'झिरो गार्बेज' विलेपार्ले

विवेक मराठी    05-Jun-2019
Total Views |

 

'स्वच्छ पार्ले अभियान' या चळवळीतून शून्य कचरा, कचऱ्याचे वर्गीकरण, कंपोस्ट खतनिर्मिती आणि शहरी शेती हे पार्ल्यात झालेले पर्यावरणपूरक सकारात्मक बदल अनुकरणीय आहेत. स्वच्छ पार्ले अभियानांअंतर्गत चाललेल्या उपक्रमांमार्फत पार्ल्यात एका स्वच्छ, सुंदर, आणि हरित पर्वाची नांदी होत आहे.

मनुष्याचा मेंदू प्रगत असल्यामुळे तो पृथ्वीवरील सर्वात बुध्दिमान प्राणी ठरला आहे. त्याच्याकडे विचार करण्याची ताकद आणि अफाट कल्पनाशक्ती आहे. त्याचा जोरावर त्याने अनेक शोध लावून त्या माध्यमातून प्रगती केलेली आहे. ही प्रगती करत असताना तो एक गोष्ट विसरला की, ज्याच्या साहाय्याने तो प्रगती करत आहे, त्या निसर्गाचा, त्यातील स्रोतांचा तो गैरवापर करत आहे - किंबहुना त्याला हानी पोहोचवीत आहे. निसर्ग जसे आपल्याला भरभरून देतो, तसेच आपण केलेल्या वाईट कृतीची परतफेड एक दिवस आपल्यालाच भोगावी लागणार, हे मात्र माणूस सोयीस्कररीत्या विसरून गेला. आपल्या वाईट कृतीमुळे निसर्गाने प्रदूषण, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती यासारखी घातक फळे आपल्याला दिली.

 आपल्या कृतीमुळेच आपल्याला दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे याची आपल्याला गेल्या काही वर्षांत प्रकर्षाने जाणीव व्हायला लागली आहे आणि त्या जाणिवेतूनच निसर्गाचे रक्षण, संवर्धन, व्यवस्थापन यासारख्या निसर्गाला अनुकूल आणि पूरक अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न सुरू व्हायला लागला.

पाश्चात्त्य देशांचे अनुकरण करता 'यूज ऍंड थ्रो' ही संकल्पना गेल्या काही वर्षांत वाढू लागली होती. याचा दुष्परिणाम म्हणजे कचऱ्याचे भयावह डोंगर. 2016मध्ये देवनार डम्प यार्डला लागलेल्या आगीमुळे अर्धी मुंबई वेठीस धरली गेली होती. कचऱ्यात निर्माण झालेल्या मिथेन आणि अन्य विषारी वायूंमुळे ही आग लागली होती. कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी आणि प्रदूषण याचे साम्राज्य वाढले होते. हे सर्व रोखण्यासाठी काही ठोस पावले उचलण्याची गरज होती.

पर्यावरणाचा हा वाढता ऱ्हास रोखण्यासाठी स्वतःहोऊन काहीतरी करण्याची गरज आहे. वाढती लोकसंख्या पाहता केवळ शासन किंवा प्रशासन यांना हे शक्य नाही. त्यासाठी मुंबईत पार्ल्यातील सुजाण नागरिकांनी 'स्वच्छ पार्ले अभियान' ही संकल्पना हाती घेतली. केंद्र सरकारनेही स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना राबविली, तिला भारतीयांचा प्रतिसादही चांगला मिळाला. स्वच्छ अभियानाचे पुढचे पाऊल म्हणजे त्याचे व्यवस्थापन.

पर्यावरण व्यवस्थापन ही मानव आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधणारी प्रक्रिया आहे. ही संकल्पना नियोजन संदर्भातील आहे. याच संकल्पनेचा आधार घेऊन पार्लेकरांनी स्वच्छ पार्ले अभियानांतर्गत शून्य कचरा (झिरो गार्बेज) ही चळवळ सुरू केलीआहे.

सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर आणि ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती होऊ शकते. त्यासाठी पार्लेकरांनी सोसायटयांमधून कचऱ्याचे वर्गीकरण करायला सुरुवात केली. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचे काम त्यांनी 'स्त्रीमुक्ती संघटने'कडे सोपविले आहे. त्याचबरोबरीने सोसायटीतील कचरा वेचक महिलांचाही या कामात सहभाग आहे. अशा रितीने कचऱ्याचे वर्गीकरण आणि त्याचा पुनर्वापर करून विलेपार्ले हे 'शून्य कचरा' मोहिमेतील आदर्श ठिकाण बनविण्याचा प्रयत्न करण्याचा मानस आहे.

 झिरो गार्बेज संकल्पनेतून फुललेली शेती

 सार्वजनिक स्वरूपात या कामाची सुरुवात होण्याअगोदर पार्ल्यातील सतीश कोळवणकर यांनी वैयक्तिकरीत्या व त्यांच्या देवांगिनी सोसायटीपुरता हा यशस्वी प्रयोग केला होता. अशा प्रकारे कचऱ्याचे योग्य रितीने वर्गीकरण केले तर डम्पिंगचा प्रश्न सुटू शकतो, हा विश्वास त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना वाटू लागला.

सोशल मीडिया हे प्रभावी साधन आहे. त्यांची ही माहिती व्हॉट्स ऍप ग्रूपद्वारे पूर्ण विलेपार्ले परिसरात पसरली. तेव्हा पार्ले पूर्व येथील सोसायटयांनी नववर्षापासून 'शून्य कचरा' मोहीम राबवून पार्ले स्वच्छ अभियानाला मोलाची भर दिली. यासाठी त्यांनी कचरा व्यवस्थापनातील तज्ज्ञ, घनकचरा व्यवस्थापनातील अभ्यासक व स्त्रीमुक्ती संघटना यांची मदत घेतली. तसेच 'लोकमान्य सेवा संघा'मध्ये ई-वेस्ट संकलित करण्यासाठी एक केंद्र उभारण्यात आले आहे.

सोसायटयांमध्ये कचरा वर्गीकरण सुरू झाल्यानंतर प्रत्येक सोसायटीच्या आवारात एक गुणफलक लावला गेला. त्यावर गोळा केलेल्या कचऱ्यामुळे पर्यावरणाचे रक्षण कसे झाले, ऊर्जेची किती बचत झाली, खतनिर्मिती किती झाली याची संपूर्ण आकडेवारी दिली जाते. या गुणफलकाद्वारे प्रयोग राबविताना झालेल्या काही चुका लक्षात येऊन त्या सुधारण्यात मदत होऊ शकते.

 पार्लेकरांच्या या स्तुत्य उपक्रमाला तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठिंबा आणि सहकार्य केले आहे. आमदार पराग आळवणी यांनी आमदार निधीतून सोसायटयांमध्ये कचरा कुंडयांचे वाटप केले. तीन वेगवेगळया रंगांच्या कुंडयांमधून स्वच्छ प्लास्टिक, स्वच्छ कागद व ई-वेस्ट कचरा संकलित केला जातो. स्त्री-मुक्ती संघटनेमार्फत गोळा झालेला कचरा शास्त्रशुध्द पध्दतीने रिसायकल किंवा नष्ट केला जात आहे. कचरा संकलनातून कचरा वेचक महिला आणि स्त्रीमुक्ती संघटना यांना आर्थिक लाभदेखील होत आहे.

 आजच्या घडीला 150 ते 200 सोसायटयांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण, तर 40 सोसायटयांमध्ये कंपोस्ट खतनिर्मितीचे काम सुरू आहे. कचरा वर्गीकरणानंतरची पुढची पायरी म्हणजे कंपोस्टिंग करणे. यात सोसायटयांमध्ये थोडे औदासीन्य, गैरसमज आणि जागेचा अभाव या गोष्टींचा अडसर येतो. या मोहिमेमार्फत जास्तीत जास्त जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहेच. लोकांमध्ये उत्साह आणि जागृती वाढावी, म्हणून गेल्या वर्षी पार्ले महोत्सवात कचऱ्याचे वर्गीकरण आणि कंपोस्टिंग याबाबत स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत 42 स्पर्धकांनी भाग घेतला. यातून आपण केलेल्या कामाची दखल घेतली जात आहे, हा सुखद अनुभव मिळाला.

स्वच्छ पार्ले अभियानाने केवळ स्वच्छतेची मोहीम हाती घेतली नाही, तर कचऱ्याचे व्यवस्थापनही (वर्गीकरण आणि कंपोस्ट खतनिर्मिती) केले. कंपोस्ट तयार झाल्यानंतर या कंपोस्टचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा अनेक पर्यावरणप्रेमी आणि हौशी लोकांच्या माध्यमातून 'शहरी शेती'चा पर्याय पुढे आला. त्याआधी काही जण आपआपल्या घरातील कुंडयातील फुलझाडांसाठी कंपोस्टचा वापर करून आपला छोटी बाग फुलवीत होतेच.

मराठी विज्ञान परिषदेचे दिलीप हेर्लेकर यांनी शहरी शेतीसाठी लागणारी अभ्यासपूर्ण माहिती दिली. एक ते दोन दिवसाचे शिबिर घेऊन तुटपुंजी माहिती न देता ठरावीक कालावधीचा एक प्रशिक्षण वर्ग घ्यावा, असे सर्वानुमते ठरले. आणि प्रथमच विलेपार्ले येथे 'शहरी शेती'चा सहा महिन्यांचा पहिला वर्ग घेण्यात आला. यामध्ये 42 विद्यार्थी सहभागी झाले होते. या प्रशिक्षण वर्गात वयोमर्यादेची अट नव्हती.


 

''या प्रशिक्षण वर्गात गच्चीवर वाफे तयार करण्यापासून ते झाडाचा संपूर्ण कालावधी याचे शिक्षण देण्यात आले. पुस्तकी ज्ञानाऐवजी प्रात्यक्षिकावर भर देण्यात आला होता. कुठल्या ऋतूत कुठली झाडे, त्यांना किती सूर्यप्रकाश, किती पाणी लागणार, असे अभ्यासपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षण वर्गाची सांगता व्हायच्या आधीच अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या गच्चीवर शेतीची सुरुवात केली होती. आता शहरी शेतीचा शास्त्रशुध्द अभ्यास करून अनेक सोसायटयांनी आपल्या इमारतीच्या गच्च्यांवर आपली छोटीशी शेती तयार केली आहे,'' असे स्वच्छ पार्ले अभियानाचे सदस्य राजन मोगरे आणि अनिल खांडेकर अभिमानाने सांगत होते.

शून्य कचरा, कचऱ्याचे वर्गीकरण, कंपोस्ट खतनिर्मिती आणि शहरी शेती हे पार्ल्यात झालेले पर्यावरणपूरक सकारात्मक बदल अनुकरणीय आहेत. त्यासाठी ज्या व्यक्तींना किंवा सोसायटयांना या पर्यावरणाच्या वाटेवर पाऊल ठेवायचे आहे, त्यांना पार्लेकर आपला हात पुढे सरसावून आपल्या बरोबरीने घेऊन पुढे वाटचाल करीत आहेत. अनेक ठिकाणी स्वच्छ पार्ले अभियानातील सदस्य या मोहिमेची माहिती देत आहेत. शहरी शेतीच्या प्रशिक्षण वर्गात केवळ पार्ल्यातील नागरिकच नाही, तर अनेक ठिकाणांहून प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थीआले होते.

स्वच्छ पार्ले अभियानांअंतर्गत चाललेल्या उपक्रमांमार्फत पार्ल्यात एका स्वच्छ, सुंदर, आणि हरित पर्वाची नांदी होत आहे. भाज्यांवर आणि फळांवर रासायनिक द्रव्यांचा भडिमार होत असलेल्या आजच्या स्थितीत शहरात राहूनही आपण नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या भाज्यांचा आणि फळांचा आस्वाद यामुळे घेऊ शकतो.


 

या पर्यावरणपूरक संकल्पनेला बळकट व सर्वव्यापी करायचे असेल तर या चळवळीविषयी जागृती आणि प्रसार सर्वदूर व्हायला पाहिजे. प्रत्येकाने आपआपल्या परीने आपला परिसर पर्यावरणपूरक होण्याच्या दिशेने पावले टाकायला हवीत. निसर्गाचा आदर करून, त्याचे संवर्धन करून आपल्या येणाऱ्या पिढीला हा वारसा देण्याची गरज आहे. निसर्गाने आपल्याला दिलेले पुन्हा निसर्गाला देऊन, निसर्गाचे ऋण फेडण्याची संधी आपण गमावता कामा नये. निसर्गाला आपण दिलेले, निसर्ग आपल्यालाच भरभरून देणार आहे. हे एक निसर्गचक्र आहे, हे विसरता कामा नये.

'शून्य कचरा' मोहिमेचे फायदे

* रोगराई आणि दुर्गंधीपासून सुटका

* रस्ते आणि परिसर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत

* अनेक महिलांना रोजगार

* परिसर फुलझाडांनी फुलला

* स्वतः पिकविलेल्या भाज्यांचा आणि फळांचा आस्वाद

* 'झिरो गार्बेज'मुळे मुलांना सायन्स प्रोजेक्टसाठी व्यासपीठ

 -9594961859