**अक्षय जोग**
हिंदुत्व देशाच्या केंद्रस्थानी आल्यापासून स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांवरील टीकेत वाढ झाली आहे.अशोक गहलोत सरकारने बारावीच्या पाठयपुस्तकातून सावरकरांच्या नावापुढील 'वीर' पदवी हटविण्याचे दु:साहस केले आहे. सावरकरप्रेमींनी शांतपणे अभ्यास करून सयंत भाषेत वास्तव मांडावे, इतकेच म्हणावेसे वाटते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून राजस्थानमधील पाठयपुस्तक बदलाच्या निमित्ताने पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसच्या अशोक गहलोत सरकारने बारावीच्या पाठयपुस्तकातून सावरकरांच्या नावापुढील 'वीर' पदवी हटविण्याचे दु:साहस केले आहे. ह्या बदलासंदर्भात एक समिती नेमण्यात आली होती आणि त्यांच्या सूचनेनुसार हे बदल केले आहेत, असे सांगण्यात आले. भाजपाच्या कार्यकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी लादण्यासाठी हेतुपूर्वक NCERT अभ्यासक्रमात बदल केले होते, असे सांगण्यात आले. (Savarkar loses Veer as Congress govt rewrites school textbooks in Rajasthan, The Indian Express, 14 जून 2019). 'वीर' पदवी काढण्याबरोबरच इतरही बदल केले आहेत. पण आपण येथे विषयाच्या अनुषंगाने 'वीर' पदवी संदर्भाचा विचार करू या.
मुळात महापुरुषांना स्वातंत्र्यवीर, लोकमान्य, महात्मा, आचार्य अशा दिल्या जाणाऱ्या पदव्या ह्या उस्फूर्तपणे जनतेकडून दिल्या जातात. स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'स्वातंत्र्यवीर' किंवा 'वीर' ही पदवी जनतेने दिली होती. ह्याचा पहिला उल्लेख सापडतो तो 1924ला. कारावासातून राजकारणात भाग घेण्यास व रत्नागिरीबाहेर जाण्यास बंदी ह्या अटींवर सावरकरांची सशर्त मुक्तता झाली. त्यानंतर नाशिकला झालेल्या शिवजयंतीच्या वेळी 1924ला वीर वामनराव जोशी ह्यांनी 'स्वातंत्र्यवीर' म्हणून सावरकरांचा गौरव केला होता. त्या वेळी प्रसिध्द झालेल्या त्यांच्या भाषणाच्या प्रतिवृत्तान्तातसुध्दा निदान तीन-चार वेळा तरी 'स्वातंत्र्यवीर' म्हणून सावरकरांचा गौरव केलेला आढळतो. कवी वैशंपायन यांनी त्या वेळी रचलेल्या कवितेतही 'स्वातंत्र्यवीर' असाच गौरव केलेला आहे. तसेच 'स्वातंत्र्य'च्या दिनांक 4 सप्टेंबर 1924च्या अंकात चिटणीस प्रभाकर, फलज्योतिष संशोधन कार्यालय यांचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर कुंडली विचार' हा लेख प्रसिध्द झाला होता. ह्यातही सावरकरांना 'स्वातंत्र्यवीर' म्हटले होते. आचार्य अत्रे यांनी 1935-36मध्ये 'स्वातंत्र्यवीर' असा गौरव केला होता. 1934मध्ये संपूर्ण मुक्तता झाल्यावर सावरकर रत्नागिरी सोडून मुंबईला राहावयास जायच्या आधी रत्नागिरीकरांनी एक सभा घेऊन 'सावरकर सत्कार मंडळ' स्थापन केले. सर्वश्री रा.आं. मिशाळ, म.गं. शिंदे आणि वि.भि. पटवर्धन या सत्कार मंडळाचे कार्यवाह होते. दि. 12 जून 1937 रोजी रत्नागिरीने वीर सावरकरांना प्रेमाने मानपत्र अर्पण केले. ह्या सभेच्या प्रारंभी रमात्मज ( अ. स. भिडे गुरुजी) लिखित 'राष्ट्रधर्मभाषा धनुतीक्ष्ण-सायका! वंदन स्वातंत्र्यवीर त्या विनायका' हे पद मुलांनी म्हटले. येथेही 'स्वातंत्र्यवीर' असा सावरकरांचा गौरव केलेला दिसून येतो. (संदर्भ - शां.शि. उर्फ बाळाराव सावरकर लिखित 'हिंदुसमाजसंरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर - रत्नागिरी पर्व', वीर सावरकर प्रकाशन, 1972.) जशी 'लोकमान्य' ही पदवी जनतेने टिळकांना दिली होती, तशीच 'वीर' किंवा 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी जनतेने सावरकरांना दिली होती.
26 फेब्रुवारी 1966 रोजी सावरकरांच्या आत्मार्पणानंतर देशातील विविश मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली होती. तेव्हाही विविध विचारसरणींच्या नेत्यांनी 'देशभक्त', 'वीर' किंवा 'स्वातंत्र्यवीर' असा सावरकरांचा गौरव केला होता.
फादर विल्यम्स म्हणाले होते, 'तुम्ही प्रामाणिकपणे जगलात व विजयी मुद्रेने मृत्यूला कवटाळले. इंडियन नॅशनल चर्च ही परकीय मिशनपासून स्वतंत्र असलेली संघटना असून तिच्या वतीने मी स्वातंत्र्यवीरांना श्रध्दांजली वाहतो.'' ज्या सावरकरांना अल्पसंख्याकविरोधी म्हटले जाते, त्याच अल्पसंख्याकांच्या एका प्रतिनिधीने सावरकरांचा 'प्रामाणिक' व 'स्वातंत्र्यवीर' असा गौरव केला होता, ह्याची नोंद घेणे आवश्यक आहे.
हल्लीचे बहुतांश कम्युनिस्ट नेते सावरकरविरोधक म्हणून गणले जातात. ह्याच कम्युनिस्टांच्या नेत्याने - ज्याने भारताला, विशेषत: महाराष्ट्राला कम्युनिस्ट विचारसरणीशी ओळख करून दिली असे मानले जाते, त्या श्रीपाद अमृत डांगे ह्यांनीही सावरकरांना 'स्वातंत्र्यवीर' म्हटले आहे. कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे म्हणाले होते, ''स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारताच्या स्वातंत्र्यलढयातील आद्य क्रांतिकारक होते व त्यांच्या प्रेरणेनेच स्वातंत्र्यलढयाचे तेजस्वी पर्व सुरू झाले.''
भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण सावरकरांचे चिरंजीव विश्वास सावरकरांना पाठवलेल्या सांत्वनपर संदेशात म्हणतात, ''वीर सावरकर यांच्या निधनाने देश एका थोर स्वातंत्र्यवीराला मुकला आहे. त्यांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांची सत्ता कधीच मानली नाही. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनंत यातना सोसल्या.'' म्हणजे काँग्रेसचे अग्रणी नेते, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व तेव्हाचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांनीही सावरकरांना 'वीर' तसेच 'स्वातंत्र्यवीर' म्हटले आहे.
इतकेच काय, ''श्री. सावरकरांच्या निधनाने आपणामधून एक महापुरुष हिरावून घेतला आहे. सावरकर म्हणजे साहस व देशभक्तीचा प्रतिशब्दच. सावरकर श्रेष्ठ दर्जाचे क्रांतिकारक होते. त्यांच्यापासून असंख्य लोकांनी स्फूर्ती घेतली.'' अशा शब्दात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी सावरकरांना श्रध्दांजली वाहिली होती. 1983 हे सावरकरांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात आले, तेव्हा 'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई' ला पाठवलेल्या संदेशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांचा 'वीर' असा उल्लेख केला आहे. (संदर्भ - No.836-PMO/80, पत्र दि. 20 मे 1980) ह्याच सावरकर स्मारकाला इंदिरा गांधीनी स्वत:च्या वैयक्तिक खात्यातून 11000 रुपयांची देणगी दिली होती. इंदिरा गांधींनी 1970मध्ये सावरकरांवर पोस्टाचे तिकीट काढले होते. 1983मध्ये प्रेम वैद्य यांच्या दिग्दर्शनाखाली माहितीपट काढण्यास अनुमती दिली होती.
सावरकरांना 'वीर' किंवा 'स्वातंत्र्यवीर' म्हणणे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी लादणे आहे का? तसे असेल, तर मग राजस्थान काँग्रेस आपल्याच पक्षाच्या नेत्या व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांनाही त्यांनी सावरकरांचा 'वीर' अथवा 'स्वातंत्र्यवीर' उल्लेख केला, म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी लादणारे असे म्हणणार का? कम्युनिस्ट विचारसरणीच्या डांगेंनाही 'स्वातंत्र्यवीर' असा हिंदुत्ववादी सावरकरांचा गौरव करताना संकोच वाटला नाही, मग राजस्थान काँग्रेसला हा असा धोका, भीती, संकोच का वाटतो?
महापुरुषांची एखादी विचारसरणी असली, तरी महापुरुषांच्या देशभक्तीचा गौरव करणे, त्यांना जनतेने दिलेल्या पदवीचा उल्लेख करणे म्हणजे त्यांच्या देशभक्तीचा, त्यांच्या विद्वत्तेचा, महानतेचा, कार्याचा गौरव करणे इतकाच त्याचा अर्थ असतो. एखादी विचारसरणी लादणे असा त्याचा अर्थ कसा काय होऊ शकतो? विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्टय आहे, तर त्यातील हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या सावरकरांचा उल्लेख केला, तर भारताच्या विविधतेत भरच पडणार आहे.
हिंदुत्व देशाच्या केंद्रस्थानी आल्यापासून सावरकरांवरील टीकेत वाढ झाली आहे. हिंदुत्व विचारांना पराभूत करण्यासाठी हिंदुत्व ज्या पायावर उभे आहे, त्या हिंदुत्वाचे प्रणेते आणि हिंदुत्व चळवळीचा वैचारिक पाया मानल्या जाणाऱ्या सावरकरांवर सतत आक्षेप घेतले जात आहेत. ह्या टीकेत वाढ होईल, पण सावरकरप्रेमींनी शांतपणे अभ्यास करून सयंत भाषेत वास्तव मांडावे, इतकेच म्हणावेसे वाटते.