दर्जाशी तडजोड न करता, चोख व्यवहार ठेवत व्यवसायात नवा मापदंड निर्माण करता येतो, याचं उदाहरण म्हणजे चितळे बंधू यांचा व्यवसाय. दूध-दुग्धउत्पादनं असोत वा मिठाई-फरसाण, चितळे बंधू हा खाद्यपदार्थातला एक विश्वसनीय ब्रँड झाला आहे. अर्थात त्यामागे आहेत चितळे कुटुंबीयांच्या 4 पिढ्यांचे अपार कष्ट. त्याबरोबरच बाळगलेला नावीन्याचा ध्यास, रुचकर खाद्यपदार्थांची परंपरा जपताना धरलेली नवतंत्रज्ञानाची कास, व्यवसायाच्या विस्तारातही वेळेची जपलेली वाखाणण्याजोगी शिस्त आणि वास्तवाचं राखलेलं भान अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. यशस्वी ब्रँड घडत असतो तो या सगळ्याच्या मिश्रणातून.
विवेकच्या उद्योग विशेषांकाच्या निमित्ताने, चितळे बंधूंपैकी श्रीकृष्ण चितळे यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या संवादाला दिलेलं हे शब्दरूप.
परंपरा अपघाताने निर्माण होत नाही. दर्जात सातत्य राखलं गेलं की त्यातून परंपरा निर्माण होते. व्यवसायाशी आणि ग्राहकांशी असलेल्या बांधिलकीतून निर्माण होते. तशी परंपरा चितळे बंधूंनी निर्माण केली, म्हणूनच त्यांचं नाव पुणे शहराचीच नाही, तर देशाची वेस ओलांडून जगभर पोहोचलं. जगाच्या नकाशात जिथे जिथे मराठी माणूस पोहोचला, तिथे तिथे तो चितळ्यांची उत्पादनं घेऊन गेला. ग्राहकच त्यांचा ब्रँड अॅम्बॅसॅडर झाला. हा ग्राहक वर्ग त्यांच्याशी पक्का बांधलेला आहे तो राखलेल्या दर्जामुळे. आज बाजारपेठेत वेगवेगळ्या ब्रँडची बाकरवडी उपलब्ध असली, तरी अद्यापही चितळेंच्या बाकरवडीला तिच्या तोडीचा पर्याय निर्माण झालेला नाही. बाकरवडी हे एक उदाहरण झालं. त्याव्यतिरिक्तही चितळ्यांकडचे असे अनेक पदार्थ आहेत की त्यांना त्यांच्या तोडीचा पर्याय आजही बाजारात उपलब्ध नाही.
1939च्या सुमारास सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी येथे रघुनाथराव चितळे यांच्या वडिलांनी दूध व्यवसायाला सुरुवात केली. ही या घराण्याच्या व्यवसायाची गंगोत्री. नंतर 1950च्या दरम्यान रघुनाथराव चितळे पुण्यात राहायला आले आणि त्यांनी तिथे मिठाईच्या व्यवसायाला सुरुवात केली. मिठाईवाले चितळे बंधू अशी त्यांच्या ओळखीत नवी भर पडली. चितळेंचे पदार्थ चोखंदळ आणि चवीचं खाणार्या पुणेकरांच्या पसंतीस उतरले आणि तिथून पुढे दूध-दुग्धोत्पादक व्यवसायाइतकाच हा व्यवसायही जोरात चालू लागला. 1970मध्ये आलेल्या त्यांच्या बाकरवडीने तर खवय्यांच्या हृदयात कायमचं स्थान पटकावलं.
भिलवडी येथील दूध व्यवसाय असो वा पुण्यातील मिठाईचा व्यवसाय, दोन्ही व्यवसायांची पायाभूत तत्त्वं समान आहेत. मूल्यांकन (evaluation), सक्षमीकरण (empowerment), सह अनुभूती (empathy)) आणि उत्तमता ( excellence) या 4 खांबांवर त्यांच्या कामाचा डोलारा उभारलेला आहे. ही मूल्यं केवळ कागदोपत्री नमूद केलेली नाहीत, तर कृतीतून सामोरी येतात, म्हणून त्यांचं महत्त्व.
तयार होणार्या पदार्थाविषयी ग्राहकाकडून फीडबॅक घेत राहणं, आलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेऊन त्यानुसार बदल करणं आणि देशातल्या अन्य प्रांतांमध्ये प्रवास करत असताना तिथल्या मिठाईच्या दुकानांना भेट देण्यासाठी खास वेळ राखून ठेवणं, तिथल्या विशेष पदार्थांची खासियत समजून घेणं, नवीन पदार्थाविषयी जाणून घेणं हे नेहमी चालू असतं. वर्षानुवर्षं तयार होणार्या पदार्थांच्या दर्जाइतकंच, मूल्यांकनाला आणि नावीन्याला दिलेलं महत्त्व चितळेंना व्यवसायात अग्रेसर राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.मूल्यांकनाला पर्याय नाही
सक्षमीकरण ही कर्तव्यापेक्षाही जबाबदारी
कर्मचारिवर्गाचं आणि दूध व्यवसायामुळे जोडल्या गेलेल्या शेतकर्यांचं सक्षमीकरण करण्याला चितळेंनी कायम प्राधान्य दिलं आहे. ‘आपल्याशी कामानिमित्ताने जोडल्या गेलेल्या व्यक्तीच्या सक्षमीकरणाची जबाबदारी आपली आहे’ ही भावना त्यामागे आहे. कर्मचार्यांच्या आरोग्याचा विषय असो वा त्यांच्या घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असो, तो सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. दुधाचा पुरवठा करणार्या शेतकर्यांना म्हैस घेण्यासाठी 37 टक्के सब्सिडी दिली जाते. मात्र म्हशींची निवड ठरलेल्या निकषानुसार चितळे करतात. जनावरांचा इन्शुरन्स काढला जातो. दूध व्यवसायात म्हशींच्या कृत्रिम गर्भधारणेवर भर दिला आहे. सुरुवातीला शेतकर्यांना ही गोष्ट पटत नव्हती. मात्र आलेल्या अनुभवातून त्यांना त्याचं महत्त्व समजलं आहे. जनावरांचा सगळा डेटाबेस तयार असतो आणि डॉक्टरही कायम ऑनलाइन उपलब्ध असतो. शेतकर्यांकडून विचारणा झाली की त्यांना तत्काळ ऑनलाइन सल्ला दिला जातो.
या गोष्टींबरोबरच गावांमधून शौचालयांची उभारणी करणं आणि गरजूंना शैक्षणिक मदत करणं ही लोकापयोगी कामंही चितळे समूहाकडून केली जातात.
सह अनुभूतीतून बंध मजबूत करणं
व्यवसायातील सहकारी घटकांच्या जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी सातत्याने केले जाणारे प्रयत्न हे चितळे उद्योग समूहाचं आणखी एक वैशिष्ट्य. हीच सहअनुभूती अर्थात एारिींहू. या भावनेतूनच गावागावांत गोबर गॅस बनवण्याचं प्रशिक्षण देणं, दुष्काळाच्या कालावधीत जनावरांसाठी छावण्या उभारणं, या संदर्भातल्या सरकारी मदतीच्या योग्य वितरणाकडे लक्ष ठेवणं आणि छावणीतल्या जनावरांची काळजी घेणं ही जबाबदारीही घेण्यात येते. त्याचबरोबर तयार पदार्थांचा पुरवठा करणार्या व्यक्तीला त्याच्या व्यवसायात उभं राहण्यासाठी प्रोत्साहन देणं, आर्थिक मदत करणं हेही केलं जातं. (त्यांचे पुरवठादार ही गोष्ट आवर्जून नमूद करतात, हे विशेष!)
उत्तमता हा यू.एस.पी.
काहीही झालं तरी दर्जात तडजोड नाही हे धोरण चितळे उद्योग समूहाने काटेकोरपणे पाळलं आहे. त्यांचं कोणतंही उत्पादन खरेदी केल्यावर त्याची प्रचिती येतेच येते. दुकानांमधल्या प्रत्येक पदार्थाचं प्रयोगशाळेत परीक्षण करणं शक्य नसतं. कारण त्याचे निष्कर्ष यायला जो वेळ लागतो, तितका काळ पदार्थ टिकेल याची शाश्वती नसते. म्हणूनच त्याऐवजी ग्रहकांना/कर्मचार्यांना पदार्थांची चव पाहायला सांगून त्यांच्याकडून फीडबॅक घेण्याची पद्धत अवलंबली जाते.
दर्जातलं सातत्य राखण्यासाठी, पदार्थ बनवताना जे घटक पदार्थ लागतात त्यांचा पुरवठा करणारेही दीर्घकाळापासून बांधलेले आहेत. त्यांच्याकडच्या मालाची पारख केल्यावर आणि त्यांनी दर्जातलं सातत्य टिकवल्यामुळेच पदार्थांचा दर्जा राखणं शक्य झालं. जे पदार्थ बाहेरून तयार करून घेतले जातात, त्यांनाही लागणारा कच्चा माल या पुरवठादारांकडूनच घ्यावा ही अट असते. ही अट पाळण्याकडे कटाक्ष असतो. तयार झालेल्या या साखळीतून पदार्थांचं प्रमाणीकरण झालं आहे. पदार्थाच्या दर्जावर त्याचा दूरगामी आणि अनुकूल परिणाम झाला आहे.
तंत्रज्ञानाची साथ मोलाची
पदार्थांची मागणी वाढायला लागल्यावर ते हाताने करणं आणि त्यातून ठरलेल्या वेळेत प्रचंड मागणीची पूर्तता करणं हे आवाक्याबाहेरचं काम होतं. त्याचा दर्जावर परिणाम झाला असता आणि चवीत फरक पडण्याचीही शक्यता होती. यावर उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यायचं ठरवलं. त्यासाठी वेगवेगळ्या इंडस्ट्रीत विविध कामांसाठी वापरली जाणारी यंत्रं आणून त्यात आवश्यक ते बदल करून वापरायला सुरुवात केली. त्याच्यात यश आलं आणि त्यातून उत्पादनाच्या आकारमानात आणि वेगातही कमालीची वाढ झाली. आज चितळेंची बाकरवडी जशी यंत्राच्या साहाय्याने तयार होते, तसंच चिवडा, गुलाबजाम, पेढे, लाडू आदी पदार्थांसाठीही यंत्रांचीच मदत घेतली जाते.
आज दिवसाला 7 ते 8 टन बाकरवडी बनतेे. 25 टक्के निर्यात होते आणि बाकी सगळी स्थानिक बाजारपेठेत आणि महाराष्ट्रभर जाते.
चोख आणि वेळच्या वेळी आर्थिक व्यवहारचितळे उद्योग समूह केवळ पदार्थ तयार करण्यापुरती आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत नाहीत, तर सर्व ठिकाणी झालेलं संगणकीकरण, दुग्धोत्पदनासाठी स्वीकारलेला म्हशीच्या कृत्रिम गर्भधारणेचा पर्याय असे त्याचे वैविध्यपूर्ण आयाम आहेत.
चितळे समूहाशी संबंधित सर्व प्रकारच्या पुरवठादारांची बिलं दर आठवड्याला देण्याचा शिरस्ता आहे. भले समोरच्या व्यक्तीने दोन महिन्यांची मुदत दिली असली, तरी सोमवारपर्यंत आलेल्या मालाचं पेमेंट बुधवारी झालं पाहिजे असा दंडक आहे आणि काही झालं तरी त्यात बदल होत नाही. जे दुकानाच्या बाबतीत, तेच फॅक्टरीतही. सगळीकडे साप्ताहिक पेमेंट होतं. दूध पुरवठा करणार्या शेतकर्यालाही दर आठवड्याला पेमेंट केलं जातं. वास्तविक शेतकर्याकडून पुरवठा होणार्या दुधाचा दर्जा रोज वेगळा असतो. त्यामुळे त्याला दिल्या जाणार्या पैशाचा हिशेब करणं हे अधिक वेळखाऊ, किचकटही असतं. तरीही आठवड्यानेच बिल देण्याची शिस्त तिथेही पाळली जाते.
वेळेची शिस्त
वेळेची शिस्त पाळणं हे चितळेंच्या डी.एन.ए.मध्येच असावं. केवळ दुकान चालू/बंद करण्यापुरती ती शिस्त मर्यादित नाही, ती प्रत्येक बाबतीत पाळली जाते. जशी आर्थिक व्यवहारात पाळली जाते, तसं भेटीसाठी दिलेल्या वेळेचंही काटेकोर पालन होतं. ही शिस्त वरपासून खालपर्यंत झिरपली आहे. जेव्हा नेतृत्वाकडून याचं काटेकोर पालन होतं, कधीही त्यातून सवलत घेतली जात नाही, तेव्हा कर्मचार्यांना वेगळं काही सांगायची गरज भासत नाही. सकाळी 9 वाजता भेटीची वेळ दिली असेल तर ती 8.59ला होणार नाही वा 9.01ला होणार नाही. वेळ पाळण्याच्या बाबतीत भारतीय इतके बदनाम असताना, चितळेंचं उदाहरण हे एकमेवाद्वितीय ठरावं.
दुकानांत व फॅक्टर्यांमध्ये असलेला साडेपाचशेहून अधिक असा कर्मचारिवर्ग, भिलवडीजवळचे अनेक शेतकरी असं चितळे उद्योग समूहाचं भलंथोरलं कुटुंब आहे. एवढा मोठा पसारा सांभाळतानाही कोणत्याही तत्त्वांना तिलांजली द्यायला लागत नाही, याचा वस्तुपाठ या उद्योगाने घालून दिला आहे.
आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारी पाचवी पिढी आता उद्योगात उतरली आहे. चार पिढ्यांनी घालून दिलेल्या परंपरांचा वारसा समर्थपणे पेलतानाच, नवताही आणेल याची खात्री आहे. कारण नवता हीदेखील चितळेंची परंपराच आहे.
चितळे उद्योग समूहाच्या यशामागच्या वैशिष्ट्यांची ही एक झलक. यातली बहुतेक कोणत्याही उद्योगाला लागू होऊ शकतील अशी आणि त्यामुळे तो उद्योग भरभराटीला येण्याची खात्री होईल अशी.