Enter your Email Address to subscribe to our newsletters
तब्बल तीस वर्षानंतर 9 नोव्हेंबर 2019रोजी रामजन्मभूमीविषयीचा निकाल जाहीर झाला. आणि देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हा निकाल म्हणजे सामंजस्याचं नवं युग सुरू होण्याची देशातील ही सुरुवात आहे. राममंदिराच्या प्रश्नातून हे सामंजस्य निर्माण होत आहे आणि हिंदुत्वाचा अभिमान असलेल्या व त्यासाठी टीकेचे धनी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत व त्यांच्या पुढाकाराने हे युग निर्माण होत आहे, ही निरातिशय आनंदाची गोष्ट आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमीविषयीचा निकाल जाहीर झाला तो दिवस होता 9 नोव्हेंबर 2019. बरोबर तीस वर्षांपूर्वी, म्हणजे 10 नोव्हेंबर 1989ला अयोध्येत राममंदिराचा शिलान्यास झाला होता. योगायोगाची दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही दिवशी कार्तिक द्वादशी होती. कोणत्याही शुभकार्यात असे योगायोग जुळतातच. अन्यथा शिलान्यासाची देवोत्थान एकादशी आणि बाबरी ढाचा पडला त्या दिवशीची मोक्षदा एकादशी असे योग कसा जुळून आला असता?
अर्थात, रामजन्मभूमीवर राममंदिर उभारण्याचं स्वप्न साकार होणं हा काही योगायोगाचा भाग नाही. त्यासाठी अनेक शतकांचा संघर्ष आणि अनेक रामभक्तांचं बलिदान कारणी लागलं आहे. राममंदिराच्या निर्माणासाठी झालेल्या 89 लढायांमध्ये किती जणांनी प्राण अपर्ण केले त्याची गणतीच नाही.
आता परवा न्यायालयाच्या निकालाचं सर्व भारतीयांनी ज्या सहजतेने आणि उत्स्फूर्ततेने स्वागत केलं, ते पाहता हा संघर्ष एवढा चिघळला जाण्याची काहीच गरज नव्हती. किंबहुना संघर्ष चिघळण्यामागे 'देशाचं दुर्दैव' यापेक्षा दुसरं कारण असेल असं वाटत नाही. कारण राममंदिराला विरोध करण्याचं कुणालाच काही कारण नाही. देशातले बहुसंख्य लोक रामाला आपला आदर्श मानणारे. बहुसंख्य मुस्लिमांचाही राममंदिराला मनातून पाठिंबा होता. देशप्रेमी मुस्लीम नागरिकांनी तो वेळोवेळी, वेगवेगळया मार्गांनी व्यक्तही केला होता. मात्र काही थोडक्या लोकांचा या मंदिर बांधणीला विरोध होता. याच लोकांना हाताशी धरून देशविरोधी शक्तींनी राममंदिर उभारणीला कडाडून विरोध केला. भारतीय संस्कृतीतील पुरातन आणि जगमान्य आदर्शांच्या आधारे हा देश उभाच राहू नये असा कटच जणू देशविरोधी शक्तींनी रचला असावा. भारतीय संस्कृतीची जशी एक चिरंतन अशी साखळी आहे, तशी या संस्कृतीवर आघात करणाऱ्या शक्तींची आणि विचारांचीही एक साखळी आहे. अनादिकाळापासून चालत आलेली ही साखळी आजही तेवढीच भरभक्कम आहे. या देशाविरोधी शक्तींचे आघात होतच राहिले. दुर्दैवाने इतिहासकाळापासून भारतीय समाज उदासीन राहिला आणि भारतातील हिंदू राज्यकर्ते निष्क्रिय राहिले.
सत्ता हेच सर्वस्व मानणारे राज्यकर्ते या शक्तीपुढे झुकले आणि त्यातून रामभक्त विरुध्द रामविरोधी असा या संघर्षाला हिंदू विरुध्द मुस्लीम असं स्वरूप दिलं गेलं. हिंदू आणि मुसलमान यांच्यात दरी निर्माण करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या ब्रिटिशांनी या संघर्षाचा खुबीने वापर करून घेतला. 1857च्या स्वातंत्र्यसमराच्यावेळी निर्माण झालेल्या सौहार्दाच्या काळात कदाचित हा प्रश्न सुटला असता, पण त्या काळात उभी असलेली बाबरी मशीद आणि तिथेच उभा असलेला राम चबुतरा यामध्ये ब्रिटिशांनी एक भिंत बांधली आणि हिंदू आणि मुस्लीम यांच्यात असलेल्या वादाला चिरस्थायी रूप दिलं.
सर्वात मोठा आघात झाला तो बाबराच्या काळात. बाबरचा सरदार मीर बाकी याने 1526मध्ये हे मंदिर उद्ध्वस्त केलं आणि तिथे मशीद बांधली. तीच ही वादग्रस्त बाबरी मशीद. हिंदूंच्या मनात हा विषय सलतच होता. त्या वेळेपासूनच संघर्षाला सुरुवात झाली होती.
स्वातंत्र्यानंतर सोमनाथप्रमाणेच अयोध्या, मथुरा आणि काशी इथल्या मंदिरांची पुनःस्थापना व्हायला हवी होती. भारतीयांच्या स्वाभिमानावरचे डाग त्यामुळे धुतले गेले असते. पण पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे तर नखशिखांत हिंदूविरोधी होते. 1948मध्ये बाबरी मशिदीत अचानक प्रकट झालेल्या किंवा ठेवल्या गेलेल्या मूर्ती हलविण्याचा आदेश त्यांनी उत्तर प्रदेश सरकारला व त्यांच्यामार्फत अयोध्येच्या प्रशासनाला दिला. पण त्यामुळे प्रक्षोभ निर्माण होईल असं सांगत स्थानिक अधिकारी नायर यांनी मूर्ती हलवण्यास नकार दिला आणि तेव्हापासून बाबरी ढाचाच्या मधल्या घुमटासाठी स्थानापन्न असलेल्या मूर्ती कुलूपबंद झाल्या. राममंदिरासाठीच्या सशस्त्र लढयाने स्वातंत्र्यानंतर न्यायालयीन लढयाचं आणि प्रतीकात्मक सत्याग्रहाचं वळण घेतलं.
पण रामभक्तांच्या या लढयांना हिंदू विरुध्द मुसलमान असं रूप देण्यात आपलं हित आहे हे स्वार्थी राजकारण्यांच्या लक्षात आलं आणि रामभक्तांचा हा लढा हिंदू-मुसलमानांचा संघर्ष ठरला. बाबरी मशिदीसाठी अनेक मुस्लीम संघटनांनी या संघर्षात उडी घेतली. शाही इमाम, शहाबुद्दीन यासारख्या मुस्लीम पुढाऱ्यांनी आगीत तेल ओतलं. प्रकरण चिघळत गेलं.
हे आपल्या अस्मितेलाच आव्हान आहे अशी जाणीव रामभक्तांच्या मनात निर्माण झाली. संघाचे ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे आणि विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत अध्यक्ष अशोक सिंघल यांनी रामभक्तांच्या मनातला हा क्षोभ संघटित केला. त्याला नियंत्रित आंदोलनाचं स्वरूप दिलं.
काँग्रेसच्या डावपेचांमुळे नेमस्त आंदोलनाला निराशाजनक प्रतिसाद मिळायला लागला. शरयू नदीच्या काठावरची मूठभर वाळू राममंदिर परिसरात टाकण्याच्या प्रतीकात्मक आंदोलनालाही परवानगी नाकारली गेली. अशी परवानगी मिळूच नये यासाठी योजनाबध्द प्रयत्न केले गेले. यातूनच पहिल्या कारसेवेच्या वेळी प्रक्षोभ उडाला. कोठारी बंधूंसह अनेक करसेवकांच्या बलिदानातून आंदोलनातली एक धग शतपटीने वाढली. पण शांतताप्रिय हिंदू समाजाने पुन्हा एकदा हा संताप पचवला. आपल्या न्याय्य मागणीसाठी रामभक्त पुन्हा संघटित झाले. लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेमुळे आंदोलनाला अनेक मुस्लीम समर्थकही लाभले. रथयात्रेच्या वेळी अडवाणींच्या रामरथाचा चालक मुस्लीम युवक होता. देशभरात 'रामलहर' निर्माण झाली.
आणि 6 डिसेंबर 1992चा तो दिवस उगवला. महाभारतात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली, तोच हा मोक्षदायिनी एकादशीचा दिवस. याच दिवसानंतर महाभारताच्या संग्रामाला सुरुवात झाली.
या आंदोलनाचं वृत्तांकन करण्यासाठी मी त्या वेळी अयोध्येला गेलो होतो. नेमस्त आणि शिस्तप्रिय रामभक्तांचा प्रक्षोभ मी प्रत्यक्ष पाहिला होता. याच प्रक्षोभातून हिंदू अस्मितेवरचा कलंक असलेला बाबरी ढाचा जमीनदोस्त झाला होता. या घटनेचे पडसाद देशभर उमटत होते. देशात अनेक ठिकाणी जातीय दंगली भडकल्या. मुंबईसारख्या शहरात बाँबस्फोट झाले. पण हा सगळा हिंसाचार रामविरोधी शक्तींनी घडवून आणला होता.
या साऱ्या स्थितीत हिंदू समाज शांत होता. अयोध्येत, 6 डिसेंबरला शांतता होती. एखाद्या देवस्थानच्या यात्रेत असतं तसं वातावरण तिथे होतं. दुकानं चालू होती. आंदोलनात महिलांना त्रास दिल्याची किंवा त्यांचा अवमान झाल्याची एकही घटना घडली नाही. एकाही दुकानदाराची कारसेवकांनी लूट केली नाही की कुणाचे पैसे बुडवले नाहीत.
दरम्यानच्या काळात बाबरी मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे अनेक ऐतिहासिक पुरावे उत्खननातून पुढे आले. के.के. महंमद यांनी हे ऐतिहासिक पुरावे खरे असून तिथे पूर्वी भव्य राममंदिर होतं हे सप्रमाण सिध्द करत आपल्या खऱ्याखुऱ्या धर्मनिरपेक्षतेचा व नि:पक्ष भूमिकेचा प्रत्यय दिला.
माध्यमांनी आणि विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींची विपरीत प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रश्न लोकशाही प्रक्रियेतूनच सुटेल असा मोदींना विश्वास होता. त्यांना आग्रही आणि आक्रमक समर्थकांचा हट्ट न मानता न्यायालयीन प्रक्रियेवरच भर दिला. त्यांच्या आघाडीतील अतिउत्साही घटक पक्षांना खडेबोल सुनावण्यासाठी त्यांनी कमी केले नाही.
शेवटी न्यायालयीन प्रक्रियेतूनच हा प्रश्न सुटला. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला. हा निर्णय हिंदूंच्या बाजूचा नाही, तर तमाम रामभक्तांच्या बाजूचा आहे हे पुन्हा एकदा सिध्द झालं. ओवेसींसारखे काही नतद्रष्ट नेते सोडले, तर 99 टक्के भारतीयांनी हा निर्णय मनापासून स्वीकारला आहे. देशात सामंजस्याचं नवं युग सुरू होण्याची ही सुरुवात आहे. राममंदिराच्या प्रश्नातून हे सामंजस्य निर्माण होत आहे आणि हिंदुत्वाचा अभिमान असलेल्या व त्यासाठी टीकेचे धनी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत व त्यांच्या पुढाकाराने हे युग निर्माण होत आहे, ही निरातिशय आनंदाची गोष्ट आहे.
विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी
प्रभू आले मंदिरी... हे कवी योगेश्वर अभ्यंकरांचे बोल भारतीयांच्या श्रीरामावरील श्रध्देमुळे आज खरे ठरले आहेत.
भगवान दातार
9881065892