सिनेसंगीताला ज्यांनी प्रतिष्ठा दिली, त्या सर्वांना एका व्यासपीठावर घेऊन आलेली ती संगीत रजनी होती. मखमली आवाजाची मलिका नूरजहान तेहतीस वर्षांनी भारतात आली होती. अवघा भारत उत्साहित होता. एकेकाळी तिला गुरू मानणाऱ्या लतादीदींची आज कसोटी होती. नूरजहान 'आवाज दे कहा है' म्हणणार, हे उघड होते. तिचा आवाज ऐकायलाच तर सारी चित्रसृष्टी एकवटली होती. या मैफलीच्या अखेरच्या क्षणाचा ठसा निरंतर राहणार होता आणि त्याचमुळे लतादीदींना मैफलीची सुरुवात प्राणपणाने करायची होती. त्यांनी गाणे निवडले, 'अल्ला तेरो नाम'... असे तर सुचवायचे नसेल ना की नूरजहान यांच्या प्रभावाखालून बाहेर पडल्यावर आज त्यांच्या गळयातून जितक्या सहजतेने अल्ला बाहेर पडतो, तितक्याच सहजतेने ईश्वर?
राजू भारतनने आपल्या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे. दीदींचे गाणे ऐकणे म्हणजे देवाच्या अस्तित्वाची प्रचिती घेणे. 28 सप्टेंबरला दीदींना नव्वद वर्षे पूर्ण होणार. आज त्यांनी गायलेल्या असंख्य गीतांतील निवडक गीतांवर लिहायचे, म्हणजे समुद्रात पडलेला आपला मोती शोधायचा. प्रेम, भक्ती, दु:ख, संताप अशा अनेक भावनांनी भिजलेल्या तिच्या सुरांनी रसिकांना गेली असंख्य वर्षे रिझवले आहे. या भावनांचा हात धरून शोधलेली ही नऊ गीते. नऊ भावनांचा आविष्कार.
1) आशावादी
1949 हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. भारतीय मनांवर आपल्या सौंदर्याने आणि आवाजाने हुकमत गाजवणाऱ्या दोन असामान्य व्यक्तींचा - मधुबाला आणि लतादीदीं यांचा उदय याच वर्षात झाला. चित्रपट होता महल.
तडपेगा कोई अबतक, बे आस बेसहारे
लेकिन ये कह रहा है, दिल के मेरे इशारे...
आयेगा आनेवाला.
काळ थांबला आहे. आकाशातील तारे स्तब्ध आहेत. प्रेमाच्या अनोळखी राज्यात नायिकेचे नुकतेच पाऊल पडलेले आहे. सारे जग शांत झोपलेले असतानासुध्दा तिच्या मनातली धडधड कोणाच्या तरी आगमनाची सूचना देत आहे. प्रियकराच्या अस्तित्वाची केवळ अस्फुट जाणीव आहे ही. तरी तिला माहीत आहे, जीवनाला कलाटणी देणारे कोणीतरी येत आहे. हृदयातील स्पंदनेसुध्दा एका आशेवर तगलेली आहेत. आयेगा, आयेगा, आयेगा.
एका झपाटलेल्या युगाची सुरुवात झाली या गीताने. 'हा आवाज एके दिवशी संपूर्ण देशावर राज्य करेल' ही खेमचंद प्रकाश या संगीत दिग्दर्शकाची भविष्यवाणी खरी ठरली.
2) प्रणय
गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने थैमान घातले होते. पावसाचे हे रूप तसे दुर्मीळ. खरे तर पाऊस आणि प्रणय यांचे नाते आहे आणि ह्या नात्याला अमर केले आहे ते सलील चौधरी संगीत दिग्दर्शित 'ओ सजना, बरखा बहार आई' या गीताने.
बाहेर धो धो पाऊस कोसळतो आहे आणि बाहेरील वादळाचे प्रतिबिंब तिच्या अंतरातही उमटले आहे. अजूनपर्यंत मुग्ध असलेले हे प्रेम ओठावर येण्यास कारणीभूत ठरलेला हा पाऊसच.
हे गीत म्हणजे सांगीतिक चित्र.
कौलावरून गळणाऱ्या पागोळया, मातीत उमटणारी आवर्तने, जास्वंदीच्या पानांची थरथर, आसमंतात काळोख दाटून आलेला असतानाही कंदिलाच्या प्रकाशात उजळून निघालेला साधनाचा चेहरा... याहून रोमांचित करणारे काय असू शकेल?
तुमको पुकारे मेरे मनका पपीहारा
मिठी मिठी अग्नी में, जले मोरा जियरा
ओ सजना
गाण्याची सुरुवातच सतारीच्या तारांनी झंकारते. त्याच्याशी तोडीस-तोड स्पर्धा करतो तो लताबाईंचा आवाज. असे म्हणतात, उस्ताद बडे गुलाम अली खां यांच्या पर्सनल कलेक्शनमध्ये एकच फिल्मी रेकॉर्ड होती, ती या गीताची होती.
3) आसक्ती
पूर्वी केवळ कामुकता दाखवायला तवायफच्या भूमिकेचा उपयोग होत होता. देवदास या सिनेमातील चंद्रमुखीच्या भूमिकेने नर्तिकेलाही प्रतिष्ठा मिळवून दिली. पारंपरिक नायिका पवित्र, सोज्ज्वळ, पण ही भूमिका एकसुरी. खरा रंग भरते ती तवायफ. नृत्यात पारंगत असलेल्या अभिनेत्रीसाठी ही भूमिका म्हणजे पर्वणीच. असाच एक चित्रपट होता, 'मुझे जीने दो'. यातील नायिकेने हा व्यवसाय यातील गुणदोषांसकट स्वीकारला आहे. ही नायिका गुणी आहे, हवीहवीशी आहे पण व्यावसायिक आहे . लोकांना भुलवणे हा तिचा पेशा आहे. जयदेव दिग्दर्शित 'रात भी है कुछ भीगी भीगी' या गीतात याचे प्रत्यंतर येते.
तपते दिल पर यूं गिरती है
तेरी नजर से प्यार की शबनम
तुम आओ तो, ऑंखे खोले, सोयी हुई पायल की छम छम
केवढी गोड तक्रार!
तुझी वाट पाहून रात्रसुध्दा आळसावलेली आहे. विरहाने डोळे शिणले आहेत. चंद्र अस्ताला जात आहे. पण जर तू येशील, तर माझ्या सैलावलेल्या पावलांनासुध्दा तुझी चाहूल लागेल. पैंजणाचा खूप सुंदर उपयोग केला आहे या गीतात. इथे मात्र शालीनता, सलज्जता नाही. इथे आहे ते आवाहन, देहाचे निमंत्रण, प्रणयाचे उन्मुक्त आमंत्रण. वहिदाच्या नजरेत जी मादकता आहे, तीच लतादीदींच्या आवाजात आहे.
4) वात्सल्य
संगीताची ओळख मानवाला आईच्या कुशीत होते. शब्द समजत नसतील, पण भावांशी परिचय होतो. अंगाई गीताने आई आणि मुलाच्या नात्याचा बंध घट्ट होतो. एक अतिशय जिव्हाळयाचा आणि त्याहीपेक्षा विश्वासाचा संवाद असतो तो. स्वत:च्या आईच्या आवाजानंतर कुणालाही निद्रेच्या कुशीत नेणारा आवाज आहे, तो लतादीदींचा.
लेकर सुहाने सपनों की कलियाँ, सपनों की कलियाँ
आके बसा दे पलकों की गलियाँ, पलकों की गलियाँ
पलकों की छोटी सी गलियन में निन्दिया आजा री आजा,
धीरे से आजा
5) क्रोध
स्त्रियांसाठी प्रेम म्हणजे फक्त प्रेम नसते. भक्तीही असते. स्वतःचे निराळे अस्तित्व ठेवते कुठे ती!! जेव्हा प्रेमात ती स्वतःला विरघळवून टाकते, तेव्हा आपला माणूस आपलाच राहावा असे वाटणे यात काय चूक आहे?
जा, जा रे जा, बालमवा
सौतन के संग रात बिताई
काहे करत अब झूठी बतियाँ ....
हे दु:ख आहे, मत्सर आहे आणि रागसुध्दा आहे.
ही नायिका प्रियकराने फसवलेली. दुसरीबरोबर रात्र घालवून आलेल्या पतीला क्षमा करण्याची तिची तयारी नाही. तिला येण्याचे वचन देऊनही तो रात्री घरी परतत नाही, तेव्हा क्रोधायमान झालेली ती त्याची निरर््भत्सना करते.
गैर के घर कई रात जगाई
मोसे काही तेरे बिना निंद न आयी
कैसो हरजाई दैया.
तू असा बेवफा होतोच कसा? हा सवाल आहे.
शंकर-जयकिशन यांनी संगीत दिलेले हे गीत कुमकुमवर चित्रित आहे. खरे तर ती नायिका नाही, पण लतादीदींच्या स्वरसामर्थ्याने सहनायिकांनाही स्वतंत्र ओळख मिळाली आहे.
वाट पाहणे म्हणजे न संपणारी अंधारी वाट. अगदी डोळे शिणले तरी मन ऐकत नाही. खरे तर वाट पाहणेसुध्दा सुख देते. आपले माणूस आपलं असते, पण परके झालेल्यांची आस धरून जगणे म्हणजे भविष्यकाळावर आंधळा विश्वास ठेवणे.
मनात शंका असताना केली जाणारी प्रतीक्षा जीवघेणी.
प्रेम सुंदर, मोहक असते असे सुरुवातीला वाटते खरे. पण नंतर लक्षात येते की ते अवघड आणि निर्दयसुध्दा आहे. प्रेमाचे हे रूप सहन करणे, त्याच्या यातना सहन करणे कठीण.
ये रात कहती है वो दिन गये तेरे
ये जानता है दिल के तुम नहीं मेरे
खडी मैं हूँ फिर भी निगाहें बिछाये
मैं क्या करूँ हाय के तुम याद आये
चाँद फिर निकला...
आपले माणूस आपले नाही, हे समजणे हा साक्षात्कार कोलमडून टाकणारा. डोळयांनी पाहिलेले असते, मनानेसुध्दा पण मान्य करता येत नाही हे खरे. एस.डी. बर्मन यांनी आपल्या सुरांतून आणि नूतनने अभिनयातून ही वेदना जिवंत केली आहे.
प्रेमाचा स्वीकार सहज होऊ शकत नाही. ते यशस्वी होईल का? मान्यता मिळेल का? ह्या शंकाकुशंकांनी गुंता वाढतो. स्वत:ला समर्पित करणे सहजसाध्य नाहीच. जिथे 'मी'ला प्राधान्य असते, तिथे दुसरी व्यक्ती भावविश्व व्यापते. पहिल्यांदा तुम्ही स्वत:शी मान्य करता की तुम्हाला दुसऱ्याची गरज आहे. आणि जरी ते स्वत:शी मान्य केले, तरी ती गरज तुम्हाला तुमच्या भावनांशी प्रामाणिक राहू देत नाही. मग स्वत:शीच वाद होतात. नंतर लक्षात येते की आपले मन परत न येण्याच्या वाटेवर चालू लागले आहे. जगणे-मरणे या क्रियांना
अर्थच पियाच्या अस्तित्वाने येतो. आणि मग स्वत:ला पूर्ण समर्पित करताना नायिका शुभा खोटे, मदन मोहन यांच्या सुरावटीचा आधार घेऊन म्हणते,
मरने से हमें इनकार नहीं
जीते हैं मगर इक हसरत में
भूले से हमारा नाम कभी
आ जाए तेरे अफसानो में,
तू प्यार करे या ठुकराये ..
लक्ष्मीकांत-प्यारेलाल संगीत दिग्दर्शित 'शीशा हो या दिल हो'मध्ये
परिस्थितीचा स्वीकार आहे. नियतीपुढे मानलेली शरणागती आहे.
एकत्र तर निघाले होते ते दोघे, पण अनेकदा काहीही चुकी नसताना दिशा वेगळया होतात. स्वप्नातून जबरदस्तीने उठवल्याची वेदना या गीतात आहे, पण कुठेही डोळयात अश्रू नाहीत. जिच्यामुळे झाले, त्या व्यक्तीबद्दल आकस नाही.
दुनिया एक तमाशा है, आशा और निराशा है
थोडे फूल हैं काँटे हैं, जो तकदीर ने बाँटे हैं
अपना-अपना हिस्सा है, अपना-अपना किस्सा है
कोई लुट जाता है कोई, लूट जाता है
शीशा हो या दिल...
सर्वस्व उजाडले गेल्याची जाणीव होत असतानासुध्दा त्याला आयुष्याची सर्व सुखे मिळू दे, हे मागण्याची ताकद असलेले मोठे मन आहे आणि तरीही एका भावुक क्षणी जाणवले आहे की आता आयुष्यात संध्याकाळ कायमच वस्तीला येणार आहे. रीना रॉयने या स्वरांना अमर केले.
प्रेम संपत्तीला आणि राज्यसत्तेलाच काय, तर परमेश्वरालासुध्दा आव्हान देते. अनारकली आणि सलीम यांची प्रेमकहाणी ही एक कथा आहे, पण नूरजहाँ आणि जहांगीर यांचे प्रेम ही एक सच्चाई. तिचे शेर अफगाणशी झालेले लग्न, त्याच्याशी असलेले जहांगीरचे वैर, अकबर बादशहाशी, जहांगीरने प्रेमासाठीसुध्दा केलेला विद्रोह या सर्व अडचणींना मात देते ते सलीम आणि नूरजहाँ यांचे
एकमेकांवरील प्रेम. आपल्या प्रेमावर असलेला त्यांचा विश्वास.
जनानखान्यात एकाहून एक सुंदर स्त्रिया सेवेस असतानासुध्दा 34 वर्षाच्या मेहेर उन्निसाला जहांगीरने लग्नाचे वचन दिले आणि निभावले. तिच्या आधी त्याच्या आयुष्यात अनेक स्त्रिया आल्याही होत्या, पण तिच्यानंतर त्याच्या जनानखान्यात कोणत्याही स्त्रीला स्थान मिळाले नाही.
ही एक अगदी वेगळी प्रेमकहाणी आहे.
आप दौलत के तराजू में दिलोंको तोले
हम मोहोब्बत से मोहोब्बत का सीला देते है
जुर्मं उल्फत पे हमें लोग सजा देते हैं
तराजूच्या पारडयात भले सारे जग हृदयाचा सौदा पैशाशी करत असतील, पण सच्चे प्रेमी, प्रेमाचे मोल प्रेमानेच मोजतात.
साहिर लुधियानवी यांचे शब्द, रोशन यांचे संगीत आणि बीना रॉयचा
अभिनय... लतादीदींच्या आवाजाला शोभणारी ही कोंदणे .
प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा नऊ गीतांत घेणे अशक्य. नऊ संगीतकार, नऊ अभिनेत्री यांनी रंगवलेली ही सर्वच गाणी अलौकिक. आयुष्याच्या कोणत्या न कोणत्या टप्प्यावर ती भेटलेली आहेत. एखाद्या वाटाडयाप्रमाणे त्यांनी रसिकांची साथ केली आहे. 'तू एकटी नाहीस, मी आहे तुझ्या सोबत' असे किती वेळा या स्वर्गीय आवाजाने म्हटले आहे, याची गणती नाही करता येणार
मला. एक मात्र नक्की, आयुष्य त्यांच्यामुळे खूप सुरेल झाले आहे .
सात सुरांच्या गोफात 'ल ता मं गे श क र' हे सप्त अक्षरी नाव दिमाखात गुंफले गेले आहे. ही गुंफण प्रत्यक्ष परमेश्वरानेच केलेली असावी.