इस्रायल आणि बहाई पंथ

विवेक मराठी    16-Jul-2018
Total Views |


 इस्रायलमध्येच बहाई पंथीयांची दोन मोठी धार्मिक स्थळे आहेत, तरीही बहाई लोकांना इस्रायलचा तीर्थयात्रेसाठीचा व्हिसा कमीत कमी सात दिवसांचा मिळतो किंवा बहाई गार्डन्समध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी एक वर्षाचा मिळतो. एकाही बहाई पंथीयाला इस्रायलमधे नागरिकत्व घेण्याचा अधिकार त्यांच्या पंथानेच दिलेला नाहीये. तरीही जगभरातून येऊन बहाई पंथाचे लोक इसायलमधील त्यांच्या धार्मिक स्थळांची निगा राखत आहेत. हा सगळा भाग मला माझ्या चौकस स्वभावामुळे समजला.

हैफा शहराची ओळख म्हणजे माउंट कार्मेल आणि बहाई टेरेस गार्डन्स. माउंट कार्मेलचा उल्लेख ज्युईश बायबलमध्ये आणि ख्रिश्चन बायबलमध्येदेखील सापडतो. हैफामधील माउंट कार्मेलच्या सगळयात उंच भागात हैफा विद्यापीठ आहे. तिथून जानेवारी महिन्यात माउंट हार्मोन हे गोलन हाइट्समधील हिमाच्छादित शिखर साध्या डोळयांनी दृष्टीस पडते. माउंट हार्मोनचा उल्लेखही दोन्ही बायबलमध्ये आहे. माउंट कार्मेलमधील बहाई टेरेस गार्डन्समधून थोडे उत्तरेकडे भूमध्य समुद्रात पाहिले की आको हे ऐतिहासिक शहर दिसते. हैफामध्ये बहाई टेरेस गार्डन्समध्ये बहाई पंथाचा संस्थापक बाब याची समाधी आहे, तर बहा उल्लाह या दुसऱ्या प्रेषिताची समाधी आको येथे आहे. माउंट कार्मेल हा एक डोंगर नसून ती एक प्रचंड मोठी पसरलेली डोंगररांगच आहे. या डोंगररांगांमधील गुहांमध्ये ज्यू धर्मातील मुनी राहत असत. त्यातीलच एक इलायजा. हे सगळे सांगण्यामागचे मुख्य कारण असे की इस्रायल हे चारही एकेश्वरवादींसाठी अतिशय महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित करणे. 

बहाई टेरेस गार्डनमध्ये एकूण एकोणीस टेरेसेस आहेत. त्या सगळया पायऱ्यांनी जोडलेल्या आहेत. या उतरत्या पायऱ्यांच्या बाजूला अतिशय सममितीमध्ये छान फूलझाडे आणि झरे, कारंजी तयार करून सुंदर असे उद्यान तयार केलेले आहे. डाउन टाउन हैफामधील बेन गुरिअन स्ट्रीटवर उभे राहिले की रात्रीच्या वेळी मनमोहक दिव्यांच्या रोशणाईने सजलेली ही बहाई टेरेस गार्डन्स आपले लक्ष वेधून घेतात. बहाई पंथाचा संस्थापक बाब याचे एकूण अठरा शिष्य होते. त्यांच्या स्मृतीसाठी म्हणून अठरा टेरेस आहेत आणि बाबच्या समाधीच्या टोंबची टेरेस धरून एकोणीस टेरेस होतात. साधारण सन 1800मध्ये पर्शियामधील एका चोवीसवर्षीय तरुणाने तत्कालीन मुस्लीम धर्माला पर्याय म्हणून एक नवीन धार्मिक विचार मांडला. त्यालाच पुढे बहाई पंथ असे म्हणायला सुरुवात झाली. बाबचे खरे नाव वेगळेच, पण अरब भाषेत बाब म्हणजे फाटक. त्याचे असे म्हणणे होते की तो या वेगळया विचारांसाठी एका मुख्य फाटकासारखा आहे. त्या फाटकामुळे नवीन पंथाची दिशा घेऊन पुढचे प्रेषित तयार होतील. अर्थातच वयाच्या 30व्या वर्षी बाबला भर चौकात फाशी देण्यात आले. त्याच्या शिष्यांनी त्याच्या शरीराचे भाग पर्शियामध्येच विविध ठिकाणी लपवून ठेवले.

त्यानंतर काही वर्षांनी बहा उल्लाह नावाच्या एका श्रीमंत माणसाने स्वत:ला बहाई पंथाचा दुसरा प्रेषित असल्याचे घोषित केले. त्यालादेखील अटक झाली आणि विविध तुरुंगांमध्ये डांबण्यात आले. प्रत्येक तुरुंगात बहा उल्लाह त्याच्या सहकारी कैद्यांशी, पहारेकऱ्यांशी बहाई पंथाच्या विचारांविषयी बोलून त्यांना बहाई पंथ म्हणजे काय हे समजावून सांगत असे आणि मग ते सगळे त्याचे शिष्य बनत. याच कारणाने त्याला एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात हलवले जात असे. पण बहाई पंथाचा प्रचार काही थांबत नव्हता. म्हणून शेवटी त्याला हायफाच्या जवळच आको येथील तुरुंगात डांबण्यात आले. तिथे तो त्याच्या आयुष्याची शेवटची तेरा वर्षे होता. प्रत्येक वेळी प्रार्थनेसाठी तो जेव्हा पश्चिमेकडे तोंड करत असे, तेव्हा त्याला हैफामधील माउंट कार्मेल दिसत असे. बहुतांश एकेश्वरवादी धर्मांसाठी माउंट कार्मेल हे अतिशय पवित्र स्थळ आहे. त्यामुळेच त्याने बहाई पंथाचा संस्थापक आणि प्रथम प्रेषित बाब याच्या शरीराचे भाग पर्शियामधून आणून माउंट कार्मेलमध्ये पुरण्यास सांगितले. हळूहळू बहाई लोकांनी त्याच्या समाधीच्या आजूबाजूची जमीन विकत घेऊन तिथे 2001 साली एक छान उद्यान केले.

बहाई गार्डन्स पाहायला गेलो असताना तिथल्या गाईडने हा सगळा इतिहास कथन केला. बहाई पंथाची मार्गदर्शक तत्त्वे सांगताना ती म्हणाली की बहाई पंथ एकेश्वरवादी आहे आणि बाकीच्या एकेश्वरवादी धर्मांसारखाच एक देव मानतो. या पंथात स्त्री-पुरुष समानता, अहिंसा, असत्य न बोलणे अशी तत्त्वे सांगितली आहेत. बहाई पंथाचे पुस्तक सगळे आपापल्या भाषेत वाचू शकतात. कोणीही जन्माने बहाई असू शकत नाही. बहाई पंथात येण्यासाठी ती व्यक्ती वयाने किमान 15 वर्षे पूर्ण असावी लागते आणि बहाई पंथात प्रवेश करताना किमान दोन साक्षीदार (अर्थातच बहाई पंथाचे) लागतात. नवीन वर्ष नवरोजच्या दिवशी (पारसी नववर्षाच्याच दिवशी) साजरे होते. बहाई पंथीय जगभरात पसरलेले आहेत. साधारणपणे सव्वाशे वर्षांपूर्वी मुसलमान धर्मातील मारकाटीची परंपरा दूर सारण्यासाठीच मुसलमान धर्मातून निघालेला बहाई हा एक पंथ आहे. बहाई होण्यासाठी तुम्ही धर्मांतर किंवा फेथमध्ये बदल करता.

इस्रायलमध्येच बहाई पंथीयांची दोन मोठी धार्मिक स्थळे आहेत, तरीही बहाई लोकांना इस्रायलचा तीर्थयात्रेसाठीचा व्हिसा कमीत कमी सात दिवसांचा मिळतो किंवा बहाई गार्डन्समध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी एक वर्षाचा मिळतो. एकाही बहाई पंथीयाला इस्रायलमध्ये नागरिकत्व घेण्याचा अधिकार त्यांच्या पंथानेच दिलेला नाहीये. तरीही जगभरातून येऊन बहाई पंथाचे लोक इस्रायलमधील त्यांच्या धार्मिक स्थळांची निगा राखत आहेत. बाबचा टोंब हा बहाई टेरेस गार्डनच्या मध्यावर आहे. त्या भागाच्या खाली नऊ  टेरेसेस आहेत आणि वर नऊ टेरेसेस आहेत. बहाई टेरेस गार्डन्समध्येच बाबच्या समाधीच्या बाजूलाच बहाई विचारसरणीच्या तत्त्वज्ञानाच्या साहित्याचे मोठे ग्रंथालयदेखील केलेले आहे. अर्थातच तिथे फक्त बहाई पंथीयांनाच प्रवेश आहे. बहाई टेरेस गार्डन सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू असते, पण फक्त बहाई लोकांसाठी. जे बहाई नाहीत, अशांना फक्त ठरावीक दोन तास, तेसुध्दा ठरावीक भागांतच प्रवेश करण्याची मुभा आहे. या सगळयाचे कारण जेव्हा मी तिथल्या जेमतेम विशी पार केलेल्या ऑॅस्ट्रेलियन स्वयंसेवकाला विचारले, तेव्हा त्याने हे सर्व सांगितले. इस्रायलमध्ये आधीच तीन एकेश्वरवादी धर्मांच्या गुंत्यामुळे अस्वस्थता आहे. अरब-ज्यू संघर्ष पेटलेला आहे. याच कारणासाठी बहाई पंथातील वरिष्ठांनी हा नियमच घालून दिला की बहाई पंथातील व्यक्ती फक्त दोन कारणांसाठीच इस्रायलमध्ये प्रवेश करू शकतील. हे इस्रायली सरकार पाळते.

बहाई पंथातील काही धनाढय व्यक्तींनी भरपूर रक्कम दान करून माउंट कार्मेलमधील बहाई टेरेस गार्डन्स आणि आकोमधील बहाई गार्डन्स जिथे आहेत, त्या जागा विकत घेतल्या. हळूहळू जगभरातील बहाईंनी दिलेल्या देणग्यांच्या आधारे आणि स्वयंसेवक सेवेच्या आधारे ही दोन धार्मिक स्थळे अतिशय सुंदर, नेत्रसुखद अशी तयार करून मेन्टेन केलेली आहेत. आपल्याकडे दिल्लीला जे लोटस टेंपल आहे, ते बहाई मंदिरच आहे. एकूण सगळया धर्मांच्या ऐतिहासिक स्थानांत हिंदू धर्माचा क्रमवारीत सगळयात जुना (साधारण 10,000 वर्षांच्या आसपास) धर्म म्हणून वर्णी लागते. एकेश्वरवादी धर्मांमध्ये ज्यू धर्म साधारण 4000 वर्षे जुना, ख्रिस्ती धर्म साधारण 2000+ वर्षे जुना, तर मुसलमान धर्म साधारण 1300 ते 1400 वर्षे जुना आणि बहाई सगळयात नवीन - म्हणजे 125 वर्षे जुना आहे. विशेष म्हणजे या एकेश्वरवादींचे धार्मिक/आध्यात्मिक बळ इस्रायलसारख्या अत्यंत छोटया देशात एकवटलेले आहे.

जेरुसलेमचा अर्थ जरी 'शांततेची स्मृती असणारे स्थान' असा असला आणि सगळे इस्रायली एकमेकांना 'शलोम' म्हणजे शांतता असे म्हणून अभिवादन करत असले, तरी आज सत्य परिस्थिती अशी आहे की तिथे अशांतताच आहे. या अशांततेची कारणमीमांसा करावयास गेले, तर बहाई पंथ सोडला तर इतर तीन धर्मांच्या माध्यमातून बाहेर पडलेली असहिष्णुता, धार्मिक आक्रमकता असेही म्हणता येईल. बहाई पंथीय लोक अतिशय शांत आणि सहिष्णू दिसतात/असतात. याचे एक कारण म्हणजे ती त्यांनी पूर्ण विचार करून स्वीकारलेली विचारसरणी आहे. दुसरे कारण म्हणजे त्या विचारसरणीमध्येच आक्रमकता नाहीये. ख्रिस्ती धर्मात विकसनशील देशांत जाऊन बिगर ख्रिस्ती लोकांचे धर्मांतर करणे यात ही आक्रमकता दिसून येते. ही आक्रमकता मुसलमान धर्मात तलवार, बंदूक आणि बाँबच्या जोरावर सर्व जगात थैमान घालताना दिसते. ज्यू धर्मीय यातील काहीही करत नसले, तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ती आक्रमकता आहे. या सगळयाचे कारण म्हणजे या सगळयांची आक्रमक धार्मिक विचारसरणी. 'इस्रायली व्यक्तिमत्त्व' या पुढील लेखात याविषयी मांडणी असेल.

-9742045785

aparnalalingkar@gmail.com