Enter your Email Address to subscribe to our newsletters
लैंगिकता हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे त्याविषयी शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून माहिती मुलांपर्यंत पोहोचणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी पालक स्वतः अतिशय योग्य माहिती देणारा घटक ठरु शकतो. बदलत्या जीवनशैलीमुळे, परदेशी संस्कृतीची अधिक ओळख झाल्यामुळे काही जीवनमूल्यं, सामाजिक मूल्यं बदलली आहेत. म्हणूनच बदललेल्या सामाजिक घडणीत, बदललेल्या गरजांमध्ये लैंगिक शिक्षणाची गरज तितकीच निर्माण झाली आहे.
मागच्या महिन्यात एका शाळेत मी इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींसाठी लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करायला गेले होते. आधी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी बोलत असताना त्यांना मी म्हटलं, ''हा विषय इयत्ता सातवी-आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवा.'' त्यावर त्यांचं म्हणणं पडलं की तो वयोगट खूपच लहान होईल. नववीच्या मुली हा अगदी योग्य वयोगट आहे. मला आठवतंय, बारा वर्षांपूर्वी मी जेव्हा नववीमध्ये होते, तेव्हाच आम्हालासुध्दा शाळेत याविषयी मार्गदर्शन मिळालं होतं. आणि आज इतक्या वर्षांनंतरही या विषयासाठी हाच वयोगट निवडला जातोय.
मी जेव्हा स्कूल काउन्सेलर म्हणून काम करायचे, तेव्हा शाळेतील मुलं माझ्याशी सगळया विषयांवर खूप मोकळेपणे बोलायला यायची. त्यांच्या मनात असलेल्या शंका, प्रश्न मला विचारायची. त्यांच्याशी वेगवेगळया विषयांवर बोलताना हे लक्षात यायला लागलं की लैंगिक शिक्षण हा विषय मुलांपर्यंत योग्य व्यक्तीकडून, योग्य वयात आणि योग्य पध्दतीने पोहोचत नाहीये. आणि त्याचे अनेक पध्दतींनी दुष्परिणाम बघायला मिळत होते.
पहिलीत शिकणाऱ्या मुलाने वर्गात एकदा बोलताना काही अश्लील शब्द वापरले, म्हणून त्याच्या शिक्षिकेने त्याबद्दल मला सांगितलं. मी जेव्हा त्या मुलाशी बोलले, अनेक पध्दतींनी प्रश्न विचारले, तेव्हा हे लक्षात आलं की त्याने त्याच्या वडिलांच्या मोबाइलवर काही अश्लील व्हिडिओज बघितले होते आणि त्याबद्दलच तो वर्गात बोलत होता. नंतर त्याच्या आई-वडिलांशी बोलल्यावर हेदेखील कळलं की दिवसभर तो जिथे असतो, तिथे त्याच्यापेक्षा वयाने मोठी मुलं असतात आणि त्यांच्याकडूनसुध्दा त्याला काही गोष्टी कळल्या असणार. तसंच सहावी-सातवीमध्ये शिकणारी मुलं ब्ल्यू फिल्म्स, पॉर्न साइट्स याबद्दलदेखील चर्चा करताना आढळतात.
आम्हाला जेव्हा याविषयी मार्गदर्शन मिळालं होतं, तेव्हा मुलींचे प्रश्न हे फक्त मासिक पाळीपुरतेच मर्यादित होते. परंतु आत्ताच्या मुलांच्या शंका, त्यांचे प्रश्न हे आपल्याला चकित करून टाकणारे असतात. त्यांच्या प्रश्नांना कसं आणि काय उत्तर द्यावं? हा प्रश्न आपल्याला पडेल इतके धीट आणि सरळ प्रश्न मुलं विचारतात.
सध्याच्या मोबाइलच्या आणि इंटरनेटच्या युगात मुलांना हवं ते ज्ञान अगदी सहजतेने उपलब्ध असतं. मालिका, सिनेमा, व्हिडिओज या सगळयामुळे मुलांना खूप लहान वयातच अनेक गोष्टी ऐकायला, बघायला मिळतात. या वयातील मुलांना प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची, माहीत करून घेण्याची आतुरता असते. आणि खूप कमी वयात एक्स्पोजर मिळाल्यामुळे या सगळया गोष्टींविषयी माहिती कशी शोधून काढायची, हे मुलांना नेमकं माहीत असतं. मुलगा/मुलगी वयात येण्याचं वयदेखील आता कमी झालं आहे. पूर्वीपेक्षा मुलं-मुली लवकर वयात येताना दिसतात. त्यामुळे मासिक पाळी, लैंगिकता, लैंगिक शिक्षण या विषयांवर मुलांशी कमी वयात संवाद साधणं तितकंच महत्त्वाचं झालं आहे.
मुलं जेव्हा याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते त्यांच्याच वयाच्या मित्रमैत्रिणींशी चर्चा करतात किंवा इंटरनेटवर शोधण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यामुळे त्यांना याविषयी अचूक माहिती मिळत नाही. ही माहिती त्यांना चुकीच्या आणि विकृत पध्दतीने कळते आणि मग त्यानुसार ते या गोष्टीकडे बघतात. यातून लैंगिक प्रवृत्तींना बेजबाबदार वळण लागू शकतं. त्यातून मग बऱ्याचदा असे व्हिडिओज सतत बघण्याचं व्यसन लागू शकतं. काही चुकीच्या गोष्टींमुळे मनात भीती बसू शकते. उत्सुकता म्हणून काही गोष्टी करून बघितल्या जाऊ शकतात. मुलं हे सगळं कोणाशीही मोकळेपणे बोलू शकत नाहीत आणि म्हणूनच या सगळया गोष्टी टाळायच्या असतील, तर मुलांशी मोकळेपणे संवाद साधणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
याविषयी मुलांना माहिती दिली तर त्यांची आतुरता वाढेल किंवा त्यामुळे मुलं या गोष्टींकडे अधिकच वळतील, अशा अत्यंत चुकीच्या समजुती आजही काही शाळांमध्ये आहेत. तसेच आजकालचे पालक कितीही पुढारलेले किंवा मुलांशी अगदी मित्रमैत्रिणींसारखे वागणारे असतील, तरीही लैंगिकता, लैंगिक शिक्षण याविषयी ते मुलांशी मोकळेपणे बोलताना दिसत नाहीत. मुलींना फक्त मासिक पाळीविषयी सांगितलं जातं, त्यापलीकडे काहीही नाही. परंतु मुलांशी मात्र कोणत्याच पध्दतीने संवाद साधला जात नाही. वयात येणाऱ्या मुला-मुलींवर पालक बंधनं घालतात, परंतु त्यांना धोके मात्र समजावून देत नाहीत.
लैंगिकता हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि त्यामुळे त्याविषयी शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून माहिती मुलांपर्यंत पोहोचणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी पालक स्वतः अतिशय योग्य माहिती देणारा घटक ठरू शकतो. त्यासाठी याविषयी मुलांना माहिती मिळणं किती गरजेचं आहे, हे आधी पालकांनी समजून घ्यायला हवं. बदलत्या जीवनशैलीमुळे, परदेशी संस्कृतीची अधिक ओळख झाल्यामुळे काही जीवनमूल्यं, सामाजिक मूल्यं बदलली आहेत. जहिराती, मासिकं, चित्रपट इत्यादी माध्यमांतून कुमारवयीन मुलांच्या मनामध्ये उत्सुकता, संभ्रम, भय, नैराश्य इत्यादी भावना निर्माण होत असतात आणि त्यामुळेच बदललेल्या सामाजिक घडणीत, बदललेल्या गरजांमध्ये लैंगिक शिक्षणाची गरज तितकीच निर्माण झाली आहे.
हे शिक्षण फक्त मासिक पाळीपुरतंच मर्यादित न राहता कामजीवन शिक्षण, लैंगिकता शिक्षण, कुटुंबजीवन शिक्षण याविषयीदेखील मुलांना माहिती द्यायला हवी. मानवाच्या अनेक सहजप्रवृत्ती असतात. लैंगिक भावना हीदेखील एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. माणसाची शारीरिक वाढ होत असताना ही प्रवृत्ती वाढू लागते, त्याच वेळी मानसिक, भावनिक बदलदेखील होतात, हे मुलांना समजावून सांगायला हवं. या बदलांविषयी, तसंच शरीरातील अंतर्बाह्य बदल, स्त्री-पुरुषांची जननेंद्रियं, नातेसंबंध, समवयस्कांशी मैत्री, लैंगिक आरोग्य, कामवृत्ती याबद्दलदेखील मुलांना माहिती देणं गरजेचं आहे.
या वयातील मुलांना स्वत:च्या शरीराचं भान असणं गरजेचं आहे. त्यांना या वयात मुला-मुलींमध्ये होणारे दर्शनीय बदल, जननसंस्था, बाह्य जननेंद्रियं व त्यांची रचना आणि कार्य, तसंच शरीराच्या आतील इंद्रियांची रचना आणि कार्य, शरीर स्वच्छता याबद्दल वैज्ञानिक दृष्टीकोनातून माहिती द्यायला हवी. तसंच या वयात निर्माण होणारे नातेसंबंध, एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण, त्यातून निर्माण होणारे प्रेमसंबंध, अल्पवयात या गोष्टींचे असणारे धोके याचीही माहिती मुलांना द्यायला हवी. स्त्री-पुरुष नातेसंबंध आणि जबाबदार वर्तन, स्वशरीराचं भान कसं ठेवावं, दुसऱ्याच्या शरीराविषयी आदर का आणि कसा बाळगावा, हे समजावून सांगावं. त्याचप्रमाणे स्त्री-पुरुष शरीरसंबंध, गर्भधारणा, संततिनियमनाची साधनं तसंच गुप्तरोग, एड्स यासारख्या रोगांविषयी माहिती देणंही तितकंच उपयुक्त ठरेल. लहान वयातील लैंगिक संबंधांचे धोके त्यांना समजावून द्यावेत. स्त्री-पुरुष संबंध म्हणजे केवळ शारीरिक संबंध नसून त्याला नैतिक, सामाजिक, मानसिक आणि भावनिक बाजूही आहेत, हे मुलांना समजेल अशा भाषेत त्यांना सांगायला हवं.
याबरोबरच लैंगिक छळ, स्पर्शाची ओळख, छेडछाडीचे प्रकार, त्याचे होणारे परिणाम, त्यावरील उपाय याबद्दल मुलं-मुली दोघांना माहिती द्यायला हवी. स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या शरीराबद्दल आदर करायला शिकवायला हवं.
या वयातील मुलांमध्ये होणारे नैसर्गिक बदल, स्वत:च्या शरीराबद्दल निर्माण होणारी जागरूकता, आकर्षक दिसण्याचा त्यांचा प्रयत्न, बरोबरीच्या मित्रमंडळींचं आयुष्यात वाढणारं महत्त्व, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची होणारी जाणीव, एकमेकांबद्दल वाटणारं आकर्षण, आपल्यामध्ये झालेले बदल बरोबरीच्या मुलांमध्येदेखील झाले आहेत का हे पडताळून पाहण्याची इच्छा, लैंगिकतेबद्दल मनात निर्माण होणारी उत्सुकता आणि त्यासाठी आपापसात केली जाणारी चर्चा ही योग्य दिशेने होत आहे का, हे पालकांनी जाणून घेणं गरजेचं आहे. त्यांच्या मनाला सतावणारे प्रश्न, त्यांच्या शंका याविषयी त्यांच्याशी मोकळेपणे चर्चा करणं गरजेचं आहे. या होत असणाऱ्या बदलांविषयी मुलांबरोबर मोकळेपणाने सुसंवाद साधला गेला, तर ही कुमारवयीन व्यक्तिमत्त्वं अधिक डोळस आणि सुदृढ होतील.
यासाठी पालकांनी, शिक्षकांनी शाळेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा आयोजित करणं फायद्याचं ठरू शकेल.
(लेखिका समुपदेशक आहेत.)
muditaa.7@gmail.com