स्थानिक बियाणांचे महत्त्व लक्षात घेता येत्या काळात राज्यातील विविध जातींच्या बियाणांचे जतन संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. यामध्ये अडचणी आहेत.

अनेक बियाणांमध्ये चांगले गुणधर्म असूनही काही अडचणींमुळे त्यांची लागवड कमी झाली आहे. राज्यात शुद्ध बियाणे उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे उत्पादन नवीन सुधारित/संकरित जातीपेक्षा कमी येते. काही जातींमध्ये फुटवा कमी येतो. तसेच काही जाती उंचीने जास्त असल्याने पीक शेवटच्या टप्प्यात जमिनीवर लोळते, त्यामुळे त्याचे नुकसान होते. या अडचणी कशा दूर होतील यासाठी प्रयत्न करणार आहेअसे धोतरकर यांनी सांगितले.

 

जागतिकीकरणाच्या काळात धनाजीरावांसारखा प्रयोग खूप महत्त्वाचा आहे. देशी वाणांच्या माध्यमातून हवामान बदलाला तोंड तर देता येईल, तसेच शेतकरी स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे राहतील, यासाठी धनाजीरावांसारखे असंख्य देशी बियाणे संकलक निर्माण होणे आवश्यक आहे.
9822998827