सोशल मीडिया, मिम्स आणि राष्ट्रवाद!
नुकतेच न्युझीलँडच्या क्राइस्टचर्च या शहरातील मशिदीत एका माणसाने केलेल्या गोळीबारात अंदाजे 44 लोक मृत्युमुखी पडले. या घटनेतील हल्लेखोर इतका हिंसक होण्यामागे इंटरनेटचा आणि सोशल मीडियाचा वापर हे एक मोठे कारण असल्याचे बोलले जाते. मात्र यासाठी फक्त सोशल मीडियाला किंवा इंटरनेटला दोष देणे चुकीचे आहे. केवळ एकांगी विचार करण्याऐवजी त्यामागचे अन्य मुद्देही विचारात घ्यावे लागतील.
सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे फेसबुक पेज like करावे....
https://www.facebook.com/VivekSaptahik/
गेल्या आठवडयात जागतिक पातळीवर एक महत्त्वाची घटना घडली. ही घटना म्हणजे क्राइस्टचर्च न्युझीलँडमध्ये घडलेला दहशतवादी हल्ला. न्युझीलँडच्या क्राइस्टचर्च या शहरात 15 मार्च रोजी दुपारी 1च्या सुमारास एक माणूस मशिदीत घुसला आणि त्याने दिसेल त्याला गोळया घालायला सुरुवात केली. थोडयाच वेळात या माणसामुळे साधारण 44 लोक मृत्युमुखी पडले. हे करत असताना संपूर्ण वेळ हा मनुष्य या सगळया हत्याकांडाचे चित्रण आणि सोशल मीडियावर प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) करत होता. सोशल मीडिया मॉडरेटर्सच्या लक्षात येऊन त्यांनी हा व्हिडिओ डिलीट करेपर्यंत कित्येक लोकांपर्यंत ही चित्रफीत पोहोचली आणि लोकांच्या मनावर त्याचे बरेवाईट परिणाम झाले.
8चॅन नावाची वेबसाइट ज्यावर हे हल्ले करून वेळोवेळी अतिशय प्रक्षोभक मिम्स, कॉमेंट्स, पोस्ट्स टाकले होते, त्या वेबसाइटवर काही लोकांनी या व्हिडिओबद्दल अभिमान दाखवल्याचेदेखील समोर आलेले आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी जेव्हा या हल्लेखोराची इंटरनेट हिस्ट्री तपासली, तेव्हा हा माणूस मुस्लिमांविषयी वेळोवेळी अतिशय द्वेषमूलक लिखाण करत असल्याचे समोर आले. तसेच मुस्लिमांचा द्वेष करणारे, रेसिस्ट मिम बनवणे आणि ते अतिजहाल उजव्या ग्रूप्सवर शेअर करणे हेही हा मनुष्य नित्यनेमाने करत होता. 8चॅनवर एके जागी तो म्हणतो की मिम्स वापरून आपण अधिकाधिक युवांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे मुसलमानांविरुध्द जमतील तितके मिम्स बनवले पाहिजेत. इथे मी मुद्दाम इस्लाम हा शब्द न वापरता मुस्लीम हा शब्द वापरला आहे. त्याला कारण आहे.
या हल्लेखोराचा राग इस्लामविरुध्द नव्हता, तो मुख्यत्वे मुस्लीम समुदायाविरुध्द होता, हे त्याच्या मिम्सवरून, पोस्ट्सवरून आणि मॅनिफेस्टोवरून लक्षात येते. हा राग असण्याचे कारण काय होते? खरे तर वैयक्तिक असे काहीही कारण नव्हते. कारण असलेच तर ते होते वंशवाद.
इंटरनेटवर अतिउजव्या ख्रिश्चन ग्रूप्सवर सतत वाचत असलेल्या युरोपमधल्या मुस्लीम प्रश्नांवरच्या फेक न्यूजमुळे आणि अतिरंजित वर्णनाने या व्यक्तीचा समज झाला होता की ख्रिश्चन धर्म संकटात आहे आणि आपण या संदर्भात काही कृती नाही केली, तर जगभर इस्लामचे राज्य पसरेल.
अतिशय ब्रेनवॉश झालेल्या व्यक्तीतले सगळे गुण या हल्लेखोरात दिसून येतात. त्याच्या रायफलवर लिहिलेले 'कबाब रिमूव्हर'सारखे शब्द (ज्यांचा संदर्भ 1990च्या दशकातल्या सर्बियन-बोस्नियन युध्दात आहे, ज्यात सर्बियन ख्रिश्चनांनी बोस्नियन मुस्लिमांच्या वांशिक कत्तली केल्या), किंवा त्याने वाजवलेले सर्बिया साँग हे गाणे ज्यात राडोवन कराजिकची स्तुती करण्यात आलेली आहे, त्याच्या वंशवादी विचारधारेचेच द्योतक आहेत. (राडोवन कराजिक बोस्नियन मुस्लिमांच्या वांशिक कत्तली करण्याच्या आरोपात दोषी म्हणून सापडला होता).
यावरून एक स्पष्ट होते की यामागे कुठेही राष्ट्रवादाची विचारसरणी नाही, जसे काही पत्रकारांचे सुरुवातीला म्हणणे होते. हल्लेखोर मूळचा ऑॅस्ट्रेलियाचा राहणारा आहे, त्याची प्रेरणा बोस्नियन वांशिक कत्तलींमध्ये आहे, त्याला युरोपमध्ये स्थायिक होणाऱ्या मुस्लीम समुदायाचा राग आहे, आणि म्हणून तो न्युझीलँडमध्ये हल्ला करतो. एकूणच हा प्रश्न फक्त न्युझीलँडपर्यंतच सीमित नसून ग्लोबल आहे, याचीच यातून खात्री पटते. दुसरे म्हणजे एखाद्या विचारसरणीतून प्रेरित होऊन करण्यात आलेले हे कृत्य नसून, मुस्लीम वंशाचा द्वेष आणि घृणा एवढेच यामागचे उद्दिष्ट आतातरी दिसते.
या संपूर्ण प्रकारावर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया साधारणपणे देण्यात आल्या, त्यातली एक म्हणजे हल्लेखोर इतका हिंसक होण्यामागे इंटरनेटचा आणि सोशल मीडियाचा वापर हे एक मोठे कारण आहे. तंत्रज्ञान आपल्याला फार एकांगी बनवते आहे, आपल्या विचार करण्याच्या पध्दतीवर सोशल मीडिया मोठा प्रभाव पाडतोय असा एकूण टीकेचा स्वर आहे. युरोपमध्ये मोठया प्रमाणावर होत असलेले मुस्लीम लोकसंख्येचे विस्थापन या हल्ल्यामागचे मुख्य कारण होते, असे हल्लेखोराने म्हटलेले आहे. हा त्याचा समज होण्यामागे इंटरनेट ग्रूप्स कारणीभूत आहेत असा पवित्रा काही लोकांनी घेतलेला आहे. हल्लेखोराने लिहिलेल्या 72 पानांच्या मॅनिफेस्टोमध्ये तो कशा प्रकारे alt-right अर्थात उजव्या जहालमतवादी वेबसाइट्सवर आणि ग्रूप्सवर पडीक असायचा, याचे जागोजागी संदर्भ आहेत. त्याशिवाय संपूर्ण मॅनिफेस्टो विविध मुस्लीम वंशविरोधी इंटरनेट मिम्सने भरलेला आहे, ज्यावरून हे खचितच लक्षात येते की तो जहालमतवादी, वंशवादी गटाबरोबर इंटरनेटद्वारे जोडला गेला होता. एका आयडियॉलॉजिकल बबलमध्ये त्याचे विचार अडकले होते याची शक्यता आहेच. पण यासाठी फक्त सोशल मीडियाला किंवा इंटरनेटला दोष देता येऊ शकतो का?
माझ्या मते नाही. सोशल मीडिया हे त्या हल्लेखोराचे कन्फर्मेशन बायस आणखी पक्के करण्यात मदत करणारे माध्यम झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण फक्त सोशल मीडियाच हे माध्यम होते हा विचार माझ्या मते चुकीचा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हल्लेखोर काही घरी बसणारा, फक्त इंटरनेटद्वारे जगाशी संपर्क ठेवून असलेली व्यक्ती नव्हता. त्याच्या विचारधारेवर शिक्कामोर्बत करण्यासाठी त्याने 2011 ते 2017 दरम्यान युरोपच्या आणि आशियाच्या बऱ्याच देशांमध्ये प्रवास केला होता. युरोपीय देशांमधल्या निओनाझी गटांशी, तसेच बाल्कन देशांमधल्या जहाल उजव्या गटांशी तो संपर्क ठेवून होता. त्याच्या मॅनिफेस्टोमध्ये तो नॉर्वेजियन दहशतवादी आंद्रेस ब्रेहीविकला (ज्याने 2011मध्ये नॉर्वेमध्ये अशाच प्रकारचे हल्ले केले होते.) भेटल्याचाही दावा करतो. याचाच अर्थ युरोपमधली परिस्थिती बघून या हल्लेखोराचा कन्फर्मेशन बायस आणखीनच पक्का झाला होता असेही म्हणायला वाव आहे. आता युरोपमध्ये खरेच एवढया मोठया प्रमाणावर मुस्लीम लोकसंख्येचे विस्थापन होत आहे का? मी गेली 6 वर्षे युरोपमध्ये राहत असून या विषयावर विविध माध्यमांमध्ये मी वेळोवेळी लिहिलेले आहे. मुस्लीम लोकसंख्येचे विस्थापन हे वास्तव असले, तरी ज्या प्रकारे जहालमतवादी हा विषय मोठा करून सांगतात तेवढी वाईट परिस्थिती युरोपमध्ये खचितच नाही आणि भविष्यात ती तशी होईल याची शक्यताही फार कमी आहे.
याचाच अर्थ खरी परिस्थिती बघूनही हल्लेखोराचा मुस्लीम आक्रमणावरचा खोटा विश्वास कमी तर झालाच नाही, उलट वाढला. मला वाटते, असा हल्ला करायची प्रेरणा कुठून आली असावी हा विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे आणि यासाठी फक्त तंत्रज्ञानाला बळीचा बकरा बनवणे बरोबर नाही.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे हल्लेखोराने व्यक्त होण्यासाठी वापरलेल्या भाषिक माध्यमाचा. हे भाषिक माध्यम आहे internet मिम. 73 पानांच्या त्याच्या मॅनिफेस्टोचा 70 टक्के भाग मिम्सने भरलेला आहे. बऱ्याच पत्रकारांनी या मिम्समुळेच हल्लेखोराच्या मॅनिफेस्टोला सुरुवातीला गांभीर्याने घेतले नाही. त्यांना वाटले की एकतर हा मॅनिफेस्टो खोटा तरी आहे किंवा हल्लेखोर त्यांना ट्रोल तरी करतोय. काही जणांनी तर असाही पवित्रा घेतला की हे मिम्स वाचणाऱ्याच्या डोळयात धूळ झोकण्यासाठी वापरलेले आहे. हल्लेखोराचे खरे वक्तव्य या मिम्सच्या मागे कुठेतरी लपलेले आहे किंवा त्याने मुद्दाम लपवलेले तरी आहे. पण ह्या सगळया कॉन्स्पिरसी थियरींना फारसा आधार नव्हता. कारण जर त्या मॅनिफेस्टोमधले मिम लक्ष देऊन बघितले, तर त्याद्वारे हल्लेखोर काय म्हणू इच्छितो हे सहजच लक्षात येते. लोकांना फक्त ट्रोल करण्यासाठी किंवा फॅशन म्हणून नवी पिढी Internet मिमचा वापर करत नसून मिम हे खरेच नव्या पिढीच्या व्यक्त होण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन झालेले आहे, याबद्दलचा ठाम पुरावा म्हणून या घटनेकडे बघता येऊ शकते. पण याचा अर्थ इंटरनेट मिममुळे त्या हल्लेखोराने मशिदीवर हल्ले केलेत का? तर हे म्हणणे फारच अज्ञानमूलक होईल. पण या हल्ल्यानंतर काही मिम्सवर होणारी टीका किंवा PewDiePieसारख्या YouTube चॅनेलवर होणारी टीका (हल्लेखोराने PewDiePieच्या संदर्भातला एक मिम त्याच्या मेनिफेस्टोमध्ये वापरलेला आहे) माध्यमांचे हेच अज्ञानमूलक धोरण दाखवते. तंत्रज्ञानाच्या बदलांचा वेग फार जोरात आहे आणि म्हणूनच त्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी असलेली माध्यमेदेखील फार वेगाने बदलत आहेत. फेसबुक ते टि्वटर ते रेडिट ते फोरचॅन ही सामाजिक माध्यमांची फक्त नावे बदलत जाणार आहेत अशातलाच फक्त भाग नाही, तर त्या त्या माध्यमांच्या भाषेचे तंत्रदेखील बदलत जाणार आहे.
मिम, वाइन (Vine), पॉडकास्ट, ट्वीट, टिकटॉक - दहा वर्षांपूर्वीपर्यंत हे शब्द आपल्या शब्दकोशातदेखील नव्हते. आज हे आपल्यापैकी कित्येक लोकांच्या व्यक्त होण्याचा मुख्य मार्ग झालेले आहेत. ह्या माध्यमांवर दोष थोपवून आपल्याला शांत बसता येणार नाही. या माध्यमांना अधिकाधिक प्रगल्भ कसे करता येईल, त्यांना अधिक जबाबदार कसे बनवता येईल, यासाठी माध्यमे, सरकार आणि समाज सगळयांनाच मिळून काम करावे लागणार आहे.
हल्लेखोराने या हल्ल्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग केले, ते पहिल्या झटक्यात साधारण 200 ते 250 लोकांनी बघितले असण्याची शक्यता फेसबुकने वर्तवली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ फेसबुकवरून काढून टाकण्यात आला, तेव्हापासून या व्हिडियोला साधारण 15 लाख वेळा फेसबुकवर अपलोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला, जो फेसबुकच्या मॉडरेटिंग अल्गोरिदमने हाणून पाडला, असे फेसबुकचे म्हणणे आहे. या व्हिडियोचे मुळातच थेट प्रक्षेपण व्हायला नको होते, त्यासाठी फेसबुकसारख्या माध्यमांच्या मॉडेरेटिंग अल्गोरिदम्स अधिक प्रगल्भ झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर फेसबुक, टि्वटर किंवा इतर सोशल मीडिया ही शेवटी फक्त विचारांचा प्रवाह राखणारी माध्यमे आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या माध्यमांमुळे समाजमन एकांगी विचारांच्या बुडबुडयात अडकून पडू नये, म्हणून काळजी घेण्याची जबाबदारी समाज म्हणून आपल्या सगळयांची आहे, ह्याचीही नोंद घेणे आवश्यक आहे.
pole.indraneel@gmail.com