आग्नेयेतील भारतीय

विवेक मराठी    23-Sep-2019
Total Views |

हजारो वर्षांपासून भारत हा आग्नेय देशांतील अनेक धाग्यांनी बांधला गेला होता. इस्लामी आक्रमण आणि पुढे एकोणिसाव्या शतकात भारतावर ब्रिटिशांनी व आग्नेय देशांवर डचांनी व फ्रेंचांनी राज्य प्रस्थापित केले. त्यामुळे या प्रांताशी भारताचा संपर्क तुटला अन् काही गोष्टी विस्मृतीत गेल्या.

 

अनेक भारतीय प्राचीन काळापासून आग्नेय देशांत गेले, तिथल्या लोकांत मिसळून त्यांच्यात एक होऊन राहिले. अनेक व्यापारी, क्षत्रिय, ब्राह्मण आणि बौध्द यांनी या देशात आपले नवीन घर मांडलेच, तसेच भारतीय देवदेवतांनीसुध्दा या प्रदेशात आपली मंदिरे मांडली. या नवीन प्रांताला आपलेसे करत भारतीयांनी आपला सांस्कृतिक ठेवा, भाषा, साहित्य आदी सर्व त्या लोकांत वाटले.

प्राचीन काळापासून भारतातून व्यापारी जहाजे या देशात जात असत. बंगाल, आंध्र व तामिळनाडूच्या बंदरांतून बंगालचा उपसागर ओलांडून आग्नेय देशांशी व्यापार चालत असे. भारतातून दगडांचे, मौल्यवान खडयांचे मणी निर्यात केले जात, तर त्या देशांमधून सोने, कथिल (tin), कापूर आदी गोष्टी आयात केल्या जात असत. इ.स.पूर्व पहिल्या-दुसऱ्या शतकापासून येथे गेलेल्या भारतीयांनी आपला ठसा तिथे उमटवला, त्यांच्यापैकी काही महत्त्वाच्या व्यक्तींचा येथे आढावा घेऊ. हा आढावा घेण्यासाठी आधार आहे या देशातील जुन्या शिलालेखांचा व चिनी बखरींचा.

 

इ.स.पूर्व पहिल्या शतकाच्या दरम्यान, कौंडिण्य नावाचा एक ब्राह्मण दक्षिण भारतात राहत होता. त्याने एकदा स्वप्नात पहिले की तो कम्बुजचा राजा होणार आहे. तेच स्वप्न उराशी धरून त्याने प्रवासाची तयारी केली आणि एका शुभ मुहूर्तावर जहाजाने पूर्वेच्या समुद्रातून निघाला. लवकरच तो कम्बोडियाच्या किनाऱ्यावर दाखल झाला. येथील निवासींना भारतीय 'नाग' म्हणत असत. बेटाबेटातून पाण्याच्या / समुद्राच्या जवळ राहणारे हे 'नाग' लोक होते. कौंडिण्य ज्या वेळी तिथे पोहोचला, त्या वेळी नाग लोक भरपूर दागदागिने परिधान करत असत. पण त्यांना वस्त्रांचा वापर माहीत नव्हता. कौंडिण्यने नाग राणीला भेट म्हणून वस्त्रे दिली. जहाजातून आलेल्या या भारतीयांच्या संपर्कात आल्यानंतर, येथील लोक वस्त्र तयार करण्यास व वापरण्यास शिकले. कौंडिण्यने येथील लोकांना भारतीय संस्कृतीचे धडे दिले. पुढे कौंडिण्यने त्या नाग राणीशी विवाह केला. या वेळी त्याने तिचे नाव, चंद्राची कन्या या अर्थाने 'सोमा' असे ठेवले. कौंडिण्य व सोमा यांचे वंशज म्हणजे पुढील काळातील कंबोडियाचे 'फुनान' राजे म्हणून प्रसिध्द झाले. हे राजे स्वत:ला 'सोमवंशीय' म्हणत असत. कौंडिण्य व सोमा यांची ही माहिती शिलालेखातून व चिनी वृत्तातून कळते. चिनी वृत्तात कौंडिण्यचे नाव Hun-Tian असे येते.

आणि एक वृत्तांत येतो कम्बू स्वयंभू नावाच्या राजाचा आणि मीरा नावाच्या अप्सरेचा. यांची कथा प्रचलित असली तरी ती ऐतिहासिक असण्याची शक्यता कमी असावी. या कथेनुसार, भगवान शंकराने मीरा नावाची अप्सरा कम्बू स्वयंभू राजाला दिली. तो या मीरेच्या प्रेमात पडला. त्यांचा विवाह झाला. दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते. दुर्दैवाने मीरा अप्सरेचा मृत्यू झाला. त्यावर हा शोकाकुल राजा राज्य करायचे सोडून वणवण फिरू लागला. या प्रवासात त्याला कोणी उपदेश केला की मीरेचा मृत्यू झाला असला, तरी प्रजेचे पालन करणे हे त्याचे राजा म्हणून आद्य कर्तव्य आहे. तेव्हा आपला शोक आवरून तो पुनश्च राज्य करू लागला. कंबू राजावरून या प्रांताचे नाव कम्बुज असे पडले. कम्बुजचे नाव नंतर कंबोडिया असे झाले. कंबोडियामधील सूर्यवंशी ख्मेर राजे आपला वंश कंबू-मीरापासून असल्याचे सांगत. फुनान आणि ख्मेर हे कंबोडियाचे सूर्यवंशी आणि चंद्रवंशी राजे!

चौथ्या शतकात आणखी एक कौंडिण्य होऊन गेला. तो इंद्रप्रस्थचा राजा आदित्यसेनचा मुलगा होता. इंद्रप्रस्थच्या - अर्थात दिल्लीच्या राजाने काही कारणाने राजकुमार कौंडिण्यला हद्दपार केले, तेव्हा तो राजकुमार जहाजाने कंबोडियाला आला. इथे त्याने एका नाग राजकन्येशी विवाह केला. त्या नाग कन्येच्या पित्याने याच्यावर 'कम्बुजाधिपती' ही पदवी बहाल केली! या कौंडिण्यने कम्बुजमध्ये मनुस्मृतीवर आधारित न्यायव्यवस्था स्थापन केली, भारतीय लिपी नेली आणि भारतीय देवता व त्यांची पूजा पध्दतीसुध्दा कम्बुजमध्ये रुजवली.

भारताच्या विविध भागांतून लोक कम्बोडियाला गेले होते असे दिसते. सातव्या शतकात दक्षिण भारतातील दुर्गस्वामी नावाचा एक यजुर्वेदी ब्राह्मण कम्बुजला गेला. याचा विवाह राजा ईशानवर्माच्या मुलीशी झाला. तसेच सातव्या शतकात चक्रस्वामी नावाचा मध्य देशातील शैव ब्राह्मण कम्बुजला गेला. त्याने राजा जयवर्मा (पहिला)ची कन्या शोभाजयाशी विवाह केला. तर दहाव्या शतकातील मथुरेच्या दिवाकरभट याचा विवाह राजकन्या इंद्रलक्ष्मीशी झाला होता. कित्येक व्यापारी कुटुंबेसुध्दा आग्नेय देशांत स्थायिक झाली.

 

अकराव्या शतकाच्या सुरवातीला सुमात्रामध्ये शैलेंद्र राजे राज्य करत होते. या राजांनी चोलांचा समुद्रातून कम्बुज व चीनशी (?) चालणाऱ्या व्यापारावर काही निर्बंध आणले असावेत. समुद्रावरील मालकीवरून दक्षिण भारतातील प्रसिध्द चोल राजांनी सुमात्रावर आक्रमण केले. शैलेंद्र राजांना पराभूत करून त्यांच्याकडून प्रचंड खंडणी/लूट गोळा केली. अकराव्या शतकाच्या उत्तरार्धात दोन्ही राज्यांमध्ये पुन्हा एकदा मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित झाले.

जवळजवळ 1500 वर्षे भारताचा या प्रांताशी संपर्क होता. व्यापारी, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक धाग्यांनी हे प्रांत बांधलेले होते. तेराव्या शतकात भारतावर इस्लामी आक्रमण झाले. याआधीपासूनच आग्नेयेकडील देशांमध्ये अरबी व्यापार वाढला होता व इस्लामचा प्रसार सुरू झाला होता. पुढे एकोणिसाव्या शतकात भारतावर ब्रिटिशांनी व आग्नेय देशांवर डचांनी व फ्रेंचांनी राज्य प्रस्थापित केले. या आक्रमणांच्या दरम्यान भारताचा या प्रांताशी संपर्क तुटला. हा प्रदेश, यांच्याशी चाललेला व्यापार, येथील राजे, नगरे, मंदिरे सर्व काही विस्मृतीत गेले.

 

या पुढील लेखांमधून एक एक स्मृती उलगडून पाहू ...

संदर्भ -

Studies In Sanskrit Inscriptions Of Ancient Cambodia - By Mahesh Kumar Sharan

Kaundinya, Preah Thaong, and the Nagi Soma: Some aspects of a Cambodian Legend - Rudiger Gaudes

The other India as seen from Ishanapura, Cambodia - Dr. Sachchidanand Saha

दीपाली पाटवदकर

9822455650