अपयशातले वरदान

विवेक मराठी    28-Oct-2020
Total Views |


साप्ताहिक विवेकच्या फेसबुक पेजला like करा...
 
 
विरोधी नेता म्हणून फ़डणवीस यांनी मागल्या सहा-आठ महिन्यांत काय पेरले, त्याचे फ़ळ काय मिळेल, त्याचा आज कोणालाही थांगपत्ता लागणार नाही. त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. पण एक मात्र मानावेच लागेल - ह्या तरूण नेत्याला दीर्घकाळ राजकारणात टिकायचे आहे. त्याच्यासारख्या संयमी तरुणांमध्येच कुठल्याही पक्षाचे भविष्य दडलेले असते.
 devendra fadnvis_1 &

'Blessing in disguise' अशी इंग्लिश भाषेतली उक्ती आहे आणि विरोधाभासाच्या अनुभवात ती सहसा वापरली जात असते. अनेकदा प्रथमदर्शनी तुम्हाला नुकसान झाले आहे असे वाटणारी घटना घडते, किंवा अपयश पदरी पडले म्हणून तुम्ही निराश होऊन जाता. पण काही काळानंतर तुमच्या लक्षात येते, की एक प्रकारे ते अपयश हा शाप नव्हता, तर वरदान होते. अनेक राजकीय नेत्यांच्या बाबतीत असेच घडलेले आहे. त्यांच्यावर संकटे आली आणि अपयशाचा भडिमार झाला. पण अंतिमत: त्याच अपयशातून त्यांचे नशीब फ़ळफ़ळलेले होते. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. तेवढेच नाही. त्यांचे निकटचे सहकारी व भारताचे गृहमंत्री अमित शहा आहेत. या दोन्ही नेत्यांना राजकीय आयुष्यातून उठवण्याचे अनेक डाव खेळले गेले, कारस्थाने झाली आणि विविध प्रकरणात त्यांना अपयशही पचवावे लागलेले आहे. पण अखेरीस त्यांच्या संयमाला व धाडसाला मिळालेले फ़ळ जगाला चक्रावून सोडणारे ठरलेले आहे. देशात असे क्वचितच राजकीय नेते आढळतात. अशा मोजक्या नेत्यांमध्ये विरोधी नेता व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांचा समावेश होतो. तसे बघितले, तर ज्येष्ठतेनुसार वा व्यक्तिगत राजकीय कर्तबगारीने त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले नाही. २०१४ साली देशात आलेल्या मोदी लाटेवर भाजपा स्वार झालेला होता, त्यामुळे त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत एकट्याच्या बळावर लढून सर्वात मोठा पक्ष होता आले. तेव्हा फ़डणवीस राज्यातील भाजपाचे अध्यक्ष होते आणि त्या तरुण नेत्यावर इतक्या मोठ्या महत्त्वाच्या राज्याचा कारभार करण्याची जबाबदारी मोदींनी टाकली. ते आव्हान होते आणि संकटांचा व प्रतिकूल परिस्थितीचा डोंगर समोर उभा होता. विधानसभेत एकहाती बहुमत नाही आणि मित्रपक्ष शिवसेना सातत्याने हुलकावण्या देत असताना पुर्ण पाच वर्षे सरकार चालवणे सोपी गोष्ट नव्हती. तारेवरची कसरत होती आणि कडेलोटावरचे राजकारण होते. अशा मुख्यमंत्रिपदाला शाप म्हणायचे की वरदान?


devendra fadnvis_1 &
 
बहुधा मोदींची ही शैली असावी किंवा परीक्षा पद्धती असावी. खुद्द मोदीही त्याच तडाख्यातून तावून सुलाखून आले आहेत. त्यांनाही योगायोगाने थेट मुख्यमंत्रिपद मिळाले होते आणि त्यानंतर त्यांच्या राजकीय जीवनामध्ये जी संकटे येत गेली, त्याला पारावार नव्हता. जगातली माध्यमे, देशभरचे सर्व विरोधी पक्ष आणि पक्षातले हितशत्रू अशा एका अभेद्य चक्रव्यूहात नरेंद्र मोदी नावाचा तरुण अननुभवी नेता सापडला होता. तिथून वाटचाल सुरू करून त्याने अवघ्या बारा वर्षांत देशभरच्या जनतेचा विश्वास संपादन करण्यापर्यंत मजल मारली. त्यामुळेच पक्षाला त्यांच्यावर विश्वास दाखवून राष्ट्रीय नेतॄत्वाची जबाबदारी सोपवणे भाग पडले. या अनुभवातून गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले सहकारी निवडताना फ़क्त चोखंदळ निवडी केलेल्या नाहीत, तर पक्षाला त्यांनी मिळवून दिलेले यश पुढे घेऊन जाऊ शकतील, असे तरुण नेते पुढे आणण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे फ़डणवीस यांना राज्यात मुख्यमंत्री होता आले. एक प्रकारे त्याला शिक्षा म्हणायचे की कोंडी? अल्पमताचे सरकार चालवायचे आणि गाठीशी प्रशासनाचा कसलाही अनुभव नाही. पण त्यातून टिकण्याची व सहीसलामत जबाबदारी पार पाडण्याचीच तर परीक्षा फ़डणवीस यांना द्यायची होती. त्यात धूर्तपणा, संयम, मुरब्बी राजकारण व हसतखेळत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करणे; अशा अनेक परीक्षाही होत्या. या तरुणाने त्यांना धाडसाने सामोरे जाऊन दाखवले, म्हणून तर पन्नास वर्षांपूर्वीचा वसंतराव नाईक यांचा अबाधित असलेला विक्रम देवेंद्रनी गाठून दाखवला. निवडणूक ते निवडणूक पुर्ण पाच वर्षे मुदतीत मुख्यमंत्री अन्य कोणाला होता आले नव्हते. तितकेच नाही, तर पुढल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करून पुन्हा विधिमंडळातला सर्वात मोठा पक्ष होण्यापर्यंत मजल मारणे सोपे नव्हते. पण फ़डणवीस त्यात उत्तीर्ण झाले आहेत. त्यात त्यांना आपले मुख्यमंत्रिपद कुठे कायम राखता आले? म्हणून अनेक जण नाक मुरडतील यात शंका नाही. पण त्याला शापवाणी अपयश म्हणावे की वरदान?

devendra fadnvis_2 &
 
गेल्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असतानाही शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाचा हट्ट धरला आणि युती मोडून विरोधकांशी साटेलोटे केले. परिणामी भाजपा सर्वात मोठा पक्ष असूनही त्याला विरोधी पक्षामध्ये बसावे लागलेले आहे. त्यामुळे एक प्रकारे संकटकाळात राज्याची धुरा फ़डणवीस यांच्या हातात नाही. कारभारात ज्या गफ़लती होत आहेत वा बोजवारा उडालेला आहे, त्यासाठी सरकारला धारेवर धरण्याचीही विरोधी पक्षाला गरज उरलेली नाही. साक्षात बारा कोटी मराठी जनताच नव्या आघाडी सरकारच्या अनागोंदीचा अनुभव घेत आहे आणि त्याचे दुष्परिणाम भोगते आहे. त्या जनतेच्या वेदना कोणत्या व त्याला जबाबदार कोण, हे समजावण्याची तरी आज गरज नाही. पण याची दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे. जितका कारभाराचा बट्ट्याबोळ झालेला आहे, त्या प्रत्येक अनुभवातून सामान्य लोकांना आधीच्या सरकारच्या कारभाराचे अनुभव आठवत आहेत. साहजिकच आज फ़डणवीस मुख्यमंत्री असते तर काय झाले असते? किती सुसह्य कारभार झाला असता किंवा कोरोनाच्या अत्यंत घातक महामारीच्या काळात जनतेचे इतके हाल झाले नसते, अशी भाषा सामान्य नागरिकच बोलतो आहे्. त्याला आशीर्वाद म्हणायचा की शाप? गेल्या अकरा महिन्यांत शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी जे आघाडी सरकार सत्तेत आले, त्याचे परिणाम शेवटी भाजपापुरते मर्यादित नसतात. सर्वात मोठा पक्ष होऊन भाजपाला विरोधातच बसावे लागले, हे त्या पक्षाचे वा त्या़च्या नेत्यांचे दुखणे असू शकते. पण त्याहीपेक्षा त्याची अधिक वेदना व वैफ़ल्य सामान्य जनतेला जाणवत असेल, तर त्याला वरदान मानायला हवे. हे भाजपाला वा त्यांच्या हिरमुसल्या नेत्यांना कितपत कळेल शंका आहे. कारण भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाला एका निवडणुकीतील यशापयश वा सत्तेतून बाजूला होण्यापुरता विषय नसतो. भविष्यावर डोळा ठेवून अशा पक्षांना आपल्या भूमिका घ्याव्या लागत असतात. आजचे अपयश वा हुकलेली सत्ता दीर्घकालीन यशाचा पाया असेल, तर?
 
devendra fadnvis_3 &
पाच वर्षे भाजपाचा मुख्यमंत्री म्हणून फ़डणवीसांनी जे काम करून ठेवलेले आहे, त्याच्याशी आजच्या महाआघाडी सरकारच्या कारभाराची जनमानसात पदोपदी चर्चा व तुलना होत असते. याला फ़ार महत्त्व आहे. कारण यातूनच पक्षाची मतपेढी तयार होत असते. विरोधात असूनही खेड्यापाड्यात जाऊन पोहोचलेले फ़डणवीस आणि घरात अडकून पडलेले विद्यमान मुख्यमंत्री यांची तुलना माध्यमांनी करायची गरज नाही. कोरोना असो किंवा चक्रीवादळ असो, महापूर वा लॉकडाउन, अशा प्रत्येक वेळी सरकारने कुठले निर्णय घ्यावेत आणि कुठले उपाय योजावेत, याचा ऊहापोह फ़डणवीस जाहीरपणे करीत राहिले आहेत. त्याचा अर्थ किती राजकीय विश्लेषकांना उमजला आहे? मुख्यमंत्री असतो व हाती अधिकार असता, तर गांजलेल्या जनतेला त्यापासून दिलासा देण्यासाठी आपण काय निर्णय घेतला असता? कसा कारभार केला असता? कोणते उपाय योजले असते? त्याचाच ऊहापोह विरोधी नेता म्हणून फ़डणवीस करीत राहिलेले नाहीत काय? हे करणे शक्य आहे, या भीषण समस्येवर अशा प्रकारे मात करता येऊ शकते असे राज्यव्यापी दौर्यातून फ़डणवीस माध्यमांना सांगतात, त्यातून जनतेपर्यंत कोणता संदेश जात असतो? हे सर्व शक्य आहे, तुमच्या समस्यांवर मातही करता येऊ शकते; पण राज्य सरकारला वा मुख्यमंत्र्यांना ते करायचे नाही किंवा करण्याची इच्छाच नाही, अन्यथा कोरोना व अतिवृष्टीत तुमचे इतके हाल व्हायचे काहीही कारण नाही, निदान आमचे सरकार असते व मी मुख्यमंत्री असतो, तर ह्या समस्यांना मात नक्कीच केली असती; सर्वच शक्य नसले, तरी इतक्या विपरीत परिस्थितीत सरकार जनतेचे जीवन आनंदी करू शकत नसले, तरी निदान सुसह्य करू शकते, सत्तेत बसलेत त्यांना ते करायचे नाही किंवा त्यांना कारभारच करता येत नाही, हाच संदेश विरोधी नेता म्हणून फ़डणवीस मागले सहा महिने राज्यभर फ़िरून देत नव्हते का?
आपल्या हाती सत्ता नसताना आणि सरकारवर खरपूस टीका करून रान उठवणे शक्य असतानाही नागरिकांना नकारात्मक काही सांगण्यापेक्षा सकारात्मक उपाय सांगणे यातला धूर्तपणा किती जणांना उमजला आहे? निदान शरद पवारांना नक्की कळला आहे. म्हणूनच त्यांनी नेमलेले वा निवडलेले मुख्यमंत्री घरातच अडकून पडलेले असताना फ़डणवीसांचा राजकीय डाव ओळखून पवार याही वयात राज्यात अनेक जिल्ह्यांना भेटी देत आहेत. कारण उथळ पत्रकार-संपादकांनी कितीही टवाळी केली, म्हणून फ़डणवीस निराश झाले नाहीत वा वैतागलेले नाहीत. त्यांनी शांतपणे आपले दौरे चालू ठेवले आणि प्रत्येक जिल्ह्यात काय त्रुटी आहेत व कुठले उपाय योजावेत, त्याची जाहीर वाच्यता करणे चालूच ठेवले. त्यातले राजकारण कळायला पवारांइतका मुरब्बीपणा अंगी असायला हवा. हा कालचा पोरगा आपल्याला तुल्यबळ आहे, हे ओळखूनच पवार आपले डावपेच योजतात आणि या वयात त्याच फ़डणवीसांना कृतीतून उत्तर देऊ पाहतात, हे या माजी मुख्यमंत्र्याच्या यशाचे खरे रहस्य आहे. विरोधातले वा सत्तेच्या बाहेर असताना करायचे राजकारण ज्याला खेळता येते, त्यालाच दीर्घकालीन राजकारण शक्य असते. इथे म्हणूनच फ़डणवीसांची सत्ता जाणे एक प्रकारे झाकलेले वरदान ठरते. कारण आज तेच मुख्यमंत्री असते, तर प्रत्येक त्रुटीसाठी विरोधकांनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला असता. युतीत व सत्तेत असूनही शिवसेनेच्या नेत्यांनी व मुखपत्राने आग ओकली असती. त्यातून फ़डणवीस आयते निसटले आणि प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जनतेला आपण सत्तेत नसल्यामुळे महाराष्ट्राची किती दुर्दशा चालू आहे, ते घरोघरी जाऊन समजावण्याचा धूर्तपणा केलेला आहे. विरोधी नेता म्हणून फ़डणवीस यांनी मागल्या सहा-आठ महिन्यांत काय पेरले, त्याचे फ़ळ काय मिळेल, त्याचा आज कोणालाही थांगपत्ता लागणार नाही. त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. पण एक मात्र मानावेच लागेल - ह्या तरूण नेत्याला दीर्घकाळ राजकारणात टिकायचे आहे. त्याच्यासारख्या संयमी तरुणांमध्येच कुठल्याही पक्षाचे भविष्य दडलेले असते.