आंबेडकरांचा नवा नारा - जय'भीम' जय'मीम'

विवेक मराठी    11-Aug-2018
Total Views |

 

राजकीय अपरिहार्यतेतून प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीत एम.आय.एम.ला घेऊ पाहत आहेत. परंतु एम.आय.एम.कडून यावर अजून काहीच स्पष्ट खुलासा आला नाही. प्रकाश आंबेडकरांनी एम.आय.एम.शी जवळीक करण्याची भूमिका समाज दुभंगविणारी ठरेल, यात काही शंका नाही. शिवाय 'जयभीम जयमीम' हा नारा राजकीयदृष्टया देवांच्या आळंदीला न नेता चोरांच्या आळंदीला नेईल असेच दिसते.

 प्रकाश आंबेडकरांनी मागच्या महिन्यात औरंगाबादेत एक घोषणा केली. पण नंतरची हिंसक मराठा आंदोलने, तरुणांच्या आत्महत्या, सांगली-जळगावच्या निवडणुका या घटनांत ही घोषणा मागे पडली. आंबेडकरांनी आगामी निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी तयार केली आहे. या आघाडीत एम.आय.एम.ला (संपूर्ण नाव - ऑॅल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुसलमीन) सामील करून घेण्याची घोषणा त्यांनी औरंगाबादला पत्रकार परिषदेत केली. शिवाय हा पक्ष लोकशाहीवादी असल्याचे शिफारस पत्रही पत्रकारांनी विचारल्यावर देऊन टाकले.

हा 'एम.आय.एम.' हा पक्ष म्हणजे काय, ते आधी समजून घेऊ.

1927मध्ये 'मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन' या नावाने निजामाची तळी उचलून धरणाऱ्या पक्षाची स्थापना करण्यात आली. नवाब मेहबूब नवाज खान किल्लेदार हे या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष. 1938मध्ये बहादुर यार जंग हे अध्यक्षपदी निवडून आले.  

हैदराबाद संस्थानात हिंदूंना (मुस्लिमेतर सर्वांनाच) धर्मांतरित करून मुसलमान करून घेण्यासाठी 'तबलिग' नावाचे एक खातेच सातव्या निजामाने तयार केले होते. एमआयएमचे अध्यक्ष  बहादूर यार जंग हेच या तबलिग खात्याचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले. 1944मध्ये अचानक संशयास्पदरित्या त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर या खात्याचे प्रमुख म्हणून कासिम रिझवी यांची नेमणूक करण्यात आली.

हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या शेवटच्या पर्वात याच कासिम रिझवीच्या नेतृत्वाखाली 'रझाकार' नावाने कट्टर धर्मांध मुसलमानांची एक फौजच तयार करण्यात आली होती. या फौजेने त्या काळात हिंदू जनतेवर भयानक अत्याचार केले. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि उचापतखोर कासिम रिझवीवर खटला दाखल करण्यात आला. नवीन राजकीय परिस्थिती अनुकूल नाही, हे पाहून 1949मध्ये मजलिस बरखास्त करण्यात आली. कासिम रिझवी याला बेडया ठोकून येरवडा तुरुंगात रवाना करण्यात आले. शिक्षा भोगून तो 11 सप्टेंबर 1957ला मुक्त झाला. पाकिस्तानात पलायन करण्याच्या अटीवरच त्याची सुटका करण्यात आली होती.

कासिम रिझवीच्या सुटकेनंतर त्याने एम.आय.एम. परत उभी करण्याचा प्रयत्न केला. मौलवी अब्दुल वहीद ओवेसी यांना अध्यक्षपदी नेमून रिझवी पाकिस्तानात निघून गेला. (पुढे 1970मध्ये पाकिस्तानात त्याचे निधन झाले). 

अब्दुल वहीद ओवेसी यांच्या लक्षात आले की आपल्या पक्षाचे स्वरूप स्वतंत्र भारतात बदलले पाहिजे. शिवाय आता केवळ हैदराबाद संस्थानापुरते मर्यादित न राहता आपण अखिल भारतीय पातळीवर गेले पाहिजे. त्यांनी आपल्या पक्षाच्या नावामागे ऑॅल इंडिया लावायला सुरुवात केली.

अब्दुल वहीद ओवेसी यांच्यानंतर 1975मध्ये त्यांचे पुत्र सुलतान सल्लाउद्दीन ओवेसी हे या पक्षाचे अध्यक्ष बनले. मुसलमानांच्या बहुमताच्या जोरावर हैदराबाद शहरांतून सुलतान ओवेसी निवडणुका जिंकत राहिले. त्यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र व सध्याचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी हे अध्यक्ष बनले. सध्या ते व त्यांचे लहान भाऊ आमदार अकबरोद्दीन ओवेसी हे दोघे पक्ष चालवतात. असा या पक्षाचा इतिहास आहे.

प्रकाश आंबेडकरांनी या धर्मांध पक्षाला लोकशाही प्रमाणपत्र देऊन आपल्या आघाडीत सामील करण्याचे निमंत्रण देण्यामागे त्यांची एक मजबुरी आहे. ती कुणी फारशी लक्षात घेतलेली दिसत नाही. नुकत्याच पार पडलेल्या जळगाव महानगरपालिका निवडणुकांत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा पार सफाया झाला. शिवसेना केवळ 14 जागांवर मर्यादित राहिली. त्या ठिकाणी पहिल्यांदाच एम.आय.एम.ने 3 जागा मिळवत आपले राजकीय स्थान बळकट करायला सुरुवात केली आहे. औरंगाबाद मनपाच्या निवडणुकांत प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ, रामदास आठवलेंचा भारिप, मायावतींचा बसपा यांना दोन-चार जागा एकेकाळी मिळायच्या. त्या जोरावर त्यांचे दबावाचे राजकारण चालायचे. स्थायी समितीचे सभापतिपद, उपमहापौरपद अशी राजकीय सौदेबाजी झालेली दिसून यायची.

गेल्या मनपा निवडणुकांत औरंगाबादेत प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, मायावती यांच्या वाटयाला भोपळा आला आणि एम.आय.एम.च्या तिकिटावर (निवडणूक निशाणी पतंग) पाच दलित नगरसेवक निवडून आले. (बाकी 20 नगरसेवक मुसलमान आहेत). शिवाय एक आमदार निवडून आला (इम्तियाज जलील). एक उमेदवार आमदारकीला थोडक्यात पराभूत झाला. एम.आय.एम.ने दलित-मुस्लीम अशी युती घडवून आणली. याच युतीने परभणी, नांदेड येथेही बऱ्यापैकी यश मिळविले. संपूर्ण मराठवाडयात ही युती काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर चांगले यश मिळवू शकते, हे सगळे बघून दलित राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत. जी मते दलित पक्षांना मिळायची, त्या मतांच्या जोरावर हे पक्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी सौदेबाजी करायचे. पण आता रामदास आठवले भाजपाबरोबर गेले आहेत. शिवाय बाकी दलित मते एम.आय.एम. खेचून घेत आहे.

अशा परिस्थितीत अपरिहार्यतेतून प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीत एम.आय.एम.ला घेऊ पाहत आहेत. एम.आय.एम.कडून यावर अजून काहीच स्पष्ट खुलासा आला नाही.

मराठवाडयात एम.आय.एम.वर हिंदूंचा अजूनही राग आहे. अगदी समाजवादी चळवळीतील लोकही एम.आय.एम.वर कडक टीका करतात. गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, बाबासाहेब परांजपे हे सगळे समाजवादी चळवळीतील नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली निजामाशी लढले होते. त्यांनी रझाकारांचे भयंकर अत्याचार अनुभवले होते. या रझाकारांचा आधुनिक अवतार असलेल्या एम.आय.एम.ला पुरोगामी चळवळ कशी स्वीकारणार? भले एम.आय.एम. आपल्या अधिकृत वेबसाइटवरून कासिम रिझवीचे नाव काढून टाकत असला, तरी खरा इतिहास कसा पुसता येईल?

शिवाय रझाकारांनी मराठवाडयातील शेकडो दलितांना मुसलमान बनविले. त्यातील काहींना आर्यसमाजींनी परत हिंदू धर्मात घेतले. पण काही दलितांनी रझाकारांना साथ दिल्याने मराठवाडयातील दलित-सवर्ण हिंदू अशी दरी तयार झाली.

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला हासुध्दा उघड बोलता न येणारा एक पैलू होता. मराठवाडयाबाहेरील सगळया पुरोगाम्यांना मुसलमानांबद्दल जे काही वाटते, त्यापेक्षा धर्मांध रझाकारांच्या संदर्भातील मराठवाडयातील पुरोगाम्यांसकट सगळया हिंदूंच्या भावना अजूनही तीव्र आहेत.

अशा पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी एम.आय.एम.शी जवळीक करण्याची भूमिका समाज दुभंगविणारी वाटते. औरंगाबाद शहरात विधानसभा निवडणुकांत एम.आय.एम.चे आव्हान इतके तगडे होते की कॉंग्रेसच्या उमेदवाराला (माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांना) तिसऱ्या क्रमांकावर जात अनामत रक्कम जप्त करून घ्यावी लागली आणि तरी भाजपाचा उमेदवार निवडून आला.

दहा महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या वेळी प्रकाश आंबेडकरांनी एम.आय.एम.ला बरोबर घेतले, तर मतांचे धृवीकरण जलद गतीने होत भाजपाला (जळगावने सिध्द केले की शिवसेनेला बाजूला ठेवत हिंदू मत भाजपापाशी एकवटते आहे.) त्याचा फायदा होतो. उत्तर प्रदेशच्या निवडणुका एम.आय.एम.ने लढविल्या होत्या. त्यांनी मुसलमान मते खात भाजपाला साथ दिली, असा आरोप इतरांनी तेव्हा केला होताच.

वंचित बहुजन आघाडी उभी करताना आंबेडकरांसमोर मोठी कठीण परिस्थिती आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली तर एम.आय.एम.सारखे मोठया प्रमाणात दलित मुसलमान मते खाऊन टाकतात. एम.आय.एम.बरोबर जावे, तर निदान मराठवाडयात अगदी पुरोगामी मतेही जवळून निघून जातात. निर्णय कुठलाही घ्या, फायदा भाजपालाच होतो. मग करावे तरी काय?

खरे तर कॉंग्रेस-भाजपेतर तिसरी आघाडी उभारण्यासाठी आतापासून कष्ट करण्याचा पर्याय समोर आहे. त्यात एम.आय.एम.सारखे पक्ष कदापिही घेऊ नयेत, कारण ते अप्रत्यक्षरित्या सत्ताधाऱ्यांना पोषक भूमिकाच घेत असतात. पण भीमा कोरेगावपासून प्रकाश आंबेडकरांचे काय चालले आहे कळतच नाही. 'जयभीम जयमीम' हा नारा राजकीयदृष्टया देवांच्या आळंदीला न नेता चोरांच्या आळंदीला नेईल, असे दिसते.  

- जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद
9422878575