दि. 2 व 3 फेबु्रवारी 2019 रोजी धुळे येथे अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन पार पडले. मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष आणि विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सावरकरप्रणीत राष्ट्रवादावर प्रकाश टाकला. भारताला बलशाली राष्ट्र बनविण्यासाठी स्वा. वि.दा.सावरकर यांच्या विचारांची कशी गरज आहे, हे त्यांनी विश्लेषणासह पटवून दिले. या भाषणाचा संपादित अंश.
स्वा. सावरकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल या संमेलनाच्या आयोजकांना मी धन्यवाद देतो. सावरकरांच्या प्रेरणेतून ज्यांनी मराठी साहित्यिक व सांस्कृतिक विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले, अशा पु.भा. भावे यांच्या जन्मस्थानी हे अधिवेशन होत आहे.
सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे फेसबुक पेज like करावे....
https://www.facebook.com/VivekSaptahik/
स्वा. सावरकरांचे जीवन मातृभूमीला समर्पित केलेले महाकाव्य आहे. साहित्यामध्ये काव्य हा सर्वात उत्कट प्रकार मानला जातो. त्यात शब्द आणि अनुभव एकात्म होऊन प्रकटतात. त्यात कृत्रिमता नसते. सावरकरांचा विचार करणे, त्यांच्या चरित्राचा अभ्यास करणे, त्यांच्याबद्दल ऐकणे किंवा त्यांच्याबद्दल बोलणे या सर्वच गोष्टी राष्ट्रभक्तीचा ऊर्जास्रोत आहेत. त्यांच्या जीवनाबद्दल आपण बोलतो, तेव्हा ते त्यांच्या एकटयाचे राहत नाही, तर त्यांच्या रूपाने समग्र हिंदू संस्कृतीतील चैतन्यतत्त्व आपल्या आत्म्याला येऊन भिडत असते.
सावरकरांचे सर्वच साहित्य भावोत्कट, मनातील उदात्ततेची क्षितिजे विस्तारणारे आणि मन उन्नत करणारे आहे. परंतु त्या सर्व साहित्यातील चमकता तारा म्हणजे 'जयोस्तुते' हे मातृभूमी गीत. जगातील मातृभूमीस्तवनपर गीतांची स्पर्धा ठेवली, तर त्यात हे पहिल्या क्रमांकाचे ठरेल. भारत पारतंत्र्यात असताना 1903 साली पुणे येथे त्यांनी हे गीत लिहिले. त्या वेळी ते अवघ्या वीस वर्षांचे होते. ज्या हिंदू राष्ट्रासाठी त्यांनी आपल अवघे जीवन अर्पण केले, त्या राष्ट्राचे त्यांना झालेले साक्षात दर्शनच जणू या काव्यात प्रकट झाले आहे. ही केवळ मातृभूमीची पूजा नाही, तर या मातृभूमीचे मूल्यसंचित काय? तिचे या जगातील कर्तव्य कोणते? आणि तिच्याप्रती असलेले माझे कर्तव्य काय? या सर्व गोष्टी त्यांनी अवघ्या चार कडव्यांमधून स्पष्ट केल्या आहेत. हे गीत म्हणजे स्वतंत्र भारताची जगात भूमिका कोणती असेल व ती पार पाडण्याकरिता त्यातील नागरिकांचे असलेले कर्तव्य यांचा जणू जाहीरनामाच आहे.
राष्ट्रवादाचे विभिन्न आविष्कार
सावरकरांच्या या गीतानंतर जवळजवळ एका शतकानंतर, आज आपण एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात वेगळया प्रकारचा प्रतिक्रियात्मक राष्ट्रवाद अनुभवत आहोत. विसावे शतक हे राष्ट्रवादाचे व विचारसरणीचे शतक म्हणून ओळखले जात असले, तरी त्याचा शेवट बाजारपेठीय जागतिकीकरणात झाला. युरोपमध्ये सुमारे गेली तीनशे वर्षे राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा विकास दोन मार्गांनी होत होता. समानतेच्या व व्यक्तिस्वातंत्र्याच्या आधारावरील लोकशाही हा एक मार्ग व वंशवादावर आधारित नाझी किंवा फॅसिस्ट राष्ट्रवाद हा दुसरा मार्ग. या दोन्ही संकल्पनांमधील संघर्ष युरोपीय देशांचा अंतर्गत संघर्ष होता. या दोन्ही गटांतील देशांना साम्राज्यशाहीचे वावडे नव्हते. दोन्ही जागतिक महायुध्दे ही या दोन गटांतील राष्ट्रांच्या साम्राज्यलोभाचा परिणाम म्हणून होती.
दुसऱ्या महायुध्दानंतर व्यक्तिस्वातंत्र्याधिष्ठित लोकशाहीवर आधारित राष्ट्रवादाबरोबरच माक्र्सवाद-समाजवाद आणि गांधीवाद या दोन विचारप्रणालींचाही जगावर प्रभाव पडला. यांतील लोकशाही राष्ट्रवाद व साम्यवाद यांच्या संघर्षामुळे झालेल्या शीतयुध्दाचा प्रभाव 1950 ते 1990 असा चाळीस वर्षे होता. 1990च्या सुमारास तीन प्रमुख घटना घडल्या. रशियाचे विघटन झाले व त्याआधी चीनने कम्युनिझमच्या राज्यकेंद्रित अर्थव्यवस्थेचा त्याग करून खाजगी मालकीच्या उद्योग धोरणाचा स्वीकार केला, जागतिक मंदीवर मात करण्यासाठी भांडवलशाही देशांनाही बाजारपेठ विस्तारण्याची आवश्यकता वाटू लागली व संपर्क तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे संगणकाच्या पडद्यापुढे राष्ट्रीय सीमारेषा पुसट होऊ लागल्या. यातूनच विसाव्या शतकाच्या अखेरीस बाजारपेठेवर आधारित जागतिकीकरणाची संकल्पना प्रभावी होऊ लागली.
भारतीय राष्ट्रवादाच्या दोन परंपरा
ब्रिटिशांविरुध्दच्या स्वातंत्र्यलढयात भारतीय सांस्कृतिक राष्ट्रवादाची मांडणी दोन महापुरुषांनी केली. या दोन्ही मांडणीत प्राचीन हिंदू संस्कृतीच्या दोन वेगळया पैलूंवर भर दिला होता. ते पैलू बाह्यत: परस्परविरोधी वाटत असले, तरी त्यात आंतरिक एकात्मभाव आहे. अनेक वेळा समाजपरिवर्तनाचे वेगवेगळे विचार त्या काळात परस्परविरोधी वाटतात, पण कालांतराने त्यात परस्परपूरकता आहे, हे लक्षात येते. टिळक व आगरकर हयात असताना आधी राजकीय की सामाजिक असा लढा हिरिरीने लढला गेला. स्वा. सावरकर व म. गांधी यांनी घेतलेल्या भूमिकांबद्दल तसाच विचार करावा लागेल. वास्तविक पाहता स्वा. सावरकरांनी म. गांधींच्या राजकारणावर तिखट टीका केली आहे. त्या टीकेला तत्कालीन राजकारणाचा संदर्भही आहे. परंतु गेल्या साठ वर्षांत म. गांधींच्या तत्त्वज्ञानाचा वेगवेगळया पैलूंतून अभ्यास होत असून लोकशाही भांडवलवाद, लोकशाही समाजवाद, साम्यवाद याप्रमाणे विसाव्या शतकात गांधीवाद हेही राजकीय चळवळींचे तत्त्वज्ञान बनले आहे.
रशियन राज्यक्रांतीनंतर भारतीय विचारवंतांवर व स्वातंत्र्यलढयातील नेत्यांवर साम्यवादी विचारांचा व त्यावर आधारित क्रांतीचा प्रभाव वाढू लागला होता. त्या वेळी म. गांधींनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. कम्युनिस्ट क्रांती फक्त व्यवस्था परिवर्तनाचा विचार करते. जर व्यक्तीमध्ये परिवर्तन झाले नाही, केवळ व्यवस्था परिवर्तन झाले, तर शोषकांचा वर्ग बदलेल, शोषण मात्र कायम राहील. ज्या ज्या देशात कम्युनिस्ट क्रांती झाली, अशा सर्व देशांत तसा अनुभव आला. व्यक्तिपरिवर्तनासाठी हृदयपरिवर्तनावर विश्वास ठेवला पाहिजे, हा गांधीवादाचा पहिला महत्त्वाचा घटक. गांधीवादाचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे अहिंसेचे मूल्य. केवळ अहिंसेचे तत्त्वज्ञानच शांततामय सहजीवन निर्माण करू शकते, असे त्यांचे प्रतिपादन होते. गांधींचा तिसरा आग्रह साधनशुचितेचा होता. हृदयपरिवर्तनावर विश्वास ठेवून अहिंसात्मक मार्गाचा अवलंब करूनच आपले साध्य साधता आले पाहिजे, याबाबत ते आग्रही होते. याचसोबत निसर्गसंस्कृतीचा स्वीकार, यंत्रसंस्कृतीला विरोध, गरजा किमान ठेवण्याचा आग्रह अशी गांधीवादाची आणखीही काही वैशिष्टये आहेत.
याउलट सावरकर हे शक्तीचे उपासक आहेत. या जगात जगण्यासाठी केवळ आत्मशक्तीच्या बळावर जगता येते, यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणारे नाहीत. सावरकरांच्या तत्त्वज्ञानावर भाष्य करण्यापूर्वी सावरकरांची राष्ट्राची संकल्पना काय आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता हेगेल या जर्मन विचारवंताच्या तत्त्वज्ञानाची थोडी ओळख असणे गरजेचे आहे. हेगेलच्या मते जगाची धारणा करणारे परमतत्त्व हे अत्यंत गतिमान, जिवंत, प्राणमय व चैतन्याने उफाळणारे आहे. हे परमतत्त्वच व्यक्तीच्या मनाला स्पर्श करते व तिच्या मनात स्वातंत्र्याच्या आकांक्षा निर्माण करते. हेच परमतत्त्व विभाजित होते, विसंवादी, विरोधी बनते, परंतु त्यातील एकत्वाची आकांक्षा लुप्त होत नाही. ते चैतन्यतत्त्व जेव्हा समूहरूपाने प्रकट होते, त्यालाच आपण राष्ट्र असे म्हणतो. ज्या ज्या व्यक्तींच्या जीवनात हे चैतन्यतत्त्व समूहरूपाने प्रकट होते, अशा व्यक्तींची गुणसंपदा ही राष्ट्राची मूल्यपरंपरा बनते व ती परंपराच राष्ट्राला जिवंत ठेवते. राष्ट्राच्या या चैतन्यदायक परंपरेलाच सावरकर आवाहन करत असतात. आपल्या विचारांनी व आचाराने समाजमनात सुप्तावस्थेत असलेल्या मूल्यभानाला जागृत करण्याचे काम नेते करीत असतात. एखाद्या देशाला आलेले पारतंत्र्य हे मूल्यभान क्षीण झाल्याचेच लक्षण असते. त्यामुळे हे सुप्त मूल्यभान जागृत करून जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न स्वा. सावरकर व म. गांधी या दोन्ही नेत्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढयामध्ये केला. आपण एका विराट चैतन्यतत्त्वाचा भाग आहोत व त्या चैतन्यतत्त्वाचे आकलन करून घेणे हे व्यक्ती म्हणून किंवा समाज म्हणून आपले उद्दिष्ट आहे, या विचारांच्या आधारावरच हिंदू संस्कृतीतील चैतन्यतत्त्व टिकून राहिले आहे. त्यामुळे सावरकर हे राष्ट्रभक्तीला मोक्ष मिळविण्याचे साधन मानतात, तसेच म. गांधीही राजकारणाकडे आध्यात्मिक साधनेच्या स्वरूपातच पाहतात.
वीरत्वाच्या ऱ्हासाचे परिणाम
भारताच्या वीरत्वाच्या परंपरेचा ऱ्हास झाल्याने आधी मुस्लिमांच्या व नंतर ब्रिटिशांच्या आक्रमणाला भारत बळी पडला. या काळात संत परंपरेनेच भारताचा सांस्कृतिक प्रवाह जिवंत ठेवला. सावरकर ज्या वीरत्वाच्या परंपरेला जागृत करू पाहत होते, त्या परंपरेचे सामाजिक मनातून काळाच्या ओघात विस्मरण झाले होते, तर म. गांधी ज्या संत परंपरेचे प्रतिनिधित्व करीत होते, ती परंपरा समाजमनात जिवंत होती. एका परंपरेचे सामर्थ्य मनगटातून किंवा ऐहिक सामर्थ्यातून आले आहे, तर संत परंपरेतील सामर्थ्य आध्यात्मिक संकल्पनेतून व सहनशीलतेतून आले आहे.
स्वातंत्र्यलढयात गांधींचा मार्ग यशस्वी होण्याची चार प्रमुख कारणे होती. मध्ययुगीन काळापासून भारतातील सर्व राज्यांत व भाषांत संतांची व त्यांच्या साहित्याची दीर्घ परंपरा होती व समाजातील सर्व वर्गांवर त्याचा प्रभाव होता, हे पहिले कारण. ब्रिटिशांच्या विरोधात देशव्यापी सशस्त्र उठाव संघटित करणे ही अशक्यप्राय गोष्ट होती, हे दुसरे कारण. त्यामुळे क्रांतिकारकांचे प्रयत्न विखुरलेले राहिले. अहिंसात्मक चळवळीत व्यापक लोकसहभाग शक्य होत होता, हे तिसरे कारण व गांधींचे राहणे व जीवनशैली ही सर्वसामान्य हिंदू मानसिकतेला भावणारी होती, हे चौथे कारण. भारताला स्वातंत्र्य मिळाले ते केवळ काँगे्रसच्या लढयामुळे असे सांगितले गेले. परंतु त्याची दोन अन्य प्रमुख कारणे म्हणजे दुसऱ्या महायुध्दात विजय मिळवूनही सर्व दृष्टींनी कमकुवत झालेले इंग्लंड व आझाद हिंद फौजेचा परिणाम म्हणून भारतीय सैन्यदलात निर्माण झालेली स्वातंत्र्यविषयक जाणीव. परंतु आपल्या अहिंसक मार्गानेच भारताला स्वातंत्र्य मिळाले असा भ्रम काँग्रेस नेतृत्वाने करून घेतला आणि स्वातंत्र्यानंतर लष्करी बळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. त्याचा परिणाम 1962च्या चीनबरोबरच्या युध्दात भोगावा लागला. त्या वेळेस लक्षात आले की वीरत्वाची परंपरा जोपासल्याशिवाय संतत्वाची परंपरा टिकविता येत नाही.
सावरकरप्रणीत राष्ट्रवादाचे वेगळेपण
विसाव्या शतकाने राष्ट्रवादाची अनेक रूपे पाहिली. इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन, जपान आदींचा साम्राज्यवादी राष्ट्रवाद, जर्मनी, इटली यांचा वंशवादी राष्ट्रवाद, लोकशाही व मुक्त अर्थव्यवस्थेच्या बुरख्याआड दडलेला अमेरिकेचा राष्ट्रवाद, रशिया व चीन यांचा माक्र्सवादाची भाषा बोलणारा राष्ट्रवाद इत्यादी. जागतिकीकरणाची प्रतिक्रिया म्हणून एकविसाव्या शतकात पुनरुज्जीवित झालेल्या प्रतिक्रियात्मक राष्ट्रवादापेक्षा सावरकरांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप वेगळे आहे. या राष्ट्रवादात समृध्दीची इच्छा आहे, पण ती नीतियुक्त असणे ही त्याची पूर्वअट आहे. ती समृध्दी इतर देशांच्या शोषणावर अवलंबून नाही. जगात जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर आहे, त्यांच्या साहचर्याने राहणारा हा राष्ट्रवाद आहे. तो सौंदर्याचा पूजक आहे. आपल्या सामूहिक जीवनातून उदात्त मूल्यांचे प्रकटीकरण करण्याचे त्याचे ध्येय आहे. त्यामुळे इतर देशांना गुलाम करू पाहणारा किंवा त्यांच्यावर अत्याचार करू पाहणारा हा राष्ट्रवाद नाही. या राष्ट्रवादाची आकांक्षा जगावर साम्राज्य प्रस्थापित करण्याची नाही, तर सामूहिक मुक्तीची आहे. तो सर्जनाची पूजा करणारा आहे. पण त्याचबरोबर त्याला हे माहीत आहे की या जगात सर्जन नष्ट करू पाहणाऱ्या, जगाला गुलाम करणाऱ्या, त्यांचे शोषण करणाऱ्या अधम प्रवृत्तीही आहेत. आवश्यकता पडली, तर आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी व अधम प्रवृत्तीपासून जगाचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रवृत्तींच्या विरुध्द प्रत्यक्ष रणांगणावर लढण्याचे सामर्थ्य व मानसिकताही हा राष्ट्रवाद बाळगून आहे.
मूल्याधिष्ठित सामर्थ्याची उपासना
सावरकरप्रणीत राष्ट्रवादाचे हे वेगळेपण लक्षात न घेता सावरकरांच्या सामर्थ्यशील हिंदू राष्ट्र कल्पनेवर आक्रमक राष्ट्रवाद म्हणून टीका केली जाते. इतर देश सामर्थ्यशाली बनल्यावर त्यांनी जे केले, तसेच भारत करणार असे गृहीत धरून ती टीका केली जाते. सावरकरांनी स्वातंत्र्य स्तोत्र लिहिले, तेव्हा भारत पारतंत्र्यात होता. भारत स्वतंत्र झाला, तेव्हा सावरकरांना राजकीय उपेक्षा सहन करावी लागली. त्यामुळे त्यांनी समर्थ भारताच्या धरलेल्या आग्रहाचा विचार सकारात्मकदृष्टया करण्याऐवजी त्यांचा उपहास केला गेला. परंतु चीन हल्ल्याचा अनुभव आल्यानंतर नाइलाज म्हणून का होईना, भारत लष्करीदृष्टया सामर्थ्यसंपन्न झाला पाहिजे हे धोरण स्वीकारावे लागले. सावरकर जेव्हा लष्करी सामर्थ्याची भाषा बोलतात, तेव्हा ते ती आक्रमकाच्या भूमिकेतून बोलत नसून अजूनही जग हे न्यायाच्या पातळीवर परस्पर संबंध असावेत असे वागण्याइतके सुसंस्कृत झालेले नाही या वास्तववादी आकलनातून. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना शांततेचा नोबेल सन्मान मिळताना त्यांनी जे भाषण केले, त्यात त्यांनी मार्टिन ल्यूथर किंग यांच्या 'हिंसाचार कधीही कायमची शांतता निर्माण करू शकत नाही. तो कोणतेही सामाजिक प्रश्न सोडवू शकत नाही, तो फक्त नवे व अधिक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण करतो' या विधानाचा उल्लेख केला व त्याच्या मर्यादाही सांगितल्या. सावरकर जेव्हा सामर्थ्यसंपन्न हिंदू राष्ट्राचा पुरस्कार करतात, तेव्हा हेच वास्तव सांगत असतात.
स्वातंत्र्याकांक्षी राष्ट्रवाद
प्रत्येक देशाला स्वातंत्र्य का हवे असते? कारण ते स्वातंत्र्य हे त्या त्या देशांतील सामूहिक स्वातंत्र्याचे प्रकटीकरण असते. प्रत्येक व्यक्तीच्या आत्मोन्नतीला जे पोषक वातावरण लागते, ते राजकीय स्वातंत्र्याशिवाय मिळू शकत नाही. पाशवी शक्ती वापरूनही राष्ट्राच्या स्वातंत्र्याकांक्षांना नष्ट करता येत नाही, याचा अनुभव अमेरिकेने व्हिएतनाममध्ये व रशियाने पूर्व युरोपीय देशात व रशियन प्रजासत्ताकातील देशांनीही घेतला. सावरकरांचा राष्ट्रवाद हा सर्जनपूजक आहे व जगातील जे जे उदात्त, उन्नत आहे त्याचे प्रकटीकरण करणारा आहे. या मूल्यांनुसार आपले जीवन जगणाऱ्या व्यक्ती समाजात असतात, परंतु जर समाजाचे समूहमन असे बनवायचे असेल, तर तशा प्रकारचे सामाजिक संस्कार समाजमनावर करावे लागतात. तसे ते करायचे असतील, तर त्या समाजाच्या परंपरेतील त्या मूल्यांना पोषक असलेला भाग समाजमनावर बिंबवावा लागतो. त्यामुळे सावरकर इतिहासाचा अभ्यास करतात तो इतिहासात रमण्यासाठी नाही, तर हिंदू समाज वर्तमानातील आव्हाने पेलण्यास समर्थ होऊन त्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी उदात्त, उन्नत मूल्यांची जोपासना करणारे, सर्जनशीलतेचे पूजन करणारे राष्ट्र कसे असू शकते त्याचे उदाहरण जगापुढे ठेवण्यासाठी.
पण हे आव्हान सोपे नाही. सावरकरांच्या काव्यकाळ हा भारताच्या पारतंत्र्याचा काळ होता. गेल्या शंभर वर्षांत जगाची उलटापालट होऊन गेली आहे. 'सागरा प्राण तळमळला' या कवितेत त्यांनी 'त्वस्वामित्वा सांप्रत जी मिरविते' असे आंग्लभूमीचे वर्णन केले होते, ती आंग्लभूमीच आपल्या भवितव्याविषयी शंकित झाली आहे. केवळ इंग्लंडच नव्हे, तर एकेकाळी सर्व जगावर राज्य करणारे युरोपीय देश वेगवेगळया आंतरिक प्रश्नांत गुंतले आहेत. रशिया व चीन या दोन्ही देशांनी आपली साम्राज्यवादी धोरणे राबवायला सुरुवात केली आहे. चीनच्या विस्तारवादामुळे दक्षिण आशियाई देश भयभीत झाले आहेत. आजवर जगाचा रखवालदार म्हणून काम करणाऱ्या अमेरिकेने आपली एक एक जबाबदारी कमी करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या देशासमोर दोन प्रकारची आव्हाने आहेत. पहिले आव्हान आहे अंतर्गत व दुसरे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे.
जातवादाचे निर्मूलन
जातीवर आधारित संघर्षाच्या मानसिकतेने विभाजित झालेला हिंदू समाज हे हिंदू समाजाचे पहिले मर्मस्थान आहे. सावरकरांनी ज्या वेळी 'ज्यात्युच्छेदक निबंध' लिहिले, त्या वेळची स्थिती वेगळी होती. जातव्यवस्था हा हिंदू धर्माचा एक अंगभूत भाग मानला जात होता. जातिगत उच्च-नीच भाव सामाजिक असंतोषाचे मोठे कारण बनला होता. समाजमनावर स्मृतींचा व धर्मशास्त्राचा पगडा होता. त्यामुळे हिंदू धर्माचे नव्याने विवेचन करणे आवश्यक होते. परंतु आता जातींच्या प्रश्नाने वेगळे वळण घेतले आहे.
जे प्रश्न आज जातीच्या आधारावर लढले जात आहेत, ते वास्तविक वंचित समाजाचे आर्थिक प्रश्न आहेत. केवळ राखीव जागा देऊन ते सोडविता येणार नाहीत. केवळ सावरकरांनी केलेली नव्हे, तर स्वातंत्र्यपूर्व काळात जातीच्या प्रश्नासंदर्भात झालेली चर्चा आता संदर्भरहित व कालविसंगत झाली आहे. शेतकरी, खेडयातील भूमिहीन, शहरात रोजगार शोधू पाहणारा व शहरातील व्यवस्थेबाहेरील गट यांच्यासाठी अर्थशास्त्राची नव्याने मांडणी करावी लागेल. या वर्गाला केवळ शासनावर आपले भवितव्य टांगून ठेवून राजसत्तेचे लाचार बनविण्यापेक्षा आपण स्वबळावर स्वाभिमानाने जगू शकतो अशा ऐहिक आकांक्षा जागृत कराव्या लागतील. आपण आपल्या बळावर विकास करू शकतो असा सामाजिक स्वभाव बनवावा लागेल. त्याकरिता आवश्यक आर्थिक, राजकीय, तंत्रज्ञानविषयक, सांस्कृतिक पर्यावरण निर्माण करावे लागेल. हे आपल्यापुढचे मोठे आव्हान आहे. याकरिता निर्धाराने आमचा नवा जाती-चक्रव्यूह भेदण्यासाठी वंचितांचे नवे अर्थशास्त्र निर्माण करण्याची गरज आहे. दलित समाजामध्ये उद्योजकता निर्माण करणारी डिक्कीसारखी उदाहरणे आपल्यासमोर आहेत. नवउद्योजकतेसाठी समाजात आपल्या गुणवत्तेच्या बळावर आपल्या जीवनात ऐहिक यश मिळवू शकतो, अशा विश्वासाची जोपासना करणे आवश्यक आहे. त्यामुळे नवउद्योजकतेसाठी अशा सामाजिक संस्कृतीची जोपासना करणे हा कृती कार्यक्रम झाला पाहिजे.
संरक्षण साधनात स्वावलंबन
स्वा. सावरकरांनी मांडलेला तिसरा महत्त्वाचा मुद्दा लष्करी सामर्थ्याचा आहे. स्वातंत्र्यानंतर त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांनी लष्करावरचा खर्च कमी करून विकासावर खर्च करू असा विचार केला. वास्तविक आजवरचा इतिहास असे सांगतो की तंत्रज्ञानातले अनेक शोध हे प्रथम लष्करी गरज म्हणून लागतात व नंतर त्याचा नागरी उपयोग होतो. भारताने संरक्षणाकडे दुर्लक्ष केले याचा परिणाम चीनबरोबरच्या युध्दात तर झालाच, परंतु संरक्षण युध्दसामग्रीबद्दलही आपण विदेशावर अवलंबून आहोत. नवे युध्द हे केवळ मानवी लष्करी बळाच्याच आधारावर नव्हे, तर प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे लढले जाणार आहे. या सर्व घटकांचा विचार न झाल्याने भारतात संरक्षण उत्पादकांचे खाजगी क्षेत्र उभेच राहिले नाही. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात ज्या शासकीय संस्था निर्माण केल्या गेल्या, त्या नोकरशाही संस्कृतीने ग्रस्त झाल्या. विद्यमान सरकार सत्तेवर आल्यानंतर या धोरणात स्वागतार्ह बदल होत आहे. आपण आंतरिक्ष क्षेत्रात स्वबळावर उभे राहू शकतो, तर इतर लष्करी साहित्य का निर्माण करू शकणार नाही?
ज्ञानसंस्कृती संवर्धन
सावरकरांचा चौथा महत्त्वाचा मुद्दा स्वभाषेचा व ज्ञानप्रसाराचा आहे. जर समाजातील तळागाळात ज्ञानसंस्कृती रुजायची असेल, तर जगातील अधिकात अधिक ज्ञान स्वभाषेत आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. आठशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून संस्कृतमध्ये लिहिलेल्या तत्त्वज्ञानाचा बहुजनांना समजेल अशा भाषेत परिचय करून दिला. आता विज्ञानेश्वरीच्या रूपाने तसाच परिचय करून देण्याची आवश्यकता आहे. ज्ञानाची उपासना करणारा वर्ग व प्रत्यक्ष कामात त्याचा उपयोग करणारा वर्ग यांची झालेली फारकत हे भारताच्या अवनतीचे एक कारण सांगितले जाते. उच्च शिक्षण घेणाऱ्या बहुसंख्य वर्गाचे डोळे विदेशाकडे लागलेले असतात. आधुनिक वैज्ञानिक संस्कृतीपासून वंचित राहिल्याने समाजातील मोठया गटाचे भावविश्व विस्तारू शकत नाही. ते जोपर्यंत विस्तारणार नाही, तोवर भारताच्या विकास प्रक्रियेचा तो अंगभूत घटक बनू शकत नाही. त्या काळात इंग्लिश शब्दांना मराठीतही तितकेच समर्थ प्रतिशब्द मिळू शकतात, हे सावरकरांनी सिध्द केले. आजचे आव्हान त्यापेक्षा अधिक व्यापक आहे. केवळ प्रतिशब्द देऊनच नव्हे, तर एकविसाव्या शतकातील भावविश्वाशी लोकांना जोडायचे आहे. मोबाइलच्या व सोशल मीडियाच्या रूपाने नवे संपर्क माध्यम लोकापर्यंत पोहोचले आहे. पण त्यातून कोणत्या प्रकारची माहिती पोहोचविली गेली पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन तयार व्हावा, यासाठी सकारात्मक प्रयत्न करणारे अनेक समाजगट आहेत.
हेगेल व सावरकर
पण हा रस्ता सोपा नाही. ते ध्येय गाठेपर्यंत आंतरिक व बाह्य संघर्षावर मात करूनच ते करावे लागेल. जर्मन तत्त्वज्ञ हेगेलने चैतन्यवादी आध्यात्मिक राष्ट्रवादाची जी भूमिक मांडली आहे, त्याचे बहारदार शब्दात डॉ. ग.मा. जोशी यांनी आपल्या 'पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतिहास'च्या तिसऱ्या खंडात वर्णन केले आहे. त्याचा सावरकरांच्या राष्ट्रवादाला लागू पडेल असा संपादित अंश असा,
अमेरिकन तत्त्वज्ञ राइस यांनी हेगेलच्या भूमिकेचे जे वर्णन केले आहे, ते त्याचा संदर्भ देऊन जोशी लिहितात -
'राइस म्हणतो की, हेगेलला जो आत्मा आणि जे आध्यात्मिक जीवन अभिप्रेत आहे, ते शांत, क्रियाविहीन, निश्चेष्ट, मरगळलेले स्थिरावलेले शून्यवत जीवन नाही, तर ते चैतन्याने सळसळणारे, उचंबळणारे, विरोध आणि व्याघांताना न टाळता त्यांचे आव्हान स्वीकारून त्यांच्याशी मुकाबला करून आणि त्यांचा पराभव करून त्यांच्यावर विजय मिळवून स्वतःचे सामर्थ्य आणि ओज प्रकट करणारे, वर्धिष्णू, जयिष्णू, सतत क्रियाशील रसरशीत जीवन आहे. एखाद्या महत्त्वाकांक्षी लढवय्या पराक्रमी जयिष्णू वीराप्रमाणे आहे. अस्वस्थतेला, विरोधांना, अडचणींना, संकटांना, आपत्तींना अपूर्णतेला भीक न घालणारे, व्यथित न होता त्यांच्यावर स्वार होऊन त्यांना पादाक्रांत करून शौर्याने त्यांचा पराभव करून त्यांना शरण आणून त्यांच्या खांद्यावर स्वतः आरूढ होऊन, हसत स्वतःच्या विजयपताका मिरविणाऱ्या पराक्रमी, साहसी, निर्भय लढवय्या शूरासारखे आहे. हेगेलचे परमसत् किंवा अंतिम सत्ता ही ब्रह्मासारखी किंवा निर्वाणासारखी निवृत्तिपर, शांतिप्रिय, क्रियाहीन, परिवर्तनाकडे आणि गतिमानतेकडे तिरस्काराने पाहणारी, संघर्षाकडे तुच्छतेने पाहणारी, आत्मतुष्ट, उदासीन, आत्मविनिवर्तित, जगन्विमुख, पलायनशाली नसून ती पराक्रमात आनंद मानणारी, युध्दाला आव्हान देऊन दिमाखाने शस्त्र परजणारी, जगातील दुरिताचा, तिमिराचा, अमंगल प्रवृत्तींचा संहार करून स्वतःचे प्रभुत्व सिध्द करण्यास उत्सुक असणारी, संकटांना, आपत्तींना आणि धोक्यांना न डगमगणारी, उलट जगातील अपूर्णता, वैगुण्ये, न्यूनता, दुरिते, अमंगलता, कुरूपता यांना पाहून स्फुरण पावणारी आणि पापांचा संहार करून स्वतःचे अंतस्थ सुप्त सामर्थ्य प्रकट करून स्वतःची अस्मिता सिध्द करणारी आणि अशा रितीने आत्मगौरव प्रस्थापित करणारा जणू एखादी रणरागिणी कालीदेवता आहे. तिला अनेकांचे, भेदांचे, विरोधांचे आणि व्याघातांचे भय वाटत नाही; उलट त्यांच्यावर आपले स्वामित्व आणि प्रभुत्व प्रस्थापित करण्यास तिला प्रचंड स्फुरण चढते. ती संकटांना आणि आपत्तींना डरत नाही; तर त्यांना आवाहन देते, आणि त्यांना शरण आणण्यात धन्यता अनुभवते. रॉइस म्हणतो की हेगेलची परमसत्ता एक शूर, पराक्रमी योध्दा आहे. मानवजातीच्या आध्यात्मिक जीवनाच्या युगायुगांची धूळ आणि रक्त यांच्या खुणा त्यांच्या अंगावर आहेत. तो जखमांनी रक्तबंबाळ झालेला, परंतु विजयाने धुंद होऊन आपल्यासमोर येतो. ज्याने सर्व विरोधांना आपल्या शौर्याने जिंकले आहे आणि जो आपल्या सर्वव्यापकत्वाने मानवाची निष्ठा, सहिष्णुता आणि दुर्दम्य विजिगीषा यांची संपन्नता उपभोगत असतो, आणि जो सर्व लहान मोठया, क्षुद्र उदात्त गोष्टींना व्यापून राहून त्यांचे स्वतःमध्ये ऐक्य घडवितो, आणि त्या सर्वांमधून स्वतःची अभिव्यक्ती करतो, असा ईश्वर आध्यात्मिक जाणिवेची समग्रता होऊन राहतो.- अशी हेगेलची अंतिम सत्ता आहे.
परंतु हेगेल व सावरकर यांच्यात एक मूलभूत फरक असा की हेगेल हा निरंतर संघर्षवादी आहे, मात्र सावरकर तसे नाहीत. संघर्ष हे मानवी आकलनशक्तीच्या मर्यादेतून तयार होतात, असे ते मानतात. आज त्या मर्यादा गृहीत धरूनच वागावे लागेल, हे वास्तवही ते मान्य करतात. कधी ना कधी माणूस त्या मर्यादेतून बाहेर पडेल याचा त्यांना विश्वास आहे. बौध्द धर्माच्या उदात्त तत्त्वज्ञानाचा गौरव करताना 'हिंदुत्व' या ग्रंथात सावरकर म्हणतात,
''खुद्द बौध्द धर्माची दीक्षा घेणाऱ्या भक्तांच्या मनात, अखिल जगात जो पवित्रतम संघ आहे, त्या बौध्द संघाबद्दल जो आदर आणि जे प्रेम असेल, तेच प्रेम आणि तोच आदर बाळगणाऱ्या बौध्द धर्माचा मी एक चाहता आहे.''
सावरकरांचा गौतम बुध्दांविषयी व बौध्द धर्माविषयी असलेला आदर आणि प्रेम पाहता त्यांनी मग त्या धर्माची दीक्षा का घेतली नाही? असा प्रश्न निर्माण होतो. त्याविषयी सावरकर म्हणतात, ''बौध्द धर्माची दीक्षा मी घेतली नाही याचे कारण, हा संघ माझ्या योग्यतेचा नाही असे नव्हे, तर मी त्या संघाच्या पवित्र मंदिरात पदार्पण करण्याला पात्र नाही हे होय.''
शेवटी भगवान बुध्दांची क्षमा मागताना सावरकर म्हणतात,
''हे तथागत! सर्व मनुष्यजातीतला मी हीन-दीन, केवळ माझी नितांत रिक्तता व माझे नितांत अज्ञान यांचाच आहेर घेऊन तुझ्याकडे येतो. जरी आपल्या बोधाचा सारांश मला आकलन करता येत नाही, असे मला वाटते, तरी मला पूर्ण खात्री आहे की, ते तसे होणेच स्वाभाविक आहे. कारण आपला उपदेश हा देवलोकीच्या वाणीतून निसृत झाला आहे; परंतु माझी श्रावणेंद्रिये आणि माझी आकलनशक्ती ही ह्या ऐहिक प्रत्यक्ष प्रमाणमय जगाचा शब्दघोष ऐकायला शिकली आहे! ह्या जगाला आपल्या भरारीबरोबर चालता येत नाही व आपल्या देदीप्यमान निशाणाकडे दृष्टी लावता-लावताच ती अंधुक होऊन दिपून जाते!''
'कधी ना कधी जग या मर्यादेतून बाहेर पडेल' यावर सावरकरांचाही विश्वास आहे. म्हणूनच 'हिंदुत्व' या आपल्या प्रबंधाच्या अखेरीस ते भगवान बुध्दांना उद्देशून म्हणतात,
''भगवान, आपणही आमचेच आहात आणि ज्याप्रमाणे आपले शब्द हे आमच्या राष्ट्रीय आत्म्याचेच बोल होत, त्याप्रमाणे आपल्याला दिसणारी दृश्ये ही आमच्या जातीचीच सुखस्वप्ने आहेत आणि जर कधी सत्याच्या तत्त्वाचा विजय होऊन सर्व मानवजात ते शिरोधार्ह करू लागली, तर हे भगवान, आपणाला असे आढळून येईल की ज्या भूमीने आपल्याला पाळण्यात खेळविले, ज्या जातीने आपले लालनपालन केले, तीच भूमी आणि तीच जाती, ह्या तत्त्वाचा जगभर जयजयकार होण्यास, प्रामुख्याने कारण झाली आहे.''
आज, भारतीय संस्कृतीचे अपत्य असलेल्या योगाच्या लोकप्रियतेने जगात एका अत्यंत सीमित क्षेत्रात का होईना, विश्वबंधुत्वाचे वातावरण तयार केले आहे, ते याच प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे आजच्या सत्तास्पर्धेत आपले राष्ट्र टिकवायचे असेल व जगापुढे आदर्श म्हणून उभे करायचे असेल, तर सावरकरांच्या विचारांवर आधारित कृती कार्यक्रम राबविण्याशिवाय पर्याय नाही. अशा उदात्त व उन्नत मूल्यसंचितांवर उभे राहिलेले समर्थ राष्ट्रच म. गांधींच्या स्वप्नातील शांततामय सहजीवनाच्या विश्वबंधुत्वाचा आधार बनेल.
kdilip54@gmail.com