पर्यावरणतज्ज्ञांमध्ये एक मतप्रवाह असा की, गवताळ प्रदेश ही भारतातली मूळची परिसंस्था नाही. भारत हा मूळचा जंगलप्रधान देश. मानवी हस्तक्षेपामुळे जंगलांचा ऱ्हास होऊन गवताळ प्रदेश तयार झालेले आहेत. चराई आणि वणवा या दोन गोष्टींपासून गवताळ प्रदेश पूर्णतः संरक्षित केले गेले, तर ecological successionची प्रक्रिया होऊन भविष्यात पुन्हा तिथे जंगल निर्माण होईल. त्यामुळे चराईवर बंदी घालण्याची मागणी अनेक पर्यावरणतज्ज्ञांकडून होते.
मात्र 'चराईबंदी'बाबत अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं काहूर माझ्या मनात अनेक दिवसांपासून होतं, अजूनही आहे. कोकणातल्या आमच्या घरी दोन म्हशी आहेत आणि आम्ही त्यांना बाहेर मोकळं चरायला सोडतो. गेली हजारो वर्षं भारतात सर्वत्र रानात गुरं चरत आहेत, तर मग तो निसर्गाचाच एक भाग नव्हे का? हरणं, हत्ती, गवे, ससे जंगलात चरलेले चालतात, तर मग गुरं का नकोत? 24 तास 365 दिवस गुरं गोठयात बांधून ठेवणं आणि त्यांना बाहेरून चारा आणून घालणं आर्थिकदृष्टया कितपत परवडेल? शिवाय गुरं बाहेर मोकळी फिरल्यामुळे त्यांना मिळणारा वैविध्यपूर्ण आहार, गोचिडीचं आपोआप होणारं नियंत्रण, नैसर्गिकरित्या गाई-गुरांचं होणारं प्रजनन, त्यांच्या शेणा-मुतातून जमिनीला नैसर्गिकरीत्या होणार खताचा पुरवठा आणि बीजप्रसार, या गुरेचराईच्या फायद्यांकडे सपशेल दुर्लक्ष करायचं का? एका बाजूला विकासकामांसाठी आणि दुसऱ्या बाजूला निसर्गसंवर्धनासाठी सगळया चराऊ जमिनी कुंपण घालून संरक्षित केल्या गेल्या, तर गुरं चरवायची कुठे? एसी गाडीतून फोटो काढायला जंगलात जाणारे पर्यटक हे निसर्गावरचं 'प्रेशर' नव्हे, आणि स्थानिक लोकांनी त्यांच्या उपजीविकेसाठी जंगलात गुरं चारली तर ते मात्र निसर्गावरचं 'प्रेशर', हा कुठला न्याय? सडेपठारांवर होणाऱ्या गुरेचराईमुळे गवताचं प्रमाण नियंत्रणात राहून इतर वनस्पतींच्या वाढीला वाव मिळतो, असंही अभ्यासकांना आढळून आलं आहे. 1983 साली जेव्हा भरतपूर पक्षी अभयारण्यात चराईबंदी झाली, तेव्हा स्थानिकांचा प्रचंड रोष झाला. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला, त्यात काही लोक दगावलेही. परंतु चराईबंदीमुळे पुढील काळात तिथे paspalum नावाचं गवत अतिप्रमाणात वाढलं आणि तिथल्या जीवविविधतेवर त्याचा विपरीत परिणाम झाला. (संदर्भ : Ecological Journeys - डॉ. माधव गाडगीळ.) या सगळयाचा विचार करता चराईबंदी सामाजिकदृष्टया आणि पर्यावरणदृष्टया कितपत योग्य?
वऱ्हाड सहलीत यातल्या काही प्रश्नांची अंशतः उत्तरं मिळाली. पूर्ण चराईबंदी केलेला परिसर, पूर्ण मोकाट गुरेचराई होत असलेला परिसर आणि चराईचं सुयोग्य व्यवस्थापन केलेला परिसर अशी तिन्ही उदाहरणं प्रत्यक्ष डोळयांनी पाहता, अभ्यासता आली.
सर्वप्रथम आम्ही भेट दिली ती अकोल्यातल्या कारंजा-सोहोळ वन्यजीव अभयारण्याला. सुमारे 1800 हेक्टरचं हे क्षेत्र 20 वर्षांपूर्वी 'संरक्षित प्रदेश' म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आला आणि गेल्या वर्षी त्याची अंमलबजावणी झाली. तीन तास अभयारण्यात भटकंती करताना बाभूळ, धामण, लेंडी, चारोळी, हेंकळ, मेढशिंगी, पळस, बारतोंडी असे शुष्क पानझडी वृक्ष नजरेस पडत होते. त्या संपूर्ण परिसरात 'काळी कुसळी' (Heteropogon contortus) हे पोषणमूल्यांच्या बाबतीत हलक्या दर्जाचं असणारं गवत सर्वत्र सुमारे तीन-चार फूट उंच वाढलेलं आढळलं. वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित झाल्याने इथे चराईवर पूर्ण बंदी घातलेली होती. त्याबाबत तिथले वनरक्षक आम्हाला माहिती देत होते. चराईबंदीपूर्वी इथल्या परिसरात किती गुरं चरत होती, त्यावर किती लोक अवलंबून होते, जेव्हा चराईबंदी झाली तेव्हा स्थानिक लोकांकडून विरोध झाला का, त्यांना विश्वासात कसं घेतलं, 1800 हेक्टरवर चराईबंदी झाल्यावर आता लोकांकडे गुरं चारण्यासाठी पर्याय काय? असे अनेक प्रश्न आम्ही वनरक्षकांना विचारले. परंतु त्यांची फारशी समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत.
कारंज्याहून वडाळा या गावाकडे जाताना वाटेत 'पिंजर' या गावात आम्ही काही वेळ थांबलो. या भागात गुरं आणि शेळयांकडून पूर्ण मोकाट चराई होते. सुमारे दोनशे शेळया आणि शंभर-एक गुरं तिथे चरताना दिसली. बाभळीची झाडं सोडता इथे फार काही वनस्पतीवैविध्य दिसत नव्हतं. गवत अगदी जमिनीलगत होतं. मोकाट चराई होत असलेल्या परिसरातला जीवभार (Biomass) हा चराई होत नसलेल्या परिसरातल्या जीवभारापेक्षा खूप कमी असतो याची खात्री पटली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चराईचं प्रमाण. आमच्याकडे कोकणात एका ठिकाणी फार फार तर वीस-पंचवीस गुरांचा कळप चरताना आढळतो. इथे मात्र एकाच ठिकाणी चरणाऱ्या गुरांची आणि शेळयांची संख्या शेकडयात होती. एवढया प्रमाणात चराई (overgrazing) झाल्यावर तो परिसर हळूहळू वाळवंटीकरणाकडे जाणार, हे उघडपणे दिसत होतं.
तिथून आम्ही पोहोचलो वडाळा या गावी. इकॉलॉजिकल सोसायटीच्या मार्गदर्शक केतकी घाटे आणि मानसी करंदीकर, विदर्भात पर्यावरणविषयक काम करणाऱ्या 'संवेदना' संस्थेचे कौस्तुभ पांढरीपांडे आणि वडाळयाचे ग्राामस्थ कुलदीपकाका, हिंमत पवार यांच्याबरोबर आम्ही तो परिसर पाहत होतो, माहिती घेत होतो.
कारंजा-लाड अभयारण्यापेक्षा वडाळयाचं उदाहरण व्यक्तिशः मला जास्त भावलं; कारण कारंजा अभयारण्यात चराईबंदी ही शासनाकडून लादण्यात आली होती, तर वडाळयामध्ये स्थानिक लोकांनी स्वयंस्फूर्तीने चराईचं व्यवस्थापन केलेलं होतं. पर्यावरणशास्त्रदृष्टया विचार करता वडाळयाच्या हा परिसर 'जंगल' या शिखर परिसंस्थेच्या (Climax Ecosystem) पातळीला जाणार नाही; परंतु परिसंस्था आणखी ढासळू न देता माणसाला या परिसरातून लाभ मिळत राहतील, हे निश्चित. 2019मध्ये करण्यात आलेल्या विसाव्या राष्ट्रीय पशुधन जनगणनेनुसार भारतात 19 कोटी 25 लाख इतकी गुरांची संख्या आहे, तर शेळयांची संख्या सुमारे 15 कोटी आहे. माणूस आणि त्याने पाळलेले प्राणी हा गेल्या हजारो वर्षांपासून निसर्गातला अविभाज्य भाग राहिल्यामुळे त्यांना डावलून आज निसर्गसंवर्धनाचा विचार करणं शक्य नाही. माणूस आणि निसर्ग यांचं एक निरोगी आणि निरंतर सहजीवन मात्र आपण नक्कीच प्रस्थापित करू शकतो.
9405955608