वसा शिक्षणाचा... ज्ञानदानाचा...

विवेक मराठी    05-Feb-2019
Total Views |


महारष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील उपक्रमशील युवा शिक्षकांचे काम प्रकाशझोतात यावे आणि त्यांच्या कार्याला अधिक गती मिळावी यासाठी 'शिक्षण माझा वसा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कारा'चे नुकतेच वितरण झाले. या पुरस्काराने सन्मानित झालेल्या काही शिक्षकांच्या कार्यावर दृष्टिक्षेप टाकणारा लेख...

 शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेतला, समाज व्यवस्थेतला महत्त्वाचा घटक. त्यांच्या असण्याने अनेक पिढया घडत असतात. उद्याचा भविष्यकाळ त्यांच्या हातात असतो. ते आपल्या प्रयत्नांनी अधिक चांगलं ते देण्याचा चंग बांधतात आणि त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत असतात. पण आपल्याकडचं आजचं चित्र वेगळं आहे. त्याला नकाराची एक गडद झालर आहे. या नकाराला समाजाकडून कळत-नकळत अधिक गडदपणे रंगवलं जातं आणि शिक्षकांबद्दल काही बेधडक विधानं केली जातात, त्याचा आपल्याच मुलांवर परिणाम होत असतो, याचा विचार न करता अनेकदा ही विधानं केली जातात. शिक्षकांबद्दलची ही नकारात्मकता सबंध शिक्षण व्यवस्थेला लावली जाते. पण वास्तव चित्र काही वेगळंच आहे, याचा प्रत्यय गेली तीन वर्षं 'शिक्षण माझा वसा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कारा'च्या निमित्ताने येत गेला.

 

सचिन बेंडभर यांच्या कल्पनेतील वाचन झोपडी

आपल्याकडे आजही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलं शिकत आहेत आणि त्या शाळांचा दर्जाही तितकाच कौतुकास्पद आहे, याची जाणीव या पुरस्काराच्या निमित्ताने झाली. आडगावात जिथे कसलीही सोय नाही, त्या शाळांमधले शिक्षक आपल्या परिसरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंच्या साहाय्याने आपल्या मुलांना मदतीला घेऊन स्वत: शैक्षणिक साधनं तयार करतात, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. त्यासाठी आपण स्वत: अद्ययावत राहतात. इतकंच नाही तर अभ्यासक्रमात असलेल्या गोष्टींना पूरक ठरतील असे उपक्रमही अभ्यासून आपल्या शाळांमध्ये घेतात. याचं उत्तम उदाहरण म्हणून या वर्षीचा भाषेचा पुरस्कार मिळालेल्या सचिन शिवाजी बेंडभर यांच्या 'मुलांच्या छान छान गोष्टी' या उपक्रमाकडे पाहता येईल. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वढू खुर्द, ता. हवेली, जिल्हा पुणे या शाळेतील विद्यार्थी हे याच उपक्रमाचा आधार घेत कथालेखनाकडे वळले आहेत. सचिन बेंडभर यांनी मुलांना प्रोत्साहन मिळावं, म्हणून स्वत: या मुलांच्या कथांचा संग्रह 'शिंपल्यातले मोती' या नावाने प्रसिध्द केला आणि कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते मुलांच्या उपस्थितीत या संग्रहाचं प्रकाशनही केलं. नुसता उपक्रम न घेता त्याचं असं आउटपुट दाखवणं सोपं नसतं, ते सचिन बेंडभर यांनी केलं. मुलांना प्रोत्साहन देतानाच आपल्या प्रतिभेलाही बहर येत असतो, याचा प्रत्ययही आपल्या उदाहरणाने सचिन बेंडभर यांनी दाखवून दिला आहे. 'कळो मानवा निसर्ग' या त्यांच्या कवितेचा सहावीच्या पाठयपुस्तकात झालेला समावेश याचंच उदाहरण आहे, असं म्हणता येईल. ज्यांना वाचता येतं त्यांना अधिक वाचनाकडे नेणं, ज्यांना येत नाही त्यांना वाचनाकडे वळवणं, ज्यांना त्यात रसच नाही त्यांच्यात तो रस निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणं हे सोपं काम नाही. त्यातलं सातत्य ठेवून वाचन झोपडीसारखी जागा आपल्या शाळेत मुलांसाठी राखून ठेवणं आणि त्यातून आपल्या शाळेतल्या मुलांबरोबरच गावातल्या लोकांना वाचनाचं महत्त्व पटवून देणं आणि वाचनासाठी पुस्तकं उपलब्ध करून देणं ही बाब खरंच कौतुकास पात्र आहे, त्यासाठी सचिन बेंडभर यांनी घेतलेले कष्टही महत्त्वपूर्ण आहेत. गावातले लोकही वाचनाकडे वळले आहेत, याचा प्रत्यय जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने पाच तास अखंड वाचन कार्यक्रमाची दखल वर्तमानपत्रांनी घेतली, यातून दिसून येतं. स्मार्ट रीडरसारख्या उपक्रमांनी वाचनामध्ये अप्रगत असणाऱ्या मुलांनाही वाचनाची गोडी लावली, यातच या उपक्रमाचं यश आहे, असं म्हणावंसं वाटतं.

संतोष पाटील छंदातून चित्रकला अध्ययन

भाषेची गोडी लागली की सगळयाच विषयात मुलं रमतात, असं एकंदर चित्र आपल्या आजूबाजूला दिसतं, याचा प्रत्ययही गणित विषयाचा पुरस्कार मिळालेल्या सतीश रमेश चिंधालोरे यांच्या उपक्रमामुळे येतो. जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल, खराशी, पं.स. लाखानी, जिल्हा भंडारा या शाळेत शिकवणाऱ्या चिंधालोरे यांनी मुलांच्या मनातली गणिताची भीती कमी व्हावी आणि त्यांना गणिताचा ध्यास लागावा, यासाठी 'माझा पाढा मी तयार करणार', 'अपूर्णांकांची साक्षरता', 'गणित कोडे' असे वैविध्यपूर्ण उपक्रम सातत्याने घेतलेले आहेत. आपल्या दैनंदिन व्यवहारात, आयुष्यात गणिताला फार महत्त्व असतं आणि त्यातूनच आपली बुध्दी तल्लख होत असते, याचं भान बाळगणाऱ्या चिंधालोरे यांनी आपल्या मुलांच्या गणित शिकण्याच्या प्रकियेचा अभ्यास सर्वप्रथम केला आणि त्यावर आधारित उपक्रम तयार केला. त्यांच्या उपक्रमांची नावं जरी पाहिली, तरी गणितातला 'मी'चा रोल किती महत्त्वाचा असतो हे पटकन कळतं. या 'मी'ला - म्हणजेच प्राथमिक वर्गातील मुलांना गणिताची भीती वाटत नाही, पण हीच मुलं जेव्हा पाचवी-सहावीत जातात, तेव्हा त्यांना गणिताची भीती वाटते आणि ती गणितात मागे पडतात, या निष्कर्षांपर्यंत ते आले आणि त्यांनी ही भीती घालवण्यासाठी प्रथम मुलांच्या मानसिकतेवर काम केलं. त्यासाठी त्यांनी जादा तास घेऊन मुलांच्या गणितातल्या मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या. त्यातून मुलांना एक एक टप्पा पार करत त्यांनी मुलांना नवोदय परीक्षेत बसण्यासाठी सक्षम केलं. संकल्पना स्पष्ट करून झाली की त्यावर सराव प्रश्न तयार करून मुलांना सोडवायला दिले, एका एका मुलाच्या प्रश्नावर बारीक बारीक काम केलं आणि मुलांना या सगळया गणिती संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या. यातून मुलांचा गणिताकडे बघण्याचा दृष्टीकोन तर सकारात्मक झालाच, त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वासही वाढला. गणितात जेमतेम उत्तीर्ण होणारी मुलं चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ लागली. शिष्यवृत्ती आणि नवोदयसारख्या परीक्षांमध्ये अव्वल ठरू लागली. चिंधालोरे यांनी 'संस्कार मॅथ क्लब' या नावाची, गणिती संकल्पना स्पष्ट करून मुलांना मार्गदर्शन करणारी यू-टयूब चॅनलही सुरू केली आहे. आजूबाजूच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या चॅनलचा उपयोग होतो आहे, हेच या उपक्रमाचं अधिकचं यश आहे.


गणित, विज्ञान यांसारखे विषय हे मुलांना अवघड जातात, इतकंच नाही, तर विज्ञानासारखा विषय तर त्यांना पाठांतर करून उत्तर लिहिण्याचा आणि गुण मिळवण्यासाठी महत्त्वाचा असणारा वाटतो, हे आपल्याकडचं एक वास्तव आहे. या वास्तवाचा विचार करत आपल्या मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, त्यांनी आजूबाजूच्या सगळया गोष्टींकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहावं आणि ते पाहत असताना ती दृष्टी त्यांच्यात विकसित व्हावी म्हणून काम करणाऱ्या अमर धर्माजी खेडेकर यांनी 'का?' आणि 'कसे?' या वैशिष्टयपूर्ण उपक्रमांची आखणी केली. जिल्हा परिषद प्राथमिक सशाळा, नाथाची वाडी, ता. दौंड, जिल्हा पुणे या शाळेत अमर धर्माजी खेडेकर कार्यरत आहेत. मुलांमधील प्रश् विचारण्याची सहजप्रवृत्ती अधिक समृध्द करण्यासाठी खेडेकर यांनी मुलांना शाळेच्या भोवतालच्या परिसराचं निरीक्षण करायला लावलं, त्यातून मुलांना जे प्रश्न पडत होते, त्याची उत्तरं ज्यांना येतात त्यांनी देणं आणि ज्या प्रश्नांची उत्तरं येत नाही, त्यासाठीची पूरक साहित्य मुलांना पुरवण्याचं कामही खेडेकर यांनी केलं आहे. त्यातून संदर्भासाठी पुस्तकांचं वाचन करायचं असतं, याची जाणही मुलांमध्ये वाढत गेल्याचं त्यांनी सांगितलं. पुस्तकांबरोबरच आधुनिक काळातल्या गूगलचा योग्य तो वापर करण्याचे आणि माहिती मिळवण्याचे नवे स्रोतही मुलांना जाणीवपूर्वक दाखवून दिले.

कला हे मानवाच्या आयुष्याचं केद्रस्थान असतं. शाळेत या विषयाकडे फार गंभीरपणे पाहिलं जात नाही, असं चित्र आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळत असतानाही जिल्हा परिषद शाळा, गांधीनगर, केंद्र खंडेराजुरी, ता. मिरज, जि. सांगली या शाळेतल्या संतोष पाटील यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला या कलेची आवड जाणीवपूर्वक जोपासायला लावली. त्यासाठी त्यांनी निराळया धाटणीचे उपक्रम तयार केले आणि त्याची अंमलबजावणी केली. 'छंदातून चित्रकला अध्ययन अध्यापन' असं त्यांच्या उपक्रमाचं नाव आहे. या उपक्रमात त्यांनी रेषा, बिंदू व अंगठयाचे ठसे यांच्या साहाय्याने चित्रनिर्मिती व लेखन पूर्वतयारी, अंकांच्या व अक्षरांच्या साहाय्याने चित्रनिर्मिती व शब्दवाचन, चित्र रेखाटन करून चित्रवाचन-चित्रवर्णन-चित्ररंगभरण आणि कथा-कवितांवर आधारित चित्र रेखाटणं असे चार वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. कला आणि इतर विषय यांची अशी सांगड घालता येते आणि त्यातून मुलांच्या संवेदना अधिक टोकदार करता येतात, विषयाबद्दलची त्यांची समज अधिक वाढवता येते, याचा प्रत्यय देणारं हे कलाशिक्षण मुलांच्या अभ्यासाला अधिक गती देणारं आहे, यात वादच नाही. यातून मुलांचा भाषिक विकास तर होतोच, त्याचबरोबर गणिती संकल्पना स्पष्ट होतात. तसंच मनोरंजक पध्दतीने हसत खेळत शिकण्यातली मजाही मुलांना घेता येते, अभ्यासाचा ताण न घेता, अभ्यास करण्यातली गंमत मुलांना अनुभवता येते. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा आहे, तसंच शाळेत घेतल्या जाणाऱ्या अशा वैशिष्टयपूर्ण उपक्रमांमुळे मुलांना शाळा हे आपले घर वाटण्याएवढी गोडी लागते. संतोष पाटील यांनी santoshpatildrawing या नावाचे आपले यू टयूब चॅनलही सुरू केलेले आहे. तसंच विद्यार्थ्यांना चित्रकला अधिक आवडावी, यासाठी त्यांनी 'परिपूर्ण चित्रकला' नावाचं पुस्तकही लिहिलेलं आहे.

एकीकडे तंत्रज्ञानाच्या गैरवापराची, वाईट परिणामांची चर्चा होत असतानाच या विषयातली ताकद ओळखून या माध्यमातून चांगल्या गोष्टी करायला शिकवू, हा ध्यास घेऊन आपल्या जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक काम करत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोतवस्ती, ता. कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली या शाळेतले अमोल किसन हंकारे हे त्यातलेच एक. मुलांच्या हातात पडणारे मोबाइल आणि त्याबद्दलच्या पालकांच्या चिंता यात मेळ साधत आपण काहीतरी करावं, या उद्देशाने अमोल हंकारे यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. ऍपच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली, तर खेळासाठी होणारा मोबाइलचा वापर कमी होईल, यासाठी त्यांनी निरनिराळया ऍप्सची निर्मिती केली. मराठी रनर, बालवाडी, स्कॉलरशिप, प्रज्ञाशोध, मराठी वर्डसर्च, शालेय कविता ही ऍप्स त्यांनी तयार केली. स्कॉलरशिप परीक्षेचे 'क्विझ ऍप' तयार करून आजपर्यंत चाळीस हजारहून अधिक लोकांना त्याचा फायदा झाला आहे. ऍपच्या या दुनियेतील 'बालवाडी' नावाच्या ऍपमध्ये दहा वेगवेगळे घटक असून त्यामध्ये धूळपाटी, स्ट्रोकसह अक्षर लेखन, अक्षर गिरवणं यांसाठी मुळाक्षरं, अंक, महिने, वार, शरीराचे अवयव हे घटक समाविष्ट केले आहेत. मराठी शब्दसंपत्ती वाढावी आणि वाचन क्षमता विकसित व्हावी, यासाठी अमोल हंकारे यांनी 'मराठी वर्डसर्च' हे ऍप तयार केलं आहे. 'शालेय कविता' या ऍपमध्ये मराठी व इंग्लिश पाठयपुस्तकातील कविता समर्पक चालीत लिरिक्ससहित  दिल्या आहेत. बालमानसशास्त्राचा विचार करून खेळ खेळत मुलांना शिकण्याचा अनुभव घेता येणारं 'प्रज्ञाशोध ऍप' म्हणजे पालकांसाठी दिलासा आणि विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेचा धडाच आहेत. ऑॅनलाइन आणि ऑॅफलाइन चालणाऱ्या या ऍपला एकूण 392 रिव्ह्यू आणि 4.6 हजार स्टार मिळाले आहेत. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत असलेल्या सर्व परीक्षांच्या तयारीसाठी मनोरंजक ऍप तयार करण्याचं स्वप्नही अमोल किसान हंकारे बाळगून आहेत.

 

महेश शिंदे अनोख्या पद्धतीने स्पर्धा परीक्षांची तयारी

उस्मानाबादसारख्या जिल्ह्यात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, कंडारी येथे काम करणाऱ्या महेश भारत शिंदे यांनी स्पर्धा परीक्षांसाठी मुलांचा विचार करून घेतलेले उपक्रम वाखाणण्याजोगे आहेत. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने मुलांच्या क्षमता लक्षात घेतल्या, तसंच त्यांच्यावर कोणत्या कोणत्या बाबतीत काम करावं लागणार आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी तसा कृती आराखडा तयार केला. त्यासाठी मुलांचे जादा तास घेतले. शिकवलेल्या भागावर त्यांनी स्पष्टीकरणात्मक उत्तरांचे सराव घेतले. सराव परीक्षांवर भर दिला. वेळेचं नियोजन करून उपलब्ध असलेल्या वेळेत प्रश्नपत्रिका कशी सोडावायची याचा सराव घेतला. त्यांनी प्रत्येक महिन्याला शिकवून झालेल्या घटकावर सराव परीक्षांचं आयोजनही केलं. कमकुवत घटकांची पुनरावृत्ती आणि उपचारात्मक अध्यापन पध्दतीचा स्वीकार करत त्यांनी विद्यार्थ्यांचा गटनिहाय अभ्यास घेतला. दिवाळीच्या सुट्टीचा वापर अभ्यासासाठी केला, पण तेव्हाही मुलांवर अभ्यासाचा ताण पडणार नाही याचीही काळजी घेतली. आपण शिकवतो त्यावर विश्वास असणारा शिक्षकच आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आपल्या आजूबाजूच्या शाळांमधील शिक्षकांना आपल्या मुलांना मार्गदर्शन करायला बोलावू शकतो, तो विश्वास जागा ठेवूनच महेश शिंदे आपल्या मुलांना मार्गदर्शन करायला बाहेरच्या शाळेतल्या शिक्षकांना बोलवतात आणि बाहेरच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा, म्हणून गणित मंचाची स्थापना करून सबंध जिल्ह्यासाठी गणिताचं एक खुलं व्यासपीठ निर्माण करतात; आदानप्रदानाची ही खुली पध्दत आपल्या शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्यात निश्चितच साहाय्यभूत ठरेल यात वाद नाही. स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी व्हॉट्स ऍप ग्रूप निर्माण केला आहे, तर दीपस्तंभ अंकगणित मार्गदर्शकची निर्मिती केली आहे.

पालकांचा असहकार ही महेश शिंदे यांच्यापुढील महत्त्वाची समस्या होती, पण त्यावरही त्यांनी मात करत पालकांसाठी पालक प्रेरणा कार्यशाळाही यशस्वीपणे घेतलेल्या आहेत. पालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे हे प्रयत्नही फार सकारात्मक आहेत.

शाळेचा प्रमुख म्हणून सगळया शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या आणि त्याच वेळी आपल्या परिसरात शिक्षणाच्या गरजा ओळखून काम करणाऱ्या आणि त्यात यशस्वी होणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दहिगाव, ता. कर्जत, जि. रायगड या शाळेतील उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणजे संतोष गोपा दातीर! शालाबाह्य मुलांना शाळेत आणणं आणि त्यांना टिकवून ठेवणं हे आव्हान स्वीकारणं आणि त्यासाठी प्रबोधन करणं, हे जोखमीचे काम संतोष दातीर गेली सात वर्षं करत आहेत. आदिवासी भागातील मजूर कामासाठी वारंवार स्थलांतर करतात, त्यामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होत राहतं, याची जाणीवही त्या पालकांना नसते आणि मुलांना तर तो समज असण्याची शक्यताच नाही. अशा मुलांसाठी त्यांचं वास्तव्य एका ठिकाणी ठेवणं ही गरज असते, ती ओळखून दातीर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मुलांच्या एका ठिकाणी राहण्यासाठी हंगामी वसतिगृहाची सोय केली. त्यामुळे खंड न पडता मुलं शाळेत येऊ  लागली. पण ही मुलं शाळेत येऊ  लागल्यावर त्यांना शिकवताना येणाऱ्या अडचणी वेगवेगळया होत्या. भाषा हा त्यातला सगळयात मोठा अडसर. दातीर यांनी या गोष्टीचं भान ठेवून त्या मुलांची भाषा शिकून घेतली. त्या मुलांना त्यांच्या भाषेत शिकण्याची सोय उपलब्ध करून दिली आणि त्यांचं शिकणं सोपं करून दिलं. किती मोठा विचार केला दातीर यांनी! मुलांचा परिसर भाषेत शिकण्याचा हक्क मान्य करून त्यासाठी कष्ट घेऊन त्यांच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवून दिला. आजच्या पालकांच्या माध्यम निवडीला आणि त्यातल्या वादाला मिळालेलं हे प्रात्यक्षिक उत्तर आहे. असे विचारी मुख्याध्यापक शाळेला लाभले, तर त्या शाळेचा, परिसराचा आणि शिक्षणापासून वंचित राहिलेल्या सगळयांचा विकास अटळ आहे.

सर्व शिक्षण अभियान, शिकण्याचा मूलभूत अधिकार, आणि ज्ञानरचना पध्दतीचा आनंददायक स्वीकार या प्रेरणा या सगळयांच्या काम करण्यामागे आहेत. ज्ञानरचना पध्दतीची मॉडेल्स यशस्वी करण्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळांचा वाटा बहुमोल आहे. शासनाला नेहमीच दूषणं दिली जातात, पण ज्ञानरचना पध्दतीने या शाळांचा आणि पर्यायाने विद्यार्थ्यांचा झालेला विकास हा शिक्षण क्षेत्रातील नव्या क्रांतीचा उदय आहे. अंमलबजावणीतल्या त्रुटी आणि सूचनांची यथायोग्य पोहोचवणी शासनाकडून झाली की आपण प्रगतीची शिखरं पादाक्रांत केल्याशिवाय राहणार नाही, हे या सगळयाचं काम पाहताना पटत गेलेलं सत्य आहे.

डॉ. अर्चना कुडतरकर

9594993034