'कभी कभी' ही एका शायरची कथा आहे. अमित (अमिताभ) आणि पूजा (राखी) कॉलेजमध्ये शिकत असताना प्रेमात पडतात. घरच्यांना याची कल्पना नसते. आई-वडील विजयशी (शशी कपूर) तिचे लग्न ठरवतात. आईवडिलांचा अपमान होऊ नये, म्हणून प्रेमाचा बळी देऊन पूजा बोहल्यावर चढते. तिचा पतीही अमितच्या कवितेचा चाहता असतो. लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या पत्नीला अमितचे पुस्तक भेट देऊन त्यातलीच एक कविता गायचा आग्रह करतो.
वेदांमध्ये सोळा संस्कारांचे महत्त्व सांगितले आहे. त्यातील एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे लग्न. इतर धर्मांप्रमाणे हा करार नाही. यात केवळ दोन मनेच नाही, तर दोन कुटुंब एकत्र येतात. त्यामुळे विवाहाला केवळ सामाजिक संदर्भ नाही, तर भावनेला आणि श्रद्धेलाही वरचे स्थान आहे.
सहधर्माचरण, निष्ठा, संयम, सहनशीलता आणि कर्तव्यपालनाचे व्रत म्हणजे लग्न. लग्न ही आयुष्यभराची बेडी आहे हा साक्षात्कार अनेकांना होऊनही लग्न समारंभाची वर्णने ऐकली, पाहिली की लक्षात येते - वरवर कितीही नको म्हटले तरी लग्नाचा लाडू खायला सारेच उत्सुक असतात.
लग्न ठरले की बाकीची अनेक कामे आ वासून उभी राहिली, तरी भावी वर-वधूला स्वप्ने पडतात ती पहिल्या रात्रीची. फार पूर्वी, अंतरपाट दूर झाला की वधूचे दर्शन घडायचे. लग्नविधीच्या निमित्ताने होणारे स्पर्श पहिल्या रात्रीची धडधड आणखीनच वाढवायचे.
आता काही भेटीचे नावीन्य नाही, तरीही लग्नानंतरचा जो एकांत असतो, तो मात्र हक्काचा असतो. राजरोसपणे उपभोगण्याचा असतो. मंत्रोच्चाराबरोबर चार अक्षता डोक्यावर पडल्या की भेटीचा संदर्भ बदलतो. तो माणूस, निदान त्या क्षणाला तरी आयुष्यभराकरिता आपला होतो.
प्रपंचातल्या प्रेमाची ही अति-तलम लय पकडताना कवी ना.घ.देशपांडे म्हणतात,
निळ्या अंधारी रंगात, मुके चिंतन चंदेरी
होती चितारत रात.
होते हातात माझ्या या मृदू सावळे पिवळे
तुझे हळदीचे हात.
आतापर्यंत जीवनात येऊन गेलेल्या असंख्य रात्रीपेक्षा ही येणारी रात्र, तारुण्याचा उत्सव साजरा करणारी, नवीन ओळख घट्ट करणारी, समर्पणाचा अर्थ समजावणारी.
लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा भारतीय मनावर मोठा पगडा आहे, याला कारण चित्रपटांत रंगवलेली पहिली रात्र. सजवलेले शयनगृह, ते उजळून टाकणारा दिव्याचा मंद प्रकाश, प्रशस्त पलंगावर अंथरलेली पांढरी शुभ्र चादर, त्यावर लाल भडक गुलाबांच्या पाकळ्यांची पखरण, त्यावर हातभार घुंगट घेऊन बसलेली, बावरलेली नववधू, खोलीच्या बाहेर तिच्या मैत्रिणींची मिस्कील कुजबुज आणि आत प्रवेश करणारा, शेरवानीतील देखणा नायक. या सर्व घटकांनी पहिल्या रात्रीची लज्जत आणखी वाढवली आहे.
अशी पहिली रात्र 'कभी कभी' या चित्रपटातही आहे. फुलांनी सजलेली सेज, रात्रीच्या पहिल्या प्रहारातला मधुर, पिवळा चंद्र, गवाक्षातून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळझुळत्या स्पर्शाने थरथरणाऱ्या दिव्यांच्या ज्योती, दागिन्यांनी मढलेली, लाल भडक रंगाच्या पोशाखात खुललेली नववधू राखी आणि तिच्या सौंदर्याने वेडावलेला शशी कपूर.
तरीही एक वेगळेपण आहे या रात्रीत. नायिकेचे मन आश्वस्त नाही, पतीच्या सहवासातही तृप्त नाही. हरवून गेलेल्या प्रेमाची हुरहुर या रात्रीत आहे.
'कभी कभी' ही एका शायरची कथा आहे. अमित (अमिताभ) आणि पूजा (राखी) कॉलेजमध्ये शिकत असताना प्रेमात पडतात. घरच्यांना याची कल्पना नसते. आई-वडील विजयशी (शशी कपूर) तिचे लग्न ठरवतात. आईवडिलांचा अपमान होऊ नये, म्हणून प्रेमाचा बळी देऊन पूजा बोहल्यावर चढते. तिचा पतीही अमितच्या कवितेचा चाहता असतो. लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या पत्नीला अमितचे पुस्तक भेट देऊन त्यातलीच एक कविता गायचा आग्रह करतो.
कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है
के जैसे तुझको बनाया गया है मेरे लिये
तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं
तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिये
ह्या गीतातील भावना असतात अमितच्या. हे गीत त्याच्या प्रेयसीसाठी असते, पण तिच्यावर आता हक्क मात्र दुसऱ्या कुणाचा असतो. गाणे जरी लताबाईंच्या आवाजात आहे, तरीही “सुहाग रात है, घूँघट उठा रहा हूँ मैं” ह्या दोन ओळी मुकेशच्या आवाजात आहेत.
चित्रपटाच्या सुरुवातीला मात्र हे गीत फक्त मुकेशच्या आवाजात आहे. प्रियकराने प्रेयसीसाठी गायलेले गीत. गीतात भक्ती आहे, प्रीती आहे आणि प्रेमापोटी आलेला हक्कही आहे. तिच्या सुंदरतेचे कौतुक आणि अप्रूप या गीतात आहे.
कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है
के ये बदन, ये निगाहें मेरी अमानत हैं
ये गेसुओं की घनी छाँव है मेरी ख़ातिर
ये होंठ और ये बाहें मेरी अमानत हैं
बर्फाची थंड चादर बसलेले ते दोघे आपल्या संसाराची स्वप्ने रंगवतात खरी, पण निष्पर्ण वृक्षांची सावली कशी मिळणार! मनातले मनातच राहते आणि कोणा दुसऱ्याच्या शेजेवर हेच गीत म्हणणे तिच्या नशिबी येते.
पहिले प्रेम विसरायचा कितीही प्रयत्न केला, तरीही तो प्रयत्नच असतो. त्याला यश मिळण्यासाठी काळ जावा लागतो. कधीतरी तो प्रयत्न यशस्वी होतो किंवा अनेक वेळा हृदयाच्या खोल टप्प्यात त्याचे दफन केले जाते. अशा अनेक सुहाग रात्री, कधीकाळी केलेल्या प्रेमाचे स्मारक म्हणूनही उरतात. एका बाजूने आता जे नाते निर्माण झाले आहे, ते निभावायचा निर्धार आहे आणि दुसऱ्या बाजूने मनाला न जुमानता डोळ्यात साठणारे पाणीही आहे. मधुचंद्राच्या या रात्री मनाचा निश्चय मोडून डोळ्यासमोर येण्याचा प्रियकराचा चेहरा या गीताला आवाज देतो.
कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है
के जैसे बजती हैं शहनाइयां सी राहों में
सुहाग रात है, घूँघट उठा रहा हूँ मैं
सिमट रही है, तू शरमा के अपनी बाहों में
प्रेम असूनही वेगळ्या झालेल्या वाटा, आपापल्या जोडीदाराबरोबर समजुतीने केलेला संसार आणि ती तडजोड छान अंगवळणी पडलेली असताना नियती परत एकदा चाल खेळते. खूप वर्षांनी पूजा आणि अमित दूरदर्शनच्या कार्यक्रमासाठी एकत्र आल्यावर, पूजाच्या आग्रहामुळे अमित ही कविता गातो.
कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है
के जैसे तू मुझे चाहेगी उम्र भर यूँ ही
उठेगी मेरी तरफ़ प्यार की नज़र यूँ ही
मैं जानता हूँ , के तू ग़ैर है, मगर यूँ ही
कभी कभी मेरे दिल में...
हे गीत म्हणणारा तो, आता मात्र हळवा राहिलेला नाही. 'काश' हा छोटासाच शब्द कधीकधी आयुष्य बदलून टाकतो.
साहिर लुधियानवी यांच्या 'तल्खियाँ' या कवितासंग्रहातील ही कविता खय्याम यांच्या संगीताने अजरामर झाली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल व्यग्र असल्याने कभी कभी हा चित्रपट खय्याम यांना मिळाला. एका कवीची ही कथा असल्याने, उर्दू जाणणारा संगीतकार असावा हा साहिरजींचा आग्रह होता. खय्यामजी यांनी त्या संधीचे सोने केले. त्या वर्षी फिल्मफेअरचा उत्कृष्ट संगीतकाराचा, गीतकाराचा आणि गायकाचा पुरस्कार अनुक्रमे खय्यामजी, साहिरजी आणि मुकेश यांना मिळाला.