Enter your Email Address to subscribe to our newsletters
दुपारच्या सत्रात नुक्कड कथा अभिवाचनाने नव्या पिढीच्या लेखनातील कथालेखन शैलीतला ताजेपणा दाखवून दिला! या ताजेपणातून कथा या साहित्य प्रकाराला नवसंजीवनी मिळेल असे या कथा ऐकताना लक्षात येत गेले. त्यानंतर रंगलेली चर्चाही प्रेक्षकांच्या रसिकतेचा प्रत्यय देत होती आणि त्यांच्या नुक्कडप्रति असलेल्या प्रेमाची ग्वाही होती. या सत्रात डॉ. स्वाती धर्माधिकारी, अमेय मोडक, अभिषेक बेल्लरवार, आभा मुळे, अभय नवाथे, विक्रम भागवत आणि मेधा मराठे यांनी कथांचे केलेले अभिवाचन रसिकांना भुरळ पडणारे ठरले.
नुक्कड कथालेखन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. गणेशवंदनेने या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. गजानन बहिरट, पूजा अवचट, दिव्या शिवतारे, श्रीपाद एडके, अदिती दाते, सायली शिवगण, मानसी झोरे, प्राजक्ता बेंद्रे, ऋचा सरपोतदार यांनी केलेली सादरीकरणे आणि नव्या पिढीतली ही सक्रियता या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढे आली.
संमेलनाच्या दुसर्या दिवशी तर 87 वर्षांच्या श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी अत्यंत तरल अशी मुलाखत देऊन सगळ्या रसिकांना आनंदी केले. मनाचा नितळपणा साहित्यात उतरतो, तेव्हा ते साहित्य रसरशीत होते याचा प्रत्ययकारक अनुभव या मुलाखतीने दिला. ही मुलाखत खुलली ती प्रिया जामकर यांच्या संवाद साधण्याच्या कौशल्यामुळे. जीवनातला आनंद आणि त्या आनंदाला असलेले आशयगर्भ कोंदण आणि या वयातही तल्लख स्मरणशक्तीचे वरदान लाभलेले श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे व्यक्तिमत्त्व तरुणांनाही आवडून गेले.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
युवा काव्यवाचनाने तरुण पिढीकडच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. छंदबद्ध कवितेबरोबरीनेच नात्यांचे अनेक आयाम या सत्रात आपल्या वाचनातून युवा पिढीने अत्यंत नेटकेपणाने खुलवून दाखवले. मनोज वराडे, सौरभ देशपांडे, स्वप्निल हसबनीस, गौरव कुलकर्णी, सुरेश राठोड, रश्मी मर्डी, दीपाली वारुडे, अभय नवाथे, प्रतीक जाधव यांनी आपल्या कविता सादर केल्या आणि वलय मुळगुंद यांनी या सत्राचे अध्यक्षस्थान भूषवले.
या दिवशीच्या दुसर्या सत्रात निवृत्त न्यायमूर्ती रोशन दळवी यांची मुलाखत निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी घेतली. कोर्टात आलेल्या अनेक केसेस कशा हाताळल्या यावर भाष्य करतानाच, तसेच कार्यपद्धती आणि त्यामागची निखळ माणुसकीची भूमिका स्पष्ट होतानाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू रसिकांसमोर उलगडत गेले.
दोन दिवसांच्या संमेलनाची सांगताही उत्साहात झाली. रसिकांच्या उचंबळून आलेल्या भावनांना वाट मिळाली आणि त्यांच्या साहित्यानंदाला एक व्यासपीठ मिळाले, अशी भावनाही उत्स्फूर्तपणे व्यक्त झाली. साहित्याच्या क्षेत्रात काही सकारात्मक घडत नाही, जे घडते ते राजकारणाभोवती फिरत असते, हा दिवसेंदिवस दृढ होत चाललेला समज खोडून काढणारे हे साहित्य संमेलन निखळ साहित्यानंद देणारे ठरले.
काय मिळाले या साहित्य संमेलनातून?असा प्रश्न मनी आला आणि त्याची फारच सकारात्मक उत्तरे समोर आली. त्यात युवा पिढीचा सळसळता उत्साह दिसला. त्यांची सक्रियता समोर आली. साहित्याच्या क्षेत्रात काहीतरी सकारात्मक घडतेय हेही समोर आले. आपल्याला दाखवले जातेय तितके वाईट चित्र साहित्य क्षेत्रात नाही, असे एकदम प्रकर्षाने जाणवले. जे लिहिले जातेय, त्यातले संदर्भही त्यांच्या प्रगल्भ जाणिवांचे निदर्शक असल्याचे दिसले. आपल्या नात्यांबद्दल, आपल्या समाजाबद्दल आणि एकूणच जगण्याबद्दलची संवेदनशीलता मांडणारे साहित्य या संमेलनाच्या निमित्ताने पुढे आले.