हिरापूरच्या ह्या योगिनी मंदिराची कीर्ती मी बऱ्याच वर्षांपासून ऐकून होते. एकतर भारतामध्ये चौसष्ट योगिनी मंदिरे खूप कमी आढळतात. मध्य प्रदेशमध्ये खजुराहो आणि जबलपूर येथली योगिनी मंदिरे आणि ओडिशामधली हिरापूर आणि बोलांगीरजवळच्या राणीपूर येथे अशी मंदिरे आहेत. योगिनी मंदिरांचे एक प्रमुख वैशिष्टय म्हणजे ही मंदिरे वर्तुळाकार असतात आणि त्यांना शिखर किंवा छप्पर नसते.
नजर जाईल तिथे हिरवीगार भातशेती पसरलेली, एका बाजूला पाण्याने काठोकाठ भरलेले तळे, तळयाच्या मधोमध एक मंदिर. तळयाच्या काठावर सतत सळसळणारा एक पुरातन पिंपळ. एका बाजूला दहा-बारा घरे, काही कौलारू तर काही चक्क गवताने शाकारलेली. घरांच्या भिंती शेणाने सारवलेल्या आणि त्यावर तांदळाच्या पिठाने अंगठयांचे ठसे वापरून चित्रे रंगवलेली. अगदी जुन्या गोष्टींच्या पुस्तकातल्या चित्रात असावा तसा देखणा गाव, हिरापूर. निसर्गसौंदर्याने नटलेल्या ओडिशा राज्यातल्या अनेक खेडयांपैकी एक छोटेसे खेडे. तसे पहिले, तर ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून हिरापूर जेमतेम पंचवीस किलोमीटरवर आहे. पण शहरी बकालपणाचा स्पर्शही ह्या सुंदर गावाला सुदैवाने अजून झालेला नाही. मी हिरापूरला जायचे मुख्य कारण म्हणजे तिथले 64 योगिनी मंदिर. चौसठी जोगिनी मंदिर म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर भारतातील अगदी हाताच्या बोटांवर मोजता येईल अशा योगिनी मंदिरांपैकी एक आहे.
मी सकाळी सात वाजता हिरापूरला पोहोचले. पावसाची चिन्हे दिसत होती. आभाळ अगदी अंधारून आले होते आणि जोराचे वारे सुटले होते. उकाडाही खूप वाढला होता. मी अगदी सकाळी सहा वाजताच जगन्नाथपुरीहून निघाले होते. त्या दिवशी नेमकी एकादशी होती. ओडिशामध्ये पुरीच्या जगन्नाथाच्या उपासनेमुळे एकादशी मोठया प्रमाणावर साजरी होते. इथले बहुतेक लोक वैष्णव आहेत. प्रत्येक ओडिया घरासमोर एक तुळशीवृंदावन असतेच, मग तो तीन मजली बंगला असो वा गवताने शाकारलेली झोपडी.
चौसष्ट योगिनी मंदिराच्या वाटेवरच शिवाचे एक छोटेसे घुमटीवजा देऊळ आहे आणि त्याच्या बाहेरच श्रीविष्णूचे सुंदर पाषाण शिल्प उघडयावरच आहे. आज एकादशी असल्यामुळे तिथे गावातल्या लोकांची गडबड सुरू होती. ओडिशामध्ये अजूनही लोक बऱ्यापैकी भाविक आणि परंपरांचा आदर करणारे आहेत. त्यामुळे गावातले तीन-चार पुरुष छान करवतकाठी धोतर नेसून मूर्तीला तुळशीपत्रे वाहत होते. मी शंकराचे आणि विष्णूचे दर्शन घेतले आणि पलीकडेच असलेल्या योगिनी मंदिराकडे निघाले. तिथलाच एक पंचविशीतला हसतमुख तरुण मी न बोलावताही माझ्याबरोबर आला आणि मला मंदिराची माहिती सांगू लागला.
हिरापूरच्या ह्या योगिनी मंदिराची कीर्ती मी बऱ्याच वर्षांपासून ऐकून होते. एकतर भारतामध्ये चौसष्ट योगिनी मंदिरे खूप कमी आढळतात. मध्य प्रदेशमध्ये खजुराहो आणि जबलपूर येथली योगिनी मंदिरे आणि ओडिशामधली हिरापूर आणि बोलांगीरजवळच्या राणीपूर येथे अशी मंदिरे आहेत. इसवी सनाच्या साधारण सातव्या ते दहाव्या शतकाच्या दरम्यान मध्य, पूर्व आणि उत्तर भारतामध्ये शाक्त पंथ खूप लोकप्रिय होता, त्या काळात बांधलेली ही मंदिरे आहेत. योगिनी मंदिरांचे एक प्रमुख वैशिष्टय म्हणजे ही मंदिरे वर्तुळाकार असतात आणि त्यांना शिखर किंवा छप्पर नसते. आपल्याकडे स्थापत्यशास्त्राच्या प्राचीन ग्रंथांमधून मंदिरांची अशी वर्तुळाकार रचना नोंदली गेली आहे. पण प्रत्यक्षात मात्र 'योगिनी' मंदिरे सोडली, तर वर्तुळाकार मंदिरे फारशी कुठे दिसत नाहीत. मग योगिनी मंदिरांसाठीच हा आकार का वापरला गेला?
तज्ज्ञांचे असे मत आहे की, वर्तुळ हे अव्यक्त अशा प्राणशक्तीचे प्रतीक आहे. स्त्रीच्या गर्भाशयाचे प्रतीक, सर्जनाचे प्रतीक आणि सर्व लयाला गेल्यानंतर उरणाऱ्या शून्याचेही प्रतीक. वर्तुळ कुठून सुरू होते आणि कुठे संपते ते सांगता येत नाही. वर्तुळ म्हणजे शून्य आणि वर्तुळ म्हणजे पूर्ण. म्हणूनच योगिनींची, म्हणजे स्त्रीशक्तीची उपासना करण्यासाठी वर्तुळाहून चांगली रचना कुठली असेल? हिरापूर येथील मंदिरही वर्तुळाकार आहे आणि तिथल्याच पिवळट-काळसर वालुकाश्माच्या ओबडधोबड शिळा एकावर एक रचून घडवलेले आहे.
मंदिरात प्रवेश करायला त्या वर्तुळातून बाहेर आलेले चिंचोळे प्रवेशद्वार आहे आणि मंदिरावर छप्पर नसले, तरी प्रवेशद्वार मात्र वरून बंदिस्त आहे. मंदिराच्या मधोमध एक चौकोनी चंडी मंडप आहे आणि त्याची उंची मंदिराच्या भिंतींपेक्षा जास्त आहे. उंचावरून छायाचित्र घेतले, तर पूर्ण मंदिर एखाद्या शिवलिंगासारखे दिसेल. बाहेरचा गोलाकार आकार म्हणजे योनिपीठ आणि आतला चंडी मंडप म्हणजे शंकराची पिंड. माझ्याबरोबर असलेल्या तरुणानेही मला तेच सांगितले. मंदिराच्या दर्शनी भागावर असलेल्या स्त्री मूर्तीकडे माझे लक्ष वेधत तो म्हणाला, ''ये आठ कात्यायनी हैं।'' त्या आठही मूर्ती अगदी एकसारख्या घडवल्या गेल्या होत्या.
मंदिराची घडण जरी वालुकाश्मात असली, तरी हिरापूरच्या मंदिरातल्या सर्व मूर्ती मात्र काळया पाषाणात घडवलेल्या आहेत. हा दगड मुद्दामहून बाहेरून आणला असावा. मंदिराच्या बाहेर एक प्रदक्षिणा काढून मी मंदिरात शिरले आणि काही क्षण अवाक होऊन बघतच राहिले. मंदिराच्या गोलाकार भिंतीवर जमिनीपासून तीन फुटांवर सुबक कोनाडे केलेले आहेत आणि प्रत्येक कोनाडयात एक अशा योगिनींच्या मूर्ती आहेत. मधोमध चामुंडेश्वरीची मोठी आराध्यमूर्ती आहे, पण सध्या ती मूर्ती पूजेत असल्यामुळे, भरजरी वस्त्रांनी झाकून टाकलेली आहे.
सर्व योगीनींच्या मूर्ती अत्यंत सुरेख आणि सालंकृत आहेत. पायात पैंजण, गळयात कंठा आणि इतर आभूषणे, हातात कंकणे, कंबरपट्टा, कानात गोल कर्णभूषणे इत्यादी अनेक अलंकार योगिनींच्या मूर्तीवर आहेत. प्रत्येकीचा केशकलाप वेगळया पध्दतीचा आहे आणि केसात अनेक आभूषणे आहेत. प्रत्येक योगिनीच्या पायाखाली तिचे वाहन आहे. काही योगिनींनी अलंकार म्हणून सर्प किंवा मानवी मुंडकीदेखील परिधान केलेली आहेत. काही योगिनी द्विभुज आहेत, तर काही चतुर्भुज आहेत. काही योगिनींच्या मूर्ती पशुमुखी आहेत, तर काहींच्या चेहऱ्यावर सुहास्य आहे. एक दात दाखवत विकट हास्य करतेय, तर दुसरी सेविकेने धरलेल्या छत्राखाली सलज्ज उभी आहे. एक हातातला खंजीर उभारून कुणा दैत्याचे निर्दालन करायला धावतेय, तर एक हातात डमरू घेऊन संगीत आणि नृत्यात लीन आहे. एक योगिनी एक पाय वर उचलून स्वत:चे पैंजण बसवत आहे, तर एक योगिनी हातातील धनुष्यबाण ताणून शिकारीच्या पवित्र्यात उभी आहे. एक आहे ती वैनायकी, म्हणजे श्री गणेशाची शक्ती, तर एक आहे नरसिंही, सिंहमुखी. एक आहे चामुंडेच्या स्वरूपातली - भयावह, अत्यंत कृश देह, गाल बसलेले, बरगडयांच्या फासळया बाहेर आलेल्या, बटबटीत मोठे डोळे आणि चेहऱ्यावर विकट हास्य अशी ती मूर्ती आहे, म्हणजे रौद्र, बीभत्सपासून ते लावण्यवती अशा सर्व रूपांमधल्या योगिनींची शिल्पे हिरापूरच्या मंदिरात आहेत. मूर्ती छोटयाशाच आहेत, जेमतेम दीड ते दोन फूट उंचीच्या, पण अतिशय नाजूक आणि प्रमाणबध्द. ह्या मूर्ती थिजलेल्या वाटतच नाहीत, उलट गतिमान वाटतात. असे वाटते की कुठल्याही क्षणी ह्या चालू-बोलू लागतील.
असे म्हणतात की भौम वंशाच्या हिरा नावाच्या राणीने नवव्या शतकात हे मंदिर बांधवून घेतले. पुढे काळा पहाड नावाच्या बंगालमधल्या क्रूर मुसलमानी सेनापतीने ओडिशावर स्वारी करून इथली बरीच मंदिरे, शिल्पे उद्ध्वस्त केली. त्याच्या सैनिकांची वक्रदृष्टी ह्या मंदिरावरही पडली. आज हिरापूरच्या मंदिरातल्या एकूण एक योगिनी मूर्ती उद्ध्वस्त अवस्थेत आहेत. काहींचे हात-पाय तुटलेले, काहींचे चेहरे विद्रूप केलेले, काहींच्या छातीवर घाव घातलेले, पण तरीही मूळच्या मूर्तींचे सौंदर्य आणि तेज लपत नाही. हे मंदिर जवळच्या गावातल्या लोकांना ठाऊक होते, पण योगिनी उपासना आणि तांत्रिक शक्ती उपासना ह्याबद्दल लोकांच्या मनात भीती असल्यामुळे ह्या मंदिरात कुणी जात-येत नव्हते. 1953 साली प्राच्यविद्या संशोधक केदारनाथ महापात्रा यांनी ह्या मंदिराला जगासमोर आणले.
''पेहले यहां आने से लोग डरते थे. क्योंकी यहाँ तामसी उपासना चलती थी, तंत्र की उपासना'' हलक्या आवाजात माझ्याबरोबरचा तो तरुण म्हणाला.
हे मीही वाचले होतेच. विद्या दाहेजिया ह्या संशोधिकेने त्यांच्या 'Yogini Cult And Temples : A Tentric Tradition' या पुस्तकात योगिनी मंदिरांबद्दल, तिथल्या शिल्पांबद्दल आणि ह्या मंदिरांमधून चालणाऱ्या उपासनांबद्दल खूप संशोधन करून विस्तृतपणे लिहिलेय. त्यांनीही ह्या मंदिरांमधून चालणाऱ्या तांत्रिक उपासनांचा उल्लेख केलाय. ह्या चौसष्ट योगिनी म्हणजे शाक्त संप्रदायाच्या देवता. रक्तबीज दैत्याच्या निर्दालनासाठी देवीने युध्द केले, पण त्या दैत्याला असा वर होता की त्याच्या रक्ताचा एक थेंबही जमिनीवर सांडला तर त्यातून नवीन दैत्य निर्माण होईल. तेव्हा त्याचे रक्त पिण्यासाठी म्हणून देवीने चौसष्ट देवता निर्माण केल्या व त्यांच्या साथीने रक्तबीजाचा वध केला, अशी पुराणकथा आहे.
योगिनी म्हणजे स्त्री-शक्ती. सर्जनाची शक्ती निसर्गाने फक्त स्त्रीला बहाल केलेली आहे, नवा जीव निर्माण करायचे सामर्थ्य फक्त स्त्रीकडे आहे. त्यामुळेच अगदी आदिम काळापासून आपल्याकडे मातृशक्तीची उपासना केली गेली. अगदी सिंधू-सरस्वती संस्कृतीपासून भारतात त्याचे पुरावे जागोजागी सापडतात. मातृदेवतेची अनेक रूपे आहेत, सप्त मातृका, सात आसरा, भारतातल्या प्रत्येक खेडयातून पूजल्या जाणाऱ्या आदिम ग्रामदेवता, स्थलदेवता यापासून ते काली, दुर्गा, महालक्ष्मी, सरस्वती इत्यादी देवता ह्या सर्व स्त्री-शक्तीचीच विविध रूपे आहेत. अनादिकालापासून आपल्याकडे स्त्री म्हणजे शक्ती आणि शक्ती म्हणजे स्त्री असे समीकरण चालत आले आहे. म्हणूनच मूर्तिशास्त्रानुसार कोणत्याही देवाची शक्ती दाखवताना ती स्त्री मूर्तीच्या स्वरूपात दाखवली जाते. ह्या योगिनी मंदिरातल्या योगिनी ह्या अमर्याद शक्तीचे प्रतीक आहेत. त्या मुक्त आहेत. योगिनी मंदिरे बिनछपराची का असतात, ह्याचा उलगडा करताना विद्या दहेजिया यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की शक्ती ही अमर्याद असते, तिला आपण बांधून ठेवू शकत नाही आणि योगिनी आभाळात मुक्त संचार करू शकणाऱ्या खेचरी असतात, म्हणून त्यांची मंदिरे वरून मोकळी असतात.
बरीच वर्षे दुर्लक्षित राहिलेले हे मंदिर आता उपासनेत आहे. इथल्या चौसष्ट योगिनींच्या मूर्तींपैकी त्रेसष्ट मूर्ती मंदिरात अस्तित्वात आहेत. एका मूर्तीचा कोनाडा मात्र रिकामा आहे. ती मूर्ती कुठे गेली, कुणी नेली ह्याबद्दल कसलेही पुरावे उपलब्ध नाहीत. ह्या मंदिरात आता पूजा-अर्चा चालते, पण भाविकांच्या मनात आंधळया भक्तीपेक्षा भीतियुक्त आदर जास्त दिसतो. हिरापूरच्या त्या योगिनी मंदिरात काहीतरी गूढ शक्ती होती, हे निश्चित. मी आत गेले, तेव्हा तिथल्या मुख्य मूर्तीपुढे पिवळे धोतर नेसून एक म्हातारा पुजारी पूजा करत होता. मंदिरात मी एकटीच नव्हते. गावातल्या एक-दोन बायका होत्या, एक-दोन पुरुष होते. भुवनेश्वरवरून आलेले एक कुटुंब होते. पुजाऱ्याने खणखणीत आवाजात देवी सूक्त म्हणायला सुरवात केली, आणि पुजाऱ्याच्या वेदपठणाला संगीताची जोड द्यायला म्हणूनच की काय, इतका वेळ वाट पाहणारा पाऊस अचानक सुरू झाला. चांगलाच जोराचा. मंदिराला छप्पर नव्हतेच. हा हा म्हणता पुजाऱ्यासकट आम्ही सगळेच भिजलो. पण आमच्यापैकी कुणीही रेसभरदेखील हलले नाही. त्या तशा पावसात भिजत पुजारी पूर्ण तन्मय होऊन देवी सूक्त गात होता आणि आम्ही सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. त्रेसष्ट योगिनींच्या चेहऱ्यावरचे गूढ हास्य आणखीनच गूढ वाटत होते.
shefv@hotmail.com