नेहमीच तर सूर्य उगवतो. डोक्यावर येतो. अंगाची लाहीलाही होते. जीव घाबरा होतो. मन कोमेजते. मग हळूहळू पृथ्वीच्या सहनशीलतेची परीक्षा बघून महाशय पश्चिमेकडे कलतात. आभाळाचा रखरखीत पांढुरका रंग आता निळा होतो. त्या निळेपणाने डोळे निवतात. सगळया रखरखीत कोरडेपणावर, शुष्कतेवर मात करण्याचे सामर्थ्य त्यात नक्कीच असते.
त्या निळया गर्द कॅनव्हासवर, स्वतःच्या अस्तित्वाच्या सोनेरी, नारिंगी खुणा ठेवून सूर्यनारायण निरोप घेतात. सावल्या लांबतात. रिकाम्या झालेल्या आकाशात पक्ष्यांचे थवे घराची वाट धरतात. आसमंतात गारवा जाणवू लागतो. अंधाराने गिळून टाकलेल्या आकाशाच्या पटलावर एक छोटीशी चांदणी लुकलुकते आणि तिच्या हाकेला ओ देत सारे आभाळच चांदण्यांनी भरून जाते. सुरेल मैफल जमून यावी तशी एखादी संध्याकाळ जमून येते.
वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है
वो कल भी पास-पास थी, वो आज भी करीब है
कोणत्यातरी आघाताने आपले मानसिक संतुलन हरवून बसलेले रुग्ण आणि त्यांना आपल्या सेवेने, प्रेमाने माणसात आणणारी नर्स यांची आगळीवेगळी कहाणी 'खामोशी'. ही कहाणी आहे देव (धर्मेंद्र), राधा (वहिदा) आणि अरुण (राजेश खन्ना) यांची. प्रेमभंग झाल्याने देव नैराश्यात बुडून जातो. त्याला रुग्णालयात भरती केले जाते. आपल्या प्रेमाने, मायेने राधा त्याला माणसात यायला मदत करते. तिच्या प्रयत्नाला यश येते आणि देव बरा होऊन आपल्या घरी परत जातो. इलाज करताना, रुग्णात मानसिकरीत्या न गुंतणे हे गृहीत धरलेले असते. तरीही मनावर नियंत्रण ठेवणे कधीतरी उपचार करणाऱ्यासाठीसुध्दा कठीण असते. स्वतःला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी राधा नकळत देववर प्रेम करायला लागते. देवसाठी मात्र हे नाते कृतज्ञतेचे. त्याच्या हृदयावर कोणा दुसरीचा हक्क आहे.
मनावर दगड ठेवून राधा देवपासून स्वतःला दूर करते. पहिले प्रेम यशस्वी होणे हातात नसते, पण ते विसरणेही शक्य नसते. पहिल्या प्रेमाची अनुभूती निरागस, सच्ची असते. आयुष्यात प्रथमच स्वतःचा अहं, स्वतःची भीती बाजूला ठेवून दुसऱ्यावर विश्वास टाकला जातो. त्यात अपेक्षा नसतात. अनेक वेळा तर प्रेमात पडतोय ही जाणीवसुध्दा पूर्णतः गुंतून गेल्यावर होते.
पहिल्या प्रेमात समर्पणाचा अर्थ समजतो आणि जाणवतो. त्यामुळे ते यशस्वी झाले नाही, तर त्याच्या जखमा दीर्घकाळ राहतात.
देव गेल्यानंतर अरुण त्याची जागा घेतो. हासुध्दा मानसिक रुग्ण. एक संवेदनाशील लेखक. प्रेयसीने दगाबाजी केल्याने स्वतःला हरवून बसला आहे. देवची केस यशस्वीरीत्या सोडवल्यामुळे अरुणला बरे करण्याची जबाबदारी राधा वर येते. तिच्या सहवासात अरुण हळूहळू स्वतःचे दुःख विसरू लागतो. भूतकाळाच्या कडवट आठवणी पुसट होऊ लागतात. पहिल्या प्रेमात दुखावल्या गेलेल्या ह्या दोन व्यक्ती एकत्र येतात. एकमेकांचा सहवास मनाला सुखावत असतानासुध्दा कडवट भूतकाळाची सावली दोघांच्याही मनात आहेच.
झुकी हुई निगाह में कहीं मेरा खयाल था
दबी-दबी हँसी में इक हसीन सा गुलाल था
मैं सोचता था मेरा नाम गुनगुना रही है वो
न जाने क्यों लगा मुझे, के मुस्कुरा रही है वो
वो शाम कुछ अजीब थी हे गाणे हेमंत कुमार यांनी यमन या रागात बांधले आहे. यमन रागाचा रस शांतरस आहे. हा शांतरस भक्ती, शृंगार आणि यातून मिळणाऱ्या आनंदाचे रूप आहे. संसारात आणि मित्रपरिवारात रमलेल्या सुखी, तृप्त गृहस्थाचे रूप म्हणजे यमन.
गुलझार लिखित या गीताचा मूडही आशा जागवणारा आहे. गाण्याची सुरुवात होते लाटांच्या लहरींच्या आवाजाने. पंचम स्वराच्या नोटवर गाणे सुरू होते. वरचा स्वर, उसळणाऱ्या लाटा आणि नायकाच्या मनातली खळबळ.. गाणे जुळून येते ते असे. राधेबरोबर संध्याकाळ घालवतानाच अरुणच्या मनात पहिली प्रेयसी आहे. अशाच एका सायंकाळी ती दोघेही एकत्र होती. तिची नजर लज्जेने खाली झुकलेली, पण त्यात त्याचेच प्रतिबिंब होते. ओठावरच्या मंद, लाजऱ्या हास्यात तिने त्याचे नाव गुंफले होते. निदान त्याची ही समजूत होती, पण ते काहीही खरे नव्हते, तिचे प्रेम, तिची जवळीक हा एक भ्रम होता. आतासुध्दा असेच घडेल का? अरुण संभ्रमात आहे.
संध्याकाळच्या सूर्याला मात्र त्या घालमेलीची जाणीवही नाही. तो चालला आहे मावळतीला आलिंगन द्यायला. त्याच जागेवर बसली आहेत ती दोघे, आपापला भूतकाळ मागे टाकून, संध्याकाळच्या सूर्याच्या साक्षीने स्वतःचा वर्तमान रंगीत करायची परत एकदा आस घेऊन. संध्याकाळ ही वेळ फार फार सुंदर असते. त्यात उल्हास असतो, आनंद असतो, हुरहुर असते आणि रात्रीची ओढही असते. या सगळया भावना मनात दाटून आलेल्या असतात. राधेच्या सहवासात जगण्याची स्वप्ने बघू लागलेला अरुण मनातल्या आशेला शब्दांचे रूप देऊन म्हणतो,
मेरा खयाल है अभी झुकी हुई निगाह में
खिली हुई हँसी भी है, दबी हुई सी चाह में
मैं जानता हूँ मेरा नाम गुनगुना रही है वो
यही खयाल है मुझे, के साथ आ रही है वो
तिची झुकलेली नजर आणि ओठात दडलेले हसू... पण ते खरेच त्याच्यासाठी आहे की त्यात कोणा दुसऱ्याच्याच आठवणी दडल्या आहेत? नदीच्या पाण्याचा शिडकावा राधाला भूतकाळात घेऊन जातो. असाच पाण्याचा शिडकावा देवकडून झालेला असतो. पण त्यात प्रेम नसते. त्याला मिठीत घेऊन ती त्याचा राग ओठांनी शांत करते, ही आठवण आणि आता तिच्याभोवती पडलेली अरुणची मिठी, त्यातील प्रेम यात खरे काय असेल, काय चिरंतर टिकेल या संभ्रमात तीसुध्दा आहेच. अभिनय, जो तिच्याकडून अपेक्षित आहे, तो करणे तिची प्रवृत्ती नाही. जे करणे तिला आवडत नाही, त्याचा ताण तिच्या मनावर आहे. आपण तुटत चाललो आहोत याची तिला जाणीव आहे. तिचे कर्तव्य मात्र तिला यातून बाहेर पडण्याची परवानगी देत नाही.
देवने तिच्यापासून लांब जाणे तिच्या भावनांनासुध्दा गोठून टाकते.
स्वतःवर लादून घेतलेली ही खामोशीच तिच्या परवडीचे कारण होणार आहे. सगळे पोटात दडवून ठेवणारी ही सायंकाळ खरेच अजीब आहे.
एक वर्ष आधी आलेल्या आराधना चित्रपटातील 'मेरे सपनों की रानी' या गीताने किशोर कुमारला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. हलकीफुलकी गीते गाणारा हा गायक 'वो शाम कुछ अजीब थी' या गीताला न्याय देऊ शकेल का? ही शंका सर्वांच्या मनात होती. हेमंत कुमार यांनी मात्र किशोरच्या आवाजाचा आग्राह धरला. एक कारकिर्द परिपूर्णतेकडे न्यायला हा निर्णय सार्थकी ठरला, असे नक्कीच म्हणावे लागेल.