संभाजीराव भिडे गुरुजी यांना खुले पत्र

विवेक मराठी    09-Jul-2018
Total Views |
 

 

मा. भिडे गुरुजी,

सप्रेम नमस्कार.

आपणास आणि आपल्या शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यास सोशल मीडियातील आणि वृत्तपत्रांतील बातम्यांमुळे जाणून आहे. कणखर मनगटांची राष्ट्रप्रेमी पिढी तुम्ही घडवत आहात, जातीच्या पलीकडे जाऊन 'आपण केवळ हिंदूच' हे भान निर्माण करत आहात, हे पाहून तुमच्याविषयी आदर वाटत होता. पण... गेल्या काही दिवसांपासून तुमच्याविषयी वाटणाऱ्या आदरास ओहोटी सुरू झाली आहे. कारण आहे मनुस्मृती.

''मनुस्मृती ही सर्वोत्तम घटना आहे'' असे आपण धुळे येथे विधान केलेत आणि काल-परवा तर ''संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ आहे'' असे विधान केलेत. या दोन्ही घटनांबाबत विविध माध्यमांतून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

आपण मनू आणि मनुस्मृतीचा वारंवार उल्लेख का करता? हा जाब विचारण्याचा माझा अधिकार नाही. पण तुमच्या मनूप्रेमामुळे माझ्यासारख्या अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, हे तुमच्या लक्षात आणून देण्यासाठीची ही खटपट आहे.

गुरुजी, आपण पुण्यात वारीदरम्यान ''संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ आहे'' असे म्हणालात. बरोबरच आहे ते, कारण मनूच्या कायद्याने ज्ञानेश्वरांना जातिबहिष्कृत केले होते. तुकोबा वाण्याच्या अभंगाच्या वह्या इंद्रयणीत बुडवल्या होत्या. त्यामुळे मनू श्रेष्ठ ठरतोच गुरुजी. पण आज, देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाल्यावर, आपला देश आधुनिक मूल्यांच्या आधारावर संचलित करणाऱ्या स्मृतीवरच चालतो आहे आणि स्मृतीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी मनुस्मृती बाद केलेली आहे आणि मनूही संपला आहे. मग वारंवार मनूची आठवण कशासाठी?

कदाचित तुम्ही म्हणता तसा मनू श्रेष्ठ असेलही. पण आज आपण घटनात्मक राष्ट्रवाद स्वीकारला आहे आणि घटनेने आपणास समान मत, समान पत बहाल केली आहे, जातिधर्माच्या पलीकडे जाऊन भारतीय नागरिक म्हणून ओळख दिली आहे. ही ओळख अधिकाधिक घट्ट करणे ही काळाची गरज असताना तुम्ही मनुस्मृतीची आठवण कशासाठी काढता? मनुस्मृतीमुळे पोळलेले अनेक समाजगट आज हिंदू समाजात आहेत. त्यांच्या भावनांचा तुम्ही विचार केला आहे का?

गतकाळातील समाजव्यवस्था आणि मनूचे तथाकथित मंडळींनी केलेले समर्थन यामुळे आपला हिंदू समाज विसविशीत झाला, अखंडतेची जाणीव हरवून बसला आणि त्यातून विखंडनास सुरुवात झाली, राष्ट्रात पारतंत्र्य आले हे तुम्हाला माहीत नाही असे कसे म्हणता येईल? तुम्ही सातत्याने राष्ट्रभान जागवण्याचा प्रयत्न करत आहात, त्यासाठी छत्रपती शिवराय, धर्मभिमानी शंभूराजे यांचा आदर्श तरुणांसमोर मांडता आहात. मग असे असताना एकदम मनूची आठवण तुम्हाला का व्हावी?

आज आपल्या राष्ट्रासमोर अनेक आव्हाने आहेत. सीमेवर सैनिक लढतील, पण समाजात चालू असणारी अदृश्य लढाई मनुस्मृतीच्या आधाराने जिंकता येईल की राज्यघटनेच्या मदतीने? हे एकदा विचार करून ठरवा.

गुरुजी, आपले कार्य थोर आहे. त्याची समीक्षा करण्याइतपत मी मोठा नाही. पण समरस समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी काही सकारात्मक कृती करू पाहणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुमच्या मनुस्मृती समर्थनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, हे आपल्या लक्षात येते का? ज्या राष्ट्राला विश्वगुरुपदी बसवण्यासाठी तुम्ही यत्न करता, तेच राष्ट्र तुमच्या मनुस्मृती समर्थनामुळे अस्वस्थ होते, परस्पराकडे संशयाने पाहू लागते याची तुम्हाला जाणीव आहे का?

गुरुजी, घटनात्मक राष्ट्रवाद हाच आजच्या काळातील परवलीचा शब्द आहे. आपणास तो मान्य नसेल, तर तुम्ही तो मान्य करा असा माझा आग्रह नाही. पण आपण मनू, मनुस्मृती अशा विषयांवर बोलून सामाजिक वातावरण गढूळ करू नका, एवढीच विनंती.

आपण, आपली संघटना, संघटनेचे कार्यकर्ते आणि कार्यपध्दती याबाबत मला बोलण्याचा अधिकार नसला, तरी या समाजाचा, या राष्ट्राचा मी घटक आहे म्हणून एवढेच सांगतो की, या समाजाच्या समरसतेपुढे, एकात्मतेपुढे संकट उभे राहील आणि सामाजिक विद्वेषाची ठिणगी पडेल अशी कोणतीही कृती आपण करू नये, एवढीच विनंती.