पारंपरिक ज्ञानसंकलन व्हावी राष्ट्रव्यापी चळवळ

विवेक मराठी    30-Nov-2020
Total Views |
ज्ञान-विज्ञानाचं उगमस्थान हे कुठल्या ग्रंथांमध्ये वा प्रयोगशाळेत नसून ते जनमानसात आहे. जगाला अद्याप अज्ञात असलेली शास्त्रं खेडोपाड्यांतल्या लोकांना ज्ञात असलेली आढळतात. आज गरज आहे ती अशा परंपरागत ज्ञानाच्या संकलनाची.

pryavaran_1  H
साधारणपणे तीन वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. पावसाळ्यात घराच्या बाजूच्या दळ्यात दर वर्षीप्रमाणे पडवळाच्या बिया रुजत घातल्या होत्या आणि त्याचे वेल चांगले जोमाने वाढून मांडवावर गेले होते. पण एक दिवस अचानक लक्षात आलं की उंदीर वेल तोडत आहेत. यावर उपाय काय करावा? तेव्हा आमच्याच गावातल्या एका शेतकर्याने सांगितलं की मांडवावर लुतीच्या दोन-चार कांड्या टाकून ठेवा! (‘लूत’ म्हणजे पावसाळ्यात उगवणारी सुरणासारखी एक रानभाजी.) त्याप्रमाणे परिसरात नैसर्गिकरित्या वाढलेल्या लुतीच्या चार कांड्या मांडवावर टाकून ठेवल्या. काय आश्चर्य! खरोखरच उंदीर वेल तोडायचे बंद झाले. तेव्हापासून दर वर्षी पडवळीचा मांडव घातल्यावर त्यावर चार लुतीच्या कांड्या टाकूनच ठेवतो! उपाय एकदम लागू पडला आहे!
 
या स्वतः अनुभवलेल्या उदाहरणाने लेखाची सुरुवात करण्याचं कारण म्हणजे, संपूर्ण लेखाचं सार या एका उदाहरणात सामावलेलं आहे. जगातल्या कुठल्याच शास्त्रज्ञाला जे ज्ञान नाही, ते गावात राहणार्या, फारसं शिक्षण न झालेल्या, शेती-मजुरी करणार्या सर्वसामान्य माणसाला आहे! एखाद्या कृषी अधिकार्याचा सल्ला घ्यायला गेलो असतो, तर त्याने ढीगभर औषधं लिहून दिली असती, ती बाजारातून विकत आणावी लागली असती. पण या माणसाने सांगितलेला उपाय बिनखर्चाचा, नैसर्गिक आणि रामबाण आहे! हां, आता लुतीमध्ये असे नेमके कोणते गुणधर्म असतात, ज्यामुळे उंदीर जवळ फिरकत नाही याची रसायनशास्त्रीय चिकित्सा त्या माणसाला नाही सांगता येणार, पण लुतीच्या कांड्या टाकल्या की उंदीर फिरकत नाही हा कार्यकारणभाव त्याला माहीत आहे!
तो माणूस वनस्पतिशास्त्र वगैरे काय्येक शिकलेला नाही, वा त्याने कुठले ग्रंथ वाचलेले नाहीत. तरीही हे, कुठेही लिखित स्वरूपात उपलब्ध नसलेलं ज्ञान त्याच्याकडे आलं कुठून? अर्थातच पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवातून! मागच्या पिढीतल्या कुठल्यातरी माणसाला शेतात काम करता करता अपघाताने कधीतरी हा कार्यकारणभाव लक्षात आला असेल, मग अनेकांनी तसे प्रयोग करून बघितल्यावर आणि सर्वांना सारखाच अनुभव आल्यावर ही गोष्ट सिद्ध झाली असेल! आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शेतकर्याच्या या ज्ञानाची रसायनशास्त्रीय चिकित्सा करता येईल. परंतु एक गोष्ट निश्चित होते, ती म्हणजे ज्ञान-विज्ञानाचं उगमस्थान हे कुठल्या ग्रंथांमध्ये वा प्रयोगशाळेत नसून ते जनमानसात आहे. ते केंद्रित नसून विकेंद्रित आहे. 1905 साली ब्रिटिश सरकारने भारताचे ‘कृषी सल्लागार’ म्हणून अल्बर्ट हॉवर्ड या त्या वेळच्या एका नामांकित वनस्पतिशास्त्रज्ञाची नेमणूक केली होती.
 
 
ब्रिटनमध्ये विकसित झालेली शेतीची काही आधुनिक तंत्रं भारतीय शेतकर्यांना शिकवायला खरं तर त्यांना भारतात पाठवण्यात आलं होतं; परंतु हे अल्बर्ट महाशय पारंपरिक भारतीय शेती पद्धती बघून चकित झाले! त्यातल्या निसर्गविचाराने भारावून गेले! अल्बर्ट हॉवर्ड यांनी स्वतः खेडोपाडी फिरून पारंपरिक शेती समजून घेतली, त्यावर पुस्तकं लिहिली आणि ती युरोपात प्रचंड प्रसिद्ध झाली!


pryavaran_1  H  
कोकणात समुद्रकिनारी वसलेल्या गावी आजूबाजूला निरीक्षण करताना, लोकांशी गप्पाटप्पा करताना, जगाला अद्याप अज्ञात असलेली शास्त्रं लोकांना ज्ञात असलेली आढळतात. उदा., कोकणात ‘भादव्याक झाड तोडूचा’ असं शास्त्र आहे. म्हणजे, इमारती लाकडासाठी मोठं झाड तोडायचं असेल तर ते भाद्रपद महिन्यात तोडायचं. त्यामुळे झाड तोडायच्या आधी दोन महिने आणि तोडल्यानंतर किमान महिनाभर त्यावर पाऊस पडतो व लाकूड टिकाऊ बनतं. ही कुठल्याच वनस्पतितज्ज्ञाला माहीत नसलेली गोष्ट आमच्या गावच्या गड्याला माहीत! खार्या पाण्यामुळे लाकडाचा टिकाऊपणा वाढतो, म्हणून कोकणात आधी लाकडाचे ओंडके वा बांबू महिना-दोन महिने खाडीच्या खार्या पाण्यात तरंगत ठेवतात आणि मग इमारती बांधकामासाठी वापरतात. यामुळे लाकूड ’लागत’ नाही. अनेक कंदवर्गीय रानभाज्यांमध्ये विषारी द्रव्य असतात, म्हणून आदिवासी लोक आधी त्या पाण्यात उकळवून, पाणी काढून टाकून मग करायला घेतात. बांबूचा पाला हा गुरांसाठी अत्यंत पौष्टिक असतो, पण तो उष्ण असल्याने गुरांना जास्त प्रमाणात खायला द्यायचा नाही, अथवा गाय-म्हैस गाभण असताना तिने तो खाऊ नये, हे शास्त्र गावातल्या लोकांना माहीत आहे. गाईचं जुनं तूप त्वचारोगांवर औषधी असतं. चाळीस वर्षांपूर्वी आमच्या घरी असलेल्या तांबू गाईच्या तुपाची बाटली अजूनही घरी आहे! उष्णतेमुळे फोड आले असतील अथवा त्वचेची आग होत असेल, तर हे तूप लावल्यामुळे निश्चितपणे बरं वाटतं. जुन्या तुपाचा हा शास्त्रीय उपयोग ज्ञात व्हायला कैक पिढ्या जाव्या लागल्या असतील! ‘वैदू’ समाजाकडे तर औषधी वनस्पतींच्या ज्ञानाचा खजिना आहे. आजही आपल्याला आदिवासी भागांमध्ये शेतीच्या, धान्य व बियाणं साठवणीच्या वेगवेगळ्या पद्धती आणि त्यांच्यामागची शास्त्रं लोकांना परंपरेने अवगत असलेली आढळतात. आज गरज आहे ती जनमानसात असलेल्या अशा पारंपरिक ज्ञानाच्या जतनाची! आज ‘निसर्गरक्षण’, ‘पर्यावरण संवर्धन’ हे परवलीचे शब्द झाले आहेत. निसर्गरक्षणाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे गावातल्या लोकांना आवतीभोवतीच्या निसर्गसृष्टीबद्दल काय ज्ञान आहे त्याची नोंद करणं, त्याचं दस्तऐवजीकरण करणं - मग ते वनस्पती-प्राण्यांविषयीचं असेल, शेती पद्धतींविषयीचं असेल, खाद्यपदार्थांविषयीचं असेल, बांधकामाविषयीचं असेल, हवामानाविषयीचं असेल, वा औषधांविषयीचं असेल!
दुर्दैवाने आपली सध्याची प्रस्थापित शिक्षणव्यवस्था अशा पद्धतीच्या ज्ञानसंकलनावर आधारलेली नाही. जे पाठ्यपुस्तकात दिलंय तेच ज्ञान आणि जे प्रयोगशाळेत सिद्ध झालंय तेच विज्ञान, अशी प्रत्येकाची मनोधारणा निर्माण होण्याची व्यवस्थित काळजी आपल्या शिक्षणव्यवस्थेने घेतलेली आहे. ज्ञान-विज्ञान ही मूठभर शास्त्रज्ञांची मक्तेदारी होऊन बसली. औषधी वनस्पतींबद्दल जनमानसात काय ज्ञान आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न कधी वैद्यकशास्त्राने केला नाही, शेतीच्या बाबतीत विविध भागांतल्या शेतकर्यांकडे काय पारंपरिक शहाणपण आहे याचा विचार कधी कृषी विद्यापीठांनी केला नाही, वा विविध भागांतल्या लोकांकडे पारंपरिक बांधकामकौशल्यं कशा प्रकारची आहेत याचा समावेश कधी अभियांत्रिकीशास्त्राच्या अभ्यासक्रमात झालेला नाही. पण आज वस्तुस्थिती अशी आहे की, विताना अडलेली म्हैस सोडवणं हे काम डिग्री घेतलेल्या व्हेटरीनरी डॉक्टरपेक्षा गावातला ‘अडाणी पण अनुभवी’ माणूस यशस्वीपणे करतो! शिक्षणव्यवस्थेने असा ‘उलटा अभ्यास’ न केल्यामुळे आज पारंपरिक ज्ञान पुढील पिढ्यांमधून लोप पावत चाललंय. ‘एथनोबॉटनी’ हा एक विषय पारंपरिक ज्ञानसंकलनावर आधारलेला आहे. पण तो फारसा सार्वत्रिक झालेला नाही.

pryavaran_3  H  
हे पारंपरिक ज्ञान का जपायला हवं? त्यामागे, रोजच्या जीवनात त्याचा होणारा व्यावहारिक उपयोग हे मुख्य कारण आहेच, पण, मध्यंतरीच्या काळात या ज्ञानाच्या मालकी हक्कांवरून जगभरात मोठा वादंग झाला होता. कुठलातरी शास्त्रज्ञ लोकांकडून माहिती घेतो, त्यावर पीएचडी करतो आणि ‘स्वत:चं संशोधन’ म्हणून ते खपवतो, असे प्रकार वाढीस लागले. अमेरिका-युरोपातील बलाढ्य मल्टिनॅशनल कंपन्या भारतातील बासमती तांदूळ, कडुनिंब, हळद अशा औषधी वनस्पतींवर आपला स्वामित्व हक्क (Intellectual Property Right) सांगू लागल्या. गावातल्या, अथवा आदिवासी भागातल्या एखाद्या माणसाला परंपरेने असलेलं एखाद्या वनौषधीबद्दलचं ज्ञान कंपन्यांनी चोरावं व त्यावर स्वतःचा धंदा सुरू करून कोट्यवधींची उलाढाल करावी, याला ‘बायोपायरसी’ (Bio-piracy) म्हणतात. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.वंदना शिवा यांच्या ’'Bio-piracy - the plunder of nature and knowledge'या पुस्तकात याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या ज्ञानचौर्याच्या घटनांनी तिसर्या जगाला खळबळवून सोडलं. जनमानसात असलेला हा ज्ञानाचा खजिना जपला पाहिजे आणि ज्यांनी हे ज्ञान जपलंय त्यांना त्याचे फायदे मिळाले पाहिजेत, असं काही जाणत्या शास्त्रज्ञांना वाटू लागलं.
 
1992 साली ‘कन्व्हेन्शन ऑन बायलॉजिकल डायव्हर्सिटी’ (CBD) नामक एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली, ज्यामध्ये भारतही सहभागी होता. या परिषदेमध्ये बायोपायरसीला आळा घालणारे अनेक करार झाले. पारंपरिक ज्ञानावर कुठल्या एका शास्त्रज्ञाला अथवा कंपनीला स्वामित्व हक्क सांगता येणार नाही हे मान्य झालं. मात्र, त्यासाठी मौखिक परंपरेने लोकांकडे चालत आलेल्या ज्ञानाची कुठेतरी पद्धतशीरपणे नोंद होण्याची गरज होती. भारतासारख्या देशात हे दस्तऐवजीकरण कसं करता येईल याबाबत डॉ. माधवराव गाडगीळ आणि अनेक पर्यावरणतज्ज्ञांचं विचारमंथन सुरू झालं आणि त्यातून 2002 साली ‘जैविक विविधता कायदा’ (Biological Diversity Act 2002) अस्तित्वात आला. या कायद्यामध्ये, प्रत्येक ग्रामपंचायतीने ‘लोकजीवविविधता नोंदवही’ (People's Biodiversity Register) तयार करावी आणि त्यामध्ये लोकांना गावातील नैसर्गिक संसाधनांबद्दल असलेल्या पारंपरिक ज्ञानाची नोंद केली जावी, अशी तरतूद केली आहे. कोणीही व्यावसायिक फायद्यासाठी या ज्ञानाचा उपयोग केल्यास त्या फायद्यातला तीन ते पाच टक्के वाटा, त्या ज्ञानाचं उगमस्थान असलेल्या ग्रामस्थांना मिळावा अशीही कायद्यात तरतूद आहे. आणखी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे लोकजीवविविधता नोंदवहीमध्ये पारंपरिक ज्ञानाची नोंद, ज्या व्यक्तीकडून हे ज्ञान मिळालं आहे ‘त्या व्यक्तीच्या नावाने’ करायची आहे! या संपूर्ण प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावर ‘राष्ट्रीय जीवविविधता प्राधिकरण’ National Biodiversity Authority), राज्य पातळीवर ‘राज्य जीवविविधता मंडळ’ (State Biodiversity Board) आणि गावपातळीवर ‘जीवविविधता व्यवस्थापन समिती’ (Biodiversity Management Committee) अशी अंमलबजावणी यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांत भारतात अनेक गावांनी लोकजीवविविधता नोंदवहीच्या माध्यमातून पारंपरिक ज्ञानसंकलन आणि त्यातून जीवविविधता व्यवस्थापन उत्तम प्रकारे केलेलं आढळतं.
2000 साली केंद्र सरकारने ‘ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी’ (TKDL) सुरू केली. या लायब्ररीमध्ये भारतातील आयुर्वेद, युनानी, सिद्ध, योगशास्त्र इ. ज्ञानशाखांमधील प्राचीन ग्रंथांमध्ये असलेलं ज्ञान डिजिटल स्वरूपात एका व्यासपीठावर आणलं जात आहे. वस्तुतः पारंपरिक ज्ञान हे संस्कृत, तामिळ अशा प्रादेशिक भाषांमध्ये आणि स्थानिक बोलीभाषांमध्ये जतन झालेलं असतं. यामुळे एक मर्यादा अशी पडते की, बायोपायरसीची घटना घडल्यास त्याविरुद्ध लढा देणं अवघड होऊन बसतं. टीकेडीएलच्या माध्यमातून स्थानिक भाषांमध्ये असलेलं ज्ञान इंग्लिश, जपानी, फ्रेंच, जर्मन आणि स्पॅनिश या भाषांमध्ये भाषांतरितही केलं जात आहे, ज्यायोगे त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणं सोपं होईल.
2014 साली राजीव गांधी विज्ञान-तंत्रज्ञान आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र सरकारतर्फे ‘महाराष्ट्र जनुक कोश’ (Maharashtra Gene Bank) हा प्रकल्प हाती घेण्यात आला. यामध्ये पिकांची पारंपरिक वाणं, गाई-गुरांच्या गावरान जाती, औषधी वनस्पती आणि इतर स्थानिक जीवविविधता यांच्या संवर्धनाला चालना देणं आणि या सगळ्यांच्या बाबतीत स्थानिक लोकांना असलेल्या परंपरागत ज्ञानाची नोंद करणं अशी उद्दिष्टं ठेवण्यात आलेली आहेत. आज महाराष्ट्रातल्या 23 संस्था या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कार्यरत आहेत. ‘बायफ’, ‘वयम’, ‘कल्पवृक्ष’, ‘संवेदना’ अशा अनेक स्वयंसेवी संस्था आदिवासी भागांत पारंपरिक ज्ञानसंकलनाचं काम स्वतंत्रपणेही करत आहेत.


pryavaran_2  H
लोकजीवविविधता नोंदवहीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस या ज्ञानसंकलनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो. इथे शिक्षणाचा वा व्यवसायाचा/पेशाचा फार काही संबंध नाही. पारंपरिक ज्ञानसंकलनाची सर्वोत्तम पद्धत म्हणजे ‘गप्पा’! ज्याला हे संकलन करायचंय, त्याच्याकडे गावठी भाषेत उत्तम प्रकारे गप्पा मारण्याचं कौशल्य असायला हवं. कारण आपण ‘संशोधका’च्या बाण्याने वा पत्रकारी थाटात गावातल्या माणसाला प्रश्न विचारायला गेलो, तर तो माहिती द्यायला बिचकेल! अनौपचारिक गप्पा मारता मारता गावातल्या लोकांनी सांगितलेली माहिती टिपून घेणं एक चांगला मार्ग आहे. ज्याच्याकडून आपण माहिती घेत आहोत त्याच्या मनात, ही माहिती एका चांगल्या कारणासाठी घेतली जात आहे याबद्दल विश्वास जागृत करणं ही माहिती संकलन करणार्याची एक मोठी जबाबदारी आहे. पारंपरिक ज्ञान हे मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे येताना त्यात काय काय बदल होत आहेत हीसुद्धा एक महत्त्वाची नोंद घेण्याची बाब आहे. एकच प्रश्न जुन्या पिढीतल्या माणसाला विचारणं आणि नव्या पिढीतल्या माणसाला विचारणं यातून याबाबत काही निष्कर्ष मिळू शकतात.

pryavaran_4  H  
संकलित केलेलं पारंपरिक ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात आज समाजमाध्यमं फार मोलाची भूमिका बजावू शकतात. फेसबुकवर फोटोसहित लेख लिहिणं, डॉक्युमेंटरी बनवून यूट्यूबवर प्रकाशित करणं अशा माध्यमांतून पारंपरिक ज्ञानाचं अभिसरण घडेल, हजारो लोकांपर्यंत ते पोहोचेल. आपल्याकडे काय आहे हे बरेचदा आपल्यालाच माहीत नसतं आणि जेव्हा ते माहीत होतं, तेव्हा आश्चर्य वाटतं, साहजिकच कुतूहल जागृत होतं. त्यामुळे पुढच्या पिढीला पारंपरिक ज्ञानाकडे आकर्षित करण्यात ही समाजमाध्यमं मोठी भूमिका बजावतील. आज ‘विकिपीडिया’ हा मुक्त ज्ञानकोश भारतातल्या सर्व प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध झाला आहे. मराठी विकिपीडियावर कुठलाही मराठी भाषिक माणूस स्वत:चं खातं उघडून त्याला असलेली कुठल्याही विषयाबद्दलची माहिती नोंदवू शकतो. अशा प्रकारे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकेंद्रित असलेलं ज्ञान एकत्र करण्यासाठी अनेक व्यासपीठं उपलब्ध होत आहेत.
 
यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो आणि तो रास्त आहे - पारंपरिक ज्ञानाच्या नावाखाली चुकीची माहिती, अशास्त्रीय समजुती याही प्रमाण मानल्या जातील की काय? यासाठी आधुनिक विज्ञान उपयोगात येईल. लोक जे पिढ्यानपिढ्या ‘मानत’ आलेले आहेत ते बरोबर आहे का, हे आधुनिक विज्ञानातील प्रयोगतंत्रांच्या साहाय्याने पडताळून पाहणं शक्य आहे. यासाठी वैज्ञानिक आणि गावांतले लोक हे कुठेतरी एकत्र आले पाहिजेत. दुसरं म्हणजे संकलित केलेल्या ज्ञानाचं समाजमाध्यमांमधून सतत अभिसरण होत असलं की आपोआप त्यावर चर्चा घडतात, त्यातलं काय बरोबर आहे व काय चुकीचं आहे याचं खंडनमंडन घडतं. यातून पारंपरिक ज्ञानाची शास्त्रीयता निश्चितपणे राखली जाईल.
 
मागच्या पिढ्यांकडचं जे ज्ञान आपल्या हातून जे निसटून गेलं ते गेलं. प्राचीन ग्रंथांतून वा ग्रामीण साहित्यातून थोडंफार जपलं गेलं आहे तेवढंच! परंतु आज एकविसाव्या शतकात, तंत्रज्ञानसंपन्न आधुनिक भारतातही, तंत्रज्ञानविरहित काळ अनुभवलेली एक पिढी नांदते आहे. ही पिढी भारताच्या खेडोपाड्यात, डोंगरदर्यांत, निसर्गाच्या सांनिध्यात राहते आहे. माणूस वयोवृद्ध होऊन जग सोडून जातो, तेव्हा नुसतं त्याचं शरीरच जात नाही, तर त्याने वर्षानुवर्षांच्या अनुभवांतून संपादिलेलं ज्ञानही जातं. तेव्हा फार विलंब न करता या पिढीकडे असलेलं ज्ञान टिपून घेण्याच्या कामाला लागायलाच हवं! जास्तीत जास्त लोकांनी या ज्ञानयज्ञात सहभागी व्हायला हवं... ‘पारंपरिक ज्ञानसंकलन’ ही एक राष्ट्रव्यापी चळवळ व्हायला हवी!