Enter your Email Address to subscribe to our newsletters
***डॉ. अजित आपटे***
कोणत्याही राज्याचे सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे पैसा! महाराजांनी ही गोष्ट केव्हाच ओळखली होती. जिजाऊसाहेबांनी त्यांच्यावर ज्या रामायण-महाभारताचे संस्कार केले, त्या महाभारताच्या शांती पर्वातच 'अर्थ मूलो ही धर्म: ' हे तत्त्व समाविष्ट आहे. व्यापाराने, करांनी व कायद्याच्या शिस्तीने इंग्रज राज्यकर्ते रयतेकडून पैसा गोळा करू लागले. महाराजांनी ते त्यांच्याआधीच सुरू केले होते. चाणक्याची परंपरा आणि ब्रिटिशांची नवता यांचा संगमच महाराजांच्या कारभारात आपल्याला दिसतो.
आतापर्यंतच्या 14 लेखांमध्ये आपण महाराजांच्या प्रशासकीय प्रतिभेचा धांडोळा घेतला. प्रशासकीय प्रतिभा कितीही चांगली असली, तरी जे राज्य चालवायचे असेल त्याचे आर्थिक अधिष्ठान पक्के असावे लागते. महाराजांनी आर्थिक आघाडीवरही स्वराज्याचे अधिष्ठान कसे भक्कम राखले, ते यापुढच्या काही लेखांमधून आपण पाहणार आहोत.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
काही विशिष्ट उद्दिष्टांसाठी आर्थिक साधनांची केलेली जमवाजमव व त्यावरील नियंत्रण म्हणजे 'अर्थव्यवस्थापन' असे ढोबळमानाने म्हणता येईल. यांमध्ये दीर्घ आणि अल्प मुदतीचे उत्पन्न व खर्च, काटकसर, उत्पादकता, बाजारपेठ इ. अनेक घटकांचा समावेश होतो. अगदी काटेकोर व्याख्येमध्ये आपल्याला पकडायचे नसले, तरी सर्वसाधारणपणे खर्चापेक्षा उत्पन्न जर जास्त असेल, तर ते व्यवस्थापन एक चांगले व्यवस्थापन समजता येईल.
ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला शिवाजी महाराजांच्या 'अर्थव्यवस्थापनाचा' आढावा घ्यायचा आहे. यात आपण महाराजांची दूरदृष्टी समजून घेणार आहोत.
अर्थ मूलो हि धर्म: - अगदी प्राचीन काळापासून अर्थाचे महत्त्व वर्णिलेले आहे.
अर्थ मूलो हि धर्म: । कोशमूलो हि दण्ड: ।
कोशाभावे दण्डं परं गच्छतिं , स्वामिनं वा हन्ति ।
सर्वाभियोगकरश्च । कोशो धर्मकर्महेतु: ।
लम्भपालनो हि दण्डकोशस्य । कोश: कोशस्य दण्डस्य च भवती।
(कौटिलीय अर्थशास्त्र, अध्याय 8 - 177)
- 'सैन्य पैशावर अवलंबून असते. पैशाच्या अभावी ते शत्रूला मिळते किंवा विघ्न निर्माण करते. पैसा हा धर्माला किंवा इच्छापूर्तीला कारण आहे. सैन्याच्या जोरावर पैसा निर्माण करता येईल किंवा जतनही करता येईल, परंतु मिळालेला पैसा व सैन्य हे दोन्ही पैशाच्याच साहाय्याने राखता येईल.'
कोणत्याही राज्याचे सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे पैसा! महाराजांनी ही गोष्ट केव्हाच ओळखली होती. जिजाऊसाहेबांनी त्यांच्यावर ज्या रामायण-महाभारताचे संस्कार केले, त्या महाभारताच्या शांती पर्वातच 'अर्थ मूलो ही धर्म: ' हे तत्त्व समाविष्ट आहे. व्यापाराने, करांनी व कायद्याच्या शिस्तीने इंग्रज राज्यकर्ते रयतेकडून पैसा गोळा करू लागले. महाराजांनी ते त्यांच्याआधीच सुरू केले होते. चाणक्याची परंपरा आणि ब्रिटिशांची नवता यांचा संगमच महाराजांच्या कारभारात आपल्याला दिसतो.
महाराजांनी आपल्या कारभारात धर्म व अर्थ यांची बेमालून सांगड घातली होती. कशी, ती पुढीलप्रमाणे - धर्म म्हणजे व्रतवैकल्ये, श्राध्द-पक्ष, तीर्थयात्रा, भजन-पूजन असे कर्मकांड नव्हे, तर धर्म म्हणजे सद्वर्तन, सध्दर्म, यवनांचे पारिपत्य (परकीयांचे उच्चाटन) आणि स्वराज्याची स्थापना. धर्म म्हणजे मरगळलेल्या मनात चैतन्य निर्माण करणे, समाजाची आत्मश्रध्दा जागी करणे. लोकांना पराक्रमाची, विश्वविजयाची प्रेरणा देणे. हे मानसिक परिवर्तन म्हणजेच धर्मक्रांती! महाराजांनी हे मनात ठेवून स्वत:च्या आचरणाने तिला मूर्त स्वरूप दिले. सध्दर्म (केवळ स्वधर्म नव्हे) आणि स्वराज्य हेच त्यांचे परवलीचे शब्द होते.
धर्मक्रांती हे मानसिक परिवर्तन. त्यामुळे चैतन्य निर्माण होते. नवा उत्साह येतो व माणसे पराक्रमास प्रवृत्त होतात. पण त्या पराक्रमातून प्रत्यक्ष जीवनात सुखाचा लाभ झाला नाही, तर त्या क्रांतीला अर्थ राहत नाही. 'अर्थ मूलो हि धर्म:' असे म्हटले जाते ते याच अर्थाने. म्हणून धर्मक्रांतीबरोबरच अर्थक्रांतीचाही उद्योग त्यांनी सुरू केला. महाराजांना लष्करी विजयात व लोकांचा पाठिंबा मिळवण्यात जे यश आले, ते केवळ धर्मप्रेरणेने, असे म्हणता येणार नाही. सामान्य लोकांनाही धर्माभिमान असतो, पण त्यांना पोटापाण्याच्या व पोराबाळांच्या संरक्षणाची चिंता जास्त असते. 'आधी पोटोबा, मग विठोबा' ही म्हण त्याचीच साक्ष आहे. आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा राजा असावा असे त्यांना वाटते. पण ते का? तर तो आपले रक्षण करेल, आपली जमीन-जायदाद आपल्याजवळच राहील, सुखाने चार घास खाता येतील अशी राज्यव्यवस्था तो करील अशी आशा असते. मुसलमानी सुलतानीत ते घडत नव्हते. अगदी दुष्काळी परिस्थितीतही मुसलमान सत्ताधारी फक्त मुस्लिमांच्या अन्न-पाण्याची काळजी घेत. इतरांना, मुख्यत: हिंदूंना वाऱ्यावरच सोडत. आपले भोग-विलास निर्वेधपणे चालावेत यासाठी आवश्यक ते धन निर्माण करणारे मजूर, गुलाम एवढीच त्यांना हिंदूंची काळजी असे. त्यामुळे दैन्य, दु:ख, दारिद्रय, अपमान, पोरीबाळींच्या अब्रूची चिंता हेच बहुधा हिंदूंचे नशीब असे. अशा स्थितीत मराठी हिंदूंना असा राजा हवा होता, जो धर्मरक्षणाबरोबरच जीवित-वित्ताचे, घरदाराचे रक्षण करेल. महाराजांनी सुरुवातीपासूनच असे कार्य करण्याचे धोरण अवलंबले. त्यामुळे लोकांचा पाठिंबाही त्यांना सुरुवातीपासून मिळत राहिला.
त्यांनी 'अर्थ मूलो हि धर्म:' हेच आपल्या सर्वंकष क्रांतीचे मूलसूत्र ठेवले. शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळेस ते आपल्या सचिवांना म्हणाले होते, ''अर्थामुळेच सर्व कामे साधतात आणि अर्थामुळेच धर्माची अभिवृध्दी होते. म्हणूनच पैशाची प्रशंसा होते. कुल, शील, वय, विद्या, पराक्रम, गांभीर्य, गुणक्षता हे सर्व पैशामुळेच प्राप्त होते. अर्थामुळेच लोकांना इहलोक आणि परलोक लाभतो. द्रव्यहीन पुरुष हा जिवंत असूनही मेल्यासारखाच असतो. ज्याच्याजवळ विपुल पैसा असतो, त्यालाच मित्र लाभतात. ज्याच्याजवळ पैसा असेल, तोच पराक्रमी होतो आणि ज्याच्याजवळ पैसा असतो त्यालाच लोक साह्य करतात.'' (शिवभारत.)
पैशाचे महत्त्व याहून अधिक चांगले कोण सांगू शकेल?