नैना ठग लेंगे

विवेक मराठी    07-May-2019
Total Views |

 डोळ्यावर जमा झालेला संशयाचा पडदा आणि ईश्वर त्यागीचा मत्सर याची परिणती शेवटी डॉलीच्या मृत्यूत होते. लग्नाच्या पहिल्या रात्रीच ओमी डॉलीचा खून करतो. एकही शब्द न उच्चारता मुकेपणाने डॉली मरणाला सामोरी जाते. त्या प्रसंगी पार्श्वभूमीला वाजणारे हे गीत डॉली-ओमी यांची शोकांतिका दर्शविते.

जग विश्वासावर चालते. त्यात पतिपत्नीचे नाते अतिशय संवेदनशील आहे. त्यात प्रेम आहे, आदर आहे, जबाबदारी आहे, एकनिष्ठा आहे आणि त्यामुळे येणारा हक्कसुद्धा आहे. इतिहास साक्षी आहे, बाहेरची कोणतीही वादळे माणूस झेलू शकतो, पण स्वतःच्याच शय्यागृहात शिरलेले वादळ आयुष्य उद्ध्वस्त करते.

तो रावण कामी कपटी

तू वसलीस त्याच्या निकटीं

नयनांसह पापी भृकुटी

मज वदवेना स्पष्ट याहुनी भलते

रावणाचा वध रामाने केला आहे, पण त्याचे कारण सीता नाही. त्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आपल्या अपमानाची भरपाई त्याने इथे के ली आहे. तिच्या चारित्र्याविषयी तो शंका व्यक्त करून थांबत  नाही, तर ‘दशदिशा मोकळ्या तुजसी’ म्हणून तो नातेच संपवून टाकतो. इतिहासात अशा अनेक कथा आढळतात, ज्याला स्थळ आणि काळाचे बंधन नाही. पाच हजार वर्षांपूर्वी घडलेल्या रामायणातील सीता आणि  सतराव्या शतकातील ऑथेल्लो नाटकातील डेस्डीमोना यांची व्यथा सारखीच.

अगदी प्राचीन काळापासून पुरुष, स्त्रीला एक सजीव संपत्ती मानत आला आहे. तिने इतर परपुरुषाकडे पाहू नये म्हणून  तिला घरात डांबून ठेवणे, तिच्यावर बंधने लादणे हे तर त्याने केलेच, पण तरीही संशयाचा किडा मात्र त्याच्या मनात आहेच. हा संशयाचा हिरवा किडा के वढा मोठा उत्पात घडवतो, हे ऑथेल्लोमध्ये दिसते. लाडक्या, प्रेमळ पत्नीचा के वळ संशयाने नवर्‍यानेच केलेला खून हा ऑथेल्लो  या नाटकाचा मुख्य विषय आहे. 2006मध्ये प्रदर्शित झालेल्या विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओम्कारा’ हा  चित्रपट ऑथेल्लोवर आधारित आहे.

हा चित्रपट म्हणजे उत्कटता, प्रेम, एकनिष्ठा आणि प्रतारणा यांची कथा. ओमी शुक्ला उर्फ ओम्कारा हा एका राजकीय नेत्याचा हस्तक आहे. त्याला  मदत करणारे त्याचे दोन सहकारी आहेत. एक ईश्वर त्यागी आणि दुसरा केशव उपाध्याय. ओम्काराची प्रेयसी डॉली ही शहरातील नामांकित वकिलाची मुलगी. वडिलांच्या इच्छेविरुद्ध तिने ओम्काराचा हात पकडला आहे. ‘जी मुलगी वडिलांना फसवते, ती एक दिवशी तुलाही फसवेल’ या वडिलांच्या भाष्यात पुढील भविष्याची सूत्रे लपली आहेत. नेत्यासाठी गुंडगिरी करणारा ओमी जेव्हा राजकारणात शिरतो, तेव्हा आपल्या टोळीची जबाबदारी केशवकडे सोपवतो. ईश्वरला याचा संताप येतो आणि चित्रपटात एक अवघड वळण येते. केशव आणि डॉली यांचे मैत्रीचे संबंध असतात. याचा फायदा घेऊन ईश्वर त्यागी उर्फ लंगडा, ओमीच्या मनात संशयाचे बीज पेरतो. विश्वास आणि अविश्वास यांच्या गुंत्यात अडकलेला ओमी स्वतःला सावरू  शकत नाही. जे पाहिले  ते खरे का खोटे त्याचा फै सला करणे त्याला जमत नाही.

डोळ्यावर जमा झालेला संशयाचा पडदा आणि ईश्वर त्यागीचा मत्सर याची परिणती शेवटी डॉलीच्या मृत्यूत होते. लग्नाच्या पहिल्या रात्रीच ओमी डॉलीचा खून करतो. एकही शब्द न उच्चारता मुकेपणाने डॉली मरणाला सामोरी जाते. त्या प्रसंगी पार्श्वभूमीला वाजणारे हे गीत डॉली-ओमी यांची शोकांतिका आपल्या शब्दांत मांडते..

नैनोंकी मत मानियो रे , नैनोंकी मत सुनियो रे

नैना ठग लेंगे

मेंदू जेव्हा डोळ्यांचा ताबा घेतो, तेव्हा डोळेही फसवतात. ‘ठगन’चा अर्थ नुसते फसवणे नाही, तर लुटणे. उद्ध्वस्त करणे. डोळ्यात धूळ जाते तेव्हा स्पष्ट दिसत नाही. संभ्रमात पडलेला  माणूस जे जाणवते त्यावर विश्वास ठेवतो. जे डोळ्यांना दिसते, ते फसवे असू  शकते. अशा डोळ्यांवर विश्वास ठेवू नका. असे  संशयाने भारलेले जादुई डोळे तुम्हाला मोहित करतात आणि मग तुमची स्वप्ने हिरावून घेतात.

भला मंदा देखे न पराया णा सगा रे

नैनोंको तो डसने का चस्का लगा रे

नैना का जहर नशीला रे

साप डसतो आणि जसा चावताना तो बरे-वाईट पाहत नाही, तसेच एकदा संशयाच्या विषाने भरले गेलेले डोळे विचारशक्तीलाही दाद देत नाहीत. जे विष त्यांच्या मनात भरले असते, त्याचीच नशा चढते आणि डोळ्यानाही त्या विषारी मनाची नजर मिळते.

नैना रात को चलते-चलते स्वर्गां में ले जावे

मेघ मल्हार के सपने बीजें हरियाली दिखलायें

नैनों की ज़ुबान पे भरोसा नहीं आता

लिखत पढत न रसीद न खाता सारी बात हवाई

पाऊस आणि हरियाली - हिरवाई??? हे संपन्नतेचे प्रतीक आहे. स्वर्ग म्हणजे काल्पनिक जागा, जिथे काळज्या नाहीत, सर्व आलबेल आहे. डोळ्यांवर जेव्हा अज्ञानाचा पडदा असतो, तेव्हा सर्व जगच रंगीत भासते. सुंदर दिसते. हा खरे तर आभास आहे. अशा वचनांचा कुणी साक्षीदार नाही. ज्या डोळ्यांना त्यांच्या मनाची साथ नाही, त्यांच्यावर भरवसा ठेवणे म्हणजे हवेत विरून गेलेल्या शब्दांना पकडण्याचा

व्यर्थ प्रयत्न करणे. डॉली एवढी दुबळी असते? तसे असते तर रंग, संस्कृती, रूप आणि प्रतिष्टा या सर्वात तिच्यापेक्षा वेगळे असणार्‍या ओम्काराला, वडिलांच्या विरुद्ध जाऊन, तिने वरलेच नसते. ओम्कारावर तिचे अपार प्रेम तर असतेच, तसाच विश्वासही असतो. विश्वास हा केवळ ओम्कारावर नाही, तर स्वतःच्या निर्णयावर असतो. त्या निर्णयाला लागलेली ठेच ती सहन करू शकत नाही.

आपल्या प्रिय माणसाने घेतलेला संशय हा मृत्यूपेक्षाही भयावह असतो. परस्परांवरील अविश्वासाने नात्याला तडा जातो, तो कधीही सांधला जात नाही. शत्रूने जखम देणे सहन होऊ शकते, पण जेव्हा स्वतःची माणसेच दगा देतात, तेव्हा शरीरच नाही, तर मनही विझते. परक्या लोकांच्या अविश्वासाच्या नजरा टोचत नाहीत, पण आपल्या लोकांचा साधा कटाक्षसुद्धा जगण्यावरची श्रद्धा उडवतो.

ओम्काराच्या नाशाचे कारण फक्त असूया आणि संशय नाही, तर स्वत:बद्दल असलेली न्यूनतेची भावनाही त्याला कारणीभूत आहे . त्याच्या मनावर या भावनेचा एवढा पगडा आहे की डॉलीसारखी उच्चकु लीन, सुंदर तरुणी त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करू शकते हे तो मान्यच करू शकत नाही. ईश्वर त्यागी हे त्याच्या मनात ठसवण्यात यशस्वी होतो, कारण त्या भावना तिथे असतात.. खोल रुतलेल्या असतात.

या गीताचे चित्रीकरण मनाला हादरवून टाकते. ओम्कारावर खिळलेली डॉलीची प्रेमळ, लाजरी नजर, ज्यात प्रियकराविषयीचा आदर आणि विश्वास आहे. मग विश्वास तुटल्याची जाणीव, आपल्याच माणसाने नाकारल्याची वेदना, तिने केलेले समर्पण आणि  शेवटी मृत्यूला मूकपणे सामोरे जाणे हे सर्वच काळीज पिळवटून टाकणारे..

संशय खट झोटिंग महा

देऊ नका त्या ठाव जरा

हा संदेश देणारे, गुलझारजींचे हे गाणे, राहत फतेह अली खान यांनी गायलेले आहे.

9820067857