जागतिक स्त्री चळवळीचा वेध घेऊन स्थानिक प्रश्नांची सोडवणूक, असलेली आव्हाने, एकेकाळचा उदात्त वैचारिक ठेवा, पण व्यवहारात झालेली अवनती, पुरुषसत्ताकता, जातिव्यवस्था यांचे खोलवर झालेले दुष्परिणाम, स्त्री-पुरुष सौहार्दावर आधारित समानतेची मांडणी यांचा वेध घेणारी 'भारतीय स्त्री विमर्श' ही दोन दिवसांची सेमिनार नुकतीच 23-24 मार्च 2019ला दिल्लीत पार पडली.
गेल्या दोनशे वर्षांत 'स्त्री' विश्वात मोठीच घुसळण झाली आहे. स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांचे अधिकार हे विषय जगाच्या पटलावर महत्त्वाचे ठरले. भारतही त्याला अपवाद नाही. 'स्त्री' ही जन्माला येत नाही, तर संस्कृतीने घडते, घडवली जाते हे त्यातले महत्त्वाचे सूत्र! खरे तर पुरुषही संस्कृतीनेच घडवले जातात. मात्र संस्कृती वेगळी, जगभर बोलबाला, प्रभाव, मान्यता आहे ती पाश्चिमात्य स्त्रीवादाची! 'प्रत्येक देशाची स्वत:ची प्रश्नपत्रिका असते' असे टागोरांनी म्हटले होते. याचाच अर्थ प्रत्येक देशाने उत्तरेही स्वत: शोधायची असतात. स्त्रियांचे प्रश्न जर 'संस्कृतीजन्य' असतील, तर त्यांची उत्तरेही त्या संस्कृतीने शोधली पाहिजेत. एतद्देशीय विचारवंतांची ती जबाबदारी आहे.
भारतीय स्त्रियांच्या प्रश्नाबाबत विचार करायचा झाला, तर पुरातन शाश्वत मूल्यांच्या आधाराने वर्तमान प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. जागतिक स्त्री चळवळीचा वेध घेऊन स्थानिक प्रश्नांची सोडवणूक, असलेली आव्हाने, एकेकाळचा उदात्त वैचारिक ठेवा, पण व्यवहारात झालेली अवनती, पुरुषसत्ताकता, जातिव्यवस्था यांचे खोलवर झालेले दुष्परिणाम, स्त्री-पुरुष सौहार्दावर आधारित समानतेची मांडणी यांचा वेध घेणारा 'भारतीय स्त्री विमर्श' ही दोन दिवसांची सेमिनार नुकतीच 23-24 मार्च 2019ला दिल्लीत पार पडली. देशभरातले दीडशे अभ्यासक, प्राध्यापक, कार्यकर्ते, पत्रकार या विमर्शामध्ये उपस्थित होते.
दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र पुणे व आर्यभट्ट कॉलेज दिल्ली यांच्यातर्फे आयोजित सेमिनारमध्ये डॉ. मनीषा कोठेकर यांनी बीजभाषण (की नोट ऍड्रेस) केले. भारतीय संस्कृती ही एकात्म विचार, समावेशकता व पूरकता या तत्त्वांवर आधारलेली आहे. स्त्रीहित व परिवारहित किंवा समाजहित यामध्ये द्वैत नाही, नसावे. व्यवहारात आलेल्या विषम रूढी-परंपरा टाकून दिल्या पाहिजेत. पुरुषसत्ताकतेचा विरोध म्हणजे पुरुष विरोध नव्हे, तर स्त्री-पुरुष सामंजस्य व सौहार्द हाच आधुनिक समाजाचा पाया व विश्वकल्याणाकडे नेणारा मार्ग आहे. जाती, धर्म, वर्ग हे भेद सोडून नवीन संहिता घडवण्याचे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.
उद्घाटक मा. स्मृती इराणी यांनी विवेकानंदांनी मांडलेल्या विचारांचा उल्लेख केला. 'स्त्रियांना शिक्षण द्या, त्यांचे प्रश्न सोडवायला भारतीय स्त्रिया समर्थ आहेत.' पण वास्तवात मात्र समान शिक्षण किंवा उच्च शिक्षण स्त्री सन्मानाची दृष्टी देतेच असे नाही. कुटुंबरचना स्त्रियांच्या उत्थानाची हमी देत नाहीत, ज्याची आज गरज आहे. मानवी संस्कृती ही कुटुंबकेंद्री आहे. ते केंद्र सक्षम झाले, तर स्त्री सक्षम होईल. कुटुंबाचे एकीकरण होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
भारतीय दर्शनामध्ये आत्मा अमर आहे, लिंग नाही, आत्मा कधी स्त्री देह तर कधी पुरुषदेह धारण करतो अशी मांडणी आहे. मात्र स्त्री आणि पुरुष यांमध्ये अभेद्य भिंती नसतात. पुरुषामध्ये 'स्त्री'तत्त्व आणि 'स्त्री'मध्ये 'पुरुष'तत्त्व वास करते याचा स्वीकार आणि उच्चार अर्धनारीनटेश्वर संकल्पनेत आढळतो.
- डॉ. भगवतीप्रसाद
दोन दिवसांच्या या सेमिनारमध्ये पाश्चात्त्य स्त्रीवादाची पृष्ठभूमी, परिवेश, प्रवाह, पौर्वात्य तत्त्वज्ञान व स्त्रीवादाचे प्रवाह, भारतीय मूळ चिंतन, तत्त्वज्ञान आणि संस्कृती, भारतीय दृष्टीकोनातून समकालीन प्रश्नांचा वेध, सामाजिक संरचना आणि स्त्रियांची स्थिती, स्त्रीत्व, स्त्रीवाद आणि मातृत्वापुढील आव्हाने अशा सत्रांमधून स्त्रीवादी चळवळीच्या इतिहासाचा व आव्हानांचा वेध घेण्यात आला. पुरुषसत्ताकता, लिंगभाव समानता, स्त्रीत्व आणि स्त्रीवाद या संकल्पनांबद्दल मांडणी व त्यांची जागतिक व भारतीय परिभाषा यांचाही सखोल वेध घेण्यात आला. (एकांगी मांडणी, जुन्याचा उदोउदो, प्रश्नांचे सुलभीकरण, प्रतीकात्मकता)
कालसुसंगत प्रकटीकरण
पाश्चिमात्य स्त्रीवादाच्या मांडणीवर झालेले ख्रिश्चन धर्मशास्त्र, हेगेलची अधिकारांच्या तत्त्वज्ञानाची मांडणी, ऍरिस्टॉटल, जे.एस. मिल, माक्र्स यांची मांडणी, कॅनन लॉ यांचे परिणाम प्रफुल्ल केतकर यांनी मांडले. व्यक्तिवाद, अस्तित्ववाद, उपयुक्ततावाद, फ्रेंच राज्यक्रांती, व्यक्ती विरुध्द चर्च, व्यक्ती विरुध्द राज्य, माणूस विरुध्द निसर्ग, आस्तिक-नास्तिक यांचा स्त्रीवादी मांडणीवर झालेला परिणाम, मातृत्व व स्त्रीत्व नाकारणारी प्रतिक्रिया, जागतिकीकरणाचे आणि नवभांडवलशाहीचे परिणाम यांचा लेखाजोखा त्यांनी घेतला. प्रश्नांचे सार्वभौमीकरण टाळून सांस्कृतिक मूल्ये व त्यांचे कालसुसंगत प्रकटीकरण यांची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली.
या सत्राचे अध्यक्ष डॉ. व्ही.के. मल्होत्रा यांनी आजच्या 'स्त्री' प्रतिपादनाचा रोख 'स्त्री शरीराकडून' स्त्रीत्वाकडे - म्हणजे 'सेक्स'कडून 'जेंडर'कडे नेण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.
पौर्वात्य तत्त्वज्ञान आणि स्त्री विमर्श
'पौर्वात्य तत्त्वज्ञान आणि स्त्री विमर्श' या सत्रामध्ये वक्त्या वीणा सिक्री यांनी पौर्वात्य, अतिपौर्वात्य, आशियाई देशांमधील स्त्रियांची शैक्षणिक, आर्थिक, आरोग्यविषयक व राजकीय स्थितीचा आढावा घेतला, तर अध्यक्ष डॉ. शैलेंद्र मेहता यांनी भारतीय संस्कृतीचा पौर्वात्य देशांवर झालेला परिणाम, बौध्द व कन्फ्युशिअसचे तत्त्वज्ञान यांची स्त्रियांच्या स्थितीवर झालेला परिणाम यांचा परामर्श घेतला. ‘Three obediences and four virtues’ - स्त्रियांसाठीच्या तीन आज्ञा आणि चार सद्गुण यांचा चीन, जपान, कोरिया यांच्या संस्कृतीत 'पुरुषप्रभाव' वाढवणारा हातभार कसा लागला व आजही हा भेदभाव कसा टिकून आहे, कम्युनिझमच्या प्रभावानंतर कुटुंबव्यवस्थेमध्ये कशी पोकळी निर्माण झाली आहे, याचा ऊहापोह आणि भारतीय कौटुंबिक संबंधांमधली पारस्पारिकता त्याला उत्तर असू शकते, असे प्रतिपादन केले.
'भारतीय मूळ चिंतन'
'भारतीय मूळ चिंतन' असा विषय गौतम बुध्द विश्वविद्यालयाचे कुलगुरु डॉ. भगवतीप्रसाद यांनी मांडला. भारतीय मूळ चिंतनात स्त्री-पुरुष समानता अनुस्यूत आहे, कारण दोघांमध्येही एकच चेतना वास करते, ही मांडणी. भारतीय दर्शनामध्ये आत्मा अमर आहे, लिंग नाही, आत्मा कधी स्त्री देह तर कधी पुरुषदेह धारण करतो अशी मांडणी आहे. मात्र स्त्री आणि पुरुष यांमध्ये अभेद्य भिंती नसतात. पुरुषामध्ये 'स्त्री'तत्त्व आणि 'स्त्री'मध्ये 'पुरुष'तत्त्व वास करते याचा स्वीकार आणि उच्चार अर्धनारीनटेश्वर संकल्पनेत आढळतो. वेदांमध्ये समानतेचा उच्चार करणारे अनेक मंत्र आहेत, हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. एकात्म मानवदर्शन, व्यक्तीपासून समष्टी व परमेष्टीपर्यंत प्रवास आणि व्यक्तिकल्याण व समाजकल्याण कधीही एकमेकांच्या विरोधी मानलेले नाही, हे भारतीय जीवन चिंतन आहे. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. उमा वैद्य यांनी या सत्राचे अध्यक्षपद भूषवले.
मातृत्व ही नैसर्गिक प्रेरणा असली, तरी विकसित जगातली माता, विकसनशील देशातील माता, शहरी माता, ग्रामीण, दलित, वनवासी माता, यांच्यापुढचे प्रश्न व आव्हाने वेगळी आहेत. म्हणूनच समन्यायाची मांडणीही समानतेच्या व समन्यायाच्या चौकटीतून तपासली पाहिजे.
- डॉ. चंद्रकला पाडिया
अधिकार आणि कर्तव्य, पारस्पारिकता व परिवार कल्याण यांवर आपली कुटुंब संरचना आधारित आहे. Cosmic Conciousness - ब्रह्मांडचेतना त्यात भरून राहिली आहे, असे भगवतीप्रसाद म्हणाले, तर विज्ञानाचे सिध्दान्त वैश्विक असतात, समाजशास्त्रात तसे नसते. परिस्थिती, पार्श्वभूमी ही बदलत असते. जेव्हा इतिहास उपलब्ध नसतो तेव्हा भाषा आणि साहित्य, शब्दांची व्युत्पत्ती इतिहासाचे कार्य करतात. प्राचीन संस्कृत भाषेत अनेक शब्द मूळ स्त्रीवाचक आहेत. पुरुषवाचक शब्दाचे स्त्रीरूप नव्हते, हे स्त्री-पुरुष समानतेचे द्योतक आहे, असे त्या म्हणाल्या. भारताला 5000 वर्षांची परंपरा आहे. काळाच्या ओघात भूगोल बदलला, संस्कृती बदलली, पण स्त्रीविषयी मूलभूत समानतेचा व सन्मानाचा दृष्टीकोन लोभस आहे, तो टिकूनही आहे.
भारतीय विचार व संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यात
या भारतीय विचार व संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यात आजच्या स्त्रीप्रश्नांना कसे सोडवता येईल याचे विवेचन डॉ. अनिरुध्द देशपांडे यांनी केले. मूल्यचिंतन शाश्वत आहे. परिवेश बदलता असतो, तात्कालिक असतो. म्हणूनच परिवर्तनीय असतो. जीवन तत्त्वज्ञान, जीवन मूल्य आणि जीवन व्यवहार हे भारतीय समाजाचे तीन पैलू आहेत. शेकडो वर्षांच्या जीवन व्यवहारात परकीय आक्रमणांनी झालेले अध:पतन हा त्याज्य विषय आहे. त्यात युगानुकूल परिवर्तन व्हायला हवे. भारतीय समाजरचना ही अखंड मंडलाकार आहे. व्यक्ती-परिवार-समाज-राष्ट्र-विश्व आणि सृष्टी अशी ती प्रवाही रचना आहे. ती एकमेकांना छेद देत नाही. ही रचना परस्परावलंबी, परस्परसंबंधी व परस्परपूरक आहे. एकमेकांना छेद देणारी नाही.
स्त्री-पुरुषांच्या संदर्भातही ती पूरक समानता - Complimentary Equality आहे. एक पक्ष्याचे एका गतीने एकाच क्षमतेने उडणारे पंख असावेत तसे. फेमिनिझममधली श्रेष्ठत्वाची, अहंकाराची किंवा बळी गेल्याची भावना त्यात नाही. भारतीय संस्कृतीने स्त्रीला विकास प्रक्रियेत सहभागी करून घेतलेले आहे. आज मल्टिपल मॉडर्निटीबद्दल बोलले जाते. बहुरंगी, बहुपेडी आधुनिकता ही राहाणी, कपडे, भाषा यापुरती मर्यादित नाही, तर विचार, कृती, नीतिनिर्धारण, निर्णयप्रक्रिया यामध्ये दिसायला हवी. स्त्री-पुरुष समानता ही तत्कालिक नाही. ते नुसते ध्येयही नाही, तर ते जगण्याचे तत्त्वज्ञान बनायला हवे. तरच रोजच्या जगण्यातले स्त्री सुरक्षा वस्तुकरण, औपनिवेशक दृष्टीकोन, स्त्रियांचे अधिकार असे प्रश्न मार्गी लागतील. दोष संस्कृतीचा नाही, तर आचरणाचा आहे.
भारतीय समाजरचना ही व्यक्ती-परिवार-समाज-राष्ट्र-विश्व आणि सृष्टी अशी प्रवाही रचना आहे. ती एकमेकांना छेद देत नाही. ही रचना परस्परावलंबी, परस्परसंबंधी व परस्परपूरक आहे. एकमेकांना छेद देणारी नाही. स्त्री-पुरुषांच्या संदर्भातही ती पूरक समानता - Complimentary Equality आहे. फेमिनिझममधली श्रेष्ठत्वाची, अहंकाराची किंवा बळी गेल्याची भावना त्यात नाही. भारतीय संस्कृतीने स्त्रीला विकास प्रक्रियेत सहभागी करून घेतलेले आहे.
- डॉ. अनिरुध्द देशपांडे
मुंबई एसएनडीटी महाविद्यालयाच्या कुलगुरू डॉ. शशी वंजारी यांनी या चर्चासत्राचे अध्यक्षपद भूषवले. प्रत्येक क्रियेला समांतर व सकारात्मक प्रतिक्रिया हा सृष्टीचा नियम आहे. सृष्टिचक्राच्या अंतर्गत संस्कृती व समाजरचना आहे. त्यामुळे पारस्पारिक समजूत, सहकार्य आणि सहभाग यावर आधारित रचना टिकून राहील. ही रचना म्हणजेच समानता व सन्मानाचा मार्ग आहे, असे त्या म्हणाल्या.
सामाजिक व्यवस्था, अवनती आणि स्त्रियांची स्थिती
'सामाजिक व्यवस्था, अवनती आणि स्त्रियांची स्थिती' या सत्रामध्ये स्त्रियांची वास्तविक स्थिती हा विषय मांडला डॉ. रजनीश शुक्ला यांनी! भक्त फुलसिंग महिला विश्वविद्यालयाच्या कुलगुरू डॉ. सुषमा यादव सत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या. या सत्रात सनातन धर्म व वैदिक काळातील स्त्रियांचे स्थान, समाजव्यवस्था कशी होती, स्त्रियांचे स्थान काय होते? महिलांना कोणते अधिकार होते, स्मृतीकाळात, आक्रमण काळात त्यांचे स्खलन का व कसे झाले, कुटुंबात व समाजात स्त्री-पुरुषांमधले सत्तासंबंध कसे होते, पुरुषसत्ताकतेचा कोणता परिणाम पती-पत्नी संबंधांवर झाला, कुटुंबरचनेचे बदलते स्वरूप, उदात्त मूल्ये पण वर्तन, व्यवहार मात्र अनुदार यामुळे स्त्री सन्मानावर झालेला परिणाम अशा मुद्दयांवर चर्चा झाली.
स्त्रियांची वर्तमान स्थिती आणि आव्हाने
'स्त्रियांची वर्तमान स्थिती आणि आव्हाने' हा विषय काशी विश्वविद्यालयातल्या व्याख्यात्या डॉ. चंद्रकला पाडिया यांनी मांडला. स्त्रीत्व, मातृत्व आणि स्त्रीवादापुढील आव्हाने यांचा विचार त्यांनी मांडला. मातृत्व ही नैसर्गिक प्रेरणा असली, तरी विकसित जगातली माता, विकसनशील देशातील माता, शहरी माता, ग्रामीण, दलित, वनवासी माता, यांच्यापुढचे प्रश्न व आव्हाने वेगळी आहेत. म्हणूनच समन्यायाची मांडणीही समानतेच्या व समन्यायाच्या चौकटीतून तपासली पाहिजे. स्त्री-पुरुष समानता केवळ संविधानामुळे व कायद्यांमुळे निर्माण करता येणार नाही. त्यासाठी समरस दृष्टीकोन प्रस्थापित व्हायला हवा. समानता ही नैसर्गिक फरक आणि जबाबदाऱ्या (Differences), तसेच स्त्री-पुरुषांची वैशिष्टये (Distinction) या परिप्रेक्ष्यातून जोपासली पाहिजे, ही काळाची गरज आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. बजरंगलाल या सत्राचे अध्यक्ष होते. विविधता हे भारतीय समाजाचे वैशिष्टय आहे, त्यामुळे समस्यांची उत्तरे शोधताना याचे भान ठेवावे लागेल. प्रश्नांपासून दूर पळून प्रश्न सुटणार नाहीत. प्राचीन विमर्श प्रमाण मानून नवे प्रश्नच नाहीत, असे म्हणून चालणार नाही. आपल्या विचारात जडता येऊन चालणार नाही. वर्तमान परिस्थिती, प्रश्न, स्त्रियांच्या आकांक्षा यांचा विचार, देश, काल, परिस्थिती अनुकूल विमर्श, परिवर्तनीय व लवचीक भूमिका यावर आधारलेला नवा विमर्श घडवणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.
मा. गीता गुंडे यांनी या दोन दिवसीय सेमिनारचा समारोप केला. सरकार्यवाह मा. भैयाजी जोशी या सत्रात उपस्थित होते.
ही सेमिनार म्हणजे भारतीय परिप्रेक्ष्यात स्त्री विमर्शाची सुरुवात आहे. हा केवळ स्त्रियांचा विचार नाही, तर सौहार्दपूर्ण कुटुंबाचा व समाजाचा विचार आहे. स्त्री-पुरुष समानतेवर आधारलेला मानवतेचा विचार आहे. कुटुंबाच्या सहकार्याशिवाय हा बदल घडणार नाही. स्त्रियांचे अधिकार जितके महत्त्वाचे, तितकी कर्तव्येही महत्त्वाची. स्त्रियांना देवत्वाची चौकट नको आहे, त्या दासीही होणार नाहीत. स्त्री विमर्श म्हणजे त्याच्या माणूसपणाबद्दलचा विमर्श आहे, असे मा. गीताताई म्हणाल्या.
कुटुंब हा भारतीय समाजाचा मूळ आधार
कुटुंब हा भारतीय समाजाचा मूळ आधार आहे. त्यामुळे स्त्रिया, मुले, वृध्द असा वर्गीय विमर्श करणे योग्य होणार नाही. तो एकांगी होईल. मातृत्व ही सर्जनाची अनुभूती, संवेदना आहे, ती जेंडरशी संबंधित नाही, भावना आहे. म्हणून प्राचीनतेचे अंधानुकरण आणि अतिगौरव, पश्चिमी विचारांनी घाबरून जाणे किंवा आधुनिकतेचे दास न होता संतुलित स्त्री विमर्श ही काळाजी गरज आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
भारतीय जीवन व्यवस्थेत स्त्री-पुरुषांचे आचरण आणि जीवनमूल्ये यात मेळ साधणे म्हणजे समानता. पुरुषांची भूमिका, सहभागही त्यात असायला हवा. काळानुरूप बदल करायला हवा असे मा. भैयाजी जोशी म्हणाले. या सेमिनारमध्ये दीडशे स्त्री-पुरुषांनी भाग घेतला. जगातल्या वेगवेगळया भागातल्या स्त्री विमर्शाबद्दल चर्चा झाली. भारतीय परिप्रेक्ष्य ठोसपणे व साधार मांडण्याची, त्याबाबत लेखन करण्याची आवश्यकता, भारतीय विमर्शाची सैध्दान्तिक मांडणी आणि काळाच्या कसोटीवर घासून त्याची ठोस मांडणी, पश्चिमी विमर्शाची ताकद व त्यातल्या कमतरता भरून काढण्यासाठी पारस्परिकता व पूरकता हे पर्याय स्त्री विमर्शात आणण्याची आवश्यकता अधोरेखित झाली.
डॉ. रश्मी सिंगदास - लिंगभाव समानता, पुरुषसत्ताकता, संध्या जैन (पत्रकार) स्त्रीत्व आणि स्त्रीवाद - डॉ. आरती व्ही. या संकल्पना, त्यांचे लाक्षणिक अर्थ व प्रचलित विमर्श यावरील समांतर सत्रे थेटपणे विषयाला भिडणारी होती. धर्म - जातिव्यवस्था - दलित स्त्रिया किंवा आफ्रिकी स्त्रिया, मुस्लीम स्त्रिया यांचा विचार बारकाईने येऊ शकला नाही, पण त्यांचा पगडा, प्रभाव, परिस्थिती यांचा संदर्भ विषय मांडणीत आला. 'पश्चिमी' म्हणून त्याज्य किंवा 'प्राचीन' ते ते उत्तम असा अभिनिवेश सेमिनारच्या आयोजनात नव्हता. होती ती पश्चिमी, पौर्वात्य व भारतीय स्त्री विमर्शातल्या समन्वयाची भूमिका!
एकांगी मांडणी, जुन्याचा उदो उदो, प्रतीकात्मकता आणि तुलना, प्रश्नांचे सुलभीकरण, आजचे प्रश्न जुन्या मापदंडांनी मोजण्याची कसरत यापासून ही सेमिनार दूर राहिली, हे तिचे ठळक यश! वेद, स्मृती, उपनिषदे, रामायण, महाभारत, साहित्य यांचा अन्वय लावतानाच जे त्याज्य वाटते त्याचे ओझे न बाळगता नव्या श्रुती लिहिण्याची - म्हणजे नवा डिस्कोर्स, नवा नॅरेटिव्ह घडवण्याची शक्यता या सेमिनारमधून समोर आली. त्याचे स्वागत व प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.
नयना सहस्रबुध्दे
9821319835