सामाजिक दायित्वाची राखी

विवेक मराठी    10-Aug-2019
Total Views |

एकविसाव्या शतकात देश प्रगती पथावर असताना आपले काही वनवासी बांधव अजूनही जीवन जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, हे आपले सामाजिक दायित्त्व आहे. काही संस्था यासाठी पुढाकार घेत आहेत. काही कारणास्तव आपण पूर्ण वेळ हे काम करु शकत नसलो तरी संस्थामार्फत त्यांच्यासाठी केलेल्या काही उपक्रमांना आपण भरभरुन प्रतिसाद देऊन सामाजिक भान जपले पाहिजे.


राखीबंधन हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. प्रत्येक प्रांतात या सणाची बोलीभाषेप्रमाणे वेगवेगळी नावे आणि पध्दती आहेत. प्रेमभाव व्यक्त करणे हा एकच भाव यातून प्रकट होत असतो. हा सण एकमेकांना जोडणारा आहे. राखीबंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह आणि परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली. हा सण सांस्कृतिक असला, तरी तिला सामाजिक, भावनिक नात्याची गुंफण आहे.

पूर्वी मध्ययुगात मुस्लीम राजवटीची अनेक आक्रमणे होत असत. अशा वेळी स्त्री असुरक्षित असे. आक्रमण झाले की, पहिले आक्रमण ज्या स्थळी केले जात, तेथील स्त्रियांना, लहान मुलींना पळवून घेऊन जात आणि त्यांच्यावर अत्याचार करत असत. त्या वेळी स्त्रियांचे रक्षण करणे हा सर्वात महत्त्वाचा विषय होता. त्यातूनच राखीबंधन या पवित्र सणाची प्रथा पडली.

आजच्या घडीला यातील कुठलीच परिस्थिती राहिलेली नाही. परंतु राखीबंधनाचा पवित्र व सामाजिक भान असलेला विषय आजही तेवढयाच उत्साहात पार पाडला जातो. या बाबतीतील आताचे आयाम थोडेफार बदलेले आहेत. आज स्त्री सक्षम झाली आहे. पुरुषाच्या बरोबरीने तिने सर्वच क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण केले आहे. घर, संसार, स्वतःच्या क्षेत्रातील जबाबदारी अशी तारेवरची कसरत करूनही ती न थकता आपले अस्तित्व अधिकाधिक बहरू पाहत आहे. भारतातील अशा अनेक सबल, सक्षम महिला भारताला गौरवशाली बनविण्याच्या दिशेने योगदान देत आहेत.

तिच्या या कार्यकर्तृत्वाला या बंधुभावाच्या सणाच्या निमित्ताने, तिचे असलेले हक्क, तिची होत असलेली प्रगती याची प्रशंसा करून तिला भावनिक पाठबळ देणारे असले पाहिजे. हा सण केवळ रक्ताच्या नात्यापुरता सीमित न राहता मनापासून आपण ज्याच्याप्रती हा भाव व्यक्त करू शकतो, अशा सर्वांनी हा आनंदाने साजरा करण्याचा सण आहे. हा सण कौटुंबिकच नाही, तर समाजातही बंधुभावाचे नाते निर्माण करणारा आहे.

हे सामाजिक भाव जपण्याचे कार्य भालिवली येथील 'विवेक रूरल डेव्हलपमेंट'च्या माध्यमातून केले जाते. तेथील वनवासी व आदिवासी महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना बांबूपासून राखी बनविण्याचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. ही संस्था 'शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, पर्यावरण संरक्षण व संवर्धन' या त्रिसूत्रीवर आधारित आहे. पालघर जिल्ह्यातील वनवासी बांधवांचा सर्वांगीण विकास हे संस्थेचे ध्येय आहे.

वनवासी बांधवाचे अर्थार्जनाचे एकमेव साधन म्हणजे शेती. त्यानंतरचा अर्थर्जनाचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा असतो. या बांधवांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्यामुळेच अंधश्रध्देचे वाढते प्रमाण आणि व्यसनाधीनता याचे प्रमाण सर्वाधिक दिसून येते. अशा वेळी घराची सर्व जबाबदारी आपसूकच घरातील महिलेवर येते. शिक्षण नाही, व्यवहारज्ञान शून्य, प्रवास करणे माहीत नाही, अशा वेळी अर्थार्जनाचा पर्याय उरतच नाही. परंतु त्यांच्याकडे जमेची बाजू असते ती त्यांचे पारंपरिक कौशल्य. आतापर्यंत हे पारंपरिक कौशल्य असून त्याला व्यासपीठ नव्हते. परंतु 'विवेक रूरल डेव्हलपमेंट' संस्थेमार्फत या वनवासी महिलांना त्यांचे पारंपरिक कौशल्य ओळखून प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीची सुवर्णसंधी दिली. त्यातीलच एक यशस्वी झालेला उपक्रम म्हणजे 'राखी निर्मिती' होय.

विवेक रूरल डेव्हलपमेंटच्या प्रशिक्षण विकास अधिकारी प्रगती भोईर या राखी उपक्रमाबद्दल माहिती देताना म्हणाल्या की, ''या प्रशिक्षणासाठी आम्ही जवळपासच्या गावात सर्वेक्षण करतो, त्यांच्याकडून अर्ज भरून घेतो आणि अत्यंत गरजू अशा महिलांना या कौशल्य प्रशिक्षणात सहभागी करून घेतो. तसेच अनेक वनवासी मुलींना पुढील शिक्षण घेण्याची उमेद असते. परंतु घरची परिस्थिती बिकट असल्याने पैशाअभावी पुढील शिक्षणासाठी अडथळे येतात. अशा मुलींनादेखील हे प्रशिक्षण देऊन त्यांना अर्थार्जनाची संधी उपलब्ध होते व त्या आता पुढील शिक्षण घेत आहेत'' असा आनंद प्रगती भोईर बोलताना व्यक्त करत होत्या.

गेल्या चार-पाच वर्षांपासून हा उपक्रम चालू झाला आहे आणि त्याला चांगले यश प्राप्त होत आहे. आज बाजारात चिनी बनावटीच्या अनेक राख्या उपलब्ध आहेत. परंतु आपल्याच वनवासी भगिनींनी बनविलेल्या या राख्या पर्यावरणपूरक तर आहेतच, त्याचबरोबर या राख्यांची कलाकुसर मनमोहक आहे. आपले भारतीय पारंपरिक कौशल्य किती उच्च दर्जाचे आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पालघर जिल्ह्यातील आपल्या वनवासी भगिनींनी बांबूपासून बनविलेल्या उत्कृष्ट कलाकुसर असलेल्या या राख्या. मुंबईतील 'सृजना' या संस्थेने या उत्तम आणि दर्जेदार राख्यांचा गौरव केला आहे. तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनीही या वनवासी भगिनींनी तयार केलेल्या राख्यांबद्दल प्रशंसोद्गार म्हणून एक व्हिडिओ प्रतिक्रिया दिली आहे. यातून आपल्या वनवासी भगिनींना प्रोत्साहन आणि काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे.

या वनवासी भगिनींनी बनविलेल्या राख्यांची आपण आणि आपल्या माध्यमातून अनेक जणांनी खरेदी करून, राखीबंधनाचा (सामाजिक बंधुभावनेचा) सांस्कृतिक-सामाजिक सण खऱ्या अर्थाने साजरा करू या. वनवासी भगिनींच्या कार्यकर्तृत्वाला, त्यांच्या जगण्याच्या संघर्षाला राखी खरेदी करून आपली छोटीशी साथ देऊ या. आपले सामाजिक दायित्व समजून, या वनवासी भगिनींकडून राखी खरेदी करून खरे तर या सणाचे सामाजिक बंध अधिक घट्ट करण्याची संधी आपल्याला मिळत आहे आणि अशा प्रकारे हा सण साजरा करून या सणाची गोडी अधिक द्विगुणित करू या.

राख्यांची विविधता

गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती व कावेरी अशा पाच प्रकारच्या राख्या वनवासी भगिनींनी तयार केल्या आहेत. राख्या जशा बांबूपासून बनविल्या आहेत, तसेच राखी अधिक आकर्षक करण्यासाठीही नैसर्गिक रंगांचाच वापर केला आहे.


 

संपर्क - प्रगती भोईर - 7798711333