प्रेम हे चिरंजीवी असते, म्हणून वैश्विक असते. प्रेमी संपतात, त्यांची जागा घेणारे दुसरे येतात. गाणी एका पिढीकडून, दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. ते शब्द, ते सूर दुसऱ्या गळयातून गायले जातात. प्रेमाबरोबर ही गीतेही अमर होतात.
गेल्याच आठवडयातील गोष्ट. नेहमीप्रमाणे वाचनालयात जाण्यासाठी बस स्टॉपवर उभी होते. तेवढयात एक वृध्द गृहस्थ दोन माणसांचा आधार घेऊन हळूहळू चालत येताना दिसले. टॅक्सी उभी होती. दोन्ही माणसांचे हात गुंतलेले, म्हणून पटकन पुढे जाऊन मी दार उघडले. आत बसताना त्यांना बराच त्रास होत होता, तरीसुध्दा शक्य होईल तेवढे स्वतंत्र बसण्याचा त्यांचा प्रयत्न खरच कौतुकास्पद होता. ते जेव्हा व्यवस्थित बसले, तेव्हा मी दार बंद केले. पाठून त्यांची पत्नी येत होती. व्यवस्थित वेशभूषा, केसांचा बॉब, भारदस्त पण थोडेसे कडक व्यक्तिमत्त्व.
एवढयात त्या गृहस्थांनी मला बोलावले. आभार मानतानाच, पत्नीची ओळख करून देताना ते म्हणाले, ''माझे वय पंचाऐंशी आहे आणि हिचे चौऱ्याऐंशी.''
मी हसले. ''अभिनंदन!''
कदाचित मला एवढा वेळ दार धरून ठेवावे लागले याची दिलगिरी असावी असे वाटले मला. पण पुढचे वाक्य मात्र माझ्यासाठी अगदी आनंदमिश्रित आश्चर्याचे होते.
''जेव्हा प्रेमात पडलो, तेव्हा मी सोळा आणि ती पंधरा वर्षाची होती.''
आतापर्यंत चेहरा कोरा ठेवून बघ्याची भूमिका घेणाऱ्या त्या चक्क लाजल्या. जवळजवळ सत्तर वर्षांचा सहवास आणि तोसुध्दा असा हवाहवासा. हे नुसते आकर्षण नव्हते. त्यात जिव्हाळा होता, आदर होता, विश्वास होता आणि या वयातसुध्दा रोमान्स जिवंत होता.
रोमान्सची व्याख्या नक्की काय करावी? मेणबत्तीच्या मंद प्रकाशात, संथ सुरावटीच्या साथीने केलेले जेवण, संध्याकाळी कलत्या उन्हात, अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने रंगवलेली सुखद आयुष्याची स्वप्ने, एकमेकांना दिलेली गुलाबाची फुले, चोकलेट्स. बदलत्या काळानुसार आता रोमान्स सुध्दा आधुनिक होतो आहे. तरीही सगळयात रोमांचक आहे तो एकमेकांच्या सोबतीने केलेला प्रवास. जर हवा असणारा हात हातात असेल तर साधा डांबरी रस्तासुध्दा फुलांच्या पायघडया पांघरून येतो.
गाभुळलेली रात्र, सुस्तावलेला रस्ता, ओथंबलेले ढग, एक छत्री आणि तिच्या विश्वासावर एकमेकांच्या डोळयात हरवलेले ते दोघे. हृदयात दाटून आलेले प्रेम व्यक्त करताना एक अजरामर गीत जन्माला येते.
सिनेसंगीताच्या इतिहासात, चित्रीकरण, अभिनय, गीताचे शब्द, संगीत या सर्वांचा मिलाप झालेले हे रोमँटिक गीत आहे, श्री 420 या चित्रपटातील
'प्यार हुआ इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यों डरता है दिल'
अनाथालयात वाढलेला, सुशिक्षित पण नोकरीच्या शोधात, महानगरात पोहोचलेला, दरिद्री पण जिद्दी तरुण राजू आणि गरिबीतही स्वाभिमान, मूल्ये जपणारी तरुणी विद्या यांची ही प्रेमकहाणी.
आपण कमावतो हे दाखवण्यासाठी राजू विद्याला चहाचे आमंत्रण देतो. पावसाचे दिवस, काळेकुट्ट ढग दाटून आले आहेत, पण एकमेकांत हरवलेल्या जिवांना त्याचे भान नाही. रस्त्याच्या कडेला एक चहाची टपरी आहे. चहा उकळायला सुरुवात होते आणि त्याच वेळी पाऊस हजेरी लावतो. राज छत्री उघडून विद्याला देतो, पण त्याचे भिजणे पाहून विद्या तीच छत्री त्याच्या डोक्यावर धरते. आता जर भिजायचे नसेल तर एकमेकांच्या जवळ येण्यावाचून पर्याय नाही. मग मदतीला येतो तो हा खटयाळ पाऊस. तोच हे गोठलेले शब्द वितळवून ओठावर आणतो.
प्यार हुआ इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यों डरता है दिल
कहता है दिल, रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल
प्रेमाचा रस्ता तसा वळणावळणाचा. 'राजा राणी राजी तो क्या करेगा काजी' असे म्हणतात खरे, पण हा समाज, आर्थिक परिस्थिती, रितीरिवाजरूपी काजीला धूप न घालता प्रेमाच्या वाटेवर चालणे हे दमछाक करणारे असते. शंका-कुशंका पावलांना बांधून ठेवतात. हृदय धडधडते. हवी असलेली मंजिल मिळण्याच्या आत हा रस्ता संपणार नाही नं? ही धास्ती प्रेमाच्या धुंदीतसुध्दा पोटात गोळा आणते.
कहो की अपनी प्रीत का मीत ना बदलेगा कभी
तुम भी कहो इस राह का मीत न बदलेगा कभी
मनातली शंका आता बोलून दाखवण्याचा मोकळेपणा दोघात आला आहे. तो माझाच असणार आहे का? या प्रश्नाचे उत्तरसुध्दा एकमेकांना गवसले आहे. आकाशात हसणाऱ्या चंद्रालासुध्दा दोघांच्या गुपितात सामील करून, कधीही विलग न होण्याचे वचन एकमेकांना देताना दोघे सांगतात,
प्यार जो टूटा, साथ जो छूटा, चाँद न चमकेगा कभी
प्यार हुआ इकरार हुआ...
नर्गिसच्या चेहेऱ्यावर लज्जा, संकोच आणि प्रेमपूर्तीचे समाधान या भावना एकापाठोपाठ तरळून जातात, तर राजचा चेहरा आनंदाने फुलून येतो. पावसात चिंब भिजलेला आसमंत या प्रेमी जिवांच्यावर आशीर्वादाची बरसात करत असतो.
राज कपूरला संगीताची उत्तम समज होती. शंकर जयकिशन यांनी आर.के. प्रॉडक्शनच्या चित्रपटासाठी दिलेले संगीत लोकप्रिय तर झालेच, त्याचा दर्जाही फार वरचा होता. राज आणि शैलेंद्र दोघांच्यासुध्दा मनाच्या तारा जुळल्या होत्या. सामान्य माणसालासुध्दा आपल्याला काय म्हणायचे आहे ते चित्रपट आणि गीत यांच्या माध्यमातून जाणता यायला हवे, ही दोघांचीही तळमळ होती आणि म्हणूनच लोकांच्या हृदयाला स्पर्श करतील अशी गाणी निर्माण झाली. सोपी, सरळ भाषा, भावांची उत्कटता या गीतात आहेच, पण रोमँटिक असूनही त्यात सवंगपणा नाही.
रातें दसों दिशाओं से कहेंगी अपनी कहानियाँ,
प्रीत हमारे प्यार के दोहराएंगी जवानियाँ
प्रेम हे चिरंजीव असते, म्हणून वैश्विक असते. प्रेमी संपतात, त्यांची जागा घेणारे दुसरे येतात. गाणी एका पिढीकडून, दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. ते शब्द, ते सूर दुसऱ्या गळयातून गायले जातात. प्रेमाबरोबर ही गीतेही अमर होतात.
मैं न रहूँगी, तुम न रहोगे, फिर भी रहेंगी निशानियाँ
ही ओळ लताजींनी एवढी हळुवार गायली आहे! या ओळीबरोबर दिसतात हातात हात घेऊन चालणारी तीन मुले. प्रेमाची परिणती नवीन जिवाला जन्म देण्यात होते. या प्रेमाचा आणि वात्सल्याचा लोभस आविष्कार राज आणि नर्गिसने आपल्या अभिनयातून समर्थपणे साकार केला आहे. या तीन मुलांची भूमिका राज कपूरच्या तीन मुलांनी केली होती.
श्री 420 गाजला. आज राज नाही, नर्गिस नाही, पण ही कहाणी मात्र अमर आहे. दोघेही कालौघात नाहीसे झाले, तरी त्यांचे प्रेम अमर आहे हा विश्वास देणारा हा पाऊस. एवढया पिढया गेल्या, पण पावसाशी आणि उत्कट प्रेमाशी हे गाणे बांधले गेले आहे.