आयुष्यभर पैसा जमवतात, तो सांभाळताना ताण येतो, त्रास होतो. कारण पुढे पैसा लागेल. पैसे असले की कुणी विचारेल, ही भावना असते. पण कधी हा पैसा कुणाला मिळेल या विचाराने नाती दुरावतात. त्यापेक्षा देण्यातला आनंद उपभोगावा.
मिळालं काय नि गेलं काय? नकोच. काय काय मिळालं याचाच विचार करू, म्हणजे समाधानाची वाट सापडेल. मिळणं म्हणजे घरदार, पैसा, वस्तू यांचा विचार नाही. मिळालेली चांगली माणसं, चांगले विचार, आधार, पाठिंबा, समाधान असा अर्थ घेऊ. लक्षात येईल - खूप भाग्यवान आहोत आपण! खडतरपणा होता, पण त्यातून तरुन गेलो ही ताकद मिळालीच ना! जे आठवायला नकोच ते वजा करून टाकू.
पूर्वीच्या जगण्यात अशा अनेक गोष्टी मी केल्या, ज्या कृत्रिम होत्या, ज्या पाखंडी होत्या, ज्या करताना मला त्रास झाला, ज्या मला करायच्या नव्हत्या, त्या कुणाच्या तरी दबावाखाली कराव्या लागल्या. त्या मी माझ्या पुढील आयुष्यातून वजा केल्या, तर उरलेलं जगणं शांतपणे जगता येईल? त्या गोष्टींनी मला ताणतणावांना सामोरं जावं लागलं. माझी प्रायॉरिटी बदलावी लागली. मनाची शांतता ढळली. मग मला अशा गोष्टी आयुष्यातून वजा करता येऊ दे.
आयुष्यभर पैसा जमवतात, तो सांभाळताना ताण येतो, त्रास होतो. कारण पुढे पैसा लागेल. पैसे असले की कुणी विचारेल, ही भावना असते. पण कधी हा पैसा कुणाला मिळेल या विचाराने नाती दुरावतात. त्यापेक्षा देण्यातला आनंद उपभोगावा. कदाचित भावी पिढीला गरज असेल (गरजेचं स्वरूप लक्षात घेऊनच), तेव्हा तो मिळाला नाही तर असं ऐकावं लागणारच. ''गरजेला नाही उपयोगी पडलात. आता उपयोग काय?'' पैसे असले की हे व्याप असतातच. आपण असं द्यावं की घेणाऱ्याला वाटेल, अगदी वेळेला मिळालं नि किती मिळालं, किती किंमत आहे त्याची नि आपल्याला वाटावं ते आपलं नव्हतंच, मग किती सांभाळावं. सगळया गोष्टी इतक्या साठत जातात की, घराला अडगळ होते. आपली मान्यता नसते, मग अडगळ वाढतेच. आपणच त्या गोष्टी देऊन टाकू. भावनिक गुंता वस्तूबरोबर जाणार नसतो, तो मनात असतो, हे लक्षात घेऊ. आपलं काही देण्यानं उरलेल्या घराला राग येणार नाही वा वाईट वाटणार नाही असं द्यावं. यात विचार, पैसा, वस्तू, अनुभव अगदी घरदार, जमीनजुमलाही. कदाचित मनात येईल, 'लिहायला काय जातंय?' पण जगून पाहू असं. खूप हलकं हलकं वाटेल.
म्हणून असं एक जगणं समोर अंथरावंसं वाटतंय. आमच्या ओळखीच्या एक आजी होत्या. मुलं आपापल्या संसारात दंग झाली. आजी एकटया होत्या. गरजेला कुणीही बोलवावं. ज्याची गरज जास्त महत्त्वाची तिथे आजी हजर. तिथे असल्या तरी कुणाला अडचण नाही. ज्यांना जे हवंय ते त्यांनी देऊन टाकलं. जरा वादावादी झाली, सगळयांनाच काही काही मिळाल्याने सगळे तसे आनंदात होते. ''मी सगळयातून मोकळी झालीय. पुन्हा जमवणार नाही. तुम्हाला मला काही द्यावंसं वाटलं तरी खाऊ आणा या म्हाताऱ्या मुलीला! माझ्यानंतर घर वाटून घ्या. कुणालाच नको असलं तर तुकडे करण्याऐवजी एखाद्या संस्थेला द्या.'' त्या असं म्हणाल्या नि तसंच झालं. मुलांचे तान-मान पाहिले नि आजींनीच ते एका संस्थेला देऊन टाकलं. तिथे वृध्दाश्रम सुरू झाला. वृध्देने वृध्दांना घर दिलं. आजी समाधानात होत्या. क्वचित घडत असलं तरी असं काही घडतंय हे पाहिल्यावर इतर वृध्दत्वांना आधार मिळतो. ''रानावनात जाऊनच साधना होत नाही. आहे तिथे राहूनही तप करता येतं. वयानुसार गुंतलेला जीव सोडवून मुक्त करणं ही जागतेपणी आत्म्याला मिळणारी मुक्ती.'' असं तेव्हा म्हणालेल्या आजीचे शब्द थोडेथोडे समजतात. एरवी म्हातारपणी ऐकावं लागतच. ''कुठे नेणार आहेत बरोबर, कुणास ठाऊक? नि काय काय नेणार आहेत? सगळं इथंच ठेवून जायचंय...'' (असं म्हणणाराही फार काही सोडणारा असतो असं नाही.)
अनेक ठिकाणी आपली गरज नाही, आपण बाहेर पडलो तरी चालेल हे लक्षात आल्यावर माणसं स्वत:ला घरातून वजा करतात. अनेक ठिकाणी सामाजिक कामात गुंतवून घेतात. वेश्यांच्या मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या एका वसतिगृहात, साठी ओलांडलेलं एक जोडपं येऊन शिकवत होतं. कुणी गडावर आलेल्यांना जेवण करून घालत होतं. कुणी मोफत शिकवत होतं, कुणी जिथे गरज आहे तिथे जाऊन काम करत होतं. अशा वेळी बाहेर पडायच्या आधी आपल्या मनात येतं, 'होईनासं झाल्यावर कोण विचारेल? पुन्हा घरात जमा होता येईल?' हे स्वाभाविक आहे. याला शब्द असे की याचे दोन फायदे - घरातल्यांना जरा मोकळेपण, शिवाय किंमतही समजेल. दुसरा फायदा आपल्यालाही बाहेरचं जग समजेल नि आपण आपल्याला योग्य ठिकाणी देऊ केलंय याचा आनंदही होईल. जे जे माझं म्हणून जपलं ते ते माझं नाही, माझं नव्हतं असा संगत्याग म्हणजेच वृध्दत्व.
एरवी आपल्याला वयाचा गर्वही वाटायला लागतो. समोरच्याला काहीच समजत नाही. आपण अनुभवी आहोत. चार पावसाळे जास्त काढलेत वगैरे! समोरचा म्हणेल आम्हीही काढणार आहोत. बदलत्या काळाचं भान आपल्याला नसतं. आपल्या तारुण्यात आपण जसे जगलो तसंच तरुणाईने जगावं असं आपल्याला वाटतं, मी असा जगलो. उधळमाधळ नाही केली. असे शब्द खरं तर समोरच्याला दुखावतातच. उलट मला मिळालं नाही ते पुढील पिढीलाही मिळता कामा नये असा विचार करण्याऐवजी त्यांना तरी ते मिळू दे असा मनाचा उदारपणा आणता आला, तर छानच. सगळया ठिकाणी आपण आपले अनुभव समोरच्याने गृहीत धरावे अशी अपेक्षा करतो. वस्तूंचं प्रमाण, माणसांचे स्वभाव, वागणं, घटना यातून आपल्याला जे मिळालं तेच इतरांना मिळेल या भावनेनं सतत सतत दिल्या जाणाऱ्या सूचना वजा करू या. नाहीतर सारख्या त्याच त्या सूचना नका देऊ, आम्हालाही कळतं कसं वागायचं ते! हे ऐकून घ्यायची तयारी ठेवू. व्यवहारातलं शहाणपण शिकवणं असू दे किंवा माणसांचं नातं असू दे. प्रत्येक ठिकाणी आपलं बोलणं त्या भूतकाळावरच आधारित असतं. सुचवणं एकवेळ ठीक आहे, पण लादणं त्रासदायकच. आजकाल सुचवलेलंही चालेल असं नाही, कारण कुटुंब खूपच स्वत:भोवती फिरत चालली आहेत. म्हणून असंही करून पाहू.
- घरापासून घराच्या समजुतीने दूर जाऊन सामाजिक कामात गुंतवून घेऊ.
- कधी कधी कर्मकांड, रितीरिवाज बंदही करायची भीती वाटते नि नव्या पिढीला तेवढा वेळही नसतो. आपण पुढाकार घेऊन यातून बाहेर पडू.
- शारीरिक व्याधी, कमकुवतपणा येणारच. त्याचा स्वीकार करू.
- वेगवेगळे वैयक्तिक, सामूहिक उपक्रम सुरू करू.
- गरज असेल तिथे आजीआजोबा होऊन जाऊ.
- चांगल्या गोष्टी नियमित करायला सुरुवात करू.
- आपले अनुभव सहजपणे इतरांना देऊ.
चला तर, ठरवू या जगण्यातून काय वजा करायचं नि जगण्यात काय मिळवायचं ते!
8828786875