मिरजेत बिनशेती भूखंडावर साकारले ऑक्सिजन पार्क

विवेक मराठी    10-Jun-2019
Total Views |

   शहरातल्या रिकाम्या जागेचे महत्त्व लक्षात घेऊन  'प्रणव बिल्डकॉन'ने पर्यावरणपूरक कार्य हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मिरज येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मागे कंपनीच्या स्वतःच्या जागेत सुमारे नऊ एकरांच्या बिनशेती भूखंडावर आगळावेगळा 'ऑक्सिजन पार्क' (बांबू बेट) विकसित करण्यात येत आहे.

 सांगली जिल्ह्यातील मिरज हे महत्त्वाचे ऐतिहासिक शहर. या शहराचा परिसर जीवविविधतेने समृध्द आहे. अलीकडच्या काळात वाढत्या शहरीकरणामुळे हिरवाई कमी होऊन प्रदूषण वाढत आहे. त्याचबरोबर शहराच्या चारही बाजूंनी लेआउट्स विकसित होऊन प्लॉट्सची विक्री सुरू आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरीकरण व प्लॉट्सची निर्मिती होणे गरजेचे असले, तरी शहरातील प्रदूषण रोखण्यासाठीदेखील पावले उचलली पाहिजेत. या अभिनव उपक्रमात 'प्रणव बिल्डकॉन' पुढे सरसावत आहे. या उपक्रमाविषयी मिरज-सांगली परिसरात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. 

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/


अशी साकारली संकल्पना

भविष्यातील नियोजनासाठी गुंतवणूक म्हणून बरेच लोक बिनशेती प्लॉट्स विकत घेतात आणि बऱ्याचदा अशा भूखंडावर बराच काळ बांधकाम न होता केवळ तारकुंपण घातलेला प्लॉट तसाच रिकामा राहतो. वर्षांनुवषर्े प्लॉटवर बांधकाम न केल्यामुळे त्या जागेवर काटेरी झुडपे, गवत इ. उगवते. ही जागा एक प्रकारे अडगळीची होऊन जाते. शहरातील अशा रिकाम्या भूखंडांवर व्यापक प्रमाणात वृक्षलागवड होऊ शकली, तर शहराचा कायापलाट होऊ शकेल आणि आख्खे शहर हिरवेगार होऊ शकेल, असा विश्वास प्रणव बिल्डकॉनचे सी.एम.डी. किशोर पटवर्धन यांना वाटला. त्या दृष्टीने विचारप्रक्रिया सुरू झाली आणि याच संकल्पनेतून मिरज येथील 'ऑक्सिजन नेचर पार्क' उभे राहिले आहे.

या पार्कची संकल्पना कशी साकारली? याविषयी सांगताना किशोर पटवर्धन म्हणाले, ''ऑक्सिजन नेचर पार्क निर्माण करताना अनेक समस्या समोर होत्या. सध्या राज्यामध्ये मनपा हद्दीतील रिकम्या बिनशेती भूखंडावर व्यापक प्रमाणावर वृक्षलागवड करण्यास प्रचलित कायद्यांचा मोठा अडथळा आहे. या जुनाट कायद्यातील कालबाह्य तरतुदी काढून टाकाव्या, म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. 'डेव्हलपमेंट फोरम सांगली-मिरज' या आमच्या संस्थेच्या शिष्टमंडळाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांची दोन वर्षांपूर्वी भेट घेतली. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत असलेल्या मोकळया भूखंडावर जागा मालकाच्या संमतीने व सहभागाने व्यापक वृक्षलागवड होण्याच्या दृष्टीने 'ट्री फेलिंग ऍक्ट' मध्ये आवश्यक त्या सुधारणा व्हाव्यात, विशेष म्हणजे जलद गतीने वाढणारी आणि पर्यावरणपूरक अशी बांबू, महानीम, सिल्व्हर ओक, सुरू, इंडियन विलो ही झाडे बिनशेती भूखंडावर जागा मालकांस लागवड, तोड, विक्री व वाहतूक अनुज्ञेय करावी आणि वनशेतीला ज्या प्रकारची मोकळीक असते तशीच मोकळीक भूखंड मालकासदेखील मिळावी, यासाठी शासनाकडे निवेदन सादर केले. वनमंत्र्यांना ही कल्पना खूप आवडली आणि त्यांनी सकारात्मकता दर्शवत 'बांबू' हा गवतवर्गीय असल्यामुळे त्यास 'ट्री फेलिंग ऍक्ट'मधून वगळून खाजगी बिनशेती जागांवर बांबू लागवडीला मुक्त परवानगी दिली.''


बांबूचे बेट बहरले

बांबूला पूर्ण मुक्त लागवडीचे सरकारचे धोरण आल्यानंतर लगेचच प्रणव बिल्डकॉनच्या वतीने 'ऑक्सिजन नेचर पार्क' उभारण्यासाठी पहिले पाऊल उचलण्यात आले. मिरज शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मागे असलेल्या कंपनीच्या सुमारे 36 एकर इतक्या विस्तृत जागेवर सुरू असलेल्या 'अर्बन रिपब्लिक' या नियोजित मेगा टाउनशिपमध्ये ज्या भागावर सर्वात शेवटी बांधकाम होणार आहे, अशा सुमारे 9 एकर जागेला तारकुंपण करून त्या ठिकाणी ठिकाणी शास्त्रोक्त पध्दतीने 12#4 अंतरावर बांबूची लागवड करण्यात आली. यासाठी खास बंगळुरूहून टिश्यू कल्चर केलेली 'बांबूसा बलकोवा' या जातीचे बांबू रोपे मागवून सुमारे 10000 रोपांची शास्त्रशुध्द पध्दतीने लागवड केली आहे. रोपांची योग्य प्रकारे जोपसना आणि जलद वाढ होण्यासाठी ठिबक सिंचनची सोय केली.

पटवर्धन सांगतात की, ''चांगली निगा घेतल्यामुळे अवघ्या दोन वर्षांतच बांबूची सुमारे 20 ते 25 फूट उंच वाढ झाली. आणि या ठिकाणी बांबूचे गर्द बेटच तयार झाले. इतकी सुंदर वनराई अल्पावधीत तयार झाल्यानंतर मग मनात विचार आली की सांगली-मिरजेच्या नागरिकांना या घनदाट सुंदर बनाचा लाभ का देऊ नये? यासाठी या ठिकाणी निर्माण केला गेला या बांबू बनामध्ये मधोमध 12 फूट रुंदीचा लाल मातीचा सुमारे 600 मी. लांबीचा छान ट्रॅक. नुकतेच 11 मे 2019 रोजी सामिकू (सांगली-मिरज-कूपवाड) मनपाच्या महापौर संगीता खोत आणि भाजपाचे राज्य चिटणीस मकरंद देशपांडे यांच्या हस्ते या ऑक्सिजन नेचर पार्कचे उद्धाटन करण्यात आले. हे पार्क सर्वांसाठी पहाटे 5 ते 10पर्यंत खुले असते. पार्कमध्ये ठिकठिकाणी विश्रांतिस्थाने उभारण्यात आली आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून चहा-कॉफी, ज्यूस सेंटर सुरू करण्यात येत आहे. रोज सकाळी सुमारे तीनशे ते चारशे लोक या पार्कचा लाभ घेतात. इथे येणाऱ्या प्रत्येकाला आल्हाददायक अनुभव येतो. रखरखत्या उन्हातही गर्द सावलीमुळे अक्षरशः जंगलात गेल्याचा अनुभव येतो. अनेक प्रकारचे पक्षीदेखील या ठिकाणी विस्थापित झाले आहेत. यामुळे येथे पाऊल ठेवले की तऱ्हतऱ्हेच्या पक्ष्यांचे दर्शन होते आणि त्यांचा किलबिलाट वेगळा आनंद देऊन जाते. येणाऱ्या तीन-चार वर्षांत बांबूच्या पूर्ण वाढीनंतर हे बेट आणखी हिरवे गर्द होईल. यामुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यास आणि या भागातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. हे 'ऑक्सिजन नेचर पार्क' सांगली-मिरजकरांना ऊर्जा देणारे ठरले आहे.''

कायद्यात सुधारणा करण्याची गरज

मिरजमध्ये निर्माण केलेले हे बांबूचे बेट आणि आणि व्यापक वृक्षलागवडीचा हा उपक्रम संपूर्ण राज्याला एक दिशादर्शक उदाहरण म्हणून नावारूपाला आला आहे. याबाबत पटवर्धन यांनी सांगितले, ''शासनाने 'ट्री फेलिंग ऍक्ट' 1975मधील कालबाह्य तरतुदी त्वरित बदलाव्या आणि जलदगतीने वाढणारी काही पर्यावरणपूरक झाडे नोटिफाय करून नपा/मनपा हद्दीतील मोकळया बिनशेती भूखंडांवरदेखील दाट वृक्षलागवड करण्यास मुक्त परवाना द्यावा आणि वनशेतीला जशी मोकळीक असते तशीच मोकळीक भूखंड मालकास देण्यात यावी. यामध्ये प्लॉट मालकास भविष्यात इमारत बांधकामासाठी अथवा अन्य बिनशेती करण्यासाठी प्लॉटचा वापर करावयाचा झाल्यास तेथील वृक्षतोडीसाठी कोणताही कायदेशीर अडथळा असू नये, अशा तरतुदी अंतर्भूत करण्यात याव्यात. या धोरणामुळे शहरामध्ये बिनशेती भूखंड रिकामे न राहता त्या ठिकाणी छोटे-छोटे ग्रीन पॅचेस तयार होतील आणि दाटीवाटीच्या वस्तीच्या शहरातील पर्यावरणाचे संवर्धन साधले जाईल.'' पटवर्धन पुढे म्हणाले की, ''शासनाने या कायद्यात सुधारणा करत असताना याही पुढे जाऊन जागामालकडूनही शहरातील बिनशेती भूखंड तीन वर्षापेक्षा जास्त काळ मोकळा राखला जाऊच नये व तो काही कारणास्तव मोकळा राहणार असेल तर अशा जागेवर व्यापक वृक्षलागवड व जोपासना करण्याचे बंधन या कायद्यात करण्यात यावे.''

आज शहरीकरण, शहरातील हवेचे प्रदूषण, जल व्यवस्थापन या सगळयाच बाबी भीषण समस्या म्हणून उभ्या राहत आहेत. शहर भागामध्ये व्यापक वृक्षलागवड व झाडांची जोपासना झाल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी खूप मदत होईल. कायद्यातील कालबाह्य अटी दुरुस्त केल्यास या उपक्रमामध्ये जनतेचा सहभाग निर्माण होऊन व्यापक वृक्षलागवड  ही लोकचळवळ कशी बनेल या दृष्टीने एक उत्तम पर्याय म्हणून शासनाने या उपक्रमाकडे पाहण्याची आणि कायद्यात त्वरित सुधारणा करण्याची गरज आहे.

संपर्क

किशोर पटवर्धन

सी.एम.डी., प्रणव बिल्डकॉन, मिरज

9325663021