भारत आणि पाकिस्तान विभाजनात हिंदू संस्कृतीशी अविभाज्य नाते असलेले अनेक प्रदेश, शहरे, नद्या भारताला गमवावे लागले. या विभाजनात झालेल्या सांस्कृतिक विस्थापनात पाकिस्तानातील आणि बांगला देशातील मुस्लीमेतर समाज घटकांचीही वाताहत झाली. पूर्व पाकिस्तानला जोडला गेलेला सिलेट जिल्हा हे त्याचेच एक उदाहरण आहे.
1947मध्ये भारताचे विभाजन केले गेले, त्या वेळी पश्चिमेला सिंधूसह पंजाबच्या पाच नद्यांचा सुजलाम सुफलाम प्रदेश पाकिस्तानला दिला गेला. सिंधू! ज्या नदीमध्ये हिंदुस्थानचे 'हिंद'पण आहे, भारताची ओळख आहे, ती नदी भारताला परकी झाली. पराशरपुत्र व्यास महर्षींचे नाव धारण करणारी बियास नदी, शतधारांनी वाहणारी सतलज नदी, जिच्या काठावर ॠग्वेदात वर्णन केलेले दहा राजांचे युध्द झाले ती इरावती किंवा रावी नदी, जिच्या काठावर पुरू राजाने यवन सिकंदरचा सामना केला ती झेलम नदी आणि गडद रंगाचे पाणी वाहून आणणारी चंद्रभागा अर्थात चेनाब नदी या पाचही नद्या भारताला परक्या झाल्या. 15 ऑॅगस्ट 1947ला आपल्या जलदायिनी मातेपासून भारताची ताटातूट झाली.
इकडे पूर्वेला ब्रह्मपुत्रा व गंगा या नद्यांच्या संगमाचा व मुखाचा सुपीक प्रदेश पूर्व पाकिस्तानला दिला गेला. भगीरथ प्रयासाने जिला धरणीवर आणले, जिला पुराणांनी गौरविले, त्या जह्नूकन्येच्या तिरापासून विलग होताना भारताला किती यातना झाल्या असतील? जिच्या तिरावर उभे राहता पलीकडचा काठ दिसत नाही, अशी ब्रह्माची 'पुत्र' असलेली ब्रह्मपुत्रा नदीसुध्दा परकी झाली.
नद्यांचा सांस्कृतिक वारसा, त्यांच्याशी असेलेले भावनिक नाते यावर पाणी सोडावे लागलेच, तसेच या नद्यांच्या पाण्यावरील अधिकारसुध्दा बऱ्याच अंशी सोडावा लागला. जी कथा नद्यांची, तीच कथा काही शहरांचीसुध्दा. हिंदू-शीख लोकसंख्या अधिक असलेला पंजाबचा लाहोर जिल्हा केवळ पाकिस्तानकडे कराचीशिवाय मोठे शहर नाही, म्हणून पाकिस्तानकडे सोपविण्यात आला. तसेच सिंधमधील काही भागात सिंधी लोकसंख्या अधिक असूनसुध्दा ते प्रांत पाकिस्तानला दिले गेले. या विभाजनाला काँग्रेसने (INCने) विरोध न करणे, दबाव न आणणे आश्चर्यकारक आहे. विभाजन झाल्यावर लाहोर व सिंधमधील असंख्य लोक घरदार सोडून नेसत्या वस्त्रानिशी भारतात आले.
पूर्व सीमेवरदेखील असेच प्रकार झाले. खुलना येथे हिंदू लोकसंख्या अधिक असूनसुध्दा हा जिल्हा पूर्व पाकिस्तानला दिला गेला, तर चितग्राम हिल्स (Chittagong Hill Tracts) हा चकमा बौध्दबहुल प्रांत बांगला देशला जोडला गेला. खुलनामधील हिंदू लवकरच भारतात शरणार्थी म्हणून आले, तर चितग्राम हिल्समध्ये बांगला देशने म्यानमारमधील मुस्लीम आणून वसविल्यावर, येथील चकमा बौध्द भारतात शरणार्थी म्हणून आले.
बंगाल आणि आसाम यांच्या सीमेवरील सिलेट जिल्ह्याचा काहीसा विचित्र प्रकार झाला. सिलेट हा आसामला जोडलेला बंगाली भाषिक प्रांत असल्याने, आसामला तो नकोसा होता. सिलेटमध्ये कॉंग्रेसचे व हिंदूंचे प्राबल्य होते, त्यामुळे सिलेट खरे तर भारतात राहावयास हवा होता. 3 जुलै 1947ला सिलेटमध्ये मतदान घेण्याचे ठरले. प्रत्येक नागरिकाला, सिलेट जिल्हा पूर्व पाकिस्ताला जोडायचा की भारताला जोडायचा हे मत देण्याचा अधिकार होता. लगेचच 6 व 7 जुलैला मतदान झाले. पाकिस्तानच्या पारडयात जवळजवळ 55,000 मते अधिक पडल्याने हा जिल्हा पूर्व पाकिस्तानला जोडला गेला. परंतु, बंगाली-आसामी भाषिक संघर्षामुळे, 22% लोकांनी (साधारण 1,23,000 मते) कोरी मते दिली. प्रांतिक आणि भाषिक विसंवादाकडे लक्ष दिल्याने, अधिक गंभीर राष्ट्रीय प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले. ती 22% मते जर भारताच्या बाजूने दिली गेली असती, तर सिलेट जिल्हा आज भारतात राहिला असता.
याचा परिणाम असा झाला की, विभाजन होताच सिलेटमधील बंगाली भाषिक हिंदू आसाममध्ये शरणार्थी म्हणून आले. सिलेट दान करून, केवळ आसामी भाषेचा प्रदेश असल्याचा आसामचा आनंद संपला. यामध्ये चहाच्या मळयांची जमीन मात्र हातची गेली. आसामच्या जनतेला या विभाजनाचा फाटक बसला, त्याहीपेक्षा अधिक घातक फटका सिलेटच्या जनतेला बसला. 1947मध्ये सिलेटमध्ये साधारण 40% असलेले हिंदू आज साधारण 12% झाले आहेत आणि बांगला देशमध्ये 1947मध्ये असलेले साधारण 31% हिंदू आता केवळ 9% हिंदू आहेत.
संदर्भ -
l Referendums past and present - Murad Qureshi, Dhaka Tribune, 20 Aug 2017
l No Hindus will be left after 30 years - Md. Kamrul Hasan, Dhaka Tribune, 20 Nov 2016
l History and Politics of Partition: Assam and Sylhet.
9822455650