आपल्या देशात 26 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. रा.स्व. संघाच्या कोकण प्रांतात सात दिवसांचा अभिवादन सोहळा साजरा केला गेला. विविध ठिकाणी सुमारे दोनशे छोटे-मोठे कार्यक्रम झाले, त्याचा हा वृत्तान्त.
भारतीय राज्यघटना हा जिवंत दस्तऐवज असून त्याचा प्रत्यय सातत्याने येत असतो. भारतीय नागरिकांना राज्यघटनेबाबत जागृत करून आपल्या देशबांधवांना अधिकाधिक सजग करण्याचा हा कालखंड आहे. एका बाजूला ‘संविधान खतरे मे’ अशा घोषणा ऐकू येतात, तर दुसर्या बाजूला राज्यघटनेबाबत घोर अज्ञान असलेला समाजबांधवही समोर असतो. या पार्श्वभूमीवर राज्यघटनेविषयी जास्तीत जास्त प्रमाणात जाणीवजागृतीची आवश्यकता होतीच. हे समाजवास्तव लक्षात घेता रा.स्व. संघ समरसता गतिविधी कोकण प्रांताने आयोजित केलेल्या राज्यघटना अभिवादन सप्ताहाचे महत्त्व खूप मूलगामी स्वरूपाचे आहे.
सन 2016मध्ये संसदेचे विशेष सत्र बोलावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेवर चर्चा घडवून आणली आणि त्या वर्षापासून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे शासकीय कार्यालयांत, शाळा-महाविद्यालयांत हा दिन साजरा होऊ लागला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण राज्यघटनेचा स्वीकार केला, तोच हा दिवस. संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधणार्या आणि प्रत्येक नागरिकाला भारतीय म्हणून ओळख देणार्या राज्यघटनेचा स्वीकार ज्या दिवशी झाला, तो दिवस केवळ राज्यघटनेच्या सन्मानाचा नाही, तर भारतीयांच्या गौरवाचाही आहे, हे लक्षात घेऊन सर्व समाजाने राज्यघटना दिन साजरा करावा, राज्यघटनेमुळे भारतीय नागरिकांच्या जीवनात जे परिवर्तन घडून आले ते समजून घ्यावे आणि राज्यघटना दिन हा समाज उत्सव व्हावा या उद्देशाने मागील काही दिवस कोकण प्रांतात चिंतन सुरू होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समरसता गतिविधीचे कार्यकर्ते या विषयावर काम करू लागले. योजना तयार झाली आणि सामुदायिक प्रयत्नातून 22 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर हा आठवडा ‘राज्यघटना अभिवादन’ सप्ताह साजरा करण्याचे ठरले. प्रत्यक्षात जेव्हा आठ दिवस वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होऊ लागले, तेव्हा त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कोकण प्रांतात दोनशेच्या आसपास कार्यक्रम झाले. हे कमी कालावधीत मिळालेले यश आहे, त्याचप्रमाणे समाज अशा कार्यक्रमात उत्साहात सहभागी होतो, त्याला सकारात्मक प्रतिसाद देतो हेही या निमित्ताने अधोरेखित झाले.
कोकण प्रांतात अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करावे असे ठरले, तेव्हा पूर्वतयारी म्हणून दोन टप्प्यांत विचार केला गेला. पहिला टप्पात सप्टेंबर महिन्यात निवडक कार्यकर्त्यांसाठी रमेश पतंगे यांचे एक व्याख्यान आयोजित केले होते. प्रांतातील प्रमुख कार्यकर्ते व जनसंघटनाचे प्रतिनिधी यांच्यासमोर रमेश पतंगे यांनी राज्यघटनेचे मर्म उलगडून दाखवले. आपण राज्यघटना कशी समजून घ्यायला हवी हे त्यांनी समजावून सांगितले. दुसर्या टप्प्यात तीन व्याख्याने आयोजित केली गेली. राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया, राज्यघटनेची उद्देशिका, राज्यघटनेने बहाल केलेले मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये या तीन विषयांवर अॅड. आशिष जाधवर, डॉ. सुवर्णा रावळ, अॅड. विभावरी बिडवे या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. समरसता गतिविधी जिल्हा संयोजक जिल्हा टोळी सदस्य, स्थानिक वक्ते, लेखक, पत्रकार यांनी या तीन व्याख्यानांचा लाभ घेतला. याचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी होणार्या कार्यक्रमांसाठी विषयमांडणी करू शकतील असे वक्ते तयार झाले. आपल्या भागात/जिल्ह्यात कुठे आणि कसे कार्यक्रम होऊ शकतात याचाही विचार या निमित्ताने झाला.
समरसता गतिविधीच्या वतीने जरी हा सप्ताह आयोजित केला गेला असला, तरी संपूर्ण समाजाने त्यात सहभागी व्हावे, अशी भूमिका घेत विविध सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संस्था, ज्ञाती संख्या, श्रद्धा केंद्र यांच्याशी संपर्क करून त्यांना या मोहिमेत सहभागी केले होते. प्रांतभर कार्यक्रम करायचा असल्याने एक समान सूत्र निश्चित केले होते. राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करावे आणि उपस्थित मंडळींनी राज्यघटनेला अभिवादन करावे, शक्य असेल तेथे विषयमांडणी व्हावी असा सहज सोपा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. परिणामी तो खूप मोठ्या प्रमाणात संपन्न झाला.
कोकण प्रांतातील सर्व संघकार्यालये व शाखा, राष्ट्र सेविका समितीच्या शाखा यामध्ये उद्देशिका वाचन आणि विषयमांडणी झाली. जनकल्याण समिती, विद्यार्थी परिषद, अधिवक्ता परिषद, विश्व हिंदू परिषद, भारतीय मजदूर संघ, भाजपा, सहकारी बँका, रक्तपेढी, रुग्ण सेवा केंद्र इत्यादी संस्था-संघटनांमध्येही हा कार्यक्रम झाला. त्याचबरोबर विविध ठिकाणचे बौद्ध विहार, मंडळे, समाज मंडळे अशा ठिकाणी समरसता गतिविधी संयोजकांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम घडवून आणला. सामाजिक कार्यकर्ते आणि राज्यघटनेबाबत आस्था असणारे अनेक नागरिक अशा कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या राज्यघटना अभिवादन सप्ताहाचा परिणाम काय झाला? कशासाठी हा आटापिटा केला? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जाऊ शकतो. या प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर द्यायचे, तर एवढेच सांगता येईल की, एका व्यापक परीघात राज्यघटनेविषयी जागृती निर्माण करण्यात समरसता गतिविधी यशस्वी झाली आहे. त्याचबरोबर कोकण प्रांत समरसता गतिविधीला आपल्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट झाली आहे. सारा समाज या सकारात्मक विचाराचे स्वागत करण्यात उत्सुक आहे, हेही या निमित्ताने लक्षात आले आहे. प्रांतातील काही महत्त्वाच्या स्थानी कार्यक्रम व्हावे यासाठी प्रयत्न केले गेले होते. चैत्यभूमी, राजगृह या मुंबईतील दोन्ही ठिकाणी उत्तम कार्यक्रम झाले. राजगृह येथील कार्यक्रमानंतर आनंदराव आंबेडकर यांची भेट आणि राजगृहातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. चैत्यभूमी येथील अशोक स्तंभासमोर उद्देशिका वाचन झाले. महाड येथे चवदार तळ्याच्या परिसरात राज्यघटना अभिवादन सोहळा झाला. मुरबाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजोळगावीही अभिवादन केले गेले. माता रमाईच्या माहेरगाव वणंद येथे ही राज्यघटना अभिवादन सोहळा झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे येथेही राज्यघटना अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने राज्यघटनेवर ऑनलाइन व्याख्यान आयोजित केले, त्याचबरोबर स्मारकातील उपस्थित बांधवांनी एकत्र येऊन उद्देशिकेचे वाचन केले. अशा प्रकारची असंख्य उदाहरणे देता येतील. अॅड. आशिष जाधवर यांच्या ऑनलाइन व्याख्यानाने या राज्यघटना अभिवादन सप्ताहाचा समारोप झाला.
एकूणच या राज्यघटना अभिवादन सप्ताहाच्या आयोजनामुळे आणि त्याला मिळाळेल्या यशामुळे समरसतेचे काम अधिक गतिमान झाले होते. भेदरहित समाजजीवन अनुभवण्यासाठी आधी एकत्र यायला हवे, तरच आपण एकत्वाची अनुभूती घेऊ शकतो, याचा प्रत्यय या कार्यक्रमाने दिला. सर्व समाजाला एका सूत्रात बांधणारी राज्यघटना हा आपल्या दैनंदिन जीवनाला वळण लावणारा जिवंत दस्तऐवज आहे, याची प्रचिती या निमित्ताने आली.