डॉ. अर्चना कुडतरकर
पुरस्काराच्या निमित्ताने अनेक प्रयोगशील शिक्षक समोर येत आहेत. त्यांच्या कामाला प्रेरणा देण्याचं काम समाज म्हणून आपल्याला करावं लागणार आहे. या कामाच्या निमित्ताने प्रयोगशील शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे, असं चित्र निर्माण झालेलं आहे. या सगळ्या प्रक्रियेतूनच रणजितसिंग डिसले यांच्यासारखे प्रयोगशील, उपक्रमशील शिक्षक नव्या उमेदीने उभे राहतील आणि आपल्या देशाचं, राज्याचं नाव जागतिक पातळीवर पुढे नेतील. त्यासाठी ‘शिक्षण माझा वसा’सारख्या पुरस्कारांची गरज आहे.
शिक्षणविवेक मासिक सुरू झालं ते विद्यार्थी, शिक्षक, पालक, संस्था यांच्यात समन्वय साधण्यासाठी आणि त्या अनुषंगाने शैक्षणिक चळवळ उभारण्यासाठी. 2012 साली सुरू झालेल्या मासिकाने अनेक उपक्रमांतही सक्रिय राहत, शैक्षणिक चळवळीत आपलं पाऊल ठामपणे रोवलेलं आहे. या शैक्षणिक चळवळीचा पायाच मुळात ही शिक्षणव्यवस्था आहे आणि या शिक्षणव्यवस्थेचा कणा आहेत ते आपले शिक्षक... ‘शिक्षक कुठे काय करतो...’ असा एक नकारात्मक सूर आपल्या आजूबाजूला सतत उमटतो आहे. वरकरणी तो खरा वाटण्याएवढा जोरदार आहे. पण चित्र खरंच तसं आहे का? या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न सुरू झाले आणि त्याच वेळी या नकारात्मक सुरातही अध्यापनाचा वसा हाती घेऊन, अभावाच्या परिस्थितीतही, आपलं सत्त्व टिकवत, आपल्या वागण्याने अनेकांना प्रज्वलित करत एका चांगल्या शैक्षणिक वातावरणाच्या निर्मितीसाठी धडपडणारे शिक्षक आहेत, असा शोध लागला. तो शोध घेण्यासाठी ‘शिक्षण माझा वसा’ या राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्काराची निर्मिती झाली. या पुरस्काराच्या निमित्ताने या चळवळीत सहभागी झाले ते लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनचे चेअरमन आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारे अॅड. किशोर लुल्ला. शिक्षणविवेक आणि लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने 2017 सालापासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका या शाळांतील शिक्षकांसाठी ‘शिक्षण माझा वसा’ राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्काराची सुरुवात झाली आणि एक वेगळं चित्र समोर उभं राहायला लागलं.
कमी विद्यार्थिसंख्या, वेगवेगळ्या परिसरातल्या वेगवेगळ्या भाषा, विद्यार्थ्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनात जाणवण्याएवढी असलेली तफावत, त्यांना शाळेत आणण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी चाललेली धडपड, अपुर्या भौतिक सुविधा, शैक्षणिक साधनांचा अभाव या आणि अशा असंख्य नकारात्मक बाजू असूनही काही शिक्षक अत्यंत तळमळीने, चिकाटीने आणि जिद्दीने आपलं काम पुढे नेत आहेत, हे सत्य या पुरस्काराच्या निमित्ताने ढळढळीतपणे समोर आलं. या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याची, त्यांचं कौतुक करण्याची नितांत गरज आहे, हे लक्षात आल्यावर त्यांना पुरस्कार दिले पाहिजेत, त्यांची काम करण्याची प्रेरणा वाढली पाहिजे आणि इतरांनाही त्यांच्या कामातून प्रेरणा मिळाली पाहिजे, असा दृष्टीकोन ठेवून 2017 साली पुरस्काराला सुरुवात झाली. तसंच युवा पिढीने शिक्षकी पेशा निवडावा, चांगलं काम करावं आणि आपल्या उन्नत समाजाच्या जडणघडणीत आपलं योगदान द्यावं अशी भूमिकाही यामागे आहे. आताच्या तरुण पिढीने, येणार्या तरुण पिढीला समजून घ्यावं आणि नवी तरुण पिढी अधिक सक्षम करावी, शिक्षण क्षेत्रात आलेल्या आणि येऊ पाहणार्या शिक्षकांना असलेल्या नकारात्मक परिस्थितीत थोडा दिलासा मिळावा, आपण योग्य त्या क्षेत्रात आहोत, असा आत्मविश्वास वाढावा आणि एक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी संस्था आपल्या पाठीशी उभी आहे, असा धीर त्यांच्या मनात पक्का व्हावा यासाठी उभी केलेली ‘शिक्षण माझा वसा’ ही चळवळ आहे. हा पुरस्कार हे त्या चळवळीचं प्रतीक आहे.
भाषा, गणित, विज्ञान, कला, तंत्रज्ञान, विशेष आणि मुख्याध्यापक अशा विषयांतले सात पुरस्कार दर वर्षी दिले जातात. हे पुरस्कार देण्यासाठी राज्यभरातून नामांकनं मागवली जातात. त्यासाठी -
* नामांकन पाठवणार्या शिक्षकाचं कमाल वय 45 वर्षं असावं.
* जन्मदाखला पुरावा आवश्यक आहे. (उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कारासाठी वयाची अट नाही.)
* किमान 5 वर्षं एका उपक्रमाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध झालेली असावी.
या नियमांची आणि निकषांची पूर्तता शिक्षकांना करावी लागते. आलेली नामांकनं निवड समितीपुढे ठेवली जातात आणि त्यांनी दिलेला निर्णय अंतिम मानला जातो. निवड झालेल्या शिक्षकांना रु. 5000/- रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन सन्मानित केलं जातं.
गेल्या चार वर्षांत हजारो नामांकनं आलेली आहेत. भाषा, गणित, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, विशेष उपक्रम राबवताना आणि मुख्याध्यापक म्हणून काम करताना आणि ते वाचताना शिक्षकांची कल्पकता आपल्याला थक्क करते. आपल्या वेळांचा, आपल्या कुटुंबांचा, आपल्या व्यक्तिगत आयुष्याचा, आपल्या भौतिक सुखांचा विचार बाजूला ठेवून आपलं 100% देऊन काम कसं केलं पाहिजे? याचा आदर्श या शिक्षकांच्या नामांकनांतून समोर आलेला आहे. वेळ पडली तर स्वतःच्या खर्चातून मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवण्याची या शिक्षकांची प्रवृत्तीही अनुकरणीय आहे. या बरोबरीनेच विद्यार्थ्यांशी असणारं त्यांचं आपुलकीचं नातं, संकल्पना स्पष्ट व्हाव्यात म्हणून परिसरातील गोष्टींचा केलेला वापर, अनेकदा अस्वच्छ मुलांना अंघोळ घालून स्वच्छ करून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतानाची शिक्षकांची भूमिका, मासिक पाळी व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन ग्रामीण भागात एका महिला शिक्षिकेने सातत्यपूर्ण 5 वर्षं काम करणं आणि आपल्या शाळेतल्या मुलींना गावातील इतर महिलांचं प्रबोधन करण्यासाठी प्रशिक्षित करणं अशी कितीतरी महत्त्वपूर्ण कामं शिक्षक करत आहेत आणि या सगळ्याचे दूरगामी सकारात्मक परिणाम मासिक पाळी व्यवस्थापनाकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णत: बदलणारा असेल, यात शंका नाही.
अभ्यासात, शिक्षणात आपण विद्यार्थ्यांना जितकं प्रगत करू, तितका आपण आपला समाज उन्नत करू असा या शिक्षकांचा ठाम विचार आहे, त्यामुळेच ज्या विद्यार्थ्यांना एक वेळचं जेवण मिळणं दुरापास्त आहे, अशा विद्यार्थ्यांना स्वखर्चाने शिकवण्याची एक अंतर्गत ऊर्मी या शिक्षकांकडे असलेली दिसते.
‘ज्ञानरचनावाद’ हे आपल्या शिक्षणव्यवस्थेला मिळालेलं एक वरदान आहे आणि त्याचा आधार घेत, आपल्यातल्या कल्पकतेला चालना देत शिक्षकांनी शिक्षणव्यवस्थेकडे, आपल्या शिकवण्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहायला सुरुवात केली आणि काय जादू झाली, याचं एक चित्र समोर उभं राहिलं. भाषिक विकास, वैज्ञानिक भान, गणितीय बुद्धिमत्ता, संगीत-चित्र-हस्त या कलांना शिक्षणव्यवस्थेत मिळालेलं केंद्रस्थान या सगळ्या गोष्टींना शिक्षकांनी दिलेलं महत्त्व या गोष्टी खचितच एक चांगला परिणाम साधून आणणार आहेत. आता खरी गरज आहे, ती त्यांना कारकुनी कामातून थोडी मोकळीक देण्याची. नवीन शैक्षणिक धोरणातून या आशाही अधोरेखित झाल्या आहेत.
खरं तर आपले शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी काहीही करू शकतात याची खात्रीच या पुरस्काराच्या निमित्ताने पटली आहे. पुलंच्या चितळे मास्तरांची एक वेगळी आवृत्तीही या पुरस्काराच्या निमित्ताने अनुभवायला आली. एक-शिक्षकी शाळांतील शिक्षकांसमोरची आव्हानं काय असू शकतात? चार वर्ग एकाच वेळी एकाच शिक्षकाने सांभाळणं आणि वेगवेगळा विषय, प्रत्येक इयत्तेतल्या विद्यार्थ्याला शिकवणं किती जिकिरीचं असेल, याची कल्पना करूनही हादरायला होतं. आणि अशा परिस्थितीतही हे शिक्षक वाचन, लेखन, काव्य-कथालेखनासाठी मुलांना प्रोत्साहित करत असतात, त्यासाठी ग्रामस्थांना सहभागी करून घेतात आणि लोकसहभागाचं महत्त्व पालक आणि विद्यार्थी सगळ्यांना पटवून देतात आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्याचं महत्त्व पटतं.
अप्रगत मुलांना शिकवणं, ज्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळा सोडून घरी नेऊन अभ्यास करून घेणं, विद्यार्थ्यांना सोपं जावं म्हणून पाढ्यांना, पाठ्यपुस्तकातील कवितांना चाली लावणं, परिसराची ओळख करून देण्यासाठी मुलांना घेऊन छोट्या छोट्या सहली घडवून आणणं अशा अनेक गोष्टी या पुरस्काराच्या निमित्ताने समोर आलेल्या आहेत. स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करणं, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सतत कार्यरत राहणं आणि सर्व शिक्षा अभियानाला जोरदार पाठिंबा देणं हेही फार महत्त्वाचं काम या निमित्ताने पुढे आलेलं आहे. अनेकदा तर शिकवणं आणि सामाजिक काम या दोन्ही गोष्टी हातात हात घालून कशा करायच्या असतात, याचं भानही या शिक्षकांच्या कामानिमित्ताने पुढे आलेलं आहे. आदिवासी पाड्यांवर असणार्या शाळांमधील शिक्षक मुलांना शिकवण्यासाठी तिथे जाऊन त्यांची भाषा शिकतात, पाठ्यपुस्तकं त्या भाषेत भाषांतरित करून मुलांचा शिक्षणातला वावर वाढवतात, ही बाबच फारच दिलासादायक आहे. हे व असे असंख्य प्रयोग शिक्षक स्वयंप्रेरणेने करत आहेत, हे विशेष.
आता पुरस्काराच्या निमित्ताने अनेक प्रयोगशील शिक्षक समोर येत आहेत. त्यांच्या कामाला प्रेरणा देण्याचं काम समाज म्हणून आपल्याला करावं लागणार आहे. या कामाच्या निमित्ताने प्रयोगशील शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे, असं चित्र निर्माण झालेलं आहे. या सगळ्या प्रक्रियेतूनच रणजितसिंग डिसले यांच्यासारखे प्रयोगशील, उपक्रमशील शिक्षक नव्या उमेदीने उभे राहतील आणि आपल्या देशाचं, राज्याचं नाव जागतिक पातळीवर पुढे नेतील. त्यासाठी ‘शिक्षण माझा वसा’सारख्या पुरस्कारांची गरज आहे. त्यातून शिक्षकांना स्वत:ला चाचपून पाहण्याची, स्वत:च्या कल्पकतेला, स्वत:च्या कामाला न्याय देण्याची एक संधी मिळेल. यासाठी त्यांना अनेक गोष्टी उपलब्ध करून देण्याची तयारीही शिक्षणव्यवस्थेने आणि शासनाने दाखवली पाहिजे. त्यांच्या विचारांना, त्यांच्या कल्पनांना आणि ते विचार, त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना पाठिंबाही दिला पाहिजे. यातूनच सक्षम असणारे शिक्षक अधिक सक्षम, प्र्र्रयोगशील असणारे शिक्षक अधिक प्रयोगशील, उपक्रमशील असणारे शिक्षक अधिक उपक्रमशील होतील आणि शिक्षणव्यवस्थेत शिक्षण हेच केंद्रस्थानी असेल. त्या दृष्टीने शिक्षण माझा वसा हा पुरस्कार केवळ स्पर्धा न राहता, ती शिक्षण क्षेत्रातली एक चळवळ म्हणून सक्षम होईल आणि या चळवळीचे पाईक असतील शिक्षणव्यवस्थेचा कणा असलेले आपलेच शिक्षक!!! आणि एक दिवस ते नक्की म्हणतील, ‘न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने...’