साहित्यक्षेत्रात अक्षरश: अथक मुशाफिरी करणारे शन्ना नवरे. कथा, पटकथा, नाटक, ललित, कादंबरी आणि वृत्तपत्रीय सदर लेखन या सर्व क्षेत्रात शन्नांचा वावर होता. नुसताच वावर होता असं नाही, तर या सर्वच क्षेत्रांत त्यांची स्वतंत्र ओळख होती. लेखणीशी असलेलं त्यांचं नातं अगदी अखेरच्या क्षणापर्यंत अभंग राहिलं, हा त्यांच्यासारख्या अंतर्बाह्य लेखक असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यातला भाग्ययोगच म्हटला पाहिजे. लेखकाएवढाच त्यांच्यातला माणूसही मोठा होता. आपुलकीच्या नात्याने त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या असंख्य लोकांच्या मनात हृद्य आठवणींची ठेव ठेवून शन्नांनी या जगाचा निरोप घेतला. अल्पसा का होईना, त्यांचा स्नेह माझ्याही वाट्याला आला. यातल्या काही आठवणींचा हा जागर...
शन्ना आणि मी दोघेही डोंबिवलीकर. आमच्यातला हा एक समान दुवा. शं.ना. नवरे नावाचे एक मोठे लेखक आपल्या गावात राहतात, याचं शाळेत असल्यापासूनच कोण अप्रूप होतं आम्हाला! तेव्हा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचं दुरून दर्शन घडायचं, ते दर्शनही अतिशय प्रसन्नता देणारं असे. प्रसिद्धीचं, यशाचं वलय असलेलं, अतिशय प्रसन्न आणि रुबाबदार अशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल एक आकर्षण मनात होतं. तरीही मुद्दाम पुढे होऊन बोलावं, ओळख करून घ्यावी असं काही माझ्याकडून कधी झालं नाही. मात्र त्यांच्या भेटीचा आणि अकृत्रिम स्नेहाचा योग बहुधा माझ्या नशिबातच लिहिलेला असावा.
त्याचं असं झालं - बारा वर्षांपूर्वी मुंबई तरुण भारतमध्ये ‘ज्येष्ठपर्व’ ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एका पानाची साप्ताहिक पुरवणी निघायची. या पुरवणीत, ज्या पती-पत्नींनी एकमेकांना पन्नासहून अधिक वर्षं साथ दिली आहे, ज्यांचं सहजीवन अतिशय समृद्ध आहे अशा जोडप्यांवर ‘सुवर्णमहोत्सव सहजीवनाचा’ हे सदर लिहावं, असं मनात होतं. यावर विचार सुरू असतानाच असं कळलं की ज्येष्ठ साहित्यिक शं.ना. नवरे यांच्या विवाहाला नुकतीच पन्नास वर्षं पूर्ण झाली आहेत. तेव्हा त्यांच्यापासूनच सदराची सुरुवात करता आली तर किती चांगलं, या विचाराने त्यांना फोन केला. प्रतिसाद कसा मिळेल याबद्दल थोडी धाकधूक मनात होतीच. त्यांनी मुलाखतीला लगेच होकार दिला नाही, मात्र घरी येण्याचं निमंत्रण दिलं. ‘‘आधी बोलू तर खरं, मग ठरवा तुम्हाला अपेक्षित असं त्यावर काही लिहिता येतं का ते...’ असं म्हटल्यावर मी खूप खूश झाले.
भेटीला जाताना एकीकडे मनात आनंदाचं कारंजं होतं, तर दुसरीकडे ज्याने साहित्यात दीर्घकाळ मुशाफिरी केली आहे अशा व्यक्तीच्या सहजीवनावर लिहिण्यासाठी आपण जातो आहोत, हातून चांगलं लिहिलं जायला हवं या स्वअपेक्षेचंच दडपण होतं.
पण आमची पहिलीच भेट, खरं तर गप्पांची मैफीलच इतकी रंगली की चारच्या सुमारास तासाभरासाठी म्हणून त्या दोघांना भेटायला गेलेली मी संध्याकाळची उन्हं उतरली तरी त्यांच्याशी गप्पाच मारत होते. पती-पत्नी दोघंही भूतकाळात रमून गेले होते. त्या आठवणींतून दोघांना बाहेर काढायला माझंही मन होईना. अपवाद फक्त एकाच गोष्टीचा... त्यांच्या धाकट्या लेकाच्या अकाली मृृत्यूचा... त्यांच्या सहजीवनाविषयी बोलताना तो विषय अटळ होता खरा, पण त्यांना कमीत कमी त्रास होऊन तो विषय संपवावा, असं मला वाटत होतं. या विषयावर बोलताना काकींपेक्षा शन्ना जास्त हळवे झाले होते. त्या माउलीने मात्र पुत्रवियोगाची जखम आणि त्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी केलेले सायास अधिक संयमाने मला सांगितले. अतिशय घुसमटून टाकणारे, अस्वस्थता देणारे ते क्षण होते.
‘‘घरातल्या माणसांच्या बाबतीत खूपच हळवे आहेत हे. एखाद्या बाईपेक्षाही हळवं मन आहे यांचं. नोकरीत असताना परदेशी जायची संधी मिळाल्यावर ते गेले खरे, पण घरापासून दूर राहणं त्यांना काही मानवलं नाही. अगदी घरकोंबडे म्हणावे इतके घराशी जोडलेले...’’ त्या वेळी बोलण्याच्या ओघात काकींनी कौतुकभरली तक्रार केली. नंतरच्या काळात तर मीही त्याची प्रचिती घेतली. त्यांच्यातल्या वत्सल कुटुंबप्रमुखाची विविध रूपं प्रत्यक्ष पाहिली. बाहेर मानमरातब असलेला हा माणूस त्याचा कसलाही बडेजाव न करता घरात कसा राहतो, हे दर्शन खूप काही शिकवणारं होतं.
‘‘तरुणपणी तर हे इतके देखणे होते ना, की बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर मी लगेच सगळा संकोच बाजूला ठेवून घरच्यांना सांगितलं की मुलगा मला पसंत आहे. मी याच्याशीच लग्न करणार.’’ काकींनी अगदी नि:संकोचपणे सांगितलं. त्या वेळचे त्या दोघांच्या चेहर्यावरचे भाव आजही लख्ख आठवताहेत. सत्तरीच्या उंबर्यावर असतानाही त्यांच्यात जो खानदानी रुबाब होता, समोरच्यावर छाप पाडणारं प्रसन्न देखणेपण होतं, त्यावरून त्यांच्या तरुणपणीच्या रूपाची कल्पना आली आणि काकींच्या त्या वेळच्या धिटाईचंही कौतुक वाटलं.
दीर्घकाळ चाललेली ही पहिलीच भेट आमच्या तिघांमध्ये मायेचा, स्नेहाचा अतूट धागा विणून गेली. त्या दिवशी त्यांच्याकडून परतताना सगळं दडपण मनातून गळून पडलं होतं. आपण इतके दिवस या छान जोडीपासून उगाच लांब राहिलो, असंही मनात येऊन गेलं.
त्यानंतरच्या गेल्या बारा वर्षांत फार तर दहा-बारा वेळा आमची भेट झाली. पण प्रत्येक भेट म्हणजे गप्पांची प्रदीर्घ मैफील असे. सर्वच बाबतीत मी खूप लहान असूनही ते त्यांच्या बरोबरीच्या एखाद्या सुहृदाशी बोलावं इतक्या आपुलकीने, सहजतेने गप्पा मारत. मीही त्यांना त्रयस्थासारखं शन्ना न म्हणता, काका म्हणू लागले होते. आमच्या दोन भेटींमध्ये बरेचदा वर्षाचंही अंतर पडे. चौकशी करायला फोन केला की ‘‘अहो बाई, आहात कुठे तुम्ही? खूप कामात आहात का? आला नाहीत बरेच दिवसात गप्पा मारायला... या कधीतरी सवड काढून’’ असं अगत्याचं निमंत्रण त्यांच्याकडून असायचंच. कधी मीही आपणहून म्हणायचे, ‘‘काका, आज वेळ आहे का तुम्हांला? येऊ गप्पा मारायला?’’ वेळ असेल तर त्यांनी कधीच आढेवेढे घेतले नाहीत. फार तर, ‘‘आज काही पाहुणे यायचे आहेत संध्याकाळी. आपली भेट झाली तरी गप्पा व्हायच्या नाहीत. थोडं उशिरा किंवा उद्या संध्याकाळी जमेल का?’’असे पर्याय माझ्यासमोर ठेवले जायचे.
काकी हा तर आमच्या गप्पांच्या मैफिलीतला अविभाज्य घटक. ‘‘काकी, अगं बघितलंस का, या अश्विनीबाई आल्यायत. ये गप्पा मारायला’’ असं ते बोलले नाहीत असं एकदाही झालं नाही. आणि माझ्या वडिलांपेक्षाही वयाने मोठ्या असलेल्या काकांनी मला कधीही एकेरी हाक मारली नाही, हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य.
त्यांच्याशी गप्पा म्हणजे खरं तर माझ्यासारखीने फक्त श्रवणभक्तीच करायची. पण आपण गेले तास-दोन तास नुसते ऐकत आहोत असं कधी मनातही आलं नाही, इतका आनंद नुसतं ऐकण्यातून मिळायचा. त्यांच्या बालपणातल्या त्या सुंदर डोंबिवली गावातून एक फेरफटका ठरलेला असायचा. आपल्या डोंबिवलीविषयी ऐकतोय की एखाद्या निसर्गरम्य गावाविषयी असं वाटावं, असं ते रसभरित वर्णन असायचं. अशा सुंदर डोंबिवलीत बालपण गेलेल्या काकांचा किती हेवा वाटायचा मला! गावावरचं त्यांचं विलक्षण प्रेम शब्दांशब्दांतून, देहबोलीतून जाणवायचं. तर कधी नुकत्याच वाचलेल्या आणि खूप आवडलेल्या एखाद्या पुस्तकावर भरभरून बोलायचे. ते नुसतेच स्वत:च्या लेखणीवर जीव जडलेले लेखक नव्हते, तर चतुरस्र वाचकही होते. दर्जेदार लेखन करणार्या नवीन लेखकांविषयी त्यांच्या मनात असलेला अपार जिव्हाळा, कौतुक अचंबित करायचं मला. ‘‘काय लिहितात ही मुलं! किती निर्भीडपणे वास्तवाला भिडतात!’’ एक ज्येष्ठ लेखक नव्या लेखकांना किती भरभरून दाद देऊ शकतो, याचं ते एक आदर्श उदाहरण होते.
नव्या पिढीचं वास्तववादी लेखन त्यांना जितकं भिडायचं, तितकंच प्रकाश नारायण संतांसारख्या हळुवार ललित लेखकाचं लेखनही आवडायचं. संतांच्या कथांमधलं रम्य बालपण त्यांनीही अनुभवलेलं असल्याने त्या लेखनाविषयीची विशेष आपुलकी त्यांच्या बोलण्यातून जाणवायची.
तर एखादी भेट त्यांच्यातल्या अतिशय मिश्कील, खट्याळ माणसाचं लोभसवाणं दर्शन घडवायची. एखादा गमतीशीर प्रसंग सांगताना चेहर्यावर पसरलेलं हसू आणि डोळ्यातला खट्याळ भाव समोरच्याला प्रसन्न करून सोडायचा. आपण सर्वार्थाने लहान आहोत, हे समोरच्याला विसरायला लावायचा दिलखुलासपणा त्यांच्यात होता.
काका म्हणजे जन्मजात कथाकथनकार होते. गोष्टीवेल्हाळपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य. ऐकणारा मंत्रमुग्ध होत असे. बोलता बोलता मध्येच त्यांची तंद्री काही काळासाठी भंग पावायची, म्हणायचे... ‘‘तुमचा खोळंबा तर करत नाही ना मी? कामाची माणसं तुम्ही. मोकळेपणाने सांगा हं घाईत असाल तर... आता फक्त हा एक मस्त किस्सा सांगतो, तेवढा ऐका...!’’ यावर समोरच्याकडून उत्तर अपेक्षित नसेच. कारण तोवर तो मजेशीर किस्सा सुरू झालेलाच असे. काही क्षणांसाठी वर्तमानकाळात शिरलेले काका पुन्हा गप्पांच्या, मजेशीर आठवणींच्या गावात पोहोचलेले असत.
आमच्या जाहिरात संस्थेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचं दर्शन घडवणार्या ‘शतजन्म शोधताना’ या कार्यक्रमाचं सावित्रीबाई फुले रंगमंदिरात आयोजन केलं होतं. आमचा हा पहिलाच प्रयोग होता. काका-काकींना निमंत्रण देण्यासाठी घरी गेले. ‘‘कोणतंही कारण सांगू नका. कार्यक्रमाला नक्की या. गाडीची सोय होणार नसेल तर त्याचीही व्यवस्था करीन. पण तुम्ही दोघांनी यायलाच हवं.’’ मी जवळजवळ गळच घातली. ‘‘गाडीची सोय करण्याची गरज नाही. मी बोलवीन ड्रायव्हरला आणि आम्ही नक्की येऊ.’ त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे कार्यक्रमाला दोघंही आवर्जून उपस्थित राहिले. आणि दुसर्या दिवशी संध्याकाळी अचानक काका आमच्या ऑफिसमध्ये हजर! ‘‘एक चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तुमचं कौतुक करायचं होतं, म्हणून आलो.’’ असं म्हणत एक पाकीट माझ्या हातात ठेवलं. म्हणाले, ‘‘अशा प्रयोगासाठी पैशाचं पाठबळ लागतं, याची मला कल्पना आहे. तुम्हाला खर्च किती आला ते माहीत नाही, पण ही छोटीशी भेट घ्या.’’ मी नको म्हणत असतानाही पाकीट माझ्या हातात ठेवलं, ‘‘काका म्हणता ना मला, त्या अधिकाराने देतोय असं समजा. तुम्हाला अवघडल्यासारखं होईल एवढी रक्कम नाही त्यात. हजार रुपयाची कौतुकभेट आहे ती, घ्या.’’ ते पाकीट घेऊन त्यांच्यासमोर वाकले, तेव्हा माझे डोळे पाण्याने भरून गेले होते.
काकांचं व्यक्तिमत्त्व जसं रुबाबदार, तसं राहणं, पोशाखही लक्षवेधी असे. झब्ब्याच्या कापडाची निवड, त्याचा पोत, रंग आणि त्यावर घातलेलं जाकीट... सगळंच त्यांचं मूळचं देखणेपण अधिक उजळवणारं असे. एकदा मी त्यांना म्हटलं, ‘‘काका, एक काँप्लिमेंट द्यायची आहे तुम्हाला. देऊ का?’’ ‘‘विचारता काय? द्या की..’’ असं त्यांनी म्हटल्यावर मी सांगितलं, ‘‘काका, तुमचं सिलेक्शन खूप छान असतं. झब्बे, जाकीट इतकं युनिक असतं, कुठून शोधून आणता?’’ मला वाटलं त्यापेक्षाही जास्त त्यांच्या आवडीचा तो विषय आहे, हे त्यांच्या नंतरच्या बोलण्यावरून लक्षात आलं. कुठून कुठून शोधून ही कापडं आणलेली असतात ते अगदी रंगवून सांगू लागले. मी म्हटलं, ‘‘तुम्हाला एक छानसं कापड द्यावं, अशी माझी इच्छा आहे. चालेल का तुम्हाला?’’ त्यांनी कोणतीही खळखळ न करता होकार दिला, आवडीचे रंग सांगितले. मीही त्या आनंदात दुसर्याच दिवशी भेट घेऊन गेले. त्यांनी त्या कापडाचं कौतुक करणं हे त्यांच्या स्वभावाला धरूनच होतं. पण त्यापुढे जाऊन महिन्याभरातच झब्बा शिवला आणि मला फोन करून सांगितलं, ‘‘अश्विनीबाई, तुम्ही दिलेल्या कापडाचा झब्बा शिवला, बरं का! काल एका कार्यक्रमाला तोच घालून गेलो होतो. म्हटलं, कळवावं तुम्हाला!’’ खरं तर, माझ्यासारख्या एका लहान व्यक्तीचा तो सन्मान होता. पण त्यांच्या त्या कृतीत कमालीची सहजता आणि अकृत्रिम जिव्हाळा होता.
पटकथालेखन हा माझ्या कुतूहलाचा एक विषय. ‘‘तुमची एखादी पटकथा मला वाचायला द्याल का?’’ असा मी खूप दिवस लकडा लावला होता. हा हट्ट पूर्ण व्हायला दोन-तीन वर्षं जावी लागली. कदाचित मला खरंच किती जिज्ञासा आहे याची परीक्षा पाहात असावेत. मग एक दिवस माझ्या हातात बाड ठेवलं आणि म्हणाले, ‘‘घ्या... वाचायची आहे ना तुम्हाला पटकथा? घरी घेऊन जा आणि चार दिवसांनी परत करा. अट फक्त एकच. नुसती वाचायची नाही. त्यात काही चुका राहून गेल्या असतील तर सांगायच्या, सुधारणा सुचवाव्याशा वाटल्या तर संकोच न करता सांगायच्या.’’ माझ्यासाठी तर ती अनपेक्षित मिळालेली भेट होती. मी वाचून त्यावर टिपण तयार केलं आणि चार दिवसांनी त्यांच्याकडे गेले. पटकथा कशी वाटली, काही चुका आढळल्या का, सुधारणा काय करता येतील यावर मी जे बोलले ते त्यांनी अतिशय गांभीर्याने ऐकून घेतलं आणि वर त्या बोलण्याचं कौतुकही केलं. खरं तर, त्यांचा या क्षेत्रातला अधिकार मोठा होता. तरीही समोरच्याचं - मग तो कितीही नवखा असला तरी - मत ऐकून घेण्याची, त्यावर विचार करण्याची प्रगल्भता त्यांच्यात होती. त्या प्रगल्भतेचं घडलेलं हे दर्शन मला खूप शहाणं करून गेलं.
त्यांच्यातल्या साहित्यिकाचं यथार्थ दर्शन घडवणारे अनेक जण समाजात आहेत. पण माझ्यासाठी लेखकापेक्षाही त्यांच्यातला माणूस अधिक लोभसवाणा होता. त्यांच्याशी जुळलेले ऋणानुबंध मला कायमसाठी समृद्ध करून गेले आहेत.
9594961865
( सदर लेख ६ ऑक्टोबर २०१३ रोजी प्रसिद्ध झाला आहे.)