शेतकर्यांना एकाच वेळी आणि एकाच जागी कृषी क्षेत्रातील आणि त्याच्याशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने भारतातील सर्वात मोठे किसान कृषी प्रदर्शन पुण्यातील मोशी येथे सुरू झाले आहे. हे प्रदर्शन रविवारी 15 डिसेंबर 2019पर्यंत सुरू राहणार आहे. विविध विषयांवरील दालने आणि पाचशेहून अधिक उद्योगांचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनाला एक लाखांहून अधिक शेतकर्यांनी भेट दिल्या आहेत.
शेतीचा विकास व्हायचा असेल तर त्याच्याशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकर्यांना असणे गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊन किसान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असते. किसान मालिकेतील29वे कृषी प्रदर्शन पुण्याजवळील मोशी येथे पाच दिवसांचे आंतरराष्ट्रीय किसान प्रदर्शन 11 डिसेंबरपासून सुरू झाले. किसान प्रदर्शनाला कृषी मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे सहकार्य लाभले आहे. आधुनिक तंत्रज्ञान व कृषि क्षेत्रातील नवे विचार शेतकर्यापर्यंत पोहोचविणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. शेतकरी, तंत्रज्ञ आणि उद्योजक अशा सर्वांसाठी उपयुक्त ठरेल अशी या प्रदर्शनाची रचना करण्यात आली आहे.
किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण
15 एकर क्षेत्रावरील या प्रदर्शनात देश, विदेशातील सहाशेपेक्षा अधिक कंपन्या, शासन, संशोधन संस्था सहभागी झाल्या आहेत. संरक्षित शेती, पाणी व्यवस्थापन, कृषी निविष्ठा, कृषी अवजारे, पशुधन, ग्रमविकास, जैव, ऊर्जा, नर्सरी, शेती लघुउद्योग आदी क्षेत्रातील नामवंत कंपन्या/संस्था सहभागी झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय दालनात चीनसह विविध देशातील कंपन्यांनी सहभाग नोंदविला. भारतीय शेतकर्यांच्या गरजा व बाजारपेठ जाणून घेण्याचा या कंपन्यांचा उद्देश असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय ऑटोमोबाईल्स, डेअरी, पशुसंवर्धन, पशुखाद्य, नर्सरी, कृषी प्रकाशने, अपारंपरिक ऊर्जा साधनांचे दालनदेखील शेतकर्यांना बघायला मिळाले आहेत. हे दालन किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण ठरले आहे.
प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉलला भेट देण्याची संधी शेतकर्यांना मिळत आहे. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत ठेवण्यात आले आहे. कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान, त्यामुळे निर्माण होणार्या संधीची माहिती शेतकर्यांना मिळाल्याचे दिसून आले आहे.
उत्कृष्ट नियोजन
भारतातले सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असा नावलौकिक मिळवलेल्या किसान कृषी प्रदर्शनाचे संयोजकांकडून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे. मोबाईलचा वाढता वापर आणि डिजीटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकर्यांना या प्रदर्शनाला भेट देण्याची मोठी संधी मिळाली आहे. त्यामुळे देशभरातील होतकरू शेतकर्यांसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरले आहे.
किसान कृषी प्रदर्शनला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. गावागोवचे शेतकरी प्रदर्शनस्थळी येत आहेत. राज्यातील विविध भागांतूनच नव्हे तर, पंजाब, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यांतूनही शेतकरी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मुळशी येथे आले आहेत. त्यामुळे प्रदर्शन स्थळी येणार्यांनी दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. अनेक शेतकरी आपल्या परिवारासह मोठ्या उत्सुकतेने प्रदर्शन पाहून घेत नव्या शेतीचे धडे गिरवू पाहत आहेत. पहिल्या दिवसापासून प्रदर्शनस्थळी शेतकर्यांनी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण प्रदर्शन काळजीपूर्वक पाहायचे झाले तर दिवस पुरत नाही, त्यामुळे अनेकांनी दशमीचे गाठोडे सोबत आणल्याचे चित्र दिसून आले.
खेरदीला चांगला प्रतिसाद
विविध दालनांतील काही स्टॉलवरील नवनवीन उत्पादने, उत्तम दर्जा आणि माफक किंमतही प्रदर्शनाची वैशिष्ट्ये होती. शेती अवजारे, देशी धान्ये, बी-बियाणे, सेंद्रिय खते व औषधे यासह कृषी विषयक पुस्तकं, नियतकालिकं यांच्या खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
स्टॉलधारकांकडून शेतकर्यांच्या विविध स्वरूपाची माहिती देण्याबरोबरच शंकेचे निरसन केले जात आहे. त्यामुळे या प्रदर्शनातून शेतकर्यांना नवनवीन गोष्टी पाहण्याची किती ओढ आहे, हेच यावरून पाहायला मिळत आहे.
याचि देही याचि डोळा
हा प्रदर्शन सोहळा याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी लाखभर लोक सकाळपासून तयारी करून प्रदर्शनस्थळी दाखल होत आहेत. उपस्थित शेतकर्यांच्या ठायी शेतीमाती विषयी असलेले प्रेम, उत्साही ऊर्जा बरेच काही सांगून जाते.
यानिमित्ताने मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, महिला बचत गट, तरुण शेतकर्यांशी संवाद साधता आला. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यताील उमेश सोनवणे हे शेतकरी गेल्या पाच वर्षांपासून किसान प्रदर्शनाला भेट देत असल्याचे सांगितले.
‘‘शेतीतील नवीन घडामोडी, नवीन बियाणे, नवे तंत्रज्ञान यांची माहिती घेण्यासाठी दरवर्षी किसान प्रदर्शनाला भेट देत असतो. यंदाही माझ्या गावातील दहा शेतकर्यांना सोबत घेऊन या प्रदर्शनास आलो आहे. या प्रदर्शनामुळे माझ्यासोबत आलेल्या शेतकर्यांना चांगली माहिती मिळाली आहे,’’ असेे उमेश सोनवणे यांनी सांगितली.
‘‘माझी 25 एकर शेती आहे. संपूर्ण शेती बागायती आहे पण शेती क्षेत्रातील नवे बदल, नवीन आव्हाने, बाजारपेठ यांची मला कल्पना नव्हती. पारंपारिक शेती करत असल्यामुळे हा अभाव असावा. किसान प्रदर्शनाला भेट दिल्यामुळे माझा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे,’’ असे पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील शेतकरी सुभाष भीमराव क्षीरसागर यांनी सांगितले.
‘‘आजचे तरुण आळशी आहेत, त्यांना शेतीची आवड नाही, अशी काहीशी नेहमी ओरड असते. पण आजचा तरुण सजग आहे. त्याला शेतीचे आकर्षण आहे. केवळ त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. किसान प्रदर्शनात सहभागी झालेले जास्तीत जास्त शेतकरी तरुण आहेत हे यावरून सिद्ध होते. आजच्या ग्रमीण तरुणांना अशा कृषी प्रदर्शनातून खूप काही शिकण्यासारखे, घेण्यासारखे आहे,’’ असे बारामती तालुक्यातील तरुण शेतकरी निलेश कोंडे यांनी सांगितले.
‘‘माझी दहा एकर शेती आहे. संपूर्ण शेती बागायती आहे. मी गेल्या दहा वर्षांपासून किसान प्रदर्शनाला भेट देत आहे. प्रत्येक वर्षी नवीन माहिती मिळते. विविध भागांतून आलेल्या शेतकर्यांचा परिचय वाढत जातो. त्या शेतकर्यांचे अनुभव, शेतीतील नवे प्रयोग याविषयी चर्चा करायला मिळते. हे नुसते प्रदर्शन नाही तर यातून शेतकर्यांशी संवाद साधायला मिळतो,’’ असे दौंड तालुक्यातील शेतकरी महादेव निगडे यांनी सांगितले.
शेती आणि महिला यांचा महत्त्वाचा संबंध येतो. महिला शेतकरी सक्षम झाला तर शेतकरी सक्षम व्हायला वेळ लागणार नाही. अनेक महिला शेतकरी शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम होऊ पाहत आहेत. याविषयीचा एक अनुभव प्रदर्शनात पहायला मिळाला.
जावळी तालुक्यातील (जि.सातारा) बेंबळी येथील माऊली महिला बचत गटाच्या सदस्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. या बचत गटातील सर्व सदस्या शेतकरी कुटुंबातल्या आहेत. आज महिला शेतकर्यांना उत्तेजन देण्याची गरज आहे. केवळ शासनाची महिती आणि योजना असून चालत नाही. त्याला अनुभवाची, संवादाची जोड असेल तर महिला पुढे जातील. अशा प्रदर्शनातून आम्हा महिला शेेतकर्यांचा हुरूप वाढला असल्याचे माऊली महिला बचत गटाच्या अध्यक्षा संगीता राजाराम देशमुख यांनी सांगितले.
‘‘या प्रदर्शनाला नेहमीच उत्तम प्रतिसाद लाभत असतो. यंदा निसर्गाचे चक्र थोडे वेगळे होते. मराठवाडा व विदर्भात दुष्काळ तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पूर आला होता. यामुळे प्रदर्शनाला शेतकरी पाठ फिरवतील अशी शंका होती, पण सर्व विभागातील शेतकर्यांनी प्रदर्शनाला भेट दिली आहे. स्टॉलवर येणार्या प्रत्येकाशी बोलायला मजा आली. त्यांच्याशी बोलून समाधान वाटले,’’ असे देवअमृत अॅग्रेटेक प्रा.लि.चे सतीश भोसले यांनी सांगितले.
आजचा शेतकरी बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय, ही चांगली बाब आहे. आमच्या स्टॉलला अनेक शेतकर्यांनी भेट देऊन हवामानाविषयी माहिती जाणून घेतली,’’ असे वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या कर्मचार्यांनी सांगितले.
भविष्यातील सर्वच बाबतीत मानवी दृष्टिकोन अधिक निकोप व विज्ञाननिष्ठ व्हावा म्हणून शेतकर्यांचा दृष्टिकोनही विज्ञाननिष्ठ होणे गरजेचे असते. अशा या प्रदर्शनातून आधुनिक तंत्र, प्रयोगाची माहिती प्रत्यक्ष मिळते, यातून शेतकर्यांचा उत्साह आणखीन वाढायला मदत मिळते हेच प्रदर्शनाचे एक फलित म्हणता येईल.
किसान प्रदर्शन म्हणजे आमची वारी
ं‘‘पंढरपूरची जशी वारी असते, या वारीतून जसे शेतकर्यांना समाधान लाभते, तसे किसान प्रदर्शन हीसुद्धा आमची एक प्रकारची वारीच आहे. या प्रदर्शनवारीची आम्ही दरवर्षी वाट पाहत असतो.
पंढरपूर वारीच्या तुलनेत‘‘किसान कृषी प्रदर्शन’’ ही वारी खूप छोटी आहे. तिचे स्वरूप, मर्यादा ह्या वेगळ्या आहेत. ही वारी शेतकर्यांना तंत्रज्ञानाची माहिती देणारी, नवी दिशा देणारी आहे,’’ असे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी विष्णू महादेव पाटील- पानेरकर यांनी सांगितले.
महाविद्यालयाकडून शेतकर्यांविषयी माहिती संकलन
राज्यासह देशातील विविध भागातून किसान प्रदर्शनाला शेतकरी मोठ्या प्रमाणात येत असतात. प्रत्येक विभागानुसार शेती, शेतीचे प्रकार, उत्पादन बदलत असते. या संदर्भात सखोल माहिती संकलनाचे काम पुण्यातील सूर्यादत्ता महाविद्यालयाकडून करण्यात येत आहे. प्रदर्शनात आलेल्या प्रत्येक शेतकर्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा होता.
‘‘शेतकर्यांना कोणती कृषी योजना मिळाली, शेतकर्यांकडे किती दुभती जनावरे आहेत, जलसिंचनाची साधने, यांसह विविध माहिती आम्ही संकलित केली आहे,’’ असे विद्यार्थिनी सिंपल पासवान हिने सांगितले.