मोदी विजय आणि अमेरिकन माध्यमे

विवेक मराठी    04-Jun-2019
Total Views |

 निवडणुकीच्या आधी आणि निकालानंतर अमेरिकेतील माध्यमांनी विविध पध्दतीने भारताची दखल घेतली आहे. त्यातील निवडणूक पध्दती आणि मोदींच्या अर्थकारणावरील काही सकारात्मक लेख सोडल्यास इतर सर्व विषयांवरील लेख हे पूर्ण एकांगी वाटावे असेच होते. म्हणून काळाची गरज ओळखता भारताला, जगाला भारतीय बाजू सांगणारे विचारवंत, विद्वानांची गरज लागेल.

Each work has to pass through these stages-ridicule, opposition, and then acceptance. Each man who thinks ahead of his time is sure to be misunderstood.

- स्वामी विवेकानंदांनी खेत्रीच्या महाराजांना लिहिलेल्या पत्रातून.

 अमेरिकेमध्ये गेल्या शतकातील नव्वदच्या दशकापर्यंत असा काळ होता की भारताबद्दल फार कमी वेळा दखलपात्र म्हणता येतील अशा बातम्या वाचनात येत असत. ज्या काही बातम्या दिसत त्यात रस्त्यावर फिरणारी जनावरे, गरिबी, अस्वच्छता, जातिभेद असे मर्यादित विषय सहजतेने असायचे. थोडक्यात, वर स्वामीजींच्या शब्दात सांगायचे झाले, तर तत्कालीन परिस्थितीमुळे सर्व भारत आणि हिंदू तत्त्वज्ञान हे ridicule करण्यावर भर असायचा. राजकारणाचा विचार केला तर ते अधिक करून गांधी-नेहरू विषयांशी घुटमळत असायचे.

मात्र साधारण विसाव्या शतकाच्या शेवटापासून हा प्रकार बदलू लागला. काही अंशी, याचे कारण हे भारतात बदलणारी परिस्थिती होती, तसेच त्यात अमेरिकेत अत्यंत कमी लोकसंख्या असूनही भारतीय समाजाने टाकलेल्या सर्वक्षेत्रीय प्रभावामुळेदेखील ते बदलू लागले. अपवाद होता आणि अजूनही आहे तो राजकारणाचा... त्यातदेखील ज्याला उजवे असे संबोधिले जाते, त्या राजकारणाचा. अमेरिकन माध्यमे गेल्या 10-15 वर्षांत तर भारत, भारतीय समाज, हिंदू धर्म आदी विविध विषयांची दखल घेताना दिसू लागली आहेत. ती दखल कधीकधी बातम्यातून असते, पण बऱ्याचदा बातमी कमी आणि बातमीचे कथन (narrative) अधिक, तसेच विविध लेख यांच्या रूपात दिसून येते. अजूनही लेखणी आदी माध्यमांद्वारे विरोधच होत असतो.

निवडणुकीच्या आधी आणि निकालानंतर इथल्या माध्यमांनी विविध पध्दतीने भारताची दखल घेतली आहे. त्याचे विस्तृत वर्गीकरण करायचे झाले, तर राजकीय, आर्थिक, सामजिक, धार्मिक आणि केवळ निवडणूक पध्दती अशा विषयांमध्ये करता येईल. त्यातील निवडणूक पध्दती आणि मोदींच्या अर्थकारणावरील काही सकारात्मक लेख सोडल्यास इतर सर्व विषयांवरील लेख हे पूर्ण एकांगी वाटावे असेच होते. भारतीय निवडणूक पध्दती संदर्भात कदाचित तमाम जगालाच आश्चर्य वाटत असेल आणि अमेरिका त्याला अपवाद नाही. संपूर्ण अमेरिका अधिक पश्चिम युरोपाची लोकसंख्या इतके  मतदार असलेला भारत हा एकमेव देश आहे. हत्ती, उंट आदींच्या वापरापासून ते आधुनिक वहाने, विमान, हेलीकॉप्टर आदींचा वापर करत निवडणूक यंत्रणा कशी सर्वांपर्यंत पोहोचते आणि तिथपासून ते मतमोजणीपर्यंत ज्या व्यवस्थित पध्दतीने कामे पार पडतात, ते पाहिल्यास अमेरिकन यंत्रणा भारतीय निवडणूक यंत्रणेपुढे फिकी ठरते. त्यामुळे अमेरिकन माध्यमांना आश्चर्य वाटल्यास नवल नाही. मोदी आल्यापासून काही सामजिक स्तरावरील समाजोपयोगी निर्णय सोडल्यास अर्थाव्यवस्था ही मुक्त अर्थाव्यवस्थेसारखी चालू आहे. ते नक्कीच आवडणारा विचारवंत वर्ग येथे आहे. म्हणूनच Modi Cut India's Red Tape. Now He Hopes to Win Votes for His Work, New York Times, Modi Is India's Best Hope for Economic Reform, Time Magazine, आदी लेख विविध माध्यमांमध्ये आले होते. 

पण अशा सकारत्मक लेखांपेक्षा नकारात्मक आणि पाया नसलेली टीका करणारे लेख हे लोकांचे अधिक लक्ष वेधून घेत होते.  उदाहरणादाखल निवडणुकीपूर्व : Under Modi, a Hindu Nationalist Surge has Further Divided India; New York Times, Hindu Nationalism, the Growing Trend in India, National Public Radio;  Can the World's Largest Democracy Endure šnother 5 years of a Modi Government?, Time Magazine, असे लेख आले होते. तर निवडणुकीनंतर: India's Modi has been a bellwether for global populism, Washington Post, India's dangerous landslide, Washington Post, Modi's Re-Election Means More Scrutiny for U.S. Tech Giants, The Wall Street Journal, Narendra Modi's Massive Mandate, The Wall Street Journal, आणि आणखी बरेच काही! 

बहुतेककरून अमेरिकेतील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये तसेच इतर माध्यमांमध्ये अनेक बातम्या आल्या, विश्लेषणे आली. त्यातील दोन विशेषतः भारतीयांमध्ये बहुचर्चित झालेली म्हणजे टाइम साप्ताहिकात आलेले मुखपृष्ठ व Divider in Chief मथळा असलेले आतिश तासीर यांचा लेख आणि हसन मिन्हाज या नेटफ्लिक्स वरील विनोदी वक्त्याच्या Patriot Act कार्यक्रमात Indian Elections हा एपिसोड. 

टाइममधील लेख आत्यंतिक नकारात्मक आणि दिशाभूल करणारा होता. 2014 साली मोदींनी जनतेला आशा लावल्या, त्या लावत असताना हिंदू-मुस्लीम फूट पाडली, पण या वेळेस काही आशा उरल्या नाहीत या गृहीतकावर हा लेख लिहिला गेला होता.  मात्र निवडणुकीनंतर याच टाइम साप्ताहिकाने Modi Has United India Like No Prime Minister in Decades हा मोदींचे समर्थक असलेल्या मनोज लडवा यांचा लेखही प्रसिध्द केला होता.

हसन मिन्हाजच्या Indian Elections ह्या एपिसोडमधील अनिवासी भारतीयांच्या दृष्टीने कथित भीतीमुळे, तसेच मोदींच्या भाषणातून त्यांच्या काटछाट चित्रफिती दाखवून केलेली कुत्सित थट्टा, ही टवाळा आवडे विनोद या उक्तीला शोभेशी होती. त्या व्यतिरिक्त संघ आणि श्रीगुरुजी गोळवलकर यांचे चुकीचे संदर्भ देत आणि अप्रत्यक्ष मोदीविरोधी प्रचार करत त्यांनी कुठलाही ऐतिहासिक अभ्यास केला नसल्याचे जाणवत होते. त्या व्यतिरिक्त स्वत:चा धर्म मध्ये आणून त्यांची मते कशी चुकीची आहेत असे आता विरोधक म्हणणार, असे चालू होते.   

या सर्व टीकात्मक लेखांमध्ये काही समान धागे होते. त्यात भारतीय निवडणुका, मोदींचा आधीचा कार्यकाळ, त्यात भारतीय माध्यमांतून सतत आलेल्या असहिष्णुतेची काळजी, अल्पसंख्याकांवर झालेला तथाकथित अन्याय वगैरे होतेच, त्याचबरोबर राष्ट्रप्रेम (nationalism), संघ आणि  हिंदुत्व हे विषयदेखील प्रामुख्याने चर्चिले गेले.

पण या समस्येच्या मुळाशी जाऊन विचार करायचा झाल्यास मला मार्क टली यांच्या 1991च्या Defeat of a Congressman अथवा त्याचेच दुसरे नाव असलेल्या No Full stops in India पुस्तकाची आठवण होती. त्यात त्यांनी सहजतेने सुरुवातीस एक अनुभव सांगितला आहे. ते म्हणतात, राजीव गांधी हत्येनंतर तमाम पाश्चात्त्य माध्यमातील पत्रपंडित चर्चा करत होते की आता आधुनिक भारत संपला. इथली लोकशाही संपली आणि त्यावर त्यांना भारत हा सर्वार्थाने वेगळा देश आहे असे त्यांना ठासून सांगावे लागले. याच पुस्तकात त्यांनी शेवटी (1991 साली) आशावाद दाखवताना या अर्थाचे म्हणाले होते की नेहरू-गांधी घराण्याने अनेक चांगली कामे केली असली, तरी हे घराणे साऱ्या देशासाठी वटवृक्षासारखे झाले आहे, ज्याच्या सावलीत देशातील जनता आणि संस्था आहेत. आणि भारतीयांना हे चांगले माहीत आहे की वटवृक्षाच्या छायेत काही वाढत नाही. मार्क टली यांचे हे विधान आठवायचे कारण म्हणजे आपल्याबद्दलची अनेक माहिती अशीच कुठल्या न कुठल्या तरी वटवृक्षाच्या छायेत खुरटी झाली आहे आणि पाश्चात्त्यांच्या लेखणीतून आणि चर्चेतून आजही तिचे प्रतिबिंब दिसते.

1991 साली लोकशाही संपली असे पाश्चात्त्य पत्रपंडितांना वाटले, कारण समान असणे आणि सारखे असणे यातील फरक त्यांनी आजतागायत समजून घेतलेला नाही. जगात इतरत्र नव्याने तयार झालेल्या लोकशाही टिकू शकल्या नाहीत, तसेच भारतातही होणार हा पुस्तकी अंधविश्वास. त्यात भारत, भारतीय संस्कृती, भारतीय तत्त्वज्ञान आणि त्याहूनही महत्त्वाचे मोघल आणि ब्रिटिश यांच्यापेक्षाही अधिक अनेक शतकांच्या स्थिर सत्तेचा सुवर्णकाळ असलेला इतिहास याबद्दलच्या ज्ञानाचा जाऊ दे, पण साध्या माहितीचा अभाव अशी अनेक कारणे आहेत. भारतीय वापरात असलेले काही शब्द आणि पाश्चात्त्य जगात वापरात असलेले तेच शब्द यांच्या भावार्थात फरक असू शकतो आणि मग इंग्लिशमध्ये ज्याला lost in translation म्हणतात तसेदेखील घडते. उदाहरणार्थ, आपण nationalist असणे अथवा समाजात nationalismची भावना जागृत करणे हे महत्त्वाचे समजतो. पण हेच nationalist आणि nationalism शब्द जेव्हा अमेरिका-युरोपमध्ये वापरले जातात, तेव्हा त्याला हिटलरचा संदर्भ लागतो. त्यामुळे तिथले विचारवंत आपल्याकडील वाचताना / ऐकतानादेखील शाब्दिक संदर्भ चुकीचा लावतात. तसे करताना ते चुकून करतात की मुद्दाम, हे समजणे अर्थातच अवघड आहे. तीच गोष्ट धार्मिकतेची आहे. हिंदू धर्माला कुठलाही भारतीय हिंदू हा सहजतेने 'धारयते इति धर्म:' असे सहज म्हणू शकेल. पण त्याचा संदर्भ जेव्हा रिलिजन या शब्दातील गृहीत मर्यादेशी लावला जातो, तेव्हा विश्लेषण बदलते. 

आणखी पुढचा मुद्दा म्हणजे डावे आणि उजवे विचार या संदर्भात असलेला वैचारिक गोंधळ. पाश्चात्त्य वैचारिकतेत डावे आणि उजवे हे दोन प्रमुख प्रवाह आहेत. ऐतिहासिकदृष्टया विचार केल्यास 1789 साली फ्रेंच राजाला आणि ख्रिश्चन धर्माला पाठिंबा देणारे राजाच्या उजव्या बाजूस बसले होते, तर राज्यक्रांतीला पाठिंबा देणारे डाव्या बाजूला. त्यावरून हे डावे-उजवे शब्द आले. भारतात स्वत:स मध्याच्या डाव्या बाजूस समजणारे हे समाजवादी तसेच कम्युनिस्ट विचारसरणीस आकर्षित झालेले अथवा कम्युनिस्टच असतात. पण ज्यांना उजवे संबोधिले जाते, ते भारतीय / हिंदू विचारसरणीस प्रामाणिक असतात, तसेच हिंदू तत्त्वज्ञानात एकरूप असलेली समानता हिंदू धर्मीयांत आणि भारतीय समाजात आणणे हा त्यांचा उद्देश असतो. थोडक्यात, भारतातील डावे हे काही अमेरिकन डाव्यांच्या गटात बसू शकत नाहीत, तर भारतीय उजवे हे अमेरिकन उजव्यांपेक्षा अनेक कारणांनी वेगळे आहेत. तरीदेखील भारतीय डाव्या विचारवंतांनी अमेरिकन डाव्या विचारवंतांशी आणि पर्यायाने विविध माध्यमांशी वर्षानुवर्षे यशस्वी हातमिळवणी करून स्वतः:च्या विचारांचा प्रचार करायची सोय करून ठेवली आहे. भारतीय / हिंदू तत्त्वज्ञान हे वैश्विक असल्याने भारतकेंद्रित विचारसरणी कधीच टोकाची, एकांगी आणि कोटी होऊ शकत नाही... म्हणूनच केवळ उजवे म्हणणे योग्य वाटत नाही. म्हणूनच अशा भारतीय उजव्यांनी अमेरिकन डाव्या विचारवंतांशी, पत्रकारांशी अधिक संवाद साधत एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. ह्या गोष्टी एका रात्रीत होणार नाहीत, पण आत्ताचा काळ अशा संवादास पोषक आहे.

आता एक सहज विचार येऊ शकतो - आपण आणि विशेषतः मोदी सरकारने जाणूनबुजून अथवा योग्य संदर्भ नसल्याने एकांगी टीका करणाऱ्या पाश्चात्त्य माध्यमपंडितांची दखल घ्यावी का? त्यांच्या विचारांना महत्त्व द्यावे का? तत्त्वत: त्याची गरज जरी नसली, तरी त्यात एक महत्त्वाचा मुद्दा येतो. वर उल्लेखलेली आणि आणखीही काही महत्त्वाची माध्यमे जे काही प्रकाशित करतात, ते अनेक धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचत असते. अनेक बँका, उद्योग, मोठे गुंतवणूकदार आदी महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय निर्णय घेताना असे लेख वाचून अथवा माध्यमपंडितांना भेटून अभ्यास करत असतात. त्या व्यतिरिक्त अनेकदा दुर्लक्ष हे जरी तत्कालीन योग्य धोरण ठरू शकले, तरी असे प्रत्युत्तर न मिळालेले छापील लेखन हे संदर्भ होतात आणि गाडी अशीच रुळाविना घसरत जाऊ लागते. त्याचा दूरगामी तोटा हा कार्याला, संघटनेला, विचाराला, व्यक्तीला आणि नकळत पण समाजालासुध्दा होत असतो.

विरोधी विचारांशी केवळ आक्रमकता योग्य नसते, तर अनेकदा संवाद साधत बाजू मांडून इष्ट परिणाम साधणे योग्य ठरू शकते. थोडक्यात ridicule आणि opposition यानंतर जर आपल्याला जागतिक acceptance हवा असेल, तर आधुनिक भाषेत जगाला भारतीय बाजू सांगणारे विचारवंत, विद्वान लागतील. असे विद्वान भविष्यात तयार करण्यासाठी आणि वर्तमानातील विद्वानांना प्रोत्साहन देण्यासाठी तशी विद्यापीठे, संस्थांची गरज लागेल. विविध ग्रांथलेखन, चर्चासत्रे, सभ्यतापूर्ण वादविवाद आदी घडवून आणाव्या लागतील. त्यासाठी जशी सरकारी इच्छाशक्ती आणि मदत लागेल, तशीच सामाजिक इच्छाशक्तीसुध्दा लागेल.

येत्या पाच वर्षांच्या कार्यकाळात चुकीच्या पध्दतीने तयार केली गेलेली प्रतिमा पुसून भारतीयांचे वास्तव जगापुढे आणण्यासाठी धोरणात्मक प्रयत्न होतील, अशी आशा करू या.