प्रेमातून प्रेमाकडे..

विवेक मराठी    07-Jan-2019
Total Views |

 

 या पुस्तकात स्वामी विवेकानंद, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्रीधर व्यंकटेश केतकर, हरी नारायण आपटे, बाबूराव गोखले इत्यादी महापुरुषांच्या जीवनातील प्रेम आणि त्यांची भावस्थिती नेमक्या शब्दात मांडण्याचा अरुणाताईंनी प्रयत्न केला आहे.

 प्रेम, मैत्र या गोष्टी मानवी जीवनात जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितक्याच बहुआयामी आणि गुंतागुंतीच्याही आहेत. मैत्रीचा, प्रेमाचा धागा नीटपणे गवसला तर ठीक, नाहीतर नसती गुंतागुंत आणि त्यातून निर्माण होणारे असंख्य संघर्षाचे क्षण यापासून सुटका नसते. हे झाले सर्वसामान्य माणसाविषयी. पण प्रसिद्धीचे वलय, कर्तृत्वाची झळाळी प्राप्त झालेली व्यक्ती असेल, तर मग बाब अधिकच नाजूक होते. त्या व्यक्तीचे सार्वजनिक जीवन आणि खाजगी जीवन यांचा तारतम्याने विचार करावा लागतो. अरुणा ढेरे यांनी 'प्रेमाकडून प्रेमाकडे' या आपल्या पुस्तकात हाच विचार केला आहे - नव्हे नव्हे, हा विचारच या पुस्तकाचा आत्मा आहे. ललित लेखन, काव्यलेखन, लोकसाहित्य आणि संस्कृती इत्यादी क्षेत्रांत लीलया विहार करून आपला दबदबा निर्माण करणाऱ्या अरुणाताईंचे हे पुस्तक वेगळे आहे. मैत्र ही भावना मनात रुजते, विकसित होते आणि त्यातून पुढे सारे जीवन व्यापले जाते अशी जनरीत असली, तरी प्रेम, मैत्र यांना आपल्या व्यवहारांनी वेगळी उंची प्राप्त करून देताना त्याचा आपल्या इप्सित ध्येयप्राप्तीत अडसर होणार नाही, त्याचबरोबर आपल्या जिवलगालाही त्यातून त्रास होणार नाही ही काळजी काळाच्या पुढची दृष्टी असणारे महापुरुष घेत असतात. अशाच निवडक पण भारतीय समाजजीवनावर खूप मोठा प्रभाव असणाऱ्या महापुरुषांच्या प्रेममय जीवनाचा आढावा अरुणाताईंनी घेतला आहे. या पुस्तकात स्वामी विवेकानंद, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्रीधर व्यंकटेश केतकर, हरी नारायण आपटे, बाबूराव गोखले इत्यादी महापुरुषांच्या जीवनातील प्रेम आणि त्यांची भावस्थिती नेमक्या शब्दात मांडण्याचा अरुणाताईंनी प्रयत्न केला आहे. हे सर्वच महापुरुष आपआपल्या क्षेत्रात हिमालयाच्या उंचीचे आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनाला आपला आदर्श मानणारे असंख्य लोक असतात. कधीकधी या महापुरुषांवरची श्रद्धा इतकी संवेदनशील असते की क्षुल्लक कारणानेही ती स्फोटक होऊ शकते, हे वास्तव लक्षात घेऊन त्या महापुरुषांविषयी लिखाण करण्यात अरुणाताई यशस्वी झाल्या आहेत. प्रेम, मैत्र म्हटले की स्त्री-पुरुष नातेसंबंधांना केंद्र मानले जाते. पण त्या पलीकडे जाऊन मानसिक, वैचारिक मैत्र यावर कधी भाष्य होत नाही. मानसिक, वैचारिक मैत्र असू शकते या दृष्टीने कधी चिंतन होत नाही. अरुणाताईंच्या या पुस्तकामुळे ही उणीव दूर झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. पुस्तकाची भूमिका मांडताना लेखिका म्हणते, 'समाजाच्या अस्तित्वाचं भान स्त्री-पुरुष मैत्रीला कायम ठेवावं लागलं आहे. समाजनिरपेक्ष अवकाशात मुक्त बहरू शकणारं ते नातं नाही. मग समाजाला सामोरं जाणारे स्त्री-पुरुष वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कधी नात्यामधून तर कधी अनाम नातं जपून आपल्या मैत्रीचा नितळपणा कसे सांभाळतात, कुटुंबाच्या आणि परिवाराच्या अस्तित्वाला ते मैत्रीच्या संदर्भात कसे स्वीकारतात आणि मैत्रीच्या अस्तित्वासाठी कशी व कोणती किंमत चुकवतात, याचा शोध कधी अस्वस्थ करणारा, कधी जिव्हारी लागणारा आणि कधी शांत आश्वासित करणारा आहे. मैत्रीची रूपमाया सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या थोरामोठ्याच्या आयुष्यातही दिसते. समाजात वावरणारी, समाजाचं नेतृत्व करणारी नामवंत अशी माणसं. त्यांच्या थोरवीच्या तळाशी त्यांचं माणूसपणही आहेच आणि त्या माणूसपणाच्या मुठीत मैत्र नावाचं मूल्य. त्या प्रेममय मैत्रीविषयी लिहिलेले हे ललितबंध आहेत.' मैत्र जपताना, जगताना कशाचा आधार घ्यावा लागतो आणि काय त्यागावे लागते, हेही अरुणाताईंनी स्पष्टपणे मांडले आहे. त्या लिहितात, 'त्याग, समर्पण, निष्ठा, धैर्य यांच्या व्यक्तिगत अनुभवांनी कधीकधी हे मैत्रीचं नातं तोलून धरलेलं दिसतं. कधीकधी शांतपणे आणि निग्रहपूर्वक मैत्रीमधल्या सुखदुःखाचं दान माणसांनी ओंजळीत घेतलेलं असतं. कधी निरोपाला किंवा मृत्यूला मैत्रीच्या संदर्भात फारसा अर्थही उरलेला नसतो आणि कधी मैत्रीच्या लहानशा हातांनी मोठ्या जीवनध्येयाच्या ज्योती पेटवल्या जातात. कधी या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं आणि कधी भक्तीत होतं.' 'प्रेमाकडून प्रेमाकडे' या पुस्तकाच्या माध्यमातून अरुणाताईंनी महापुरुषांच्या जीवनातील प्रेमाचा, मैत्रीची पारदर्शक नितळता शोधण्याचा प्रयत्न केला आहे. दीर्घकाळ विविध नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले हे सारे ललितबंध प्रेम, मैत्र या एका सूत्रात गुंफलेले असल्यामुळे एक वेगळा अनुभव देऊन जातात. प्रेम म्हणजे काय? मैत्र कशाला म्हणावे? ते कसे होते? कसे जपले जाते? हे ज्यांना समजून घ्यायचे आहे, त्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे. २५६ पानांच्या या प्रेममय पुस्तकातून अरुणाताईंनी प्रेमाच्या आणि मैत्रीच्या विविध गहिऱ्या छटा आपल्या ललित शैलीत मांडून अनेक घटना चित्रमय केल्या आहेत. मागच्या शतकाचा सामाजिक वेध घेण्यासाठी, महापुरुषांची नवी ओळख करून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की उपयुक्त ठरेल.

रवींद्र गोळे