अण्णाभाऊंच्या साहित्यातील सामाजिकता

विवेक मराठी    01-Aug-2018
Total Views |


 

1 ऑगस्ट, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती. एका महापुरुषाचे निधन आणि एका महापुरुषाचा जन्म एकाच दिवशी आहे. हा केवळ योगायोग असला, तरी दोघामध्ये एक विलक्षण साम्य आहे. लोकमान्य हे स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते. त्यांनी स्वातंत्र्याचा आग्रह धरला. साहित्यरत्न अण्णाभाऊंनीही स्वातंत्र्याची केवळ पाठराखण केली नाही, तर आपल्या साहित्यातून स्वातंत्र्य म्हणजे काय हे शिकवले. आपल्या समाजावर या दोन्ही महापुरुषांचे अनंत उपकार आहेत. त्या उपकारातून उतराई होण्याचा हा एक प्रयत्न.

मराठी साहित्यात एका तुकारामाची अभंगवाणी प्रसिध्द आहे, तर दुसऱ्या तुकारामाची शाहिरी. समाजाबाबत विलक्षण कळवळा हे दोघांमधील साम्यस्थळ. 'बुडती हे जन पाहवेना डोळा' असे म्हणत पहिला तुकाराम उपेक्षित-वंचितांबरोबर ठाम उभा राहतो, तर दुसरा तुकाराम कष्टकरी कामगारांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या वेदना आपल्या काव्यातून वेशीवर टांगतो. पहिला तुकाराम म्हणजे संत तुकाराम महाराज, तर दुसरा तुकाराम म्हणजे अण्णाभाऊ साठे.

अण्णाभाऊंचे पाळण्यातले नाव तुकाराम. 1 ऑॅगस्ट 1920 रोजी वाटेगावच्या मांगवाडयात त्यांचा जन्म झाला आणि 18 जुलै 1969 रोजी घाटकोपरच्या चिरागनगरमध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला. एवढया छोटया कालखंडात अण्णाभाऊंनी डोंगराएवढे काम केले आणि आपल्या नावाची मुद्रा मराठी भाषेच्या व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जगतात उमटवली. अण्णाभाऊंनी अल्पकाळात सुमारे 35 कादंबऱ्या, 14 लोकनाटये, 3 नाटके, 13 कथासंग्रह आणि विपुल काव्यलेखन केले आहे. आज अण्णाभाऊंच्या नावाची विविध अध्यासने वेगवेगळया विद्यापीठांतून चालवली जातात. पण अण्णाभाऊंचे शिक्षण केवळ दीड दिवस झाले. दीड दिवसाच्या शाळेत शिकलेला हा माणूस मराठी साहित्यातील अक्षररत्नाचा निर्माता झाला. हा चमत्कार नाही, तर अण्णाभाऊंनी स्वत:ची निरीक्षणशक्ती, कष्ट, चिकाटी यातून स्वत:ला सिध्द केले. 'असाध्य ते साध्य करिता सायास' हे सुभाषित अण्णाभाऊंनी आपल्या कृतीतून साकार केले आहे.

बालपणापासून कष्ट करणाऱ्या आणि उपेक्षेचे धनी असणाऱ्या अण्णाभाऊंनी आपल्या जगण्यातील दु:ख-वेदना चव्हाटयावर मांडण्यापेक्षा इतरांच्या वेदना समजून घेणे आणि ते शब्दातून साकार करणे महत्त्वाचे मानले. म्हणून त्यांचे जीवन व्यक्तिकेंद्रित न राहता समाजकेंद्री झाले. समाजाची वेदना त्यांना आपली वाटली, समाजातील उपेक्षित त्यांना आपले जिवलग वाटले, त्याचप्रमाणे त्यांनी समाजातील सज्जनशक्तीचा गौरव केला. या सज्जनशक्तीचा अधिकाधिक विकास व्हावा आणि त्यांचा संपूर्ण समाजावर प्रभाव निर्माण व्हावा, अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच त्या लेखनात बरबाद्या कंजाऱ्यापासून विष्णुपंत कुलकर्णींपर्यंत समाजातील सर्व स्तरांतील व्यक्तिरेखा येतात.

समाजातील सुखदु:खाशी ते समरस झाले होते, त्याचप्रमाणे इथली संस्कृती आणि संस्कार यांचा त्यांना अभिमान होता, तर समाजात अस्तित्वात असणाऱ्या कुप्रथा, अंधरूढी यांचा त्यांना तिटकारा होता. समाजातील सारे भेद लयास जाऊन सर्व समाजबांधव एका समान पातळीवर यावे, अशी त्यांची इच्छा होती आणि याच कारणासाठी ते लिखाण करत असत. एका ठिकाणी ते म्हणतात - 'जुन्या चालीरिती दूर कराव्या आणि आणि लोप पावलेल्या पण प्रगत प्रथांना पुढे आणावे, हेवेदावे, दुष्टावे, वैर यांचा घोर परिणाम दाखवावा आणि महाराष्ट्रातून प्रेम व सलोखा यांची वाढ व्हावी, जनता सुखी, संपन्न व्हावी अशी श्रध्दा हृदयात घेऊन मी लिहितो.'

अण्णाभाऊ वरील उदात्त विचारासाठी लेखन करतात, तेव्हा महाराष्ट्रातील तत्कालीन सामाजिक जीवन आणि त्यातील वाईटपणा यांना केंद्र केल्याचे लक्षात येते. अण्णाभाऊंनी आपल्या लेखनात समाजजीवन मांडताना केवळ वास्तवच मांडले. ते लिहितात, 'मी जे जीवन जगलो, पाहतो, अनुभवतो तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही. त्याबाबत मी स्वत:ला बेडूक समजतो. माझी सारी पात्रे या ना त्या नात्याने माझ्या आयुष्यात येऊन गेली आहेत. माझी माणसे ही वास्तव आहेत. जिवंत आहेत.' वास्तवातील माणसाच्या कथा लिहिताना अण्णाभाऊंनी या माणसांचे सुखदु:ख, वेदना, उपेक्षा आणि जगण्याचा संघर्ष शब्दबध्द करताना त्यांची जगण्यांची प्रचंड ऊर्मी, येणाऱ्या अडचणींशी चार हात करण्याची जिद्द ते अधोरेखित करत असतात. समाजातील चांगुलपणा अधिक वाढावा, यासाठी ते आपल्या लेखनातून आदर्शवत व्यक्तिरेखा उभ्या करतात. या व्यक्तिरेखा विविध जातिसमूहांतील आहेत. केवळ पुरुषच नाही, तर स्त्री व्यक्तिरेखा साकार करताना अण्णाभाऊ माणसाच्या अंगभूत गुणांना आणि त्या विकसित होण्याच्या ऊर्मीला, सकारात्मक बंडखोर वृत्तीला आदर्श म्हणून उभे करतात.

अण्णाभाऊ समर्थ लेखक होते. समाजमन त्यांना कळले होते. आणि म्हणून समाजाशी एकरूप होत त्यांनी आपल्या लेखनातून समाजाला दिशा मिळेल असे लेखन केले. आयुष्यभर भोगलेले दु:ख कुरवाळत न बसता अण्णाभाऊंनी त्या दु:खमुक्तीचा मार्ग शोधला. उमेदीच्या काळात ते कामगार चळवळीत सहभागी झाले, त्याचप्रमाणे त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळही गाजवली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात 'माझी मैना गावाकडे राहिली' ही त्यांची छक्कड खूप गाजली. महाराष्ट्रापासून तुटलेल्या भूभागाच्या, तेथील माणसांच्या भावना अण्णाभाऊंनी आपल्या समर्थ लेखणीतून साकार केल्या. आपल्या काव्यातून त्यांनी जशी लावण्यांची नजाकत मांडली, तशीच अन्याय-अत्याचाराविरुध्द बंड करण्यांची प्रेरणाही जागवली आहे.

कथा, कादंबरी, लोकनाटये, काव्य असे विविध साहित्यप्रकार लीलया हाताळणाऱ्या अण्णाभाऊंची लेखन प्रेरणा काय होती? कशासाठी ते लिहीत होते? अण्णाभाऊ म्हणतात, 'माझ्या देशावर, जनतेवर व तिच्या संघर्षावर माझा अढळ विश्वास आहे. हा देश सुखी, समृध्द व्हावा, इथे समता नांदावी, या भूमीचे नंदनवन व्हावे अशी मला रोज स्वप्ने पडत असतात. ती मंगल स्वप्ने पाहता पाहता मी लिहीत असतो.' म्हणजेच एका अर्थाने अण्णाभाऊ सर्वमंगलाची अभिलाषा मनी ठेवून जगले आणि तीच भावना जोपासत त्यांनी लेखन केले. त्यामुळे ते अजर आहे. अण्णाभाऊ हे या काळातील महान समाजचिंतक होते. त्यांचे हे चिंतन आपण आपल्या कृतीतून सिध्द केले, तर ती त्यांना खरी आदरांजली ठरेल.

9594961860.