सध्या भारत आणि नेपाळ हे दोन वेगवेगळे शेजारी देश असले, तरी या दोन्ही देशांत रामायणकाळापासून सांस्कृतिक बंध आहेत. हजारो वर्षांपासून एक संस्कृती, एक वारसा घेऊन वाटचाल करणारे हे दोन्ही देश. संस्कृती आणि पौराणिक कथांची गुंफण दोन्ही देशांमध्ये पहायला मिळते.
नेपाळच्या विदेह प्रांताचा प्रथम उल्लेख येतो रामायणात. बिहार आणि नेपाळच्या सीमेवरील असलेल्या विदेह राज्याची राजधानी होती प्रसिध्द मिथिला नगरी. आणि गदिमांच्याच शब्दात सांगायचे तर, 'मिथिलेहूनही दर्शनीय नृप होता - मिथिलेचा राजा जनक!' आपली जनकाशी ओळख होते ते सीतेचे वडील म्हणून. रामायणाची नायिका सीता अनेक नावांनी प्रसिध्द आहे. जनकाची कन्या म्हणून जानकी. मिथिलेची राजकन्या म्हणून मैथिली. आणि विदेहची नागरिक म्हणून वैदेही. ही रामाची भार्या रामाशी इतकी एकरूप झाली, की यांच्या अद्वैताला एकच नाव मिळाले - सियाराम!
॥ जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥
नेपाळने आपल्या कन्येवर प्रेम केलेच, तसेच सीतामैय्या म्हणून तिची भक्तीसुध्दा केली. सीतेची भक्ती करणारा एक संप्रदाय नेपाळमध्ये आहे. आज जनकपूर या गावी सीतेचे मोठे मंदिर आहे - जानकी मंदिर. असे मानले जाते की इथे जनकाचा दरबार भरत असे. या ठिकाणी रामाने शिवधनुष्य तोडले होते व राम-सीतेचा विवाहदेखील इथेच झाला होता. मार्गशीर्ष शुध्द पंचमीला राम-सीतेचा विवाह झाला होता, अशी मान्यता आहे. हा दिवस विवाह पंचमी म्हणून इथे साजरा केला जातो. या दिवशी भारत व नेपाळमधील हजारो भक्त जानकी मंदिराला भेट देण्यासाठी येतात.
नेपाळने सीतेवर प्रेम केले, तसेच रामावरसुध्दा प्रेम केले. पण आंधळेपणाने नाही. नेपाळने डोळसपणे रामाची भक्ती केली. आज रामाचे वचन, नेपाळचे ब्रीद वाक्य आहे, जे नेपाळच्या emblemवर येते - ॥ जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥
गौतम बुध्दाचे जन्मस्थान
रामायणाच्या नंतरच्या काळातील नेपाळचा प्रसिध्द पुत्र आहे गौतम बुध्द. इ.स.पूर्व 6व्या शतकात भारत-नेपाळच्या सीमेवरील लुम्बिनी या गावी गौतम बुध्दाचा जन्म झाला. कपिलवस्तूचा राजा शुध्दोधन व राणी मायादेवी यांचा पुत्र सिध्दार्थ किंवा सर्वार्थसिध्द. सिध्दार्थच्या जन्मानंतर लवकरच मायादेवीचा मृत्यू झाला. त्याची मावशी महाप्रजापती गौतमीने त्याचा सांभाळ केला, म्हणून त्याचे नाव गौतम. आणि कालांतराने बोधी प्राप्त केली म्हणून बुध्द! संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुध्दाचे जन्मस्थान लुम्बिनी हे फार पूर्वीपासून प्रसिध्द होते.
इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने लुम्बिनी येथे एक स्तंभ बांधवला. या स्तंभावर त्याने कोरलेल्या लेखातून कळते, की लुम्बिनीला येणाऱ्या यात्रेकरूंची व्यवस्था करणाऱ्या गावाचा कर त्याने माफ केला होता.
नेपाळने या पुत्रावरसुध्दा अत्यंत प्रेम केले. आज बुध्दाच्या जन्मस्थानी, लुम्बिनी येथे गौतम बुध्दाचे मंदिर आहे. त्याच्या आईचे - मायादेवीचे मंदिर आहे. लुम्बिनीच्या प्राचीन स्तूपांचे अवशेष जतन करणारे म्युझियम आहे. श्रीलंका, म्यानमार आदी देशांनी तिथे बुध्दाच्या स्मरणार्थ तसेच त्या त्या देशातील यात्रेकरूंच्या सोयीसाठी बांधलेले भव्यदिव्य स्तूप आहेत. ध्यान करण्यासाठी उपवने आहेत. ध्यानगृहे आहेत. एकूणच संपूर्ण लुम्बिनी ही बुध्दजन्मभूमी असल्याचा प्रत्यय येतो. देश-विदेशातील हजारो भक्त येथे दररोज भेट द्यायला येतात.
नाथांच्या पाऊलखुणा
बुध्दाच्या नंतरच्या काळातील नेपाळचा प्रसिध्द पुत्र आहे मत्स्येंद्रनाथ किंवा मच्छींद्रनाथ. नेपाल आणि तिबेटमध्ये 'बुंग द्य:' या नावाने मच्छींद्रनाथांची पूजा केली जाते. मच्छींद्रनाथ पावसाचा देव म्हणून हिंदू व बौध्द या दोन्ही पंथात पूजला जातो. साधारण इ.स. 10व्या शतकातील मच्छींद्रनाथ यांचे जन्मस्थान नेपाळमधील ललितपूरजवळ दाखवले जाते. नेपाळचे या पुत्रावरील प्रेम मच्छींद्रनाथांच्या जन्मस्थानी असलेल्या मंदिरांमधून दिसते. तसेच त्यांच्या जन्मदिवशी मोठी जत्रा भरते आणि खूप पूर्वीपासून चालणाऱ्या रथयात्रेमधून नेपाळचे स्वपुत्रावरील प्रेम झळकते.
शैव नाथपंथाचे संस्थापक असलेले मत्स्येंद्रनाथ आणि त्यांचे शिष्य गोरक्षनाथ यांच्या, भारताच्या जडणघडणीवर असलेल्या प्रभावाची तुलना केवळ बुध्दाच्या प्रभावाशी होऊ शकते. पंजाबपासून तिबेट, आसामपर्यंत आणि काश्मीरपासून पार तामिळनाडूपर्यंत नाथपंथाचा प्रभाव दिसतो. याची एक पावती मिळते मच्छींद्रनाथांवर तयार झालेल्या चित्रपटातून. हिंदी, मराठी, तामिळ आणि तेलगू या सर्व भाषांमध्ये मत्स्येंद्रनाथांवर चित्रपट काढले गेले. 'माया मच्छींद्र' हा 1975मधला तेलगू चित्रपट. यामध्ये प्रसिध्द नट व नंतरचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.टी. रामा राव (NTR) मत्स्येंद्रनाथांच्या भूमिकेत होते. हा चित्रपट खूप गाजला होता आणि चित्रपटातील 'अलख निरंजन'ची ललकारी जीतवाचक शब्द म्हणून सररास वापरली जात होती!
गोरक्षनाथांची किंवा गोरखनाथांची नेपाळमधील ओळख 'योध्दा संन्यासी' अशी आहे. भारत-नेपाळ सीमाभागातील लोक गोरखनाथांचे अनुयायी म्हणून 'गोरखा' म्हणवून घेतात. गोरखनाथ हे या पंथाचे आराध्य दैवत आहेत. रक्षण करणारे व निडर अशी गुराख्यांची ख्याती आहे. गोरखनाथ हे नेपाळचे राष्ट्रदैवत समजले जातात. नेपाळच्या कैक नाण्यांवर गोरखनाथांची छबी आहे.
मातृभूमीला स्वर्गाहून महान मानणाऱ्या, योध्दा संन्याशाला दैवत मानणाऱ्या, साधुसंतांना मान देणाऱ्या, आपल्या पुत्रांची कदर करणाऱ्या आणि आपल्या श्रेष्ठ पुत्रांवरील प्रेम कृतीतून दाखवणाऱ्या नेपाळकडून आपण खूप काही शिकण्याची गरज आहे, हे लक्षात येते. भारताने आपल्या राष्ट्रपुरुषांना ओळखून त्यांचे शब्द प्रमाण मानून त्यांना आपल्या कृतीतून आदरांजली वाहणे नितांत आवश्यक आहे. तसे पाहता राम हा आपला आद्य राष्ट्रपुरुष आहे. पण त्याचे जन्मस्थानच काय, त्याचे चरित्र, त्याचे ऐतिहासिकत्वसुध्दा कथित विद्वानांच्या बुध्दीने गौरवाचा, स्वाभिमानाचा विषय न करता वादाचा विषय केला आहे. रामाचे गुणगान करून त्याचे सद्गुण आत्मसात करावयाचे सोडून त्याची निंदा करण्यात स्वत:ला धान्य मानणारी पिढी भारतात निपजली. राजराजा चोल, महाराज कृष्णदेवराय, यादव सिंघाण, सम्राट ललितादित्य यासारख्या सुवर्णकाळातील राष्ट्रपुरुषांची तर आपल्याला ओळखदेखील नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या आधुनिक राष्ट्रपुरुषांविषयी राष्ट्रीय पातळीवर दाखवली जाणारी आस्था (?) निश्चित विचार करायला लावणारी आहे. आणि देवतांविषयी, साधुसंतांविषयी माध्यमांतून, व्यंगचित्रातून दाखवला जाणारा अनादर हा आपल्याला अधोगतीला नेणारा आहे.