के दिल अभी भरा नहीं

विवेक मराठी    11-Feb-2019
Total Views |

काही गाणी कितीही ऐकली तरी मन भरत नाही. त्यातील सूर, शब्द, भावना काळाचे भान हरपून वर्षानुवर्ष तितक्याच ताज्या राहतात. हिंदी सिनेसृष्टीला तर अशा गाण्यांची देणच लाभली आहे. 'हम दोनो' चित्रपटातील गीताच्या 'के दिल अभी भरा नही' या ओळी त्या गाण्याबाबतीतही तितक्याच सार्थ ठरतात.

संध्याकाळची वेळ. पार्क फुलून गेले होते. सारी तरुणाईच इथे अवतरली होती. आकाश सांजरंगात न्हाऊन निघाले होते. उल्हास, आनंद, हुरहुर अशा अनेक संमिश्र भावनांचा कोलाज घेऊन येणारी ही वेळ खरंच सुंदर असते. काही वेळाने काळोखाचे साम्राज्य सुरू झाले. सूर्याने जड अंत:करणाने पृथ्वीचा निरोप घेतला आणि इथेही अनेकांची घरी परतायची तयारी सुरू झाली. आता सातच्या आत घरी ही परिस्थिती नसली, तरी वेळेला मर्यादा असतेच.

आमचा चार-पाच मैत्रिणींचा ग्रूप आठवडयातून एकदा भेटतो. गप्पांचा मस्त फड जमवतो. दोनएक तास हशा-टाळयांत रात्र कधी विसाव्याला येते, ते समजतच नाही. मग जायची लगबग सुरू होते, पण जेव्हा उठतो, तेव्हा मात्र 'दिल अभी भरा नही'ची अवस्था झालेली असते. घरच्या जबाबदारीत अडकलेल्या आम्हा चारचौघींची जर ही कथा, तर ज्यांचे जगच दोघांचे आहे, त्यांची काय अवस्था होत असेल!  कितीही वेळ गेला तरी जेव्हा परतायची वेळ येते, तेव्हा एकमेकांत अडकलेली नजर, हातात गुंफलेले हात सोडवून घेणे खरेच कठीण होते. मग विनवण्या सुरू होतात. घालवलेला वेळ - मग कितीही का असेना, प्रेमिकांना नेहेमीच अपुरा वाटतो.

अल्बर्ट आइनन्स्टाइनचा सापेक्षता सिध्दान्त आठवतो का? तो समजावताना त्यांनी एक मजेशीर उदाहरण दिले होते. गरम तव्यावर एक मिनिट जरी हात ठेवायला सांगितले, तरी ते मिनिट एका तासासारखे भासते, पण तेच एका सुंदर मुलीशेजारी बसून राहा बघू, मनाचे घडयाळ एवढे फास्ट धावते की घालवलेला ताससुध्दा मिनिटाहून कमी भासतो.

अभी ना जाओ छोडकर

के दिल अभी भरा नहीं

 

रातराणीच्या फुलांचा गंध साऱ्या आसमंताला भारून टाकत आहे. त्यातच तिच्या केवळ अस्तित्वाने सारे वातावरणच नशीले झाले आहे. मग तो तरी कसा अलिप्त असणार!

एवढा सुंदर नजारा आहे हा, मग त्याला पोरके करून कशी जाऊ शकतेस तू? असा रोकडा सवाल आहे त्याचा. दोघांच्यातील 'तो' आपल्या प्रियेला आणखी थोडा वेळ थांब ना असे विनवताना म्हणतो,

 

अभी-अभी तो आयी हो, बहार बन के छाई हो

हवा ज़रा महक तो ले, नज़र ज़रा बहक तो ले

ये शाम ढल तो ले ज़रा, ये दिल सम्भल तो ले ज़रा

मैं थोडी देर जी तो लूँ, नशे के घूँट पी तो लूँ

अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं।

 

जिच्याकडे हा हट्ट आहे, ती आहे 'साधना'. देखणी आणि सोज्ज्वळ साधना. हे गाणे पाहणाऱ्या कुणालाही, स्वत:ला देव आनंदच्या जागी उभे राहून जिची आराधना करायला आवडेल अशी साधना.

पूर्ण दिवस एकमेकांच्या संगतीत घालवूनही न जाऊ देण्याचा हा वेडा हट्ट तिलाही हवाहवासा वाटला, तरी आता क्षितिजावर तारे लुकलुकायला लागले आहेत. घरचे लोक वाट पाहत असतील याची तिला जाणीव आहे. उशिराच्या कारणांची उत्तरे तर तिलाच तयार करायची आहेत. आता जर आपण थांबलो, तर आपलाही पाय घसरू शकतो याचीही भीती आहेच तिच्या मनात. संयम तर कुणाचाही सुटू शकतो आणि त्याचे परिणाम निश्चितच चांगले असू शकत नाहीत, हे माहीत आहे तिला. स्वत:ला थांबवून त्याला सावरताना ती म्हणते,

 

सितारे झिलमिला उठे, चराग जगमगा उठे

बस अब ना मुझ को टोकना, न बढ़ के राह रोकना

अगर मैं रुक गयी अभी, तो जा न पाऊँगी कभी

 

आता जर थांबले, तर परत जाण्याची वाट बंद होईल म्हणून मनावर दगड ठेवून पदर सोडवून घेताना तिची घालमेल चेहऱ्यावर स्पष्ट दिसते तिच्या. जेव्हा हवेहवेसे वाटणारे सुख हाताच्या कवेत असूनही घेता येत नाही, तेव्हा मनातील संघर्षाचे कसे वर्णन करणार! चाललेली खळबळ मनातच ठेवून ती त्याला बजावते,

 

जो ख़त्म हो किसी जगह, ये ऐसा सिलसिला नहीं

यही कहोगे तुम सदा, के दिल अभी नही भरा

 

या सिनेमातील नायक नोकरीच्या शोधात आहे. जिच्यावर त्याचे प्रेम आहे, ती आहे श्रीमंत घरची मुलगी. प्रेमात माणसे आंधळी होतात, म्हणून परिस्थिती बदलत नाही. प्रेमाचा रस्ता खडतर असणार हे जाणून आहे तो. तिच्यावर विश्वास असला, तरीही हे आव्हान ती पेलू शकेल का? याबाबत साशंकसुध्दा.

 

अधूरी आस छोड के, अधूरी प्यास छोड के,

जो रोज़ यूँ ही जाओगी,

तो किस तरह निभाओगी

 

हा प्रश्न केवळ आजच्या संध्याकाळपुरताच मर्यादित नाही. हा प्रश्न आहे त्यांच्या दोघांच्या सहजीवनाचा. आत्ताच जर सोडून चाललीस, तर आयुष्याचा मार्ग कसा काय चालणार तू माझ्याबरोबर? मनातली असुरक्षितता दडवून तो तिला विचारतो.

कि जिन्दगी की राह में, जवाँ दिलों की चाह में,

कई मकाम आयेंगे, जो हम को आजमाएंगे

 

प्रेमात असलेला पुरुष थोडा उतावीळ असतो. आपले सुख आपल्या मुठीत ठेवायला उत्सुक असतो. तिलाही सहवासाची ओढ वाटत असतेच, पण समाजाची धास्ती, संस्काराचे ओझे, घरातील माणसांचे दडपण आणि स्त्री म्हणून असलेल्या तिच्या मर्यादा तिला भानावर ठेवतात. 'अभी ना जाओ छोडकर' हे गाणे तसे नायकाचे.

या वेळी आपला पदर सोडवून ती निघून जाते खरी, पण जेव्हा त्याला गरज असते, तेव्हा मात्र त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. याच गाण्याच्या सुरावटीवर बेतलेले आणखी एक गीत आहे या चित्रपटात.

 

तुम्हारे प्यार की कसम, तुम्हारा ग़म है मेरा ग़म

न यूँ बुझे-बुझे रहो, जो दिल की बात है कहो

जो मुझ से भी छुपाओगे, तो फिर किसे बताओगे

मैं कोई गैर तो नहीं, दिलाऊँ किस तरह यक़ीं

कि तुमसे मैं जुदा नहीं, मुझसे तुम जुदा नहीं

 

हे केवळ आकर्षण नाही, तर प्रगल्भ, परिपक्व प्रेम आहे. कोणत्याही अडचणींना, गैरसमजांना तोंड देण्यास समर्थ आहे. 'तुम्हारे प्यार की कसम, तुम्हारा गम है मेरा गम' ही नुसती कोरडी सहानुभूती नाही. त्यात दिलासा आहे आणि त्याच्याबरोबरीने उभे राहण्याची जिद्दही.

1961मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दोनो' या चित्रपटातील या गीतांचे संगीत दिग्दर्शन जयदेव यांनी केले आहे. वर्षानुवर्षे रसिकांच्या मनात जागा पटकावून असलेले हे गीत कितीही ऐकले, तरी 'दिल अभी भरा नहीं' या ओळीला सार्थ ठरवते.