Enter your Email Address to subscribe to our newsletters
हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण पुरुषोत्तम उर्फ राजाभाऊ जोशी यांचे सोमवार, दि. 18 फेब्रुवारी 2019 रोजी निधन झाले. मृत्युसमयी ते 89 वर्षांचे होते. साप्ताहिक 'विवेक'च्या व्यवस्थापनाला स्थैर्य देण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने विवेक परिवार एका उत्तम संघटकास आणि व्यवस्थापकास मुकला आहे.
सोमवारी रात्री राजाभाऊ जोशी गेल्याची बातमी आली. सात-आठ वर्षांपूर्वी त्यांच्यावर हृदयरोगासाठी शस्त्रक्रिया झाली, तेव्हापासून त्यांच्या हालचाली मंदावल्या होत्या. त्यांना कमी दिसू लागले होते. ते पुण्याला असल्यामुळे त्यांच्या भेटीगाठीही कमी झाल्या होत्या. अधूनमधून फोनवर बोलणे होत असे. 'विवेक'च्या विविध उपक्रमांबद्दल त्यांना उत्सुकता असे. 'हिंदुस्थान प्रकाशन संस्था' ही 'विवेक'ची मातृसंस्था. 1990पासून या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या आधी नाना चिपळूणकर संस्थेचे कार्यवाह होते. तेही एका व्यावसायिक संस्थेतून आले असल्याने 'विवेक'कडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन व्यावसायिक होता. मनात ध्येयवाद ठेवून व्यवहारात व्यावसायिक दृष्टीकोन ठेवला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. राजाभाऊ जोशी यांनी तीच परंपरा अधिक सुदृढ केली. नाना चिपळूणकर यांनी जे रोप लावले, त्याचीच पुढे राजाभाऊंनी मशागत केली. आज 'विवेक'चे जे विश्व उभे आहे, ते उभे करण्यात या दोघांचा मोठा वाटा आहे.
राजाभाऊही 'व्होल्टास'मध्ये मोठया पदावर काम करीत होते व त्याचबरोबर रा.स्व. संघाचे मुंबई महानगरातील एका भागाचे संघचालक होते. या दोन्ही ठिकाणी त्यांनी समरसून काम केल्याने या दोन्ही क्षेत्रांतील शक्तिकेंद्रांची त्यांना कल्पना होती. संघासारख्या संस्थेत काम करीत असताना कार्यकर्त्याची प्रेरणा महत्त्वाची असते. किंबहुना, या प्रेरणांच्या आधारेच अशा संस्थांचे काम चालत असते. केलेले परिश्रम आणि त्याचे परिणाम यांचे गणित अशा प्रकारच्या कामात घालता येत नाही. अपेक्षित परिणाम आले नाहीत, तरी नाउमेद न होता दुप्पट उत्साहाने काम करीत राहायचे असे वातावरणच यातून तयार झालेले असते. परंतु, व्यावसायिक संस्थेत असे नसते. व्यवसायात गुंतवलेल्या प्रत्येक घटकाचा परिणाम काय झाला याचा विचार केला नाही, तर तो व्यवसाय टिकणेच अशक्य असते. वरवर पाहता हे दोन परस्परविरोधी दृष्टीकोन वाटतात. पण, संघकार्यातील प्रेरणा कायम ठेवून दृष्टीकोन मात्र व्यावसायिक ठेवायचा असे जमू शकते, यावर नानांचा जसा विश्वास होता तसाच राजाभाऊंचासुध्दा.
राजाभाऊंच्या कार्यपध्दतीची तीन वैशिष्टये होती. प्रत्यक्ष मैदानावर काम करण्यासाठी पूर्ण स्वायत्तता हे त्यांच्या कार्यपध्दतीचे पहिले वैशिष्टय. बैठकीत अनेक विषयांची साधकबाधक बरीच चर्चा होई. 'विवेक'ची परिस्थिती अत्यंत खडतर होती. प्रत्येक प्रश्नावर मात करण्याकरिता अनेक प्रयोग करावे लागत. त्यातील काही यशस्वी होत, तर काही अयशस्वी. असे असतानाही त्यांनी नवे प्रयोग करणाऱ्यांना कधी अडवले नाही. एखादा प्रयोग अयशस्वी झाला म्हणून त्यांनी कधी कोणाला धारेवर धरले नाही. प्रयोगांच्या यशापयशाच्या कारणांवर चर्चा व्हायची. त्याही वेळी 'मी असे सांगत होतो' असे सांगत, आपला शहाणपणा मिरविला नाही. त्यामुळे नवनवे प्रयोग करण्याची 'विवेक'ची संस्कृती अधिक डोळस बनत गेली. 'विवेक'च्या व्यवस्थापनाला स्थैर्य आले. 'एक उत्तम संच म्हणून काम करणारी संस्था' असा जो 'विवेक'ने नावलौकिक मिळविला, ती कार्यपध्दती विकसित करण्यात राजाभाऊंचा सिंहाचा वाटा होता.
त्यांचे दुसरे वैशिष्टय म्हणजे, राजाभाऊंनी कधी मोठी मोठी भाषणे दिली नाहीत. याउलट बैठकीत संवाद साधण्यात त्यांची हातोटी होती. त्यांच्या कार्यकाळातच जिल्ह्या-जिल्ह्यात 'विवेक'साठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण होऊ लागली होती. काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांवर स्वाभाविकच संघाच्या कार्यपध्दतीचा प्रभाव होता. त्यांच्याशी बैठकीत अनेक उदाहरणे देत ते संवाद साधत व या दोन्ही कामांतला फरक स्पष्ट करत. अनेक वेळा भाषणापेक्षा अशा संवादांचा उपयोग अधिक होत असतो.'विवेक'च्या प्रतिनिधीचा व्यावसायिक दृष्टीकोन तयार व्हायला याची खूप मदत झाली.
त्यांचे तिसरे वैशिष्टय म्हणजे 'विवेक'मध्ये कार्यरत असलेल्या सर्वांना त्यांनी दिलेला व्यावहारिक दृष्टीकोन. 'विवेक'मध्ये स्वत:ला झोकून देऊन काम करण्याची संस्कृती आहे व तेच 'विवेक'चे खरे बळ आहे. पण हे करत असताना आपण आपल्यासाठी व आपल्या घरासाठी वेळ दिला पाहिजे, असे ते केवळ आग्रहाने सांगत असत. एवढेच नव्हे, तर वर्षभरात कोणी जर रजा घेतली नाही, तर ती का घेतली नाही याची चौकशी करत. पहिल्यांदा आम्हाला याची अडचण वाटू लागली. कारण, आजाराव्यतिरिक्त कोणी रजा घेत नसे. त्यामुळे प्रत्येक जण वर्षभर असणार, असे गृहीत धरून कामाचे नियोजन केले जाई. पण राजाभाऊंनी ती पध्दत बदलायला लावली. त्या वेळी ती अडचणीची ठरली, तरी नंतर त्याची दीर्घकालीन उपयुक्तता लक्षात आली.
एखादी संस्था घडत जाते, त्या वेळी तिच्या वेगवेगळया टप्प्यांवर अनेक जणांनी तिला आकार दिलेला असतो. ती सर्वच व्यक्तिमत्त्वे लोकांसमोर येतात असे नाही. खरे तर इतर संस्थांत अध्यक्षपद हे मिरविण्याचे असते. तशी परिस्थिती 'विवेक'मध्ये कधीच नव्हती. अशा संस्थेत संस्थेचा विकास होण्यासाठी विश्वस्त मंडळाने कशी भूमिका घ्यावी, याचा वस्तुपाठ नाना चिपळूणकर, राजाभाऊ जोशी आदींनी घालून दिला. तो स्मरणीय व आचरणीय आहे.