सरकारी योजनांचा लाभ घेऊन महिलांमधून अधिकाधिक उद्योजक पुढे यावेत, यासाठी एक समाजमन तयार होण्याची गरज आहे. यासाठी बाँबे स्टॉक एक्स्चेंज पुढाकार घेत आहे. मार्गदर्शपर बऱ्याच गोष्टी बाँबे स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून होत आहे. त्याचा लाभ महिलांना होईल, हा विश्वास बाँबे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौहान यांनी व्यक्त केला.
भारतात महिला उद्योजकता वाढीसाठी अनुकूल वातावरण आहे असं आपल्याला वाटतं का? ते अधिकाधिक अनुकूल होण्यासाठी काय होणं आवश्यक आहे?
भारतात महिला उद्योजकतेला पोषक वातावरण आहे. मात्र जगाचा विचार करता उद्योजकता वाढीला मर्यादाही खूप आहेत. स्वातंत्र्यानंतर आपण बऱ्याच अंशी सरकारनियंत्रित अर्थव्यवस्था स्वीकारली. शिवाय पुरुषप्रधान संस्कृती आपल्याकडे परंपरेने चालत आलेली असल्यामुळे स्त्रिया घरगुती कामांमध्ये मोठया प्रमाणावर गुंतलेल्या राहिल्या. महिलांचं उद्योगविश्व हे भाजीपाला विकणं, शिवणकाम अशा छोटया छोटया कामांपुरतंच मर्यादित राहिलं. उदारीकरणानंतरच्या गेल्या 25 वर्षांत भारतात स्त्रिया बंधनांतून बाहेर पडत आहेत. आता उद्योजकतेला जात-धर्म-वंश -लिंग यांची मर्यादा उरलेली नाही. अर्थात, भारतात महिला उद्योजकता वाढीसाठी अजूनही पूर्णपणे समाधानकारक वातावरणनिर्मिती झालेली नाही, ही खरी गोष्ट आहे. त्याचं कारण पाच हजार वर्षं जुना इतिहास असलेल्या आपल्या देशात अचानक बदल होऊ शकत नाही. त्याला काही काळ जावा लागतो. एकेकाळी भारतीय जनता शेतीमध्ये आणि हस्तोद्योगांमध्ये गुंतलेली होती. 'उद्योग' म्हणून त्याचा विस्तार होत नव्हता. आता शिक्षणाच्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ही गोष्ट शक्य झाली आहे. त्यामुळे महिला उद्योजकतेसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यात भारत आतापर्यंत बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. मात्र आणखी बराच प्रवास बाकी आहे.
एक वस्तुस्थिती अशी आहे की, भारताचा Female Labour Force Participation Rate कमी झाला आहे. म्हणजेच भारताची आर्थिक प्रगती जसजशी होत आहे, तसतसं रोजगारातलं स्त्रियांचं प्रमाण कमी होतंय. याचं एक कारण असं सांगितलं जातं की, एखाद्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली की त्या कुटुंबातली महिला पैसे कमवण्यापेक्षा घरी बसणं पसंत करते. भारतात स्त्रियांना शिक्षणाची संधी जरी मिळालेली असली, तरी चूल आणि मूल सांभाळण्याची जबाबदारी अजूनही त्यांच्यावर टाकली जात असल्यामुळे नवीन आव्हानं आणि जोखीम स्वीकारायला त्या चटकन तयार होत नाहीत. हा प्रश्न फक्त भारतातच आहे असं नाही. अनेक देशांमध्ये, विशेषत: दक्षिण आशियाई देशांमध्ये स्त्रियांवर सारखीच बंधनं आहेत. ही परिस्थिती सुधारून जास्तीत जास्त महिलांना Workforceमध्ये कसं आणता येईल, यासाठी भारताला आणखी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
उद्योजकता हा कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीचा पाया असतो. मग उद्योजक पुरुष असो वा महिला. पण भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात महिला उद्योजकतेचं काय विशेष महत्त्व आहे?
बाजारपेठेतल्या बऱ्याचशा वस्तूंची मागणी ही महिलांकरवी होत असते. त्यामुळे बाजारपेठ नेमकी कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे, याचा अंदाज महिलांना अधिक चांगल्या पध्दतीने असतो. महिलांमध्ये नैसर्गिकरीत्या असलेले काही गुण - उदा., कामसूपणा, कामावरची निष्ठा, यशाची आकांक्षा, उत्साह इ. उद्योगाच्या यशासाठी पोषक ठरतात. त्यामुळे जितक्या जास्तीत जास्त महिला उद्योग क्षेत्रात येतील, तेवढं हे क्षेत्र कार्यक्षम होऊ शकेल आणि तेवढी भारताची आर्थिक प्रगती वेगाने होईल. कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या नव्या नियमानुसार संचालक मंडळावर किमान एक महिला असणं अनिवार्य केलं आहे. अशा पदावर जेव्हा महिला येतात, तेव्हा त्या एक वेगळा दृष्टीकोन घेऊन येतात. उद्योगाकडे आणि परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टीकोन एकांगी होऊ नये, त्यात वैविध्य असावं आणि निर्णयप्रक्रियेत सर्व बाजूंचा विचार व्हावा, हा महिला संचालक अनिवार्य करण्याच्या निर्णयाचा हेतू आहे. सामाजिक समतेच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा आहे. जर एखादी महिला संचालक म्हणून उत्तम भूमिका निभावू शकत असेल, तर तिला योग्य संधी मिळायला हवी. महिलांचं क्षेत्र हे छोटी घरगुती कामं आणि छोटयामोठया नोकऱ्या एवढयापुरतंच मर्यादित नसून उच्चस्तरीय निर्णयप्रक्रियेतही त्या सहभाग घेऊ शकतात, हा एक संदेश समाजाला मिळाला आहे.
महिला उद्योजकता वाढीमध्ये वित्तसंस्थांनी नेमकी काय भूमिका बजावणं अपेक्षित आहे? 'बाँबे स्टॉक एक्स्चेंज'ची या बाबतीत काय भूमिका राहिली आहे?
महिला उद्योजकांना अर्थपुरवठयासाठी सरकारने मुद्रा योजनेसारख्या अनेक चांगल्या योजना तयार केल्या आहेत. अनेक बँकाही यासाठी उत्तमोत्तम योजना आणत आहेत. मात्र या योजनांचा लाभ घेऊन महिलांमधून अधिकाधिक उद्योजक पुढे यावेत, यासाठी एक समाजमन तयार होण्याची गरज आहे. बाँबे स्टॉक एक्स्चेंजनेही यासाठी पुढाकार घेतला आहे. स्टॉक एक्स्चेंजच्या इमारतीतच आमचं स्वत:चं Incubation Centre स्थापन केलं आहे. कॅनडाचं रायर्सन विद्यापीठ आणि सायमन फ्रेझर्स विद्यापीठ यांच्या सहयोगाने हे Incubation Centre चालवलं जातं. यामध्ये महिला उद्योजकांनी मोठया हाय-टेक उद्योगांमध्ये यावं, यासाठी कार्यक्रम आखले जातात. यामध्ये कायदेविषयक बाबी, अकाउंटिंगच्या बदलत्या पध्दती, तांत्रिक प्रशिक्षण असं अनेक बाबींचं प्रशिक्षण दिलं जातं. जगभरातल्या उद्योग क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींना इथे बोलावून त्यांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केले जातात. यशस्वी महिला उद्योजकांना या ठिकाणी अनुभवकथनाची संधी दिली जाते. नव्याने उद्योग क्षेत्रात प्रवेश केलेल्या महिलांना हवं ते मार्गदर्शन इथे मिळतं.
जगभरात प्रत्येक क्षेत्रात चाललेलं इनोव्हेशन आणि प्रचंड वेगाने बदलणारं तंत्रज्ञान यांच्याशी जुळवून घेण्यासाठी भारतीय महिला उद्योजकांनी काय करण्याची आवश्यकता आहे?
वास्तविक जगभर तंत्रज्ञानाच्या प्रगतीत महिलांचाच सहभाग जास्त राहिला आहे. संगणक अस्तित्वात आल्यानंतर सुरुवातीला अल्गोरिदम आणि सॉफ्टवेअर तयार करण्यात महिला मोठया प्रमाणात आघाडीवर होत्या. आज तंत्रज्ञानाच्या बदलाचा वेग खूप वाढला आहे. उद्योजक महिला असोत वा पुरुष, प्रत्येकालाच स्वत:ला अद्ययावत ठेवणं क्रमप्राप्त आहे. आज महिला आणि पुरुष यांच्या कार्यक्षमतेत फारसा फरक राहिलेला नाही. पुरुषांइतक्याच महिलाही मेहनतीने काम करतात. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं महिला उद्योजकांना अशक्य नाही.
पुढील दहा वर्षांमध्ये भारतात महिला उद्योजकतेच्या वाढीसाठी बीएसईची धोरणं काय असणार आहेत?
बाँबे स्टॉक एक्स्चेंजचे दोन Platforms आहेत. एक म्हणजे BSE SME Platform आणि दुसरा BSE Start-Up Platform. यापैकी BSE SME Platform हा छोटया, नव्या Non Hi-Tech उद्योगांसाठी आहे. या उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी या Platformवरून आवश्यक त्या वित्तीय सोयी पुरवल्या जातात. या platformद्वारे असंघटित क्षेत्रातील उद्योजकांना संघटित क्षेत्रात आणण्याचा बीएसईचा प्रयत्न आहे. या platformच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील महिला स्टॉक एक्स्चेंजशी जोडल्या जातील आणि त्यांना व्यवसायवृध्दीची संधी मिळेल. दुसऱ्या Platformमध्ये मोठया Hi-Tech कंपन्यांची नोंदणी होते. या दोन्ही Platformsवर जास्तीत जास्त महिला उद्योजक कशा सहभागी होतील, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने बाँबे स्टॉक एक्स्चेंजमध्ये तरुण महिला उद्योजकांची नोंदणी वाढत आहे. हा निश्चितच शुभसंकेत म्हणावा लागेल.
खेडयापाडयातल्या सर्वसामान्य लोकांना शेअर बाजाराशी जोडण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न केले जात आहेत?
गुंतवणूक या गोष्टीला दोन बाजू असतात. एक म्हणजे आपली आर्थिक मालमत्ता सुरक्षित ठिकाणी ठेवून त्यावर एका ठरावीक दराने परतावा मिळवणं. दुसरी बाजू म्हणजे जोखीम घेणं. सर्वसामान्य भारतीय माणूस सहसा जोखीम स्वीकारायला तयार होत नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करायची असल्यास तो तज्ज्ञांची मदत घेतो आणि तज्ज्ञांकरवी व्यवहार करतो. इक्विटी शेअर्स, डेरिव्हेटिव्ह्ज अशा शेअर बाजारातल्या वेगवेगळया instrumentsमध्ये जोखमीची पातळी वेगवेगळी असते. याची सर्वसामान्य लोकांना पूर्ण माहिती होणं ही त्यांना शेअर बाजाराशी जोडण्याची पहिली पायरी आहे. त्या दृष्टीने बाँबे स्टॉक एक्स्चेंज निश्चितच प्रयत्नशील आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, सेमिनार्स यांच्या माध्यमातून याबद्दलचं ज्ञान लोकांना दिलं जात आहे. लोकांना शेअर बाजारातल्या जोखमीचं सुयोग्य ज्ञान होण्यासाठी तीन तासांपासून तीन वर्षांपर्यंतचे सर्टिफिकेट कोर्सेसही घेतले जातात. जोखीम स्वीकारण्याची प्रवृत्ती आणि जोखीम व्यवस्थापनाचं ज्ञान लोकांमध्ये जसजसं वाढेल, तसतसे ते
शेअर बाजाराशी जोडले जातील.