बहुगुणी धणे

विवेक मराठी    12-Jul-2018
Total Views |



 

 धणे/कोथिंबीर ही दैनंदिन जीवनातली किरकोळ समजली जाणारी गोष्ट आहे. पण या किरकोळ गोष्टीचा उपयोग आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी होऊ शकतो. मसाले, चटण्या, पदार्थ, मुखशुध्दी असो की वैद्यकीय उपयोग असो, एकच नाही तर अशा अनेक आघाडयांवर धणे जणू 'विजयी भवं' असा आशीर्वाद घेऊन वावरणाऱ्या विजयी वीराप्रमाणे वावरतात. अनेक आजारांवर धणे आणि कोथिंबीर उपयोगी आहे हे जाणवल्याने, यावर संशोधन जोमाने सुरू आहे.

'तुझी मसालायात्रा वाचत असताना मिसळणाचा डबा आणि आजीचा जुना बटवा जास्तच जवळचा वाटायला लागलाय' असा सुरेख मेसेज एका वाचकताईंनी ईमेलमधून पाठवला. मेसेज वाचताना जाणवलं की पूर्वापार चालत आलेल्या अनेक गोष्टी हल्ली इन्स्टंटच्या जमान्यात आपल्या दैनंदिन जीवनातून पटापट हद्दपार होताहेत. मला आठवतंय, मी लहान असताना उन्हाळयाच्या दिवसांत उन्हाळी लागेल म्हणून आजी आणि आई धणे-जिरे पाण्यात घालून रात्री भिजत ठेवायच्या. सकाळी ते पाणी, खडीसाखर घालून प्यायला मिळायचं. खूप मजा वाटायची तेव्हा. पुढे वय वाढलं आणि आजी कापसाच्या पांढऱ्या म्हातारीसारखी अलगद तरंगत निघून गेली आणि जड होऊन भांडयाच्या तळाशी बुडालेल्या धण्याच्या आठवणी मागे राहिल्या. ईमेलमधून आलेला तो मेसेज वाचून आजीच्या आठवाने उन्हाळयात डोळयांनाही घाम आला. म्हणूनच आजची मसालायात्रा आजीच्या हमखास उपायाची, उन्हाळयात थंडावा देणाऱ्या धण्याची.

मला कायम वाटतं की धणे माहीत नाहीत किवा पाहिले नाहीत अशी व्यक्ती औषधालाही शोधून मिळणार नाही. जगभर खाण्याच्या पदार्थांमध्ये सढळ हस्ताने वापरले जाणारे धणे भारतीय मसाल्यांचा जणू जीवच आहे. धणे पावडरच बहुतांश मसाल्यांचा बेस असते. मसाले, चटण्या, पदार्थ, मुखशुध्दी असो की वैद्यकीय उपयोग असो, एकच नाही तर अशा अनेक आघाडयांवर धणे जणू 'विजयी भवं' असा आशीर्वाद घेऊन वावरणाऱ्या विजयी वीराप्रमाणे वावरतात. गाजराच्या एपीएसी (Apiaceae फॅमिली) कुटुंबातील हे झुडूप आपल्या कॉरिएंड्रम सातिवम (Coriandrum sativum) या शास्त्रीय नावाने ओळखलं जाण्यापेक्षा धनिया या लोकप्रिय नावाने ओळखलं जात. भारतीय मसाल्यांमधल्या बहुतेक सुगंधी आणि प्रफुल्लित करणाऱ्या वासाचं कारण यात असणारा लिनॅलूल नावाचा पदार्थ, ज्या घटकामुळे या मसाला घटकांना एक विशिष्ट गंध तयार होतो. याआधी आपण तमालपत्र, दालचिनीच्या पडावात या लिनॅलूलबद्दल वाचलं होतच. या लिनॅलूलमुळे पानाला एक विशिष्ट गंध तयार होतो. पानं वाळल्यावरही हा गंध येतच असतो. धण्याची ही गंधयुक्त पानं म्हणजेच कोथिंबीर, जिच्यामुळे अनेक पदार्थांना वेगळीच हवीहवीशी खुमासदार चव येते. अनेकांना आजही माहीत नसतं की कोथिंबिरीच्या बिया म्हणजे धणे किंवा धण्याची पानं म्हणजेच कोथिंबीर. भारतीय खाद्यपदार्थांची चव वाढवणारे हे धणे भारतीय वंशाचे नाहीत, हेही बहुतेकांना माहीत नसतं. हिंगाच्या प्रांतातून, म्हणजेच मूळ इराणच्या प्रांतातून धणे जगभर नेले गेले आणि नेल्या घरी सुखाने नांदायला त्यांनी सुरुवात केली.

मानवी वापरात धणे आढळण्याचे धागेदोरे थेट मध्ययुगातल्या मेसापोटेमियाच्या उत्खननात जुळले आहेत. मृत समुद्राच्या जवळ इस्रायलमध्ये सापडलेल्या 'नहल हेमर' या गुहेत उत्खननादरम्यान सापडलेल्या मातीच्या भांडयांमध्ये धण्याचे फोडलेले बारा दाणे आढळून आलेत. या निओलिथिक काळात मानवाने मातीची भांडी वापरायला सुरुवात केल्याचं आपण शाळेत शिकलेलं असतोच. शेतीची सुरुवातही याच काळात झाली, असं शास्त्रज्ञ म्हणतात. त्याच काळात सापडलेले हे धणे मानवी वापराची पहिली अधिकृत नोंद. त्यानंतर अर्थातच इजिप्तमध्ये तुतांखामेनच्या कबरीच्या उत्खननात भांडं भरून अखंड धणे बिया आढळून आल्या. हिंगाचं झुडूप जंगली अवस्थेत उगवतं. मात्र धणे कसेही कुठेही जंगली अवस्थेत वाढत नाहीत. याचाच अर्थ जुन्या इजिप्तमध्ये धण्याची शेती केली जायची. पश्चिम आशियातून इजिप्तसारख्या आफ्र ो-आशियाई देशात स्थिरावलेले धणे दर्यावर्दी आणि प्रवासी लोकांनी सोबत नेऊन इतरत्र रुजवले. हजारो वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात धणे आणले गेले आणि मानवी वापरात रुळले. आयुर्वेदाला या साध्याशा उग्र वासाच्या बीचं महत्त्व जाणवल्याने यांची लागवड करून स्थानिक वापर सुरू झाला. धणे हा शब्द जरी उच्चारला, तरी त्याचा तो एक विशिष्ट उग्र वास लगेच आठवतो. उग्र वास ही ओळख बाळगणाऱ्या धण्याला जर पूर्ण वाढू दिलं, तर त्याचं चक्क दोन फुटांपर्यंत वाढणारं झुडूप बनतं. वितीपेक्षा जास्त मोठया झालेल्या कोथिंबिरीच्या काडीला आपण जून झालीय म्हणून नाक मुरडून निव्वळ वरवरची पानं खुडून घेऊन देठ फेकून देतो. मात्र कोथिंबिरीच्या औषधी वापरात या देठाला अपार महत्त्व दिलं गेलंय. 

धणे आख्खे असो की दळलेले, कच्चे असो की भाजलेले, भिजवलेले असो की अंकुरलेले, त्याचे औषधी गुणधर्म नष्ट होत नाहीत. धण्याला दळताना कायम त्यात असलेला तेलाचा मोठा अंश जाणवतो. दाताखाली चावून बघितल्यास यांची चव किंचित गोडसर तुरट लागते. जणू संत्र्याची साल चावल्यासारखी लिंबू वर्गातल्या फळांच्या जवळ जाणारी ही चव अनेकांना आवडत नाही. अनेकांना कोथिंबिरीत ही चव जणू साबणाच्या ओशट चवीसारखी वाटते. याचं कारण म्हणजे यात नैसर्गिकरित्या असलेला aldehydes नावाचा पदार्थ, जो साबणातही वापरला जातो. मी उल्लेखलंय तसं धणे सर्व प्रकारात वापरता येतात. भारतीय उपखंडात धण्यांचा वापर मुख्यत्वे मसाले आणि मग औषधी वापरासाठी केला जातो. धणे अ, ब आणि क जीवनसत्त्व, लोह, मॅगेनीजसंपन्न असल्याने तोच गुणधर्म कोथिंबिरीतही उतरतो. धण्याचं बारमाही रुजणार झुडूप आपल्या पंखाकृती पानांमुळे कायम वेगळं दिसतं. जगभर कोथिंबिरीची पानं, जाड झालेला दांडा, मुळं वापरात आणली जातात. पारंपरिक औषधांमध्ये कोथिंबिरीचा आणि धण्यांचा वापर एक डझनाहून जास्त रोगांवर केला जात असल्याने जगभर त्यांची कायम मागणी असतेच. याच कारणाने, सर्वात जास्त पिकवलं जाणारं हे झुडूप कायम महागच मिळतं. जगभर धण्याच्या काही जाती उपलब्ध आहेत. भारत आणि परिसरात आढळणारे धणे हे जाड फुगीर असतात आणि यातून येणारं झुडूपही खूप मोठं नसतं. साधारण उन्हाळयाच्या मध्यावर धण्याच्या झुडपाला गुच्छात फुलं येतात. ही फुलं जणू लहानशा छत्रीसारखी दिसतात. ही लहानसर पांढरी फिकट गुलाबी रंगाची फुलं 'उंबेल' म्हणून ओळखली जातात. या शब्दाचा अर्थ आहे छत्रीसारखी पसरट. आपल्याकडे फुलं आलेली कोथिंबीर घेणं आपण टाळतो. मात्र युरोपिअन आणि अमेरिकन स्वयंपाकात या फुलाला खाण्यात महत्त्व दिलं गेलंय. ही फुलं ताजी असताना खाणं अतिशय आरोग्यदायक समजलं जातं. गम्मत म्हणजे कोथिंबिरीच्या फुलांचा उपयोग अमेरिकेत नैसर्गिक कीटकनाशक म्हणून केला जातोय, हे आपल्या गावीही नसतं. पुढे याच फुलांमधून बिया धरून त्यांचे धणे बनतात.

धणे/कोथिंबीर ही दैनंदिन जीवनातली किरकोळ समजली जाणारी गोष्ट आहे. पण या किरकोळ गोष्टीचा उपयोग आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी होऊ शकतो. कुठल्याही अतिआनंदाने, नैराश्याने येणारी अधीरता, नैराश्य दूर करण्यासाठी या धण्यांचा वापर केला जातो, हे आपल्या गावीही नसतं. पोटाचे सुमारे मुख्य आठ आजार यांच्या वापराने दूर ठेवले जातात. अलीकडेच, मानवी शरीरातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि स्मृतीनिगडित आजारांवर धणे आणि कोथिंबीर उपयोगी आहे हे जाणवल्याने, यावर संशोधन जोमाने सुरू आहे. खाद्यपदार्थांच्या वापरामध्ये याचा उपयोग सगळे जाणत असल्याने मी त्यावर लिहिणार नाहीये. इराणसारख्या देशांमध्ये आणि युरोपमध्ये धण्यांच्या चवीने सिध्द केलेली वाईन पारंपरिक आणि महाग म्हणून ओळखली जाते. बहुगुणी, बहुऔषधी अशा धण्याबद्दल बोलायला, लिहायला खूप आहे, पण मी जास्त लिहिण्यापेक्षा तुम्ही स्वत: शोधून वाचून अनुभवल्यास उत्तमच. जाता जाता धण्याच्या इंग्लिश नावाच्या उत्पत्तीबद्दलची गम्मत सांगते. याचं इंग्लिश नाव 'कॉरिएंड्रम' हे जुन्या फ्रेंच शब्द कोरिआंद्रे या शब्दावरून घेतलंय. या कोरिआंद्रेमागचा इतिहास म्हणजे फ्रेंचांनीही हा शब्द जुन्या ग्रीक भाषेतून घेतलाय. जुन्या ग्रीक भाषेत 'कोरी' म्हणजे वास असणारा लहान किडा. म्हणजे धण्याला येणाऱ्या उग्र वासावरून हे नाव ठेवलं गेलं होतं.

कुणी घाण म्हणो की छान, मला धण्यापासून बनलेली ती धणादाल मुठी भरून खायला आवडते आणि कोथिंबिरीचा वास आला की डायरेक्ट ओली भेळ आठवते. 

roopaliparkhe@gmail.com