मसादाच्या कथेला साधारणपणे 1900 वर्षांची पार्श्वभूमी आहे. इस्रायलमध्ये फिरताना अशा प्रकारे काही हजार शतकांपूर्वीचा इतिहास त्यांनी विविध मार्गांनी जतन करून ठेवलेला दिसतो. उत्तरेकडील मृत समुद्राच्याच किनारी 'एन गेडी' नावाचे एक ओऍसिस आहे. तिथे डोंगरात तीन-चार धबधबे आहेत. त्या जागेची व्यवस्थित निगा राखून इस्रायली लोकांनी तिथे पर्यटन स्थळे उभी केली आहेत. यामुळे इतिहास तर जिवंत ठेवला जातोच, त्याचबरोबर महसूलदेखील मिळतो.
जेरुसलेमपासून साधारणपणे 13 मैल पूर्वेकडे आणि समुद्रसपाटीच्या 1300 फूट खाली खाऱ्या पाण्याचे एक तळे आहे. या पाण्यात क्षार प्रचंड प्रमाणावर आहेत. त्यामुळेच या समुद्राच्या पाण्यात काहीच जिवंत राहू शकत नाही. म्हणून त्या खाऱ्या पाण्याच्या तळयाला 'मृत समुद्र' असे म्हणतात. या अतिक्षारांमुळे त्यातील पाण्याची घनता खूप आहे. म्हणूनच मृत समुद्रात माणसे पोहू शकत नाहीत, तर फक्त तरंगतात. ते पाणी आणि त्यातील माती ही विविध क्षारांमुळे औषधी आहे. विशेषत: त्वचेच्या रोगांसाठी मृत समुद्रातील माती खूपच चांगली आणि औषधी आहे. चुकून जरी आपल्या डोळयात किंवा तोंडात मृत समुद्राचे पाणी गेले, तर डोळे प्रचंड चुरचुरतात आणि तोंडात कडूजहर चव येते. पाण्याने स्वच्छ धुतल्याशिवाय डोळे चुरचुरणे थांबतच नाही. आता मृत समुद्रातील पाणी आटत चाललेले आहे. बऱ्याच ठिकाणी जिथे पाणी आटलेले आहे, तिथे मोठमोठाले खड्डे तयार झालेले आहेत. या खड्डयांमुळे ती जमीन अत्यंत धोकादायक झालेली आहे. त्यामुळेच त्या जागांचा वापर शेतीसाठीदेखील करता येत नाही. त्याचे दोन स्वतंत्र भाग झालेले आहेत. उत्तरेकडील भागात खड्डयांचे प्रमाण प्रचंड असल्याने त्या भागातील मृत समुद्राच्या किनाऱ्यावर जाण्यास मनाई आहे. पण दक्षिणेकडील भाग त्या मानाने अजूनही सुरक्षित आहे. त्या ठिकाणीच मृत समुद्राच्या किनाऱ्यावर विविध रिसॉर्ट्स बनवलेली आहेत.
साधारणत: 1946-47मध्ये आणि 1956मध्ये मृत समुद्राच्या काठावरच असलेल्या कुमरनच्या अकरा गुहांमध्ये ज्युईश परंपरांची हिब्रू, अरामाईक, ग्रीक आणि नबाटाईन या भाषांमधील हस्तलिखितांच्या 900पेक्षा जास्त गुंडाळया सापडल्या. कुमरनच्या गुहा या हेलेनिस्टिक काळातील खिरबेत कुमरन या पूर्वेकडील जुडियन वाळवंटात असलेल्या ज्युईश सेटलमेंटच्या जवळ आहेत. साधारणपणे ख्रिस्तपूर्व 100 वर्षे ते ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर 70 वर्षांपर्यंतच्या कालावधीत या हस्तलिखितांचे लेखन केलेले आहे. मुख्यत: हिब्रू बायबलमधील इस्थरच्या पुस्तकातील तपशील, जेनेसिस, ज्युबिली, एक्सोडस, डिनायल, रूथ, जोशुहा अशा अनेक ज्युईश आणि ख्रिश्चन धर्मांचे संबंध दर्शविणारे तपशील या गुंडाळयांमधे आहेत. ख्रिस्तपूर्व 100 वर्षे ते ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर 70 वर्षे या कालावधीत ज्युईश पंथातीलच एसीन्स नावाचा एक पंथ अस्तित्वात होता. या एसीन्स पंथीयांचा संबंध ज्यू लोकांच्या दुसऱ्या मंदिरातील घडामोडी, तत्त्वज्ञान याच्याशी अधिक असे. त्यातीलच मुनी, विचारवंत हे कुमरनच्या गुहांमध्ये वास्तव्यास होते. ज्यू धर्मीयांची मूळ शिकवण कोणती हे शोधणे आणि त्याचा प्रसार करणे हे या पंथीयांचे मुख्य ध्येय होते. असे म्हणतात की राजा हेरॉदच्या मृत्यूनंतर येशू ख्रिस्त इजिप्तमधून आपल्या मातृभूमीत परत आल्यावर या एसीन्स पंथीयांशी जोडला गेला. त्यामुळे या डेड सी स्क्रोलमध्ये जी हस्तलिखिते सापडली, त्यात येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या मूळ शिकवणीचा समावेश आहे. पण त्याचा सध्याच्या बायबलच्या न्यू टेस्टामेंटशी काहीही संबंध नाही.
या सगळया कथा-कहाण्या वादग्रस्त आहेत, कारण पुरातत्त्व खात्याच्या काही संशोधकांचे म्हणणे आहे की यात एसीन्स पंथीय लोकांचा काहीही संबंध नाही. यात येशू ख्रिस्ताच्या मूळ शिकवणीचादेखील काहीही संबंध नाही, असेदेखील अनेक बायबल संशोधकांचे आणि अभ्यासकांचे म्हणणे आहे. या सगळया वादात बरीच वर्षे त्यांचे प्रकाशन रखडलेले होते. पॅलेस्टाइनच्या राष्ट्रीय पुरातत्त्व विभागाच्या प्रदर्शनात यातील बऱ्याच गुंडाळया ठेवण्यात आलेल्या असून संशोधक त्यांचा अभ्यासही करत आहेत. कुमरनच्या गुहांमध्ये आता नुकतीच बारावी गुहादेखील सापडली आहे. त्यातही काही हस्तलिखितांच्या गुंडाळया मिळालेल्या आहेत. या सगळयातून आणि पुरातत्त्व खात्याच्या उत्खननात सापडलेल्या जुन्या अवशेषांमुळे तिथल्या ज्युईश इतिहासाला बळकटीच मिळालेली आहे.
राजा हेरॉद हा एक उत्तम बांधकाम करणारा (करवून घेणारा) होता. त्याच्या हयातीत त्याने जसे जेरुसलेममध्ये ज्यू लोकांच्या दुसऱ्या मंदिराचे बांधकाम करण्यास सुरुवात केली होती, तशीच इतरही अनेक ठिकाणी बांधकामे केली. त्यातीलच एक मसादाचा किल्ला. हा किल्ला मृत समुद्राच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भागाच्या मधोमध आहे. या किल्ल्यावर अरादच्या बाजूनेही जाता येते आणि मृत समुद्राच्या बाजूनेही जाता येते. अरादच्या बाजूने लाइट-ऍंड साउंड शोची व्यवस्था आहे. अरादच्या बाजूने मसादावर चढतच जावे लागते, तर मृत समुद्राच्या बाजूने केबल कारची, तसेच पायऱ्यांचीदेखील सोय आहे. राजा हेरॉदने मसादाचा किल्ला एक उत्तम तटबंदीसाठी म्हणून बांधलेला होता. राजा हेरॉदच्या मृत्यूनंतर त्या भागावर रोमन राजांनी पूर्णपणे कब्जा केला. या विरोधात बऱ्याच भागांतून ज्युईश लोकांनी बंडखोरी केली. येशू ख्रिस्ताला त्या काळातील काही ज्युईश धर्मगुरूंनीच 'हा रोमन साम्राज्याविरुध्द बंडखोरी करून ते उलथवून टाकण्याचा प्रयत्न करतोय' असे सांगून अटक करविली होती.
रोमन लोकांना फक्त त्या भागावर राज्य करण्यात रस होता, ना ज्युईश धर्माच्या उच्चाटनात. पण येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर ज्युईश-रोमन युध्दाच्या शेवटच्या टप्प्यात - म्हणजे साधारण ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर 72 वर्षांनंतर त्या भागातील बऱ्याच ठिकाणी रोमन साम्राज्यवादाविरोधात बंडाळया झाल्या. जितक्या कडवेपणाने या बंडाळया झाल्या, तितक्याच कठोरपणाने रोमन राजांनी त्या चिरडूनही टाकल्या. यातीलच साधारण 15000 ज्युईश बंडखोरांनी (स्त्रिया, पुरुष, लहान मुले, वृध्द) रोमन सैन्याविरुध्द अत्यंत निकराचा लढा दिला. त्यातूनच वाचलेल्या 960 लोकांनी मसादावर आश्रय घेतला. रोमन सैन्याने मसादापर्यंत या बंडखोरांचा पाठलाग केला आणि संपूर्ण मसादाला वेढाच घातला. एकूणच मसादाची चढण आणि बांधणी खूप अवघड असल्याने काही महिने त्यांना मसादाला वेढा टाकूनच थांबावे लागले. या वेढयामुळे मसादावर अन्न-पाण्याची रसद बाहेरून पोहोचत नव्हती. तशातच हे 960 लोक तग धरून होते. मसादावर पाणी साठविण्यासाठी विशिष्ट पध्दतीच्या गुहा केलेल्या आहेत. जो अल्पसा पाऊस त्या भागात पडतो, त्या पावसाचे पाणी डोंगरावरून ओघळत येऊन ठरावीक पन्हाळींच्या द्वारे मसादातील गुहांमध्ये साठविले जात असे. त्याच पाण्यावर हे 960 बंडखोर काही महिने जगले. तोपर्यंत रोमन सैनिकांनी मसादा किल्ल्याच्या भोवती असलेली तटबंदीची भिंत पाडण्यात यश मिळविले आणि मसादावर चढाई करण्यास सुरुवात केली. रोमन सैनिकांच्या हाती सापडण्यापेक्षा या लोकांनी सहज मृत्यूला कवटाळले. ज्या वेळी रोमन सैनिक मसादावर पोहोचले, त्या वेळी त्यांना सर्वच्या सर्व ज्युईश बंडखोर मृतावस्थेत आढळले आणि अन्नधान्याची कोठारे जाळलेली आढळली. असे म्हणतात की मसादावरील ज्युईश बंडखोरांच्या सामूहिक आत्महत्या अतिशय थंड डोक्याने आणि पूर्वनियोजित पध्दतीने केल्या. सर्वात आधी स्त्रिया, वृध्द आणि लहान मुले यांना मारले गेले. नंतर उरलेल्या पुरुषांमधील दोन पुरुषांनी तलवारीने बाकीच्यांचा वध केला. शेवटी उरलेल्या दोघांनी एकमेकांची मुंडकी उडविली.
मसादाच्या या कथेला साधारणपणे 1900 वर्षांची पार्श्वभूमी आहे. इस्रायलमध्ये फिरताना अशा प्रकारे काही हजार शतकांपूर्वीचा इतिहास त्यांनी विविध मार्गांनी जतन करून ठेवलेला दिसतो. उत्तरेकडील मृत समुद्राच्याच किनारी 'एन गेडी' नावाचे एक ओऍसिस आहे. तिथे डोंगरात तीन-चार धबधबे आहेत. त्या जागेची व्यवस्थित निगा राखून इस्रायली लोकांनी तिथे पर्यटन स्थळे उभी केली आहेत. यामुळे इतिहास तर जिवंत ठेवला जातोच, त्याचबरोबर महसूलदेखील मिळतो. आपल्याकडे खरे तर अशा प्रकारे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली अनेक ठिकाणे अगदी रामायणकालीन, महाभारतकालीन ठिकाणे आहेत. पण अशा ठिकाणांचा उल्लेख करण्याचे आपल्याकडे राजकीय भांडवल केले जाते. 600 वर्षांपूर्वीचे, शिवाजी महाराजांच्या काळातील किल्लेदेखील आपण स्वच्छ ठेवू शकत नाही. आपल्याकडे एनगेडीपेक्षाही अतिशय उंचावरची ठिकाणे आहेत. प्रचंड मोठे धबधबे असलेली संपूर्ण देशभरात किमान 1000-1500च्यावर तरी ठिकाणे असतील. आपल्याकडे पर्यटक तिथे जातात आणि प्रचंड घाण करून ठेवतात. ऐतिहासिक कथांची मोडतोड करून विकृत गोष्टी सिनेमांद्वारे दाखविणे याचे पेवच फुटले आहे. आपल्याकडील इतिहासाची मोडतोड नियोजनबध्दपणे केली जाते आहे, याविषयी आपल्यातीलच बरेच जण त्याचे समर्थन करताना आढळतात. गांभीर्याने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे असे का होतेय? याची कारणे शोधली असता त्याचे मूळ शिक्षण पध्दतीत सापडते. पुढच्या लेखात
इस्रायली शिक्षण पध्दतीवर मांडणी असेल.
9742045785