Enter your Email Address to subscribe to our newsletters
पॉप-रॉक-पंजाबी गाण्यांच्या जमान्यातही भारतीय शास्त्रीय संगीताचे महत्त्व कायम आहे. आता संगीताविषयी उच्च जाण असलेली मंडळी छोटया गावांमध्ये संगीताच्या मैफली घडवून आणत आहेत. सेलू येथे नुकतेच संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पार पडलेला संगीत महोत्सव हा त्यातील एक भाग समजावा. एकूणच ग्रामीण भागात शास्त्रीय संगीत चळवळ कशी जोर धरत आहे, याचा धांडोळा घेणारा लेख.
डिसेंबर महिन्यातील शेवटच्या दिवसांतील ही घटना आहे. थंडी प्रचंड वाढलेली. रविवारचा दिवस. नेमका हा लग्नाचा मुहूर्त. अशा प्रसंगी जर संगीताचा कार्यक्रम, तोही शास्त्रीय संगीताचा, तोही सकाळी 8 वाजता ठेवला, तर कुणी येईल का? गाव छोटे. पण या सगळया अडथळयांवर मात करत सेलू (जि. परभणी. गांव रेल्वे ट्रॅकवर आहे. यवतमाळ माहीत नसणारे लोक महाराष्ट्रात आहेत, तेव्हा त्यांना सेलू कुठे आहे हे सांगावेच लागेल.) या गावात शास्त्रीय संगीताच्या मैफलीत शंभरएक रसिकांनी पहाटे हजेरी लावून आपले रसिकतेचे नाणे खणखणीत असल्याचे सिध्द केले.
जुन्या जमान्यातील गायक संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 29-30 डिसेंबर 2018 असे दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सामान्य रसिकांच्या बळावर शास्त्रीय संगीताचा महोत्सव भरविता येतो, यावरच मुळात कुणाचा विश्वास बसत नव्हता. पण सेलूसारख्या गावाने कुठलाही मोठा प्रायोजक न घेता, कुठल्याही राजकीय नेत्याचा आश्रय न घेता सामान्य रसिकांच्या स्वेच्छा देणगीवर संमेलन यशस्वी करून दाखविले. या संमेलनात संपूर्ण तीन सत्रे शास्त्रीय संगीताचीच झाली.
'आधी केले मग सांगितले' या धर्तीवर या प्रदेशातील रसिकांनी सेलूचा महोत्सव झाल्यावर औरंगाबादला मराठवाडा पातळीवर बैठक घेतली. आधी संपूर्ण मराठवाडयात आणि नंतर महाराष्ट्रात शास्त्रीय संगीताचे महोत्सव, छोटया मैफली, कार्यशाळा यांचे आयोजन करण्याचा निर्धार केला. आधीपासून विविध ठिकाणी ज्या व्यक्ती आणि संस्था शास्त्रीय संगीतासाठी काम करत आहेत, त्यांना जोडून घेण्यासाठी 'देवगिरी संगीत प्रतिष्ठान' नावाने अनौपचारिक मंचाची स्थापना केली. संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ गायक पं. नाथराव नेरळकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या मंचाचे रीतसर उद्धाटन गाण्याच्या मैफीलीनेच व्हावे, असे सर्वानुमते ठरले.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या पत्नी वत्सलाबाई जोशी या औरंगाबादच्या. येथील शारदा मंदिर प्रशालेत त्यांचे शिक्षण झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगीतिक उपक्रम करण्याचे प्रयत्न पूर्वीही झाले होते. पण त्यात सातत्य राहिले नाही. तेव्हा 'देवगिरी संगीत प्रतिष्ठान'ची सुरुवात म्हणून वत्सलाबाईंच्या स्मृतीत संगीत सभा घेण्याचा ठरले. पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले. बनारस घराण्याचे तबला वादक पं. अरविंद आझाद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिष्ठानचे रीतसर उद्धाटन झाले.
प्रतिष्ठानच्या वतीने परभणीला उस्ताद डॉ. गुलाम रसूल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाने संगीत चळवळीची कोंडी फोडण्याचे काम केले आहे. या प्रदेशात अंबडसाख्या छोटया गावात गेली 95 वर्षे दत्त जयंती संगीत महोत्सव होतो आहे. असे तुरळक अपवाद वगळता छोटया गावांमधून नियमित स्वरूपात शास्त्रीय संगीताचे उपक्रम होताना दिसत नाहीत.
मोठया शहरांमध्ये 'सवाई गंधर्व संगीत महोत्सव'च्या धर्तीवर छोटे-मोठे उपक्रम आता नियमित होत आहेत. पण लहान गावांत असे काही घडत नाही. त्यातील काही अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. एक तर अशा कार्यक्रमांना तिकीट लावले तर लोक येतीलच असे नाही. शिवाय पुरेसा निधी जमा होईलच असे नाही. प्रायोजक मिळवावेत, तर त्यांच्या काही अटी असतात त्या शास्त्रीय संगीताला पेलतीलच असे नाही. कुठल्याही व्यावसायिक आस्थापनांची अपेक्षा असते की भरपूर गर्दी जमा झाली पाहिजे. पण शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात असे काही होताना दिसत नाही.
पॉप-रॉक-पंजाबी गाण्यांना प्रचंड मोठा समूह ऐकायला मिळतो. मोठया स्टेडियमवर हे कार्यक्रम होतात. येणारे तरुण-तरुणी धुंद होऊन नाचत असतात. प्रचंड मोठा आवाज केलेला असतो. याच्याशी तुलना करता शास्त्रीय संगीताचे क्षेत्र प्रचंड वेगळेच आहे, हे लक्षात येते.
पहिली बाब म्हणजे हजारो श्रोत्यांपर्यंत आमचे संगीत अशा पध्दतीने पोहोचू शकत नाही. डोके बाजूला ठेवून बेधुंदपणे झिंग आणणाऱ्या तालावर नाचणे हे इथे जमत नाही. हे संगीत बुध्दी बाजूला ठेवून नव्हे, तर बुध्दी लावूनच सादर केले जाते, परिणामी ऐकतानाही त्या श्रोत्याला आपल्या बुध्दीने त्याचा अन्वयार्थ लावावा लागतो. हे संगीत म्हणजे तयार असलेल्या नोटेशनवर केवळ गाणे असे नाही. रागदारीची एक चौकट तेवढी असते. बाकी रंग प्रत्येक मैफलीत त्या त्या वेळी भरले जातात. तोच गाणारा/वाजविणारा असेल आणि रागही तोच असेल, तरी तो पहिल्यासारखा असतोच असे नाही.
कुणीही येऊन शास्त्रीय संगीताच्या मैफलीला बसेल आणि त्याला ते पचेल असेही नाही. इथे श्रोत्याचा कानही तयार व्हावा लागतो. शास्त्रीय संगीतासाठी साधारणत: 500 आसनक्षमतेचे सभागृह पुरेसे आहे. (छोटया मैफलींसाठी 200पेक्षाही कमी पुरे.) त्यापेक्षा जास्तीची आसनव्यवस्था पोषक ठरत नाही. आज ज्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचा बोलबाला आहे, त्याही महोत्सवात जास्तीची गर्दी अनावश्यक आहे असेच या क्षेत्रातील तज्ज्ञ मानतात. मुळात आमचे संगीत असे पाच आणि दहा हजारांच्या संख्येने ऐकण्याचे नाहीच.
मोठे कलाकार व्यवहारिक पातळीवर मोठया महोत्सवात सहभागी होतात, पण जाणीवपूर्वक छोटया मैफलीत आपली कला सादर करतात, कारण त्यांना त्यातून आपल्या सादरीकरणाचे कितीतरी आयाम सापडतात. हे प्रचंड मोठया ठिकाणी घडत नाही. डोळे मिटून आपण केलेला रियाज, आपला विचार ते जेमतेम सादर करतात. पण नवीन काही सुचण्याची प्रक्रिया प्रचंड मोठया महोत्सवात घडत नाही.
या सगळया पार्श्वभूमीवर छोटया गावांमधून सुरू झालेल्या 'देवगिरी संगीत प्रतिष्ठान'सारख्या शास्त्रीय संगीत चळवळीला रुजवू पाहणाऱ्या उपक्रमांचा विचार करावा लागेल.
मुळात आपल्याकडे देवळांमधून संगीत परंपरा फार वर्षांपासून जतन केली गेली होती. कितीतरी कालबाह्य धार्मिक रूढी-परंपरांना विरोध करत असताना नकळत आपण संगीत परंपरेवरही घाला घातला. देवीच्या आरत्या-पदे-गाणी सादर करणारे दलित कलाकार पुरोगामी चळवळीत या परंपरा जतन करताना टीकेचे लक्ष्य व्हायला लागले. चर्मवाद्य वाजविण्याची परंपरा पूर्वाश्रमीचे महार, मातंग यांच्याकडे चालत आलेली होती. कोल्हाटी समाजाकडे नृत्याची परंपरा होती. जातिव्यवस्थेची एक काळी छाया संगीतावर पडलेली होती.
पण स्वातंत्र्योत्तर कालखंडात यातील कालबाह्य रूढी-परंपरांना बाजूला ठेवून निखळ संगीत परंपरा जतन व्हायला हवी होती. अजूनही दक्षिणेतील काही मंदिरांमध्ये ती जतन केलेली आहे. मंदिरांपेक्षा सार्वजनिक सभागृहांमध्ये आपण सांस्कृतिक उपक्रम चालवू. ते सोपे आहे, असे बऱ्याच जणांना वाटते. पण यातील अडचण अशी की महाराष्ट्रात सांस्कृतिक उपक्रमांसाठी बांधलेली सभागृहे, समाज मंदिरे यांची अवस्था बकाल होऊन गेलेली आहे. शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना (नगरपालिका, महानगरपालिका इ.ना) निधी देऊन जी नाटयगृहे उभारली, ती काही दिवसांतच निकाली निघाली. याच्या उलट छोटया गावांमध्ये आजही एखादे जुने किंवा नवीन मंदिर आढळून येते, ज्याचे सभागृह चांगल्या अवस्थेत असते. तिथे किमान स्वच्छता राखली जाते. त्या त्या देवी-देवतेचा उत्सव असेल, तर छोटया गावातील अगदी धार्मिक नसलेले लोकही त्यात उत्साहाने सामील होतात.
या मंदिरांना जोडून छोटया गावांमध्ये संगीताच्या मैफली करणे सहज शक्य आहे. काही ठिकाणी गुरुवारची पंचपदी, एकादशीचे कीर्तन, महाशिवरात्रीचे भजन अशा परंपरा आहेतच. यांना केवळ थोडेसे आधुनिक रूप देण्याची गरज आहे.
शास्त्रीय संगीतासाठी असे उपक्रम रुजविणे आवश्यक आहे, याचे कारण असे की हे संगीत म्हणजे इतर सर्व प्रकारच्या सुगम संगीताचा पाया होय. ते शिकविण्याची एक शास्त्रशुध्द पध्दत आहे. काही एक मेहनत, उपजत गळा आणि बुध्दी या तिन्हीच्या आधारावर हे संगीत फुलते. संगीत ही सादरीकरणाची कला असल्याकारणाने ते सादर होणेच गरजेचे आहे. खूप मोठा गायक आहे, पण तो गातच नाही असे होऊ शकत नाही.
दुसरीकडून चांगले रसिक - म्हणजेच कानसेन तयार होण्यासाठी नियमितपणे हे शास्त्रीय संगीत सादर झाले पाहिजे. या दोन्ही बाबींचा विचार करून, म्हणजेच तानसेन आणि कानसेन - किंवा त्याहीपेक्षा ज्यांच्याकडे कलासक्त मन आहे, त्यांच्यासाठी पोषक वातावरण होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. धर्माच्या नावाखाली शेकडो वर्षे हे चालले. आता मात्र जाणीवपूर्वक वेगळया पध्दतीने हे रुजविले गेले पाहिजे.
दुसरा एक गंभीर मुद्दा सध्याच्या धकाधकीच्या काळात पुढे येता आहे. तास-दोन तास शांत बसून एखाद्या रागाचा विस्तार ऐकणे, स्वरांचे बारकावे समजून घेणे, संगीत सौंदर्याचा आस्वाद घेणे हे मनःशांतीसाठी आवश्यक आहे हे लक्षात घेतले पाहिजे. तुम्हाला गाणे कळो की न कळो, पण या गाण्याने मनःशांती मिळते, विचारशक्तीला चालना मिळते, आपलेही मन सर्जनात्मक दिशेने काम करू लागते, हे महत्त्वाचे आहे.
छोटया गावांमध्ये ही चळवळ जास्त चांगली रुजू शकते, याचे एक कारण म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडात तयार झालेला मध्यमवर्ग. त्याच्यापाशी अशा कलांसाठी किमान वेळ आणि पैसा उपलब्ध आहे. शहरांमध्ये वेळेची समस्या मोठी गंभीर आहे. आणि अगदी छोटया गावांमध्ये पोटापाण्याचे प्रश्नच सुटलेले नसताना कलात्मक चळवळींसाठी कुठल्याच अर्थाने जागा शिल्लक नसते. मग यातला मधला पर्याय म्हणून नगरपालिका असलेली महाराष्ट्रातील 200 गावे 'संगीत चळवळीची केंद्रे' म्हणून विचारात घ्यावी लागतील. 'देवगिरी संगीत प्रतिष्ठान'सारख्या उपक्रमांचे महत्त्व या दृष्टीने जास्त आहे.
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद