आत्मनिर्भर भारत आणि महात्मा गांधी

विवेक मराठी    01-Oct-2020
Total Views |
महात्मा गांधी यांच्या १५१ जयंतीवर्षाच्या काळात देशभर आत्मनिर्भरतेचा सूर गुंजत आहे. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रयत्न करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भरता काय आहे आणि ती प्रत्यक्षात कशी येईल, याकडे लक्ष द्यावे लागेल. या लेखाच्या माध्यमातून महात्मा गांधी यांच्या विचारांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.


gandndhi_1  H x

कोरोना आपत्तीच्या पार्श्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत' ही घोषणा केली. लोकल ते ग्लोबल अशा व्यापक परिप्रेक्ष्यात आपल्याला स्वयंपूर्ण - आत्मनिर्भर व्हायचे आहे. एका अर्थाने स्वत:ला कसास लावण्याची संधी कोरोनाने उपलब्ध करून दिली आहे. या पार्श्वभूमीवर, आत्मनिर्भर म्हणजे काय हे आपण आधी समजून घेतले पाहिजे. आत्मनिर्भर होण्यासाठी पहिली पायरी आहे स्वत:ला ओळखण्याची. आपण कोण आहोत? आपल्या क्षमता काय आहेत? आपले जीवितकार्य काय आहे? या देशातल्या उत्थान आणि पतनात माझा सहभाग कसा आहे? या गोष्टीचा विचार करून दुसरी पायरी ओळखायची असेल, तर मी आणि माझा समाज यांचे संबंध कसे आहेत? माझ्या देशाबद्दल मला काय वाटते? विकासाची धारणा काय आहे? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नाच्या जंजाळातून बाहेर पडून स्वत:बरोबर आपल्या समाजाचा व राष्ट्राचा विचार करायचा असेल, तर पूर्वसुरींचे बोट पकडून वाटचाल करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा पूर्वसुरींमध्ये महात्मा गांधी यांचा वरचा क्रमांक लागतो. महात्मा गांधींच्या विचारांचा मागोवा घेतला असता आपल्या लक्षात येते की आत्मनिर्भर भारत ही संकल्पना साकार करण्यासाठी गांधीविचारांचा आधार घेतला, तर आपली वाटचाल सुकर होईल.

महात्मा गांधी यांच्या जीवनात आपणास अनेक चिरंतन मूल्ये आढळतात. या मूल्यांना त्यांनी व्यवहाराची जोड दिली. या मूल्यांमुळेच त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला असून या मूल्यांबाबत त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. उलट ही मूल्ये जगण्यासाठी ते कर्मठपणे वागत होते, असेच आपल्या लक्षात येईल. साधी राहणी, उपभोगावर नियंत्रण, संयमाचे पालन, साधनशुचिता, साध्य-साधनविवेक, स्वदेशी, ग्रामस्वराज्य, प्रत्येक हाताला काम, श्रमप्रतिष्ठा, नैतिक शिक्षणाचा आग्रह, गोप्रेम या सर्व गोष्टी महात्मा गांधींशी जोडलेल्या असल्या, तरी त्या शाश्वत आहेत. शाश्वत मूल्ये ही प्रत्येक कालखंडात वेगवेगळ्या स्वरूपात पुढे येत असतात. हा कालखंड आत्मनिर्भर भारत होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचा आहे.

आत्मनिर्भर होणे म्हणजे काय? तर आपली दुर्बळता झटकून उत्साहाने भारित होऊन स्वत:ला सिद्ध करणे होय. आपल्या सुप्त शक्तीला जागृत करून सामर्थ्याचे प्रकटीकरण करणे होय. महात्मा गांधी म्हणतात, "भारत दुर्बळ आहे म्हणून मी त्याला अहिंसेच्या मार्गावर चालण्याची विनंती करत नाही. माझी इच्छा आहे की त्याने आपल्या सामर्थ्याची आणि शक्तीची जाणीव ठेवून अहिंसेचे अनुसरण केले पाहिजे... मला वाटते की, प्रत्येक भौतिक दुर्बलतेवर मात करू शकणाऱ्या व संपूर्ण भौतिक सामर्थ्याला आव्हान देऊ शकणाऱ्या आपल्या अविनाशी आत्म्याची ओळख भारताला पटावी." महात्मा गांधी यांचे हे विचार १९२० सालचे, म्हणजे शंभर वर्षांपूर्वीचे आहेत, पण आजही ते कालसुसंगत आहेत

महात्मा गांधींनी भौतिक शक्तीपेक्षा आत्म्याच्या शक्तीला प्रबळ करण्याचे सुचवले आहे. इथल्या मातीत रुजलेली संस्कृती आणि त्यातून निर्माण झालेल्या समाजव्यवहारात जी शक्ती दिसते, ती भारताची आत्मिक शक्ती आहे. विशाल पसरलेल्या देशातील प्रत्येक नागरिकाला जगण्याची संधी मिळाली पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे आणि सर्वांच्या प्रयत्नातून भारतीय नागरिकाला आत्मनिर्भर होता आले पाहिजे ही महात्मा गांधी यांची भूमिका आहे. ते भारताचे वर्णन करताना म्हणतात, "ही भूमी भोगभूमी नसून कर्मभूमी आहे." कर्मभूमी या शब्दाचा अर्थ सातत्याने कार्यरत असलेली भूमी. पूर्वीच्या काळी ग्रामोद्योग, कुटिरोद्योग यांच्या माध्यमातून प्रत्येक हाताला काम मिळत होते आणि त्या माध्यमातून सर्वाना आत्मनिर्भर होऊन जगता येत होते. मधल्या काळात ही परंपरा खंडित झाली असली, तरी पुन्हा नव्याने व नव्या स्वरूपात आत्मनिर्भर भारत उभा राहत आहे. असे असले, तरी आपल्याला महात्मा गांधींचे काही विचार आचरणात आणावे लागतील. त्यातील पहिली गोष्ट आहे श्रमप्रतिष्ठा. कोणतेही काम हलक्या दर्जाचे नाही ही गोष्टी आपण व्यवहारातून सिद्ध केली पाहिजे. महात्मा गांधी म्हणतात, "आपल्या देशातील घोर दारिद्र्य आणि बेरोजगारी पाहून मी अक्षरशः रडलो आहे. परंतु याकरिता आमची उपेक्षा आणि अज्ञान बहुतांशी जबाबदार आहे, हे मला मान्य करावे लागेल. आपण श्रमप्रतिष्ठेशी अपरिचित आहोत. इथे जोडे बनवणारा त्याशिवाय दुसरे कोणतेही काम करू इच्छित नाही. इतर सर्व काम त्याला त्यांच्या प्रतिष्ठेला कमीपणाला आणणारे आहेत असे वाटते. आपल्याला हा भ्रम नाहीसा करावा लागेल." महात्मा गांधींच्या या निरीक्षणात आज फार फरक पडला आहे असे वाटत नाही. जोपर्यंत आपल्या जगण्यात श्रमप्रतिष्ठा अग्रक्रमावर येत नाही, तोपर्यंत आत्मनिर्भरतेकडे आपली वाटचाल होणार नाही. महात्मा गांधी श्रमप्रतिष्ठेइतकेच स्वावलंबनाला महत्त्व देत असत. स्वत:च्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वत:च प्रयत्नशील असले पाहिजे. आपले जीवन परस्परपूरक असले, तरी स्वत:चा भार दुसऱ्यावर पडणार नाही असा व्यवहार करणे म्हणजे स्वावलंबन. महात्मा गांधींच्या विचारांमध्ये या तत्त्वाला खूप महत्त्व असून आजच्या काळात ते अधिक मोलाचे आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

आत्मनिर्भर होताना आपले शिक्षण कसे असावे याचाही विचार करावा लागेल. महात्मा गांधी यांनी 'नई तालीम' या नावाने शिक्षण विचार मांडले आहेत. शिक्षणाबद्दल ते म्हणतात, "प्राचीन सुभाषित 'सा विद्या या विमुक्तये' आजही तितकेच सत्य आहे, जितके आधी होते. इथे शिक्षणाचा अर्थ केवळ आध्यात्मिक शिक्षण असा नाही, विमुक्तीचा अर्थ मृत्यूनंतर मोक्ष असाही नाही. मानवजातीच्या सेवेकरिता उपयोगी असलेल्या सर्व प्रकारच्या शिक्षणाचा ज्ञानात समावेश होतो आणि विमुक्ती म्हणजे सर्व प्रकारच्या पारतंत्र्यातून मुक्तता. यात सध्याच्या परिस्थितीचाही समावेश आहे - म्हणजे बाह्य सत्तेची गुलामगिरी आणि माणसाच्या कृत्रिम गरजांची गुलामगिरी यांच्यापासून मुक्ती. याच आदर्शाच्या प्राप्तीकरिता करण्यात आलेले ज्ञानार्जन म्हणजे खरे शिक्षण." स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात शिक्षण क्षेत्रात ज्या पद्धतीने विचार झाला, त्याला छेद देणारे हे विधान असले तरी त्यांची गरज आज लक्षात येऊ लागली आहे. केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणावर महात्मा गांधींच्या 'नई तालीम'चा प्रभाव दिसून येतो आहे, त्याला हेच कारण असेल. आत्मनिर्भर होण्यासाठी खरे शिक्षण आवश्यक आहे. खरे शिक्षण स्वत:ची ओळख पटवून देते. आज आपल्याला त्याचीच गरज आहे.

भारताचा आत्मनिर्भरतेचा निर्णय एका विशेष परिस्थितीत घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारत केवळ ग्राहक नाही, तर उत्पादक देश आहे हे जगाला दाखवून देण्याची ही वेळ आहे. मात्र या प्रवासात आपली दिशा निश्चित करताना महात्मा गांधी यांचे विचार उपयुक्त ठरणार आहेत. महात्मा गांधी म्हणतात, "भारताचे ध्येय इतर राष्ट्रांपेक्षा वेगळे आहे, असा माझा अनुभव आहे. विश्वाचे धार्मिक नेतृत्व करण्याचे सामर्थ्य भारताजवळ आहे... इतर राष्ट्रे पाशवी शक्तीच्या बाजूची आहेत. युरोपात सुरू असलेले भयानक युद्ध याच सत्याचा पुरावा आहे. आपल्या आत्मबलाने भारत सर्वांना जिंकू शकतो." आज जागतिक पातळीवर जे ताणतणाव आणि प्रबळ राष्ट्राची अरेरावी चालू आहे, ती पाहता शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी मांडलेले विचार कालसुसंगत आहेत हे लक्षात येते. आपल्याला आत्मनिर्भर होतानाच आपला आत्मा जपत प्रवास करायचा आहे. हा प्रवास कसा असावा, हे समजून घेण्यासाठीही आपल्याला महात्मा गांधींच्या विचारांचा आधार घेता येऊ शकतो.

आत्मनिर्भर झालेला भारतच जगाच्या कल्याणासाठी ठामपणे उभा राहू शकतो. महात्मा गांधी म्हणतात, "युरोपच्या चरणासमोर झुकलेला भारत मानवतेकरिता आशेचा कोणताही किरण दाखवू शकत नाही. जागृत आणि स्वतंत्र भारतच कण्हत असलेल्या जगाला शांतीचा आणि सद्भावनेचा संदेश देऊ शकेल." महात्मा गांधींच्या मांडणीत युरोपचा उल्लेख केला असला, तरी ही गोष्ट आज संपूर्ण जगाला लागू आहे आणि ती गोष्ट म्हणजे भारताने आत्मनिर्भर होऊन जगाला मार्गदर्शन करणे. भारताचे परमवैभव हा विश्वकल्याणाचा मार्ग आहे. जगातील अनेक देशांना भारत आधार ठरू शकतो, त्यासाठी आधी भारताने आत्मनिर्भर झाले पाहिजे.

महात्मा गांधी यांच्या विचारांचा आढावा घेताना त्यांचे काही विचार काळाच्या कसोटीवर टिकत नाहीत, कारण जग झपाट्याने बदलले आहे. महात्मा गांधी ज्या ग्रामस्वराज्याचा आग्रह धरत, ती ग्रामव्यवस्थाही बदलून गेली आहे. असे असले, तरी मानवी जीवन आणि राष्ट्रीय जीवन या विषयावरील त्यांचे विचार कालातीत आहेत. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आत्म्याची ओळख पटली पाहिजे आणि राष्ट्राने त्याचा आत्मा जपला पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. विकासाला त्यांचा विरोध नव्हता. ते म्हणत, "मला समृद्धी हवी आहे, मला आत्मनिर्णय हवा आहे, मला स्वातंत्र्य हवे आहे, परंतु या सर्व गोष्टी मला आत्म्याकरिता हव्या आहेत." आपल्या देशाचा महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील आत्मा जागृत होणे आणि देश आत्मनिर्भर होणे ही महात्मा गांधींना समयोचित आदरांजली ठरेल.